অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकऱ्यांची प्रगतीकडे वाटचाल

पाटण तालुक्‍यात शाश्‍वत शेती कार्यक्रम

सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्‍यातील चार दुर्गम, डोंगराळ व पर्जन्याधारित गावांत कृषी उत्पादकतेत शाश्‍वत वाढ करण्यासाठी जिरायती शाश्‍वत शेती कार्यक्रम राबविण्यात आला. शेतीतील सुधारित तंत्रज्ञान त्यातून शेतकऱ्यांना उपलब्ध झाले, दुधाळ जनावरांच्या सुधारित जाती उपलब्ध झाल्या. शेताच्या बांधापर्यंत पाणी पोचले. त्यातून पीकपद्धती विस्तारता आली. 

सातारा जिल्ह्यात कराड शहरापासून श्री क्षेत्र नाईकबा देवस्थानकडे जाताना काढणे, बागलवाडी, मानेगाव व करपेवाडी ही गावे लागतात. सरासरी सुमारे 1200 मिलिमीटर पाऊस या भागात बरसतो. दुर्गम व डोंगराळ परिस्थितीत हलक्‍या व मध्यम स्वरूपाच्या शेतीवर या गावांमधील शेतकऱ्यांची गुजराण चालते. खरिपात भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, भात, तर रब्बीत गहू, हरभरा, ज्वारी, तर नगदी म्हणून ऊस ही या गावांमधील पीक पद्धत आहे. गावालगत वांग नदीवर केटी वेअरमुळे पाणी साठल्यामुळे विहीर व कूपनलिकांच्या आधारावर शेती सिंचनाखाली आहे.

प्रकल्पापूर्वीची स्थिती


सन 2011-12 मध्ये संबंधित गावांत कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिरायती शाश्‍वत शेती कार्यक्रम हाती घेण्यात आला. यापूर्वी या गावांमध्ये एकूण क्षेत्रापैकी सुमारे 65 टक्के क्षेत्र जिरायती होते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची तसेच भूधारण क्षेत्रही अल्प आहे. शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जोखमीचे असते व पावसाळा व्यतिरिक्त अन्य हंगामात पाणीटंचाई भासते, त्यामुळे भागातील बहुतांशी जनता पुणे व मुंबईला नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक आहे. दुर्गम व डोंगराळ भागात शेतीला पाणी पोचविण्याची साधने अद्याप विकसित झालेली नाहीत. शेतीला तंत्रज्ञानाची जोड नव्हती. देशी पशुधन जोपासले जायचे. या सर्व गोष्टी अभ्यासून काढणे, बागलवाडी, मानेगाव व करपेवाडी ही गावे कार्यक्रमासाठी निवडण्यात आली.

शेतकऱ्यांचे गट स्थापन

पाण्याची शाश्‍वत व्यवस्था करणे, दुग्धविकास, पीकबदल, आधुनिक तंत्रज्ञान प्रसार वाढ या घटकांवर कार्यक्रमात भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शरद दोरगे, तंत्र अधिकारी भरत अर्जुगडे, मंडल कृषी अधिकारी बी. एस. पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. वेळोवेळी चर्चासत्रे घेऊन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्यात आले. शेतकऱ्यांचे सुमारे 10 ते 11 स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले. गटांमार्फत बियाणे, खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीडनाशके पन्नास टक्के अनुदानावर एकत्रित घेण्यात आले.

कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्टे

  • भागात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त, त्यामुळे किमान 20 गुंठे व कमाल 100 गुंठे क्षेत्रधारक अशा 100 शेतकऱ्यांची व सुमारे 100 हेक्‍टर क्षेत्रावर कार्यक्रम राबवला.
  • 50 टक्के शासन हिस्सा व लाभार्थीकडील 50 टक्के हिस्सा
  • खरिपात भात, सोयाबीन, भुईमूग तर रब्बीत गहू, हरभरा आणि रब्बी ज्वारीत लावणीपासून काढणीपर्यंत कृषी विद्यापीठ शिफारशीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, संतुलित खतांचा वापर.
  • पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेची ओळखही शेतकऱ्यांना झाली.
  • पिकांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना अनुभवण्यास मिळाली.
  • 95 लाभार्थी शेतकऱ्यांना पंढरपुरी व मुऱ्हा म्हशी तसेच होलस्टिन फ्रिजिअन गायी देण्यात आल्या. 50 टक्के लाभार्थी हिस्सा घेऊन पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथून जनावरे खरेदी करण्यात आली.
  • जनावरांच्या उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी 62 शेतकऱ्यांना कडबाकुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले.

फायदे असे दिसून झाले

1) पाणी व्यवस्थापन घटकांतर्गत तीन व पाच अश्‍वशक्तीच्या 18 मोटारींचा शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यातून 25 एकर क्षेत्र ओलिताखाली आले. जमिनीचे अधिक क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी 85 शेतकऱ्यांना पाइपलाइनचा लाभ देण्यात आला. आणखी 85 ते 90 एकर जिरायती क्षेत्र बारमाही पाण्याखाली आले.

2) शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीची आवड निर्माण करण्यासाठी 50 गांडूळखत युनिटचे वाटप करण्यात आले. याद्वारे प्रति युनिट वर्षाला चांगल्या प्रतीचे 2 ते 3 टन खत उत्पादित होऊ लागले. यामुळे रासायनिक खतांच्या वापरात बचत होण्याबरोबर पिकाच्या गुणवत्तेतही वाढ झाली.
3) लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार पीक उत्पादन वाढीसाठी खत व पाण्याच्या नियोजनाचा अहवाल उपलब्ध झाला.
4) पीक उत्पादनात सुमारे सव्वा पटीपर्यंत वाढ झाली.

मानेगाव, करपेवाडी, बागलवाडी व काढणे या गावांत 2011-2012 मध्ये राबवण्यात आलेल्या जिरायती शाश्‍वत शेती कार्यक्रमामुळे शेतकरी सुधारित पीक पद्धतीकडे प्रवृत्त झाले. जातिवंत जनावरांचे संगोपन वाढल्याने दूधनिर्मिती झाली. कडबाकुट्टीच्या वापरामुळे हिरव्या चाऱ्याच्या वापरात 50 टक्के बचत झाली.
प्रदीप गायकवाड-9423862951.
कृषी पर्यवेक्षक

कार्यक्रमांतर्गत कडबाकुट्टी यंत्र उपलब्ध झाले. पूर्वी दुग्ध उत्पादनातून महिन्याकाठी दोन हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. जातिवंत जनावरे मिळाल्यामुळे तेच उत्पन्न चार हजारांपर्यंत पोचले आहे. पाणी शेतापर्यंत आल्याने यंदाच्या उन्हाळ्यात झेंडू, काकडी, भुईमूग, वांगी ही पिके घेता आली. त्यातून 30 हजार रुपयांचा नफा मिळाला.
मधुकर पाटील - 9923854200.
लाभधारक शेतकरी, काढणे.

कार्यक्रमांतर्गत मला पशुधन खरेदीसाठी मदत झाली. जातिवंत व दुधाळ गायी-म्हशी मिळाल्याने यापूर्वी कासंडीमधून डेअरीला विक्रीसाठी जाणारे दूध आता दररोज कॅनद्वारा 18 लिटरपर्यंत जाऊ लागले आहे. पूर्वी दुग्ध व्यवसायातून महिन्याला पंधराशे रुपये मिळायचे. आता त्याहून अधिक उत्पन्न मिळत आहे.
भागातील शेतकऱ्यांना पूर्वी सोयाबीनचे एकरी 8 क्विंटलपर्यंत मिळणारे उत्पादन 11 क्विंटलपर्यंत तर भाताचे आठ क्विंटलवरून 15 क्विंटलपर्यंत पोचले आहे. अधिक माने - 9823888879.
मानेगाव

कोरडवाहू शाश्‍वत शेती कार्यक्रमांतर्गत पाइपलाइन करता आली. याद्वारा आडसाली उसाची लागवड केली. 62 गुंठ्यांपैकी 12 गुंठ्यांतील ऊस बेणे म्हणून विकला. प्रति गुंठा साडेपाच हजार रुपयांप्रमाणे विक्री केली. उर्वरित 50 गुंठ्यांतून सुमारे 110 टन ऊस उत्पादित झाला.
रघुनाथ बाळू मोरे, मानेगाव.

पाइपलाइनच्या सुविधेमुळे माझे साडेचार एकर क्षेत्र ओलिताखाली आले. बागायतीसह नगदी पिकांचे नियोजन शक्‍य झाले आहे.
श्रीमती कुसुमताई करपे- 9545891090.
कृषिभूषण शेतकरी, करपेवाडी

-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate