অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बारमाही पाण्याची झाली सोय

बारमाही पाण्याची झाली सोय

"सकाळ" व ग्रामस्थांची साथ ठरलीय प्रेरणादायी

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील काराजनगी (ता. जत) या जतपासून चौदा किलोमीटर असणाऱ्या छोट्याशा गावात 'सकाळ रिलीफ फंड' व ग्रामस्थांच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे तलावात बारमाही पाणीसाठा झाला आहे. याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे. सकाळ रिलीफ फंड, तनिष्का गट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून सदैव कोरड्या राहणाऱ्या तलावात आता चांगला पाणीसाठा झाला आहे.

राज्यातील सर्वांत मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या जत तालुक्‍यातील (जि. सांगली) काराजनगी हे दुष्काळी गाव. जतपासून चौदा किलोमीटरवर असलेल्या या गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. गावात तब्बल 142 विहिरी, नऊ हातपंप, पाणीपुरवठा योजना, दोन पाझर तलाव आहेत. पाण्याच्या सोयीबाबत जलस्रोतांची आकडेवारी पाहिल्यास गावात पाण्याची अडचण नसावी असं चित्र प्रथमदर्शनी समोर येतं; पण चित्र नेमके उलट आहे. काही जलस्रोत सोडले, तर या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उभरली होती. बहुतांश जलस्रोत आटले होते. आश्‍चर्य म्हणजे गावात मध्यभागी हनुमान मंदिरामागे सुमारे चार फूट खोलीचा झरा आहे. त्याला बारमाही पाणी असते; पण ते पाणी इतके खराब आहे, की त्याचा वापर खर्चालाही होऊ शकत नाही.
गावात पाच एकरपेक्षा जास्त शेती असणारे सुमारे तीनशे शेतकरी आहेत. एकूण साडेपाचशे खातेदारांपैकी निम्मे शेतकरी हे पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले आहेत; पण शेतीच्या दृष्टीने गावात फारसा उत्साह दिसत नाही. याला कारण म्हणजे सिंचनाचा अभाव हेच होते.

गावच्या ग्रामस्थांनी दाखविली एकी... "सकाळ'चे मिळाले बळ

दोन वर्षांपूर्वी सकाळ माध्यम समूहाने काराजनगी गाव दत्तक घेतले. तिथे लोकसहभागातून श्रमदान झाले. गावापासून दीड किलोमीटरवर असणारा गडाणी हा मोठा तलाव व गावाशेजारील छोटा तलाव अशा दोन्हींतील गाळ काढण्यात आला. त्यातून किमान खर्चासाठी तरी पाणी मिळण्याची सोय या निमित्ताने गावाला झाली.
'सकाळ'ने गावनिश्‍चितीपूर्वी परिसराचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतरच काराजनगी येथे काम करण्याची अधिक संधी असल्याचे लक्षात आल्यावर "सकाळ'ने हे गाव दत्तक घेण्याच ठरविले. ग्रामस्थांना याची कल्पना देण्यात आली. ग्रामस्थांची एकी करण्यास बरीच मेहनत घ्यावी लागली. होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांबाबत त्यांच्यात विश्‍वास निर्माण करावा लागला. ज्या दिवशी कामाचा प्रारंभ झाला. त्या दिवसापासूनच गावातील ग्रामस्थांनी एकीचे प्रत्यंतर घडवले. गावातील तलावातील गाळ काढण्यास त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. भर उन्हात गावच्या विकासासाठी महिलांनीही ट्रॉलीमध्ये मुरूम टाकत झपाटून काम सुरू केले. सकाळ समूहाचे अर्थसाह्य व ग्रामस्थांच्या एकीच्या माध्यमातून काम तातडीने पूर्ण झाले.

तलावात पाणी तर गावकऱ्यांत उत्साह भरला

दोन्ही तलावांतील गाळ काढल्यानंतर वळवाच्या पावसाने पहिल्यांदाच गेल्या वर्षी दोन्ही तलाव पूर्ण भरले. हे तलाव भरल्यानंतर ग्रामस्थांत मोठा उत्साह संचारला. हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी गावांतील विहिरी, कूपनलिकेचे पाणी वाढण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. याचा फायदा साहजिकच झाला.

गाळमुक्त तलावामुळे साचले पाणी

गडाणी तलावाच्या शेजारी चार ते पाच विहिरी आहेत, तसेच काही कूपनलिकाही आहेत. या तलावात पाणी साठून राहिल्याने त्याचा फायदा शेजारील विहिरींची पाणीपातळी वाढण्यावर झाला आहे. गाळामुळे तलाव भरून गेल्याने पाणी फारसे साठत नव्हते; पण आता तलाव गाळमुक्त झाल्याने पाणी साठून राहते.

तनिष्का गटातून जनजागृती

गावात सकाळ तनिष्का उपक्रमाद्वारा महिलांचे तीन गट तयार झाले आहेत. गावातील अनेक महिला या गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. एकत्र काम केल्यास गावाचा फायदा होऊ शकतो. या दृष्टीने गटातील सदस्यांनी गावांतील अन्य महिलांना प्रोत्साहित केले.

सात हेक्‍टरवर नवीन झाडांची लागवड

तलावाच्या आजू-बाजूच्या सात हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन झाडे गेल्या वर्षी लावण्यात आली आहेत. आंबा, निलगिरी, डाळिंब आदीसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे वन तयार करून तलावाभोवती वनराई फुलविण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीच्या वतीने होत आहेत. दुर्लक्षिलेल्या दुष्काळी काराजनगी या दुष्काळी गावच्या दृष्टीने ही वनराई फुलल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.

पाणीसाठा झालाय दुप्पट

दोन्ही तलावांतील गाळ काढल्यानंतर काही दिवसांतच या परिसरात वळवाचा जोरदार पाऊस झाला. यापूर्वी वळवाचा पाऊस झाला, तरच  पाणी साचायचे; पण प्रचंड गाळ असल्याने काही दिवसांतच पाणी आटायचे. याचा फायदा कोणालाच व्हायचा नाही. यामुळे तिकडे कोणाचे लक्षही नव्हते. दहा ते पंधरा दिवसांतच पाण्याचे अस्तित्व नाहीसे व्हायचे. सध्या मात्र तशी स्थिती नाही. गेल्या वर्षभरापासून दोन्ही तलावांत पाणी आहे. एका तलावात कमी साठा असला तरी पाणी टिकून राहिले आहे. गावाजवळच्या तलावातून सांडव्यापर्यंत पाणी आहे, तर गडाणी या तलावात चौदा टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. आतापर्यंत दोन्ही तलावांतून सुमारे पाच हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.

वैशिष्ट काराजनगीचे..

  • सकाळ माध्यम समूहाच्या कार्यामुळे गावात उत्साह
  • दोन तलावांतील गाळ काढल्याने उन्हाळ्यातही पाणीसाठा
  • खर्चासाठी पाण्याचा होतोय वापर
  • परिसरातील विहिरींना पाणी आल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा
सकाळ माध्यम समूहाने आमच्यात ऊर्जा आणली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आमच्यामध्ये आत्मविश्‍वास आला. गाळ काढण्याच्या वेळी काही अडचणीही आल्या. गाळ काढण्याचे काम करण्यापूर्वी काही शेतकऱ्यांना कामाचे स्वरूप समजावून सांगावे लागले. गावालाच पाणी मिळणार असल्याने अनेकांनी समजूतदारपणा दाखवत कामांत मदत केली. या सहकार्यामुळेच आज तलावांमध्ये पाणीसाठा होण्यास मदत झाली. येथून पुढील काळातही गावांतील पाणी जास्तीत जास्त टिकून राहावे, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
संजय चौगुले
उपसरपंच, काराजनगी, ता. जत, जि. सांगली
----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate