অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दरवळतोय मोगऱ्याचा सुगंध

दरवळतोय मोगऱ्याचा सुगंध

व्यापाऱ्यांशी निश्‍चित दर बांधून घेतले आर्थिक उत्पन्न वाढवले दुष्काळात महिलांना दिला रोजगार

"जत तालुका' म्हटलं की उभे राहते दुष्काळाचे चित्र. मात्र दुष्काळातही नावीन्यपूर्ण पिके करून फायदेशीर शेतीचा मंत्र देणारे शेतकरीही आहेत. बी.एस्सी.चे (हॉर्टी ) शिक्षण घेतलेला रविकिरण वसंतराव पवार हा तरुण या पैकीच एक. जिथे मैलोन्‌ मैल केवळ कुसळे उगवतात, त्या शिवारात त्याची एक एकर मोगऱ्याची बाग जतच्या वाळवंटात लक्ष वेधून घेते. परिसरात काही किलोमीटर अंतरापर्यंत नसलेले, मात्र फायदा देऊ शकणारे पीक निवडून वेगळी वाट चोखंदळली, की शेती कशी फायदेशीर होऊ शकते याचे एक उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. दुष्काळी भागातही रविकिरण यांची मोगऱ्याची यशस्वी शेती दीपस्तंभच आहे. 

प्रतिकूल परिस्थितीत केली मोगऱ्याची लागवड

जतपासून पंधरा किलोमीटर अंतरावर येळवी हे दुष्काळी पट्ट्यातलं गाव. सध्या गावाला दररोज चार टॅंकरने पाणी सुरू आहे. ज्वारी, बाजरी आदी पिके गावात घेतली जातात. काही विहिरींना पाणी आहे. पण ते नाममात्रच. गावातील रविकिरण याची एकूण सत्तेचाळीस एकर शेती. त्यापैकी चाळीस एकर लागवडीखाली आहे. पण पाणी नसल्याने केवळ एक एकर क्षेत्र वापरले असून त्यावर मोगरा घेतला आहे. 
सातत्याने दुष्काळ झेलणाऱ्या या भागात मोगऱ्याची लागवड म्हणजे आव्हान होते. रविकिरण यांनी महाविद्यालयात असल्यापासूनच फुलशेती करायची हे पक्के ठरविले होते. यानुसार या शेतीचा अभ्यासही केला. आष्ट्याचे (जि. सांगली) शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी तानाजीराव चव्हाण यांच्याकडून मोगऱ्याबाबतची माहिती घेतली. 

पिकाचे व्यवस्थापन

मुरमाड जमिनीत रोपांची लागवड डिसेंबर 2010 मध्ये केली. दोन वर्षांनंतर मार्च 2012 च्या सुमारास उत्पन्नास सुरवात झाली. नर्सरीतून "बेंगलोर बड' जातीची रोपे आणून एकरी 4500 या प्रमाणात लागवड केली. दोन रोपांतील अंतर दोन x दोन फूट झिगझॅग पद्धतीने ठेवले. दोन ओळींतील लॅटरलचे अंतर पाच फूट ठेवले. 

पाणी व खताचे नियोजन

पाण्याची उपलब्धता फारशी नसल्याने ठिबकशिवाय पर्यायच नव्हता. उपलब्ध विहिरीतील पाण्याचा वापर करीत दररोज एक तास याप्रमाणे पाणी दिले. रोपांची छाटणी झाल्यानंतर सेंद्रिय व रासायनिक खते एकत्रित दिली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी केली. त्यानंतर एकरी आठ ट्रॉली शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो, जैविक खत दोनशे किलो, निंबोळी पेंड दोनशे किलो, करंजी पेंड 125 किलो, डीएपी, 10:26:26: शंभर किलो, या प्रमाणात खते दिली. जैविक खताचीही स्लरी दिली. उत्पादन सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसात ठिबकद्वारे 19:19:19, 12:61, 0.52.34, 0.0.50 मॅग्नेशिअम झिंक अशी खते दिली. 

नावीन्यपूर्ण मार्केटिंग पद्धती

(एस.टी. बसचे क्‍लिप आर्ट वापरणे, बसच्या फलकावर जत- तुळजापूर असे नाव घालणे) 
1) शेतीमालाचे प्रभावी मार्केटिंग ही सर्वांत महत्त्वाची बाब. रविकिरण यांनी त्यात कौशल्य वापरले आहे. त्यांनी वाहतूक खर्च मोठ्या खुबीने कमी केला आहे. बागेतील फुलांची सकाळी साडेसात ते दुपारी दीड अशी दररोज सुमारे पंचवीस किलो तोडणी (कळ्यांची) सुमारे दहा महिलांकडून होते. यानंतर कळ्यांचे पोत्यात पॅकिंग केले जाते. सोलापूर बाजारात विक्री केली जाते. 
2) येळवी गावात दररोज दुपारी दोन वाजता जतहून येणारी व सोलापूरमार्गे तुळजापूरला जाणारी जत- तुळजापूर ही बस येते. या बसमध्ये मोगऱ्याचे पोते टाकले जाते. या बसचा वर्षाचा पास रविकिरण यांनी काढला आहे. सोलापूरमध्ये व्यापारी ठरलेले आहेत. ही गाडी सायंकाळी सहाच्या दरम्यान सोलापुरात पोचते. व्यापारी पोते काढून घेतात. वजनानुसार मोगऱ्याची किंमत पवार यांच्या बॅंक खात्यात भरली जाते. व्यापाऱ्यांशी समन्वय साधत किलोला दीडशे रुपये ही किंमत वर्षभरासाठी निश्‍चित केली आहे. यामुळे मोगऱ्याचा दर कमी असो वा अधिक याचा फायदा दोघांनाही होतो. 
3) सुलभ पद्धतीने पॅकिंग होत असल्याने त्यावर फारसा खर्च होत नाही. अन्य ठिकाणी मोगरा उत्पादकांना करावा लागणारा शीतकरण, तोलाईवरील खर्च इथे वाचतो. त्वरित विक्री होत असल्याने फुले खराब होण्याचा धोकाही कमी असतो. रविकिरण यांनी परिस्थितीनुसार वापरलेली मार्केटिंगची पद्धत त्यांच्या विक्री कौशल्याला दाद देणारी आहे. घरच्या सदस्यांकडून वेळापत्रकानुसार काटेकोरपणे तोडणीचे नियोजन केले जाते. यामुळे फुले बाजारात योग्य वेळेत पोच होतात. 

दहा महिला मजुरांचे संसार चालतात मोगरा शेतीवर

मार्च ते ऑक्‍टोबरअखेर दररोज फुलांची तोडणी होते. त्यामुळे महिला मजुरांना सलग काम मिळते. प्रत्येक महिलेला दररोज ऐंशी रुपयांची मजुरी दिली जाते. मार्च ते ऑक्‍टोबर अखेर फुलांचा हंगाम चालतो. हा भाग दुष्काळी असल्याने रोजगाराचे अन्य कोणते साधन नाही. यामुळे रविकिरण यांची मोगऱ्याची शेती ही या मजुरांच्या दृष्टीने उपजीविकेचे साधनच बनली आहे. 

भविष्यात नफ्यात वाढ शक्‍य

सन 2010 ला मोगऱ्याची लागवड केल्यानंतर मार्च 2012 ला उत्पन्नास सुरवात झाली. ऑक्‍टोबर 2012 पर्यंत हंगाम चालला. त्यानंतर पुन्हा मार्च 2013 ला उत्पादनास प्रारंभ झाला. येत्या ऑक्‍टोबरपर्यंत उत्पादन चालेल. ही बाग सुमारे दहा वर्षे चालेल. दुष्काळी भागात मोगऱ्यासारखे पीक अन्य ठिकाणी नाही, यामुळे बाजारपेठेची चिंता नाही. पहिल्या वर्षीचा रोपे, बेड, ठिबक आदींचा खर्च वाचणार असल्याने निव्वळ नफ्यात वाढच होणार असल्याचे रविकिरण यांनी सांगितले. 

रविकिरण यांच्याकडून काय शिकाल?

-कृषी पदवीधर असल्याने तांत्रिक ज्ञानाची पार्श्‍वभूमी. 
* दुष्काळी भागातही सकारात्मक शेतीचा दृष्टिकोन व मनोधैर्य कायम. 
* मागणी असलेल्या फुलशेतीला प्राधान्य. 
* पाण्याचा काटकसरीचा वापर. 
* वाहतूक खर्चात कुशलपणे बचत, मध्यस्थांचाही खर्च वाचवला. 
* तोटा न होण्यासाठी व्यापाऱ्यांकडून समान निश्‍चिती. 
* लहान क्षेत्रातही लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न. 

अर्थशास्त्र-

आठ महिन्यांचे उत्पन्न- 
दररोजची तोडणी- सरासरी सुमारे 25 किलो (बहरानुसार फुले 10, 40, 50 किलो अशी मिळतात) 
-आठ महिन्यांत फुलांचे उत्पादन- 6 टन 
-निश्‍चित केलेला दर प्रति किलो- 150 
उत्पन्न- 9 लाख 

आठ महिन्यांचा खर्च (रुपये) 
तोडणी कामगार - 1 लाख 92 हजार 
खते-कीडनाशके- 45000 
रोपे 35000 
बेड खर्च 10000 
ठिबक 35000 
एस.टी. पास 4000 
............. 
एकूण खर्च 3 लाख 21 हजार 
एकूण उत्पन्न 9 लाख 
खर्च 3 लाख 21 हजार 
निव्वळ नफा 5 लाख 79 हजार 

- रविकिरण पवार- 8275391590

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate