অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाथर्डी शिवारात फुलली फुलशेती

पाथर्डी शिवारात फुलली फुलशेती

नगर जिल्ह्यात पाथर्डी शहरानजीक असलेल्या शिवारात शशिकांत बोरुडे यांची दहा एकर शेती आहे. त्यांची आई सौ. कुसुम, वडील शिवराम शिक्षक आहेत. त्यांचा वारसा पुढे चालवत शशिकांत यांनी एमए बीएडपर्यंत शिक्षण घेतले. काहीकाळ महाविद्यालयांतून नोकरीही केली. मात्र, घरच्या शेतीतच करिअर करायचे, असे ठरवून नोकरीला रामराम केला.

पूर्णवेळ झाले शेतकरी

सन 2004 च्या सुमारास शशिकांत यांनी प्रत्यक्ष पाहणीतून हरितगृह उभारणी केली. त्यांना जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र आव्हाड, तसेच पुणे कृषी महाविद्यालयातर्फे हरितगृहासंबंधी मार्गदर्शन मिळाले. बोरुडे यांची प्रत्येकी 11 गुंठ्यांची दोन पॉलिहाउस शेड आहेत. सध्या दोन्ही शेडमध्ये जरबेरा आहे. एका शेडमधील जरबेरा पिकाला तीन वर्षे पूर्ण झाली असून, तेथे आता भाजीपाला पिकांद्वारे फेरपालट केली जाणार आहे.

पॉलिहाउसची सुरवात

हरितगृहातील फुलशेतीतील बोरुडे यांचा सुमारे आठ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. हरितगृह शेतीला सुरवात करताना त्यांनी 200 मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक पेपरने शेड बंदिस्त केली. लागवडीपूर्वी 80 ब्रास निचरा होणारी लाल माती टाकण्यात आली. 70 सें.मी. रुंद व 36 मीटर लांब आकाराचे गादीवाफे तयार केले. सेंद्रिय घटक पुरविण्याच्या उद्देशाने मातीत 20 ब्रास शेणखत व पाच टन निंबोळी पेंड मिसळली. पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन टन भाताचे तूस वापरले. फॉरमॅलीनच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले. एका बेडवर दोन ड्रीपलाइन व दोन ड्रीपर ठेवून इनलाइन ठिबक सिंचन करून घेतले. पुण्यातील खासगी कंपनीकडून रोपे आणली. जुलै 2005 मध्ये जरबेराच्या पांढरा, पिवळा, लाल, केशरी, राणी व गुलाबी अशा विविध रंगांच्या फुलांची लागवड केली. पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खते दिली. रोग-किडींच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. जमिनीचा पोत व पाण्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला.

फुलांचे मार्केट

दररोज सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत या वेळेत तजेलदार व देठात ताठरता असणारी फुले तोडली जातात. पॅकिंगसाठी प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते. दहा फुले प्रति गुच्छ असे 50 गुच्छ प्रति बॉक्‍समध्ये भरले जातात. प्रति दिन सरासरी नऊशे ते एक हजार फुलांची तोडणी होते. वर्षभर फूल हंगाम सुरूच असतो. ऑक्‍टोबर ते जानेवारी व एप्रिल ते मे हा फुलमार्केटच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे सण- लग्न समारंभांचा काळ असतो.

दरांत सातत्याने बदल

फुलांच्या दरांत मात्र वर्षभर चढ-उतार होत असतो. बोरुडे म्हणाले, की मागील वर्षीचे उदाहरण सांगायचे तर सर्वोच्च हंगाम कालावधीत प्रति दहा फुलांचा कमाल दर 120 रुपये होता, तोच दर यंदा 50 ते 70 रुपयांवर घसरला आहे. जरबेराचे क्षेत्र अनेक ठिकाणी वाढू लागल्याने आवक वाढते आहे. साहजिकच दरांवर त्याचा परिणाम होत असल्याची भीतीही बोरुडे यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी प्रति फूल उत्पादन खर्च एक रुपयापेक्षा कमी यायचा. दरही दोन रुपयांपेक्षा जास्त असायचे. आता खर्च किमान एक रुपया येतोच. फुलाला दर 1.70 पैसे मिळाला तर नफा केवळ 70 पैसेच राहतो, असे ते म्हणाले. फुलांची विक्री औरंगाबाद मार्केटला केली जाते.
सन 2005 मध्ये वर्षाला सुमारे तीन लाख फुलांच्या विक्रीतून सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले. सन 2005 व 2006 या दोनच वर्षांत चांगला दर मिळाला. त्यानंतर सातत्याने दरांत घसरण होत आहे.
2014 मध्ये 11 गुंठ्यांत दोन लाख 75 हजार फुलांचे उत्पादन झाले. प्रति फुलाला सरासरी एक रुपया सत्तर पैसे दर मिळाला.
बोरुडे यांच्या फुलशेतीचे महिन्याचे अर्थशास्त्र पाहिले तर महिन्याला सरासरी 25 हजार फुलांची विक्री होते. एका फुलाला सरासरी दोन रुपयांपर्यंत दर मिळातो. सद्यःस्थितीत पाऊस नाही, मात्र पाण्याचे नेटके नियोजन केल्याने महिन्याकाठी चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी ऍड. सारिका बोरुडे यांची साथही बोरुडे यांना मोलाची ठरत आहे.

कार्नेशननेही दिली साथ

सध्या 11 गुंठ्यांतील जरबेरा शेतीत पूर्वी कार्नेशनचे उत्पादन घेतले. या पिकासाठी सुशिक्षित मजुरांची गरज असते. वीस हजार रोपांची लागवड केली. त्यापासून प्रति सहा महिन्यांचा हंगाम याप्रमाणे अडीच वर्षे उत्पादन घेतले. प्रति हंगामात अडीच ते तीन लाख फुलांचे उत्पादन झाले. हैदराबाद व पुणे मार्केटला फुलांची विक्री केली. सुमारे दोन एकरांत खुल्या शेतीत ढोबळी मिरची पिकाचाही प्रयोग केला. एकरी 20 टन उत्पादन घेतले. 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने नगर, श्रीरामपूर, पुणे बाजारपेठेत विक्री केली. त्यानंतर कारले पिकाचा प्रयोग केला आहे.

बोरुडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

 • शेतात गांडूळ खत निर्मिती युनिट. भाजीपाला, डाळिंब शेतीसाठी त्याचा उपयोग होतो. फुलशेतीसाठी व्हर्मिवॉश वापरले जाते.
 • उपलब्धता विचारात घेऊनच पाण्याचे नियोजन. शंभर फूट खोल विहिरीत सध्या बऱ्यापैकी पाणी उपलब्ध. हरितगृहातील फुलांना पाणी देण्यासाठी 17 मिनिटे पंप चालविला जातो. आवश्‍यकतेनुसार प्रति झाडास 150 मि.लि. पाणी पुरविण्यात येत आहे. उन्हाळ्यात काटसरीने नियोजन.
 • एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे यंदा उभारले.
 • बॅंकेच्या कर्जाची वेळेत परतफेड, त्यामुळे बॅंकेत विश्‍वासार्हता वाढली.
 • शेतीची ठरलेली कामे वेळेतच पूर्ण केली जातात.
 • दहा एकरांत ठिबक सिंचनाचा वापर
 • शेतीतील नवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी इंटरनेटची मदत
 • फुलशेतीतील नवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी देशभरातील प्रदर्शनांना भेटी
 • भारतीय कृषक समाज, नवी दिल्ली यांच्या वतीने कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित

  संपर्क - शशिकांत बोरुडे : 9420946750
  जिद्द, चिकाटीला ज्ञान, सुधारित तंत्राची जोड दिल्यास पीक उत्पादन वाढते. मार्केटमधील दर घसरले तरी
  वाढीव उत्पादनवाढीचा फायदा घेता येतो.

   

  स्त्रोत - अग्रोवन  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate