- नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथील संधान यांचे द्राक्ष व्यवस्थापन
- "डाऊनी' राहिला नियंत्रणात; फवारण्या झाल्या कमीया वाटचालीला 2009 मध्ये फयान वादळाने मोठा "ब्रेक' दिला. बागेचे 70 टक्के नुकसान झाले. 15 ते 16 लाख रुपयांचा हा तोटा होता. त्यापुढील वर्षी "क्लोरमेक्वाट क्लोराईड'च्या अवशेषांवरून युरोपीय बाजारात भारतीय द्राक्षे अस्वीकृत झाली. प्रवीण यांनी स्वत:चे व परिसरातील शेतकऱ्यांचे मिळून पाठविलेले 32 कंटेनर संकटात सापडले. आर्थिक तोट्याबरोबरच शेतकऱ्यांच्या नाराजीचेही धनी व्हावे लागले. हे संकट पचविणे अवघड होते; पण पुन्हा हिमतीने सावरून प्रवीण नव्या दमाने कामाला लागले.
प्रवीण म्हणाले, की या कालावधीत निर्यातीच्या निमित्ताने इटलीत जाणे झाले. तेथील द्राक्षबागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादन पाहिले. नाशिक भागात पूर्वी असे प्रयोग झाले होते; पण त्यातून हाती फार लागल्याचे आढळले नव्हते. इटलीत या विशेष प्लॅस्टिक तंत्रज्ञानाचा सुलभ वापर पाहिल्यानंतर आपणही ते वापरण्याचे ठरवले. इटलीत मागील 25 वर्षांपासून ते प्रचलित असून, तिथे पीकविमा करण्याआधीच प्राधान्याने आच्छादन केले जाते.
अखेर पुरेशा चिंतनानंतर 2012-13 मधील ऑगस्टमध्ये प्रवीण यांनी इटलीतून हे पॉलिथिन भारतात आणले. सुरवातीला सहा ओळींवर (चार ओळी जंबो सीडलेस, दोन थॉम्पसन) प्रयोग केला. त्या वर्षी प्रयोग क्षेत्रावर डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव उर्वरित बागेच्या तुलनेत कमी जाणवला. जम्बो सीडलेसच्या चार ओळींतून 1200 किलोपर्यंत उत्पादन अपेक्षित असताना ते दोन हजार किलोपर्यंत मिळाले.
यंदाच्या वर्षी चार एकरांवर (तीन एकर जंबो सीडलेस व एक एकर थॉम्पसन) हा प्रयोग केला. मागील वर्षी जम्बो सीडलेस वाणाची 28 सप्टेंबरच्या सुमारास फळछाटणी घेतली होती. यंदा 16 व 18 ऑगस्टला छाटणी घेतली. या काळात संपूर्ण ढगाळ वातावरण, संततधार पाऊस ही स्थिती असताना नेहमीपेक्षा लवकर छाटणी घेणे मोठे धाडसच होते. संपूर्ण दिंडोरी तालुक्यात यंदा सतत पावसाचे वातावरण राहिले. मात्र बाहेर पाऊस पडत असतानाही प्लॅस्टिकच्या वरील आच्छादनामुळे संधान यांच्या बागेतील सर्व कामे वेळेतच पूर्ण झाली. अत्यंत प्रतिकूल वातावरणात या बागेत "डाऊनी' वाढण्यासारखी परिस्थिती नव्हती. या काळात संधान यांनी प्रति लिटर पाण्यात बुरशीनाशकाचे प्रमाण शिफारशीपेक्षा निम्म्यानेच घेण्यास सुरवात केली. मात्र राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांच्याशी चर्चा केली असता, डोस अपुरा करू नका, गरजेनुसार फवारण्यांतील अंतर वाढवा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार नियोजन केले.
डाऊनीसाठी तीस दिवसांतील महत्त्वाच्या "स्प्रे' काळात वीस दिवस पाऊस राहिला. त्या काळात रोज दोन स्प्रे घेतले असते, तर एकूण 40 स्प्रे झाले असते. पण आच्छादन प्रयोगामुळे तीन ते चार व त्याही प्रतिबंधक फवारण्या झाल्या.
-"एचडीपीई वूवन फॅब्रिक' मटेरियलचा वापर
-यामुळे बागेतील तापमान व आर्द्रता यांचा समतोल साधला जातो. दुपारचे 32 अंश से. तापमान असताना बागेतील तापमान 27 ते 28 अंश असते.
-यातून दिवसा 85 टक्के सूर्यप्रकाश आत येतो व तो 65 टक्के विभागला जातो.
-रात्रीच्या वेळीही तापमान नियंत्रणामुळे वातावरण ऊबदार राहते.
-यामुळे पानांवर, घडांवर दव साचत नाही, असा अनुभव.
-यात वेलीचे शेंडे वरती प्लॅस्टिकला भिडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
-प्लॅस्टिक आणि वेली यात तीन-साडेतीन फुटांचे अंतर ठेवले जाते. वाढ नियंत्रित ठेवावी लागते.
- "वाय' किंवा बावर अशा कोणत्याही पद्धतीसाठी हे तंत्र वापरता येते.
-झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी शेवटी गॅल्वनाईज्ड लोखंडाचा वापर करून संपूर्ण बागेच्या चारही बाजूंनी फ्रेम
-त्यावर साडेतीन मि.मी. गेजची ( 8 क्रमांकाची) तार ओळीत बांधली. त्यावर प्लॅस्टिक आच्छादन
-बागेतील फ्रेमच्या प्रत्येकी 25 फुटांवर एमएस पोल व त्याला दोन बांबूंचा सपोर्ट
-झाडांच्या रांगेत प्रत्येकी आठ फुटांवर बांबूंचे सपोर्ट. बांबू सिमेंटमध्ये पक्का रोवून त्याचा पॉलिथिन आच्छादनाला टेकू.
-तंबू आकाराची मांडणी
-प्लॅस्टिक कव्हर फाटू नये म्हणून प्रत्येक बांबूला प्लॅस्टिक कॅप. तारेच्या फ्रेमला "पीव्हीसी' मटेरियलच्या दोरीने बांधले. या दोरीत अधिक ताण सहन करण्याची क्षमता असते. वादळ-वाऱ्यात प्लॅस्टिक उडून जात नाही.
संधान यांना यंदाच्या मार्चमध्ये द्राक्षांना किलोला 65 रुपये दर मिळाला. 18 ऑगस्टच्या दरम्यान फळछाटणी घेतली असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच माल बाजारात येण्यास सज्ज झाला आहे. 145 रुपये प्रतिकिलो दराने मालाचा व्यवहार आशियाई देशांसाठीच्या निर्यातीसाठी झाला आहे.
प्लॅस्टिकच्या संपूर्ण प्रयोगाला (प्लॅस्टिक, बांबू, मांडव रचना वगैरे एकत्रित) एकूण 22 लाख रुपये (एकरी साडेपाच लाख रुपये) खर्च आला आहे. द्राक्षाला अधिक दर मिळणार असल्याने प्लॅस्टिकवरील काही खर्च भरून निघेल, असा संधान यांना विश्वास आहे.
दर वर्षी खुल्या क्षेत्रावरील बागेत वर्षाअखेर एकरी एकूण उत्पादन खर्च एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत येतो. प्लॅस्टिक आच्छादनाच्या बागेत हा एकरी खर्च यंदा 30 हजार रुपयांनी कमी झाल्याचे संधान यांना दिसून आले आहे. प्लॅस्टिकचा वापर किमान सात ते आठ वर्षे टिकेल. त्यामुळे पुढील वर्षीपासून त्यावरील खर्चही कमी होत राहील, असे संधान म्हणाले.
खर्चाचा तपशील----खुल्या क्षेत्रावरील बाग (एकरी) --पॉलिथिन आच्छादनयुक्त बाग खते-----------35,000----------------------30,000
कीडनाशके--------50,000--------------------20,000
मजुरी------------40,000-----------50,000 (या तंत्रात मजुरी खर्चात वाढ धरली आहे)
संजीवके------15,000----------------15,000
----------------------------------------------
एकूण खर्च------1,40,000-----------1,05,000
28 वर्षीय प्रवीण मागील पाच वर्षांपासून द्राक्षांची नियमित निर्यात करीत आहेत. शेतातील उत्पादनापासून ते जगाच्या बाजारातील मागणीपर्यंत त्यांचा अभ्यास सतत सुरू असतो. युरोप हे भारतीय द्राक्षांसाठी महत्त्वाचे मार्केट. जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबरअखेरपर्यंत युरोपच्या बाजारात स्पेन, इटली, पोर्तुगाल या देशांतील द्राक्षांचा हंगाम असतो. नोव्हेंबरनंतरच्या हंगामाला "ओव्हरसीज सीझन' म्हटले जाते. ब्राझीलमधून या काळात द्राक्षे सुरू होतात. त्यानंतर क्रमाक्रमाने दक्षिण अफ्रिकेचा हंगाम हा जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर अर्जेंटिनाची द्राक्षे 2 आठवडे चालतात. त्यानंतर चिलीचा हंगाम 4 आठवडे चालतो. त्यानंतर भारताचा हंगाम 1 मार्च ते 15 जूनपर्यंत असतो. इजिप्तचा द्राक्षांचा हंगाम 15 जून ते 30 जूनपर्यंत असतो.
मागील काही वर्षांचा आढावा घेतला तर असे दिसते, की 15 डिसेंबर ते पाच जानेवारी या काळात युरोपात पाठविण्यात आलेल्या द्राक्षांना प्रतिबॉक्स 15 ते 20 युरोचे दर मिळाले आहेत. याच काळात युरोपीय बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने आपल्याला या काळात मोठी संधी आहे. या काळात बाजारात दर्जेदार द्राक्षे आणून आपण या संधीचा फायदा घ्यायला हवा, असेही प्रवीण यांनी सांगितले.
युरोपीय बाजारात चिली या देशाचा हंगाम आतापर्यंत एक मार्चपर्यंत राहिला आहे. मात्र भारतीय द्राक्षांनीही 15 एप्रिलपासूनच युरोपीय बाजारात मुसंडी मारल्याचे मागील दोन्हीही वर्षी दिसून आले. भारतीय द्राक्षांत अवशेषांचे निकष पाळले जात असल्याने भारतीय द्राक्षांची सकारात्मक प्रतिमा जगभरात पसरली आहे. भारतीय द्राक्षांना या स्थितीत मागणी वाढली आहे.
पीक- द्राक्ष (एकूण 11 एकर)
वाण : थॉमप्सन (8 एकर), जम्बो सीडलेस (3 एकर)
जमीन प्रकार : मध्यम प्रकारातील मुरुमाट आणि काळी
सिंचन : ठिबक
रामनाथ संधान हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत. वेलीच्या गरजेनुसार पाणी, अन्नद्रव्ये, संजीवके यांचे नियोजन व कीड-रोगांच्या नियंत्रणाकडे त्यांनी प्रभावी लक्ष दिले आहे. सातत्याने प्रयोगशील राहणे, हा संधान पितापुत्रांचा स्वभावच बनला आहे. त्यातूनच दर्जेदार, निर्यातक्षम एकरी 8 ते 10 टन इतके उत्पादन ते घेत आहेत. वर्ष 2008 पासून ते अलीकडेपर्यंत द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, हे पुढील आकडेवारीवरून समजते.
वर्ष----एकरी उत्पादन (टन) -दर (प्रति किलो रु.)
2008-09-----8-----30 (फयानमुळे 70 टक्के नुकसान)
2009-10-----8-----50 (युरोपीय पेचामुळे तोटा)
2010-11-----10-----50
2011-12------11----60
2012-13-------11-----65
अपेक्षित
2013---
1)जंबो सीडलेस- तीन एकरांतून- 25 टन
निश्चित झालेला दर- प्रति किलो 145 रु.
2)थॉम्प्सन- एक एकर- 12 ते 13 टन
संपर्क
प्रवीण रामनाथ संधान : 9823077753
रामनाथ संधान -9422945389
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी संधान यांच्या प्लॅस्टिक आच्छादन प्रयोगावर व्यक्त केलेली मार्गदर्शनपर टिप्पणी अशी.
1) द्राक्षबाग झाकण्यासाठी किंवा वरून पडणाऱ्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी संधान यांनी केलेला प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग अतिशय चांगला आहे.
2) या तंत्रज्ञानात प्रत्येक ओळीत प्लॅस्टिकचे छत आहे. मात्र दोन ओळींतील मधला भाग मोकळा आहे. त्यातून पाणी खाली पडते. द्राक्षे तयार होण्याच्या काळात जर पाऊस आला, तर पडणाऱ्या पावसाचे हे अतिरिक्त पाणी मुळे शोषून घेतील व बेरी क्रॅक होण्याचा धोका वाढेल. त्यामुळे मधल्या जागेत प्लॅस्टिक अंथरून अतिरिक्त पाणी बागेबाहेर निचरा करण्याची सोय करावी लागेल.
3) या तंत्रज्ञानात झाडांवर पाणी पडत नसल्याने ती ओलसर राहत नाहीत. त्यामुळे डाऊनीचा धोका कमी राहील. फवारण्यांची संख्या कमी राहील. मात्र पावसाची परिस्थिती बिघडून आर्द्रता वा दव वा ओलसरपणा वाढला तर त्याची शक्यता लक्षात घेऊन फवारण्यांचे नियोजन करावे लागेल. अशी परिस्थिती कोणती ते पाहून फवारणी वेळापत्रक तयार करावे लागेल.
4) प्लॅस्टिक छताखाली भुरीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी "स्प्रेईंग' जास्त करावे लागते. अधिक चांगल्या प्रकारे भुरीचे नियोजन करावे लागेल.
5) प्लॅस्टिक छत व त्याअनुषंगाने येणारा खर्च लक्षात घेता, तो भरून काढण्यासाठी अर्ली प्रूनिंग घेणे, त्यातून द्राक्षाला चांगला दर मिळवण्याची जोखीम घेणे या गोष्टी कराव्या लागतील.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...
भात रोपांचे वय आठ ते बारा दिवसांचे म्हणजे रोपे दोन...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...