অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धडाडीच्या वृत्तीमुळेच यश

वाहनचालक तसेच अन्य किरकोळ व्यवसाय करीत कुटुंबाची उपजीविका भागवत असताना शेतीतील उत्पन्नाची वेळोवेळी बचत केली. टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी करीत 15 एकरांपर्यंत शेतीचा विस्तार केला. व्यवस्थापन कौशल्य, कोणतेही कष्ट करण्याची तयारी, धडपडी वृत्ती, ज्ञान घेण्याची वृत्ती यातून यशाचा आलेख प्रगतीपथावर ठेवला आहे. हस्तपोखरी (ता. अंबड, जि. जालना) येथील राजू एकनाथ सोनवणे यांची ही यशकथा सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

हस्तपोखरी येथील राजू सोनवणे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती. त्यातून फारसे हाती लागत नव्हते, त्यामुळे वाहनचालक म्हणून व्यवसाय सुरू केला. गावात इलेक्‍ट्रीक मोटर दुरुस्तीही कामेही करू लागले. पुढे ठिबक संच विक्री केंद्रात "फिटिंग'चेही काम केले. यातून मिळत असलेल्या उत्पन्नावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवली जात असे.
राजू सुरवातीपासूनच कृषी विभागाच्या सतत संपर्कात राहिले. जिरायती शेतीवर भागणारे नव्हतेच म्हणून सुरवातीला एक विहीर घेतली. त्यास बख्खळ पाणी लागले, त्यामुळे कापूस बागायती झाला. त्याच वेळी मोसंबी लागवडीचाही निर्णय घेतला. शेतकरी रवीभाऊ गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीक व्यवस्थापन सुरू केले. उत्पादन सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागणार होता. त्या कालावधीपर्यंत आंतरपीक म्हणून कापूस घेतला. खरिपात कापूस तर रब्बी हंगामात गव्हाचे आंतरपीक घेतले. मिळत राहणारे उत्पन्न खर्च न करता गुंतवणूक करीत राहिले. शेती तीनच एकर, तीही जिरायती. क्षेत्र वाढवले तर शेतीतला नफा वाढणार होता. बचतीच्या पैशातूनच टप्प्याटप्प्याने राजू यांनी जमीन खरेदी करण्यास सुरवात केली.

दोन विहिरींचे केले पुनर्भरण

दिवसेंदिवस विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली. दुसरीकडे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी दिसत होते. त्यामुळे विहीर पुनर्भरणाचा प्रयोग तत्कालिन कृषी सहायक मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली केला. त्याचा परिणाम जाणवायला सुरवात झाली. पहिल्याच पावसात विहिरीला 4 ते 5 फूट पाणी आले. त्याचा उपयोग जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या खंडात झाला. हा खंड सरासरी 20 ते 35 दिवसही चालतो. दोन्ही विहिरींच्या पुनर्भरणामुळे मोसंबी व कापसाला वेळेवर सिंचन करता आले, त्यामुळे आपसूकच उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. सध्या 70 ते 75 फूट खोलीच्या दोन विंधन विहिरी असून, पाच कूपनलिका खोदल्या आहेत. त्यापैकी चार कूपनलिकांना पाणी लागले.

सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर 

आता क्षेत्र वाढले होते. पाण्याचे महत्त्व कळाल्याने ठिबक सिंचनाचाच वापर सुरू केला. ठिबक सिंचनाचे "फिटिंग' राजू यांनी स्वतःच केले. ठिबकमुळे कमी पाण्यात कापसाचे फरदड पीकही घेता आले. मागील वर्षी दुष्काळात प्लॅस्टिक आच्छादनही (मल्चिंग) केले होते, त्यामुळे कमी पाणी असूनही मोसंबीही जगविता आली. त्या वेळी पाण्याअभावी अनेकांना मोसंबी तोडून टाकण्याची वेळ आली होती. मात्र आच्छादन, छाटणी, सेंद्रिय पदार्थांचा वापर, पाणी धरून ठेवणाऱ्या पॉलिमरचा वापर आदी वेगवेगळे उपाय करून बाग वाचविण्यात राजू यांना यश आले.

माती व पाणी तपासणी महत्त्वाची

राजू दर दोन वर्षांनी नियमितपणे माती परीक्षण करून घेतात. त्यानुसारच खतांचा वापर करतात. कंपोस्ट व जैविक खतांचाही वापर ते करतात. रसायनिक खतांचा समतोल व वेळेवर वापर हे त्यांच्या पीक उत्पादनाच्या वाढीचे प्रमुख सूत्र होय, त्यामुळे खर्चात बचत व उत्पादनात वाढ असा दुहेरी फायदा झाला.

मोसंबीचे उत्पादन

मोसंबी पिकाचा सुमारे दहाहून अधिक वर्षांचा अनुभव आता राजू यांच्या गाठीस आहे. सध्या पाच एकर जुनी मोसंबीची बाग व स्वतंत्र कापूस क्षेत्र ही त्यांची मुख्य पिके आहेत. सुमारे पाच एकरांत मोसंबीची सुमारे सातशे झाडे आहेत. संपूर्ण बागेस ठिबक सिंचन आहे. प्रत्येक झाडाला बोर्डोपेस्ट नियमित लावली जाते. छाटणीही दर दोन वर्षांनी होते. झाडाभोवती चर खोदून खते दिली जातात. दर वर्षी पाच एकरांत सुमारे 90 टनांपर्यंत उत्पादन मिळते. अनेक वेळा बागेत भरपूर माल लगडला असल्याचे अनुभवले आहे. फळांच्या ओझ्यामुळे झाडाच्या फांद्या जमिनीला टेकल्या होत्या. फांद्या तुटू नयेत म्हणून झाडांना बाबूंचा व काठ्यांचा आधार दिला होता. अलीकडील वर्षात तेवढ्या क्षेत्रात सहा लाखांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

कोलकता, दिल्लीत जाऊन मोसंबी विकली

आतापर्यंत सर्व मोसंबी बागवानालाच विकली जायची, त्यामुळे टनामागे एक क्विंटलचे नुकसान होत होते. (बहुतांश बागवान 11 क्विंटलचा एक टन धरतात. वाहतुकीमध्ये वजनात घट येते असे कारण त्यामागे बागवान सांगतात) मात्र राजू यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना सोबत घेऊन स्वतः कोलकता येथील बाजारपेठ पाहिली, दर, आवक, मालाची विक्री व्यवस्था यांचा अभ्यास केला. त्या वेळी खर्च वजा जाऊन टनाला 26 हजार रुपये चढा दर त्यांना मिळाला. येथे व्यापाऱ्यांनी वजनात घट केली नाही. यंदाच्या वर्षी पुन्हा स्थानिक व्यापाऱ्याला सोबत घेऊन दिल्लीची बाजारपेठ गाठली. तेथे व्यापाऱ्यांना गाठले. टनाला 15 हजार रुपये दर खर्च वजा जाऊन मिळाला. स्थानिक बाजारपेठेत एरवी किलोला आठ ते दहा रुपये दरावर समाधान मानावे लागत होते.
साहजिकच राज्याबाहेरील बाजारपेठेत व्यापाऱ्यांना सोबत घेऊन मोसंबीची विक्री जाण्याची ही संकल्पना राजू यांनी यशस्वी केली.

राजू यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

1) कपाशीतून जिरायती शेतीत यंदा एकरी 14 क्विंटल तर बागायती शेतीत 20 क्विंटल कापूस त्यांनी पिकवला.
एकूण 60 क्विंटल माल विकला. क्विंटलला 5200 रुपये दर मिळाला.
2) मोसंबी व कापूस पिकातील उत्पन्न बॅंकेत ठेवले जाते. त्यातूनच शेती खरेदी केली जाते व त्यातून पुन्हा नफा वाढवला जातो.
3) भागीदारी तत्त्वावर सुमारे 600 संख्येसह अर्ध बंदीस्तपद्धतीने शेळीपालन सुरू केले आहे.
4) कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांचे त्यांना मार्गदर्शन लाभते. योग्य व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून शेतीचा विकास करणाऱ्या राजू यांची कृषी विभागातर्फे कृषिमित्र म्हणून नेमणूक झाली आहे. शासकीय योजना त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवतात. त्या निमित्ताने विविध शेतकऱ्यांचे प्रयोगही त्यांना पाहण्यास मिळतात.
आपल्या प्रगतीमागे आईचे आशीर्वाद व पत्नीचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे राजू मोकळ्या मनाने कबूल करतात.
5) कृषी प्रदर्शने, मेळाव्यांतही त्यांची उपस्थिती असते.


(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)
संपर्क - राजू एकनाथ सोनवणे - 7798611945

स्त्रोत - अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate