অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निर्मलाताईंची सेंद्रिय शेतीशाळा

निर्मलाताईंची सेंद्रिय शेतीशाळा

नऊ वर्षांपासून देताहेत सेंद्रिय शेतीचे धडे, थेट शिवारातच भरतेय शाळा

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख


किफायतशीर शेतीसाठी सेंद्रिय शेती करा, असा सल्‍ला महिला कृषी सहायक निर्मला सोनवणे (पोटे) देतात. सेंद्रिय शेतीशाळेतून शेतकऱ्यांना प्रबोधन करण्‍याची त्‍यांची धडपड कौतुकास्‍पद आहे. कोपरगाव तालुक्‍यात शेतकऱ्यांना थेट शिवारातच सेंद्रिय शेतीचे धडे देणाऱ्या निर्मलाताई शेतकऱ्यांसाठी आधार ठरल्‍या आहेत. पारनेरमध्‍ये दहा वर्षांपूर्वी त्‍यांनी सुरू केलेली सेंद्रिय शेतीशाळेची चळवळ आता कोपरगावात विस्‍तारली आहेराज्‍यात शासकीय पदावर काम करताना आपले कर्तव्‍य सारेच सांभाळतात, पण त्‍यापेक्षाही वेगळे काम करून स्‍वत:ची वेगळी ओळख आपल्‍या कामातून निर्माण करता येते. हेच आपल्‍या कामातून निर्मलाताईंनी दाखवून दिले आहे. निर्मला सोनवणे यांना एकदा भेटून त्‍यांची कामगिरी ऐकली की त्‍यांच्‍याविषयी मनात असणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्‍तरे मिळतात. त्यांचे मूळ गाव राहुरी तालुक्‍यातील निंभेरे. वडिलांकडे असताना शेतीची बहुतांश कामे केलेली होती. निर्मलाताई लग्‍नानंतर राहाता तालुक्‍यातील साकुरी गावात राहायला आल्‍या. सासरी शेतीची जबाबदारी त्‍यांनी खांद्यावर घेतली. पेरणीपासून ते थेट शेतीमालाच्‍या निर्यातीपर्यंतच्‍या संपूर्ण जबाबदाऱ्या त्‍या पार पाडत. माहेरच्‍या शेतीचा वारसा त्‍यांनी सासरीही तेवढ्याच मेहनतीने जोपासला आहे.

निर्मलाताई सांगतात, सुरूवातीपासून शेतीची आवड आहे. प्रवरानगरच्‍या कृषी महाविद्यालयात कृषी अभ्‍यासक्रम पूर्ण केला व येथूनच मला शेतीची नवी दिशा मिळाली. माहेरी आणि सासरीही शेतीत स्‍वत: काम केले. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न जवळून अभ्‍यासले आणि ही परिस्थिती बदलण्‍यासाठी पुरेपूर प्रयत्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. याचदरम्‍यान पारनेर तालुक्‍यातील देवीभोयरे गावात कृषी सहायक पदाची जबाबदारी मिळाली. रासायनिक खताचा गरजेपेक्षा जास्‍त होणारा वापर व त्‍यामुळे जमिनीचे होणारे नुकसान टाळून पर्यावरण संतुलन अबाधित राखणे, कमी उत्‍पादन खर्चात जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन शेतकऱ्यांना घेता यावे, रासायनिक खताच्‍या वापरामुळे शेतकऱ्यांना न परवडणारा खर्च वाचून त्‍यांना सेंद्रिय व विषमुक्‍त शेतीमाल पिकविण्‍याच्‍या दृष्‍टीने मार्गदर्शन करण्‍यासाठी 1 जुलै 2009 कृषीदिनी देवीभोयरे गावात निर्मलाताईंनी सेंद्रिय शेतीशाळा सुरू केली. 20 शेतकरी निवडून 20 हेक्‍टर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड करून कांदा उत्‍पादनाचे उद्दिष्‍टही त्‍यांनी पूर्ण केले.

प्रत्‍येक आठवड्याच्‍या दर मंगळवारी खरीप व रब्‍बी हंगामाचा विचार करून 30 आठवडे या शाळेचे ठरलेले वेळापत्रक पूर्ण केले. सेंद्रिय शेतीशाळेसंदर्भातील 20 दिवसांचे प्रशिक्षण त्‍यांनी महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण केले आहे. सेंद्रिय शेतीशाळेचा सुरूवातीच्‍या काळात खर्चाचा भारही त्‍यांनी उचलला. आज निर्मलाताई अनुदानित सेंद्रिय शेतीशाळेला धडे देत आहेत.सेंद्रिय शेतीशाळेतून शेतकऱ्यांना प्रात्‍यक्षिकाद्वारे गांडुळ खत, निंबोळी अर्क या जैविक निविष्‍ठा बनविण्‍याबाबत थेट शेतकऱ्यांच्‍या शेतीवरच प्रशिक्षण दिले जाते. सकाळी 9 ते 12 ही शाळेची वेळ ठरलेली आहे. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या शेतीशाळेचे वैशिष्‍टे ठरले आहे.

शेतीशाळेसंदर्भात निर्मलाताई सांगतात, विनाअनुदानित तत्‍वावर शेतकऱ्यांच्‍या सहकार्यामुळेच ही शेतीशाळा सुरू केली. यासाठी आपल्‍याला तत्‍कालीन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील, भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले. आज जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब खटकाळे यांच्‍या मार्गदर्शनातून कोपरगाव तालुक्‍यात सेंद्रिय शेतीच्‍या विस्‍ताराचे काम सुरू आहे. कोपरगाव तालुक्‍यातील जेऊरकुंभारी गावात कृषी सहायक याच पदावर बदली झाल्‍यांनतर या गावात सेंद्रिय शेती गटाची स्‍थापना करण्‍यात आली. जेऊरकुंभारी, डाऊचखुर्द गावात 75 एकरावर सेंद्रिय शेती बहरते आहे. कांदा, सोयाबीन, गहू व हरभरा या पिकासंदर्भात शाळेत दर मंगळवारी व शुक्रवारी मार्गदर्शन केले जाते.

निर्मलाताईंची सेंद्रिय शेतीशाळा आज अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरली आहे. एक महिला म्‍हणून काम करत असताना त्‍यांच्‍यासमोर असंख्‍य अडचणी येतात. मात्र या अडचणीवरही मोठ्या जिद्दीने मात करून शेतकऱ्यांच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी त्‍या नेहमीच पुढे असतात. आजच्‍या माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात शेतकऱ्यांमध्‍ये सेंद्रिय शेतीबाबत जागृती निर्माण करून शेतकऱ्यांनी एकत्रित येत जास्‍तीत जास्‍त क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जावी, असा माझा मानस असल्‍याचेही त्यांनी बोलून दाखविले. एक महिला कृषी सहायक म्‍हणून त्‍यांनी केलेले काम इतर महिलांसह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

लेखक - गणेश फुंदे,
प्र. माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी.
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate