অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निर्मळ पिंप्रीचा शाश्‍वत विकास

नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड हमरस्त्यावरील निर्मळ पिंप्री या जिरायती गावाने बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने प्रगतीची वाट धरली आहे. पीकबदलासह उत्पादवाढीचे प्रयोग व त्यास पूरक व्यवसायाची जोड देत येथील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने सुधारित शेतीत आघाडी घेत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

नगर जिल्ह्यात राहाता तालुक्‍यातील निर्मळ पिंप्री गावची लोकसंख्या सुमारे 5466, तर कुटुंब संख्या 1675 पर्यंत आहे. गावाच्या 2330 हेक्‍टर भौगोलिक क्षेत्रापैकी 2090 हेक्‍टर क्षेत्र कायम जिरायती. निम्म्यापेक्षा अधिक जमीन हलक्‍या प्रतीची. मागील वर्षी केवळ 278 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बाजरी, कडवळ, हरभऱ्यासारखी पारंपरिक पिके सोडली तर अन्य पिके नाममात्रच. गावातील 70 टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून.

प्रकल्पासाठी निर्मळ पिंप्री गावाची निवड

सन 2010-11 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (नवी दिल्ली) वतीने देशात हवामान बदलावर आधारित राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पात बाभळेश्‍वर येथील (ता. राहाता, जि. नगर) कृषी विज्ञान केंद्राचाही (पायरेन्स) समावेश होता. केंद्राने प्रकल्पासाठी हवामान बदलाला नेहमी संवेदनशील व कमी पावसाचे गाव म्हणून निर्मळ पिंप्री गावची निवड केली. त्यानंतर केंद्रातील शास्त्रज्ञांकडून गावाचे सर्वेक्षण केले.

समस्या सोडवण्यासाठी कृती आराखडा

गावामध्ये पाण्याचा प्रश्‍न बिकट होता. जमिनी अत्यंत हलक्‍या स्वरूपाच्या होत्या. उत्पादन खर्चात वाढ होत होती. दुग्ध व्यवसायात दुधातील फॅटचे घटते प्रमाण, शेळ्या व कोंबड्यांची कमी उत्पादकता, हिरव्या चाऱ्याची टंचाई, गाईमधील पैदाशीची समस्या, यांत्रिकीकरणाचा अभाव यासारख्या समस्या सर्वेक्षणातून पुढे आल्या. प्रश्‍न सोडवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) कृती आराखडा तयार केला. त्यानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये केंद्राने अनेक उपक्रम राबविले. त्यात प्रयोग, प्रात्यक्षिकांबरोबरच प्रशिक्षण, अभ्यासदौरे, गटचर्चा, मेळावे आदींचा समावेश होता.

लोकसहभागासाठी संघटन

केंद्राने गावातील शेतकऱ्यांमध्ये प्रकल्पाविषयी जागरुकता निर्माण केली. हवामान बदलाच्या अनुषंगाने शाश्‍वत शेतीचे महत्त्व पटवून सांगितले. यातून नाबार्डच्या माध्यमातून "फार्मर्स क्‍लब' स्थापन केला. यातून पुढे शेतकऱ्यांचे उपगट स्थापन केले. आज शेतकऱ्यांचे एकूण आठ गट स्थापन झाले असून, प्रत्येक गटात 15 ते 20 शेतकरी आहेत. यात पिके, फलोत्पादन, पशुसंवर्धन असे प्रकार आहेत. सुमारे 12 महिला स्वयंसहायता बचत गटही तयार झाले. विविध योजना पुढे आल्या. बॅंकांच्या दृष्टीने काळ्या यादीत नाव असलेल्या गावात बॅंकांनी मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा सुरू केला.

जमीन सुधार कार्यक्रम


  • गावातील 70 टक्के जमीन हलक्‍या प्रतीची. तिची उत्पादकता वाढावी म्हणून सुमारे 250 नमुन्यांचे माती परीक्षण झाले. त्यानुसार गावचा जमीन सुपिकता निर्देशांक तयार केला. त्यानुसार एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन शेतकरी करू लागले. गावात सुमारे दहा गांडूळ खत प्रकल्प यातून उभे राहिले.
  • अधिकाधिक शेतकरी सोयाबीन, हरभरा, गहू या पिकांना बीजप्रक्रिया करू लागले.
  • विद्राव्य खतांचा वापर वाढला.
  • हलक्‍या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते (सरासरी 0.3 ते 0.4 टक्के). प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात तो वाढावा म्हणून विशेष मोहीम घेण्यात आली. आज 150 पेक्षा जास्त डाळिंब बागायतदार सेंद्रिय स्लरीतून सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाणी व्यवस्थापन


  • निर्मळ पिंप्री पारंपरीक अवर्षणप्रवण गाव आहे. पावसाचे जे काही पाणी पडते ते हलक्‍या जमिनीमुळे वाहून जाते किंवा जमिनीत लवकर मुरते. पाणीटंचाई ही भीषण समस्या होती. अनेक वर्षांपूर्वी गावासाठी बंधारे, पाझर तलाव झाले होते; परंतु ते मातीने पूर्ण भरले होते.
  • लोकसहभागातून सहा पाझर तलावांतील गाळ काढण्यात आला. एक बंधारा सुमारे एक किलोमीटरपर्यंत दुरुस्त केला.
  • पाझर तलावाची दुरुस्ती केल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता जवळपास 49,083 घनमीटरनी वाढली. तळ्यातील काढलेला गाळ 15 शेतकऱ्यांच्या 15 ते 20 हेक्‍टर क्षेत्रात पसरविण्यात आला. यातून जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत झाली.
  • पाझर तलाव व बंधाऱ्यांत पाणी साठल्याने आसपासच्या विहिरींची पाणीपातळी वाढली. सुमारे 126 विहिरी आणि 183 बोअरना त्याचा फायदा झाला. यामुळे रब्बी हंगामात 62.4 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली वाढले.
  • 40 शेतकऱ्यांनी शेततळी उभारली. आर्थिक परिस्थिती बिकट असूनही फळपिकांत 100 टक्के ठिबकचा वापर, तर तुषार सिंचनाचा वापर सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा या पिकांत सुरू केला.
  • गावात फेब्रुवारीनंतर दुष्काळी परिस्थिती दिसायची, तेथे आज वर्षभर हिरवळ दिसू लागली हे उपक्रमाचे मोठे फलित आहे. गावाला टॅंकरचे गाव म्हणून संबोधले जायचे. आता शेतकऱ्यांकडील टॅंकर शेततळी भरण्यासाठी वापरले जातात.

पीकनिहाय झाले प्रयत्न


  • पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी केव्हीकेच्या माध्यमातून आच्छादनाचा वापर करण्यास शेतकरी शिकले. पाणी धरून ठेवणाऱ्या रसायनांचा (पॉलिमर) प्रयोग डाळिंब, कांद्यासारख्या पिकांत होऊ लागला.
  • सोयाबीन, बाजरी, गहू, हरभरा पिकांत उत्पादकता वाढीसाठी नवनवीन वाणांची प्रात्यक्षिके उपयोगी ठरली. मिश्रपिके, आंतरपिके यांचा वापर वाढला.

फलोत्पादन कार्यक्रम

गावात पूर्वी सुमारे 84हेक्‍टर डाळिंब पिकाखाली असलेले क्षेत्र आज 250 हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. एकरी उत्पादकता सुमारे चार टनांवरून सात-आठ टनांपर्यंत वाढली आहे. गावातील दादासाहेब बजरंग आहेर, नानासाहेब त्र्यंबक निर्मळ यांनी योग्य व्यवस्थापनातून डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतले. उत्पादकता वाढण्यासाठी सेंद्रिय स्लरी, जैविक कीडनाशके, सापळ्यांचा वापर, विद्राव्य खते आदी तंत्रज्ञानाचा अवलंबही शेतकऱ्यांनी केला. गावात डाळिंब हे शाश्‍वत उत्पादन देणारे महत्त्वाचे पीक झाले आहे.

पशुसंवर्धन व्यवस्थापनातील बदल

हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी केव्हीकेने जयवंत, डीएचएन-6, को-4 यासारख्या चारापिकांच्या जातींवर भर देताना पिकाच्या अवशेषांवर प्रक्रिया करून पोषक आहार तयार करण्यासाठी प्रयत्न केले. ऍझोला, मूरघास, हायड्रोपोनिक्‍स या त्रिसूत्री तंत्राची प्रात्यक्षिके राबविली. गावात सुमारे तीन हजार संकरित गाई आहेत. त्यांच्या दुधाची उत्पादकता 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढविणे प्रात्यक्षिक तंत्रज्ञानातून शक्‍य होत आहे. 

शेळीपालन

स्थानिक शेळ्यांच्या गुणप्रत आणि उत्पादकता वाढीसाठी प्रात्यक्षिकांद्वारा सुमारे 50 शेळ्यांचे पाच छोटे प्रकल्प उभे राहिले. प्रति पाच ते 10 शेळ्यांचे काही युनिट तयार झाले. गावातील बहुतांश कुटुंबांकडे स्थानिक कोंबड्या पाळल्या जात होत्या. यात अंडी देण्याचे प्रमाण, तसेच वजन कमी असायचे. केंद्राने ग्रामप्रिया, वनराजा यासारख्या अधिक उत्पादनक्षम कोंबड्यांद्वारा स्थानिक कोंबड्यांच्या उत्पादकता वाढीचा कार्यक्रम राबविला. गावात आज दोन हजारांपेक्षा जास्त सुधारित कोंबड्या आहेत.

यांत्रिकीकरणाचा वापर

गावातील शेतकरी भाडेतत्त्वावरील यंत्रांचा वापर शेतीत करीत आहेत. दूध काढणी, चारा कुट्टी यंत्र यांचा वापर केल्याने उत्पादन खर्च कमी होऊन मनुष्यबळाची बचत होत आहे. प्रशिक्षण घेऊन गावातील सहा युवकांनी पॉलिहाऊस उभारण्यास पुढाकार घेतला. प्रत्येकी 10 गुंठे क्षेत्रावर नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

मोबाईलद्वारा शेती सल्ला

केव्हीकेने गावात हवामान मापक यंत्रणा उभारली आहे. तीद्वारा हवामानातील विविध घटकांचे मोजमाप केले जाते. सुमारे 423 शेतकऱ्यांना मोबाईलद्वारा दररोज हवामान अंदाज दिला जातो. तांत्रिक सल्ला, बाजारभाव, योजनांचीही माहिती दिली जाते. त्यानुसार पीक नियोजन, काढणी करणे शेतकऱ्यांना सुलभ होत आहे. 

(लेखक बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत आहेत.) 

संपर्क ः डॉ. भास्कर गायकवाड - 02422- 252414, 253612 
कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र

डॉ. भास्कर गायकवाड, सुनील बोरुडे,शैलेश देशमुख

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate