অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे !

नेरचे ‘गवळे’… त्यांचे फुलांचे मळे !

आपण चित्रपट पाहताना रंगबिरंगी फुलांचे मोहरून टाकणारे ताटवे फुललेले दिसतात. असेच फुलांचे ताटवे महाराष्ट्र शासनाच्या मदतीने फुलविले आहेत धुळे तालुक्यातील नेर येथील राजेंद्र तुकाराम गवळे व संजय तुकाराम गवळे या बंधूंनी. फुलांचे ताटवे फुलवितानाच त्यांनी विक्री व्यवस्थापन, प्रक्रिया यावर भर दिला. त्याचा दरवळ आज सर्वत्र पसरला आहे. गवळे बंधूंनी कशी साधली ही किमया याविषयीचा माहितीपर हा लेख…

काही वर्षांपूर्वी दहा बिघे जमिनीच्या आधारावर त्यांनी फुलशेती फुलविण्यास प्रांरभ केला. पुढे हा विस्तार वाढला. एवढेच नव्हे, तर धुळ्यात त्यांनी फुलांचे पहिले- वहिले सर्वसुविधांयुक्त पुष्पभांडार सुरू केले. गवळे भावंडांनी या क्षेत्रात आता चांगलाच जम बसविला आहे. धुळे-साक्री महामार्गावरील नेर फाट्यापासून डावीकडे म्हणजे म्हसदी गावाकडे जाताना श्री. गवळे यांची शेती आहे. फुलांचा सीझन असेल, तर त्या शेतावरुन नजर हटत नाही. सध्या झेडूंच्या फुलांचे ताटवे लक्ष वेधून घेत आहेत.

गवळे कुटुंब मूळ नेरचे. माळी समाजातील या परिवाराचा उदरनिर्वाह 10 बिघे जमिनीवर चालायचा. त्या जमिनीत पिकणारा थोडाफार भाजीपाला आणि काही फुले यांच्या विक्रीतून हा परिवार उदरनिर्वाह करीत असे. श्री. राजेंद्र आणि श्री. संजय यांच्या वडिलांचे मामा दामू भागा माळी धुळ्यात घरोघरी फुले पुरविण्याचा व्यवसाय करीत. त्या सोबतच ते भाजी विक्रीसुध्दा करीत. नेरहून हे साहित्य धुळ्यात आणण्याची जबाबदारी तेव्हा राजेंद्र यांची असे. यातून त्यांचे धुळ्यांशी नाते विकसित होऊ लागले. 1982 मध्ये त्यांनी वाणिज्य शाखेत बारावीची परीक्षा दिली. तोवर हळूहळू फुलांची बाजारपेठ विस्तारु लागली होती. धुळ्यात या व्यवसायाला मिळू शकणारी संधी त्यांना खुणावत होती. त्यामुळे पुढील शिक्षण थांबवून आता व्यवसायातच लक्ष घातले पाहिजे, असा निर्णय श्री. राजेंद्र यांनी घेतला. त्यांचे वडील तुकाराम गवळे हे सुध्दा नोकरी शोधण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय असावा,याच मताचे होते. त्यामुळे आर्थिक गरजेपोटी छोटी मोठी नोकरी शोधण्याऐेवजी त्यांनी धुळ्यात संतोषीमाता मंदिराच्या परिसरात लोटगाडीवर फुले विक्रीला सुरवात केली. सकाळी फुलांचे घरोघरी वितरण, तर उर्वरित कालावधीत मंदिरासमोर फुलांची,हारांची विक्री करायची,असा त्यांचा क्रम सुरु झाला. या प्रयोगास चांगले यश मिळाले. गॅलेंडर,चांदणी,मोगरा अशी फुले आणि त्यांचे हार यांची विक्री सुरू केली. धुळेकरांनाही या दुकानांची माहिती होऊ लागली. त्यातून मंदिरात जाणाऱ्या भक्तांबरोबरच गावातील इतर कार्यक्रम प्रसंगी लागणाऱ्या फुलांची चौकशीही त्यांच्याकडे सुरु झाली. लग्न समारंभाच्या कामांसाठी त्यांच्याकडे चौकशी होऊ लागली. कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही, या सूत्रानुसार राजेंद्र यांचा कारभार चालू होता. समारंभाची ही सजावट फक्त त्यांच्या शेतातील फुलांतून होण शक्य नव्हते. सुरवातीला नाशिक, मुंबई, पुणे, इंदूर येथे जाऊन तेथील मार्केटचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तेथून माल आणायचा आणि धुळ्यातील कामे करुन द्यायची, असा क्रम त्यांनी सुरु केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.

कार्यक्रमांची सजावट करतानाच अशा कार्यक्रमात लागणाऱ्या पुष्पगुच्छांची गरज त्यांच्या लक्षात आली. तोवर धुळ्यात पुष्पगुच्छ तयारच होत नव्हते. ही संकल्पनाच तेथे नव्हती. कार्यक्रमात मान्यवराच्या गळ्यात थेट पुष्पहारच घातले जायचे ! हा ट्रेन्ड धुळ्यात आणण्याचे ठरवून त्यांनी काही बुके डिझाईन केले. हे अगदी साधे बुके होते. ते त्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात छानपैकी सजवून ठेवले.आपल्या शहरात बुके मिळतात. हे कळल्यानंतर धुळेकरांनी त्याचा वापर सुरु केला. ही कामे वाढत असताना त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली होती.

धुळ्यात आता त्यांचा चांगला जम बसला होता. पण बाहेरुनही फुलांची खरेदी करावी लागत असल्याने इतरांवरील अवलंबित्व वाढत होते आणि नफ्याचा मोठा वाटा तिकडे वळत होता. या टप्प्यावर त्यांनी फुलशेतीचा विचार सुरू केला. त्यांचे लहान बंधू संजय त्यांच्या मदतीला आले. त्यांनी शेतीची जबाबदारी उचलण्याचे ठरविले. त्यांच्या जमिनीला लागून त्यांच्या चुलतभावाची जमीन होती. ती विकत घेण्यास त्यांनी प्रारभ केला. त्यांच्याकडे आता 24 एकरांपर्यंत शेती आहे. या जमिनीत त्यांनी पाण्याची सोयही केली. त्यासाठी विहिरी, कूपनलिका खोदल्या. येथे त्यांना गॅलेंडर, निशिगंध, गुलाब, शेंवती, मोगरा, ग्लॅडर, जरबेरा, लिली, गुलावा, ग्लूटोप, कांगडा, पिस्टेल पॉम, सब्जा, कामिनी पत्ता, आरेका पाम, अस्पा ग्रास, स्प्रींग जेरीसह विविध फुले व सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या पानाच्या वनस्पती यांची लागवड केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत मिळालेल्या सात लाख आठ हजार रुपयांच्या अनुदानातून त्यांनी शेतात पॉलिहाऊस उभारले आहे. यामध्ये सध्या गुलाबाच्या रोपांची लागवड केली असून त्यांचा सेंद्रीय शेतीवर अधिक भर आहे. संपूर्ण फुलशेती ही ठिबंक पध्दतीने असुन त्या शेतीत ते सेंद्रीय पध्दतीचा वापर करतात. श्री. राजेंद्र यांनी दुकानाचा आणि त्यातील सेवांचा विस्तार केला. आता ते धुळ्याबरोबरच देशातील इतर मोठ्या शहरांतून पुष्पगुच्छ घरपोच पोहोचविण्याची जबाबदारीही घेतात. देशभरात विस्तारलेल्या अशा प्रकारच्या सेवांच्या जाळ्यात त्यांनी स्वत:ला जोडले आहे. त्यामुळे धुळ्यात बसून देशविदेशात कुणाला एखाद्या विशिष्ट दिवशी, कुठल्या ही शहरात, केव्हाही पुष्पगुच्छ पोहोचवायचा असेल, तर राजेंद्र यांच्याशी संपर्क साधला आणि काम झाले असे सूत्र तयार झाले आहे. त्यासाठी श्री. गवळे हे www.fnp.com या संकेतस्थळाची मदत घेतात.

श्री. राजेंद्र दोन मुलगे व एक मुलगी आहे. त्यापैकी मोठा मुलगा गोपाळ गवळे याने कृषी विज्ञान शाखेत पदवी घेतली आहे. तो सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे. लहान मुलगा शिक्षण घेत आहे. श्री. संजय यांनाही दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा कपिल सुध्दा कृषी विज्ञान शाखेचा पदवीधर असून संपूर्ण फुल शेती तो सेंद्रीय पध्दतीने करतो. तसेच शेतीकडे त्याचे संपूर्ण लक्ष असते तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. त्यांच्या एकत्रीत कुटूंबामुळे श्री. संजय हे शेती कडे लक्ष देतात तर श्री. राजेंद्र मार्केटिंग क्षेत्र सांभाळतात.

महाराष्ट्र शासनाची मदत

श्री. गवळे यांना पॉली हाऊस बांधण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतंर्गत त्यांना 7 लाख 8 हजाराचे अनुदान मिळाले आहे. तसेच 2016-2017 मध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ,पुणे मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ साठी त्यांना रुपये 87500/- इतके अनुदान मिळाले आहे. याच वर्षी त्यांना कृषी विभागामार्फत ठिंबक सिंचनासाठी रुपये 1,50,000/- इतके अनुदान मिळाले आहे. फुलशेती करीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून वेळोवेळी कर्ज घेतात व त्याची ते नियमितपणे परतफेड करतात. त्यासाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत नियमितपणे कर्ज फेडल्यामुळे त्यांना रु. 25,000/- चे अनुदान आता मिळणार आहे. प्लॉस्टिक मुक्त अभियान राबविल्या बद्दल त्यांना धुळे महानगरपालिका ,धुळे याच्या मार्फत स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर त्यांचे बंधू संजय यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.

फुलशेतीसाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. केवळ फुले, पुष्पगुच्छ विकण्याचा व्यवसाय करीत नाही, तर या माध्यमातून व्यक्तींच्या सद्भावना पोहोचविण्याचे काम आपण करतो, असे ते नमूद करतात. त्यांच्याकडे दुकानावर दहा ते बारा व शेतीत दहा ते बारा जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. व्यवसाय करताना ते टॅबचा वापर करतात. त्याच्यावरच ते नमुने दाखवितात.

-संदीप गावित

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate