অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा

परसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा

नैसर्गिक आपत्तीने वेढलेल्या कुटुंबांसाठी प्रकल्प

महापूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या काळात सामाजिक जीवन विस्कळित होते, कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात. त्या ठिकाणी अशा कुटुंबांचे पुनर्वसन होण्यासाठी 'परसबागेतील शेती' हा मोठा आसरा होऊ शकतो. त्यातून ही कुटुंबे सावरली जाऊ शकतात, त्यांची अन्नसुरक्षा ती मिळवू शकतात, असे अन्न आणि कृषी संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेने पाकिस्तानात अशा प्रकारचा प्रकल्प राबवला. त्यातून काही शेतकरी महिलांनी आपले घर चांगल्या प्रकारे सावरून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
अन्नसुरक्षा या गोष्टीला सध्या जागतिक स्तरावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेतीतील उत्पादकता वाढवणे हा विविध देशांचा तसेच अन्न आणि कृषी संघटनेचा (एफएओ) अजेंडाच (कार्यक्रमच) आहे. आपतकालीन परिस्थितीत परसबागेतील शेती अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरू शकते यावर "एफएओ'ने जोर दिला आहे.

परसबागेत घेऊ शकणाऱ्या विविध भाजीपाला पिकांत विविध जीवनसत्त्वे व खनिजे असतात आणि आपल्या आरोग्यासाठी तो एक उत्तम पोषणयुक्त आहार असतो. या भाजीपाल्यांचे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही.

परसबागेतून सावरले कुटुंब

ज्या ज्या ठिकाणी गंभीर नैसर्गिक आपत्ती येतात, त्या त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती विस्कटून जाते. अशा वेळी अन्नसुरक्षेची मोठी समस्या निर्माण होते. एफएओ संस्थेने यासंदर्भात एक उदाहरण दिले आहे.

शाझादी ही पाकिस्तानी महिला शेतकरी. आपला पती अब्दुल नबी याच्यासह ती चार एकर शेती सांभाळायची. त्यांना आठ मुले आहेत. सन 2012 मध्ये त्या भागात महापूर आला. त्यात या कुटुंबाची सर्व शेती आणि घर उद्‌ध्वस्त झाले. सारे कुटुंब उघड्यावर आले. घरची चूल बंद झाली. त्या भागात एफएओ संस्थेचे कार्य सुरू होते. महापुरानंतर पुनर्वसन कामांत अडीच हजार महिलांना आधार देण्याचे काम ही संस्था करीत होती. त्यासाठी परसबागेतील शेती हा प्रकल्प राबवण्याचे काम सुरू होते. शाझादीला याच प्रकल्पाचा आधार मिळाला.

दुखीकष्टी न होता तिने हिंमत एकवटली. आपल्या परसबागेत शेती करायला सुरवात केली. टोमॅटो, कांदा, भेंडी आदी पिके टप्प्याटप्प्याने ती परसबागेत घेऊ लागली. साधारण चार महिन्यांनंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. परसबागेत पिकवलेला भाजीपाला घरी येऊ लागला. घरची चूल पुन्हा पेटली. अन्नावर स्वयंपूर्णतः मिळवण्यात शाझादी यशस्वी झालीच शिवाय पुढील तरतूद म्हणून कांद्यासारख्या शेतमालाची साठवणूक करून ठेवण्यापर्यंत तिने मजल मारली आहे. याही पुढे जाऊन परसबागेत पिकवलेला भाजीपाला मार्केटला जाऊन विकण्यापर्यंत शाझादी सक्षम झाली आहे. हंगामाच्या अखेरीस तब्बल 14 हजार रुपयांची कमाई ती करू लागली आहे.

चांगले नियोजन केले तर परसबागेतील शेती आपल्या घराला अन्नाची स्वयंपूर्णतः देऊ शकते हाच संदेश एफएओने देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना गंभीरपणे ही शेती करायची आहे त्यांनी माझ्या परसबागेचे उद्दिष्ट काय आहे, त्यातून किती व्यक्तींचे पोट भरणे शक्‍य आहे, या बागेत कोणकोणता भाजीपाला किती कालावधीत पिकवणे शक्‍य आहे, या प्रश्‍नांचा अभ्यास करावा. योग्य मार्गदर्शन घ्यावे, ते नक्कीच यशस्वी होतील, असे संस्थेने म्हटले आहे.

स्त्रोत: अॅग्रोवन



© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate