ओडिशा राज्यात लहान शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे परसबाग. लहान क्षेत्र आणि उत्पन्नाच्या मर्यादा असणाऱ्या शेतकऱ्यांना परसबागेतील भाजीपाला लागवडीतून पुरेसा पोषण आहार मिळावा, तसेच काही प्रमाणात उत्पादित भाजीपाल्याच्या विक्रीतून आर्थिक नफा वाढावा या दृष्टीने परसबाग प्रकल्प फायदेशीर दिसून येत आहे
भुवनेश्वर येथील केंद्रीय फलोद्यान केंद्राच्या माध्यमातून मयूरभंज, कोंझार आणि संबळपूर जिल्ह्यामध्ये "एनएआयपी' प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात आला आहे. यामध्ये शेततळ्यात मत्स्यशेती, फळबाग लागवड आणि पशुपालनाला चालना देण्यात आली आहे. यामध्ये आता परसबागेचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली.कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या आहारात पोषक घटकांची कमतरता दिसून येत आहे, त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या दिसून येत आहेत. हे लक्षात घेऊन कुटुंबाला पुरेसा पोषक आहार उपलब्ध व्हावा ही या परसबागेची संकल्पना आहे. परसबागेमध्ये हंगामनिहाय विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळझाडांच्या लागवडीचे नियोजन आहे.
परसबाग प्रकल्पाच्या माध्यमातून तीन जिल्ह्यांतील निवडक शेतकऱ्यांना भेंडी, कारले, दोडका, चवळी, काकडी, भोपळा, दुधीभोपळा, पडवळ, शेवगा, पालक, वांगी, मिरची टोमॅटो या भाजीपाला पिकांचे बियाणे आणि खते देण्यात आली. याचबरोबरीने जागेच्या उपलब्धतेनुसार पपई, केळी, पेरू, आंबा, अननसाची रोपेदेखील परसबागेत लागवडीसाठी देण्यात आली. कुटुंबातील सदस्यांना परसबागेत भाजीपाला, फळपिकांची लागवड आणि पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी परसबाग संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. हळूहळू परिसरातील लोकांनाही या परसबागेचे महत्त्व पटले, त्यातून परसबागेचा प्रकल्प या तीनही जिल्ह्यांत चांगल्या प्रकारे विस्तारला.
टप्प्याटप्प्याने परसबागेतून भाजीपाला आणि फळांचे चांगले उत्पादन मिळू लागले, त्यामुळे कुटुंबाच्या रोजच्या आहारात विविध भाजीपाल्यांचा समावेश झाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीचा भाजीपाला परसबागेतच उत्पादित होऊ लागला. घरापुरता भाजीपाला आणि फळांचा वापर करून उर्वरित भाजीपाला शेतकरी महिला बाजारपेठेतही विकू लागल्या आहेत.
कोंझार जिल्ह्यातील भटुनिया गावातील टिकीना दिहुरी ही महिला शेतकरी केवळ आठवीपर्यंत शिकलेली, त्यांना परसबागेत भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनाबाबत विशेष माहितीही नव्हती; परंतु प्रकल्पाच्या माध्यमातून टिकीना दिहुरी यांना परसबागेत लागवडीसाठी विविध भाजीपाल्यींची बियाणे देण्यात आले. संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी त्यांना भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केल्यामुळे चांगल्या दर्जाच्या भाजीपाल्याचे उत्पादन त्यांना मिळाले. या परसबागेतून त्यांना आतापर्यंत 900 किलो भाजीपाल्याचे उत्पादन मिळाले. त्यातील 650 किलो भाजीपाला घरासाठी वापरण्यात आला आणि उर्वरित 250 किलो भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत विकला, त्यातून 11,500 रुपयांचा नफा मिळाला. या परसबागेच्या प्रकल्पामुळे कुटुंबाच्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश झाला, तसेच विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळाले.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊतकतापन चिकित्सा : (डायाथर्मी). उच्च कंप्रतेच्या (...
सध्या महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अ...
मेंढ्यांच्या संगोपनाच्या पद्धती देशकाल परिस्थिती, ...
राजस्थानातील शेतक-यांनी शेतीतील उत्पादन आणि उत्पन्...