অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य

पिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य

माळशिरस तालुक्‍यातील पांडुरंग म्हसवडे यांचे प्रयोग

यंदाच्या वर्षीच्या पाणीटंचाईच्या झळा राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. मात्र प्रतिकूल परिस्थितीवर हिमतीने व जिद्दीने मात करता येते हा आशावाद बोरगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील पांडुरंग म्हसवडे यांनी आपल्या शेतीतील प्रयोगांतून सिद्ध केला आहे. 
जनावरांना चारा म्हणून आणलेल्या उसाच्या वाड्यापासून लागवडीसाठी त्यांनी बेणे मिळवीत उसाची रोपे तयार केली. त्यापासून लागवड केली. केळी, शेवगा आदी पिके व त्यातील आंतरपिकांतूनही त्यांनी आर्थिक स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. 
मनोज गायकवाड
पांडुरंग म्हसवडे यांची बोरगाव (ता. माळशिरस) येथे 16 एकर शेती आहे. त्यातून नेहमीच चांगले उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकाचवेळी विविध आंतरपिके घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. विशेषतः भाज्या व त्यातही फळभाज्यांचे प्रयोग यशस्वी करून त्यापासून उत्तम उत्पन्न मिळविणारा शेतकरी म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे. मात्र गेली दोन वर्षे अपुरा पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करताना त्यांचीही दमछाक होत आहे. त्यांच्या शेतीतील तीन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या सुमारे चार विंधन विहिरींपैकी केवळ दोन विहिरींना जेमतेम पाणी उरले आहे. या पाण्यावरच उभी पिके वाचविण्यासाठी ते निकराचा संघर्ष करीत आहेत. 

सध्या 16 एकरांत विविध पिकांपासून चांगले उत्पादन घेण्यापेक्षाही अत्यंत कमी पाण्यात ही पिके कशी वाढवता येईल असे प्रयत्न म्हसवडे यांचे सुरू आहेत. त्यांच्या मुख्य पिकांपैकी ऊस हे मुख्य पीक आहे. पाण्याची उपलब्धता कमी-जास्त असल्याने उत्पादनही त्याप्रमाणे असते. मात्र दरवर्षी एकरी 40 ते 45 टन उत्पादन ते घेतात. सध्या त्यांचा पावणेतीन एकर लावण ऊस तर दीड एकरावर खोडवा ऊस आहे.

वाड्याचा उपयोग केला बेण्यासाठी

सध्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाले आहे. ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये आपल्या घरच्या जनावरांसाठी ते जवळच्या साखर कारखाना परिसरातून उसाचे वाडे विकत आणीत होते. आणलेल्या वाड्याच्या सुरवातीला ज्या कांड्या असतात त्यापासून ऊस लागवडीला बेणे मिळविणे शक्‍य असल्याचे त्यांना वाटले. बेण्याचा खर्च अशा प्रकारे पूर्णपणे वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला. जानेवारीत ऊस लागवडीचा निर्णय घेतला. आणलेल्या वाड्याला असलेल्या कांड्या तोडून त्या गोण्यांमध्ये भरून ठेवल्या. या कांड्या तोडल्यावर त्यातील डोळ्यावर असणारे पाचट त्यांनी काढले नव्हते.

कांड्यातील डोळ्यांची मर झालेली नव्हती. शिवाय तोडलेल्या कांड्या निर्जंतुक करून घेतल्या होत्या. पंधरा दिवस साठवलेल्या या कांड्या त्यांनी वस्तीजवळच झाडाखाली सावलीत अंथरल्या. उपलब्ध पाण्यावर रोपनिर्मितीला सुरवात केली. उगवण लवकर व्हावी यासाठी बेणे लावल्यावर ते प्लॅस्टिक कागदाने झाकून घेतले.

रोपांसाठी बेणे खरेदी, रानाची मशागत, पाणी अथवा अन्य कसल्याही प्रकारचा खर्च आला नव्हता. फुले-265 जातीची सुमारे 4600 रोपे तयार केली. मात्र पुरेशा पाण्याअभावी त्यातील 3500 पर्यंत रोपेच जगली. 
खोडवा तुटून गेलेले एक एकर रान नांगरून घेतले होते. त्याच रानात बैलाच्या मदतीने सहा फुटांवर सरी सोडून रोपांची लागवड केली. ठिबकद्वारे पाणी देण्यास सुरवात केली. लागवडीमध्ये पूर्वीचे जुने ठिबक संच वापरले आहेत. आता हा ऊस दोन महिन्यांच्या पुढील अवस्थेत गेला असून, त्याची वाढ चांगली आहे. सध्या दोन विंधन विहिरींचे जेमतेम पाणी आहे.

केळी पिकातून आर्थिक स्थैर्य

श्री. म्हसवडे यांनी आपल्या अडीच एकर केळी बागेतसुद्धा अनेक आंतरपिके घेतली आहेत. पाणीटंचाईच्या काळात धोक्‍यात येणारी शेती अर्थव्यवस्था त्यातून समतोल राखण्याचा निकराचा प्रयत्न केला आहे. कलिंगडाचे आंतरपीक लावले असता ऐन फळधारणेच्या काळात पाणी आटल्याने मोठे संकट उभे राहिले. घरातील सोने विकून रानात नवीन विंधन विहीर घेतली. त्यास पाणी लागले. या विंधन विहिरीत मोटार बसवून पाणी उपसा सुरू केला.

पाणी मिळाले, मात्र केवळ चारच तासांत या ठिकाणचे पाणी येणे बंद झाले. त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतरावरील विंधन विहिरीपासून पाइप लाइन करून पाणी आणले. या महिनाभराच्या काळात कलिंगड पीक मात्र धोक्‍यात आले व नुकसानही सोसावे लागले.

पाणी कमी पडल्याने काही केळी कंदही जळाले. परिस्थिती लक्षात घेऊन म्हसवडे यांनी जळालेल्या केळीच्या जागी पपईची रोपे आणून लावली. या झाडांना आता चांगली फलधारणा झाली आहे. पाण्याअभावी अडचणीत आलेली केळी वाचवताना आंतरपीक घेण्याचा त्यांचा निर्णय खूप दिलासादायक ठरला आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंमत न हारता म्हसवडे पुढे वाटचाल करीतच राहिले. त्यांनी केळीत काकडीचे आंतरपीक घेऊन त्यातून सुमारे 60 हजार रुपयांचे तर याच केळीतील आंतरपीक मिरचीतूनही सुमारे 20 हजार रुपयांची कमाई केली आहे.

केळीचे सरासरी उत्पादन योग्य परिस्थितीत एकरी 25 टनांपर्यंत आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी संघर्ष करीत त्याची सुरू असलेली ही वाटचाल प्रेरणादायी आहे. एका पिकाहून होणारे नुकसान दुसऱ्या पिकातून भरून काढण्यासाठी तसेच मुख्य पिकातील उत्पादनखर्च कमी करण्यासाठी विविध पिके घेणे सोईस्कर होते, असे म्हसवडे यांचे म्हणणे आहे.

शेवगा व आंतरपिकांची जोड

सध्या एक एकर क्षेत्रात शेवगाही आहे. त्यालाही सध्या पाणी कमी पडते आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही शेवगा पिकात भेंडी, घेवडा, करडई आदी पिके घेतली आहेत. दररोज शेवगाच्या सुमारे 100 शेंगा, 10 किलो भेंडी व पाच किलो घेवडा श्रीपूर सहकारी साखर कारखाना परिसरातील मंडईत जाऊन विक्री केली जाते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वसुधा जातीची ज्वारी त्यांनी एक एकरात केली होती. सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रात 15 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. याच ज्वारीत त्यांनी हरभरा पिकाचेही आंतरपीक घेतले होते. सध्या पाणीटंचाईचे संकट असल्याने काही क्षेत्र रिकामे ठेवले आहे. 
सध्या पाण्याअभावी परिस्थिती बिकट झाली आहे. चार विंधन विहिरींचे पाणी एकत्र करून रोटेशनद्वारे सुमारे सहा दिवसांनी पिकांना देत आहे. त्या पाण्यावरच लढाई सुरू आहे. शेतकऱ्याला थकून चालत नाही. शक्‍य त्या पिकांच्या नियोजनातून शेतीतील आशावाद कायम ठेवला आहे.


पांडुरंग म्हसवडे
संपर्क - पांडुरंग म्हसवडे, 99210682489921068248

माहिती संदर्भ : अॅग्रोवन १३ मे २०१३

 

You'll need Skype CreditFree via Skype


© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate