অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉट कल्चर - जरबेरा शेती

नोकरी सांभाळून शेतीचेही चांगले व्यवस्थापन करणे हे कसब आहे. सातारा जिल्ह्यातील राजेंद्र पवार यांनी त्याचप्रकारे ग्रीनहाऊस बेड व पॉट कल्चर (कुंडीत रोपे वाढवणे) पद्धतीने जरबेराची यशस्वी शेती केली आहे. केवळ पाच ते दहा गुंठ्यांत सुधारित तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेतीतून चांगला "अर्थ" शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा जिल्ह्यातील धनवडेवाडी या छोट्या गावात राजेंद्र पवार राहतात. गावाला दोन्ही बाजूस डोंगर. राजेंद्र यांची अवघी साडेतीन एकर शेती. विहीर असूनही पाणी कमी असल्यामुळे बागायत क्षेत्र कमीच. अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्यात ते लेबर विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. इच्छाशक्ती असूनही पाण्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन, भुईमूग आदी पिके त्यांना घ्यावी लागायची, त्यातच गावात दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे कुटुंबाचा सर्व खर्च नोकरीवरच भागवावा लागे. अशातच कारखान्यातील मित्राच्या माध्यमातून वर्णे (जि. सातारा) येथील मानसिंग पवार यांच्या ग्रीनहाऊसला त्यांनी भेट दिली. त्यातून प्रेरणा घेत, अभ्यास व माहितीसह 2007 च्या सुमारास पाच गुंठे क्षेत्रावर ग्रीन हाऊसची उभारणी केली. नोकरी सुरू ठेवतच कुटुंबाच्या मदतीने त्यात जरबेरा शेती सुरू केली. यात अडीच फुटांचा गादीवाफा (बेड) असून, त्यात तीन हजार ते 3200 रोपांची लागवड केली. ग्रीन हाऊस उभारणीसाठी सहा लाख रुपयांचे कर्ज काढले. विक्री व्यवस्था व बाजारपेठांचा अनुभव घेत तीन वर्षांत ग्रीन हाऊस कर्जमुक्त केले.

दहा गुंठ्यांत पॉट कल्चर

ग्रीनहाऊसमध्ये अजून सुधारणा करणे पवार यांना आवश्‍यक वाटत होते.

मित्राला सोबत घेऊन जयसिंगपूर, धारवाड येथील ग्रीन हाऊसची पाहणी त्यांनी केली. तेथील कुंडीतील व कोकोपीटवर जरबेराची लागवड पाहिली. त्यानंतर दहा गुंठे क्षेत्रावर या पद्धतीने लागवड करण्याचा निर्णय घेतला. 
त्यासाठी सुमारे आठ हजार कुंड्यांची गरज भासली. त्यात कोकोपीट भरले. स्टीलचे रॅक तयार करून त्यात जमिनीपासून सुमारे दोन फूट उंचीवर कुंड्या ठेवण्यात आल्या. एका रॅकमध्ये 28 याप्रमाणे 10 गुंठ्यांत सुमारे 296 रॅक आहेत. सप्टेंबर 2012 मध्ये कुंड्यांमध्ये जरबेराची लागवड केली. रोपांच्या वाढीच्या आवश्‍यकतेनुसार 0ः0ः50, 12ः 61ः 0, 13ः-0-45 यासारख्या विद्राव्य खतांचा वापर केला. गरजेनुसार कीडनाशकांची फवारणी केली.

पाणी व्यवस्थापन

पॉट कल्चरमध्ये पाणी देण्यासाठी पेग सिस्टिमचा वापर केला आहे. यामुळे पाण्याची बचत होते, सर्व रोपांना समान पाणी व खत दिले जाते. पाण्याचे नियोजन हंगामानुसार होते. उन्हाळ्यात दिवसातून तीन वेळा पाणी दिले जाते.

पवार यांच्या सुधारित शेतीची वैशिष्ट्ये

1) पॉट कल्चर व बेड अशा दोन पद्धतीने जरबेरा लागवड 
2) पाच ते दहा गुंठे एवढेच त्यासाठी क्षेत्र 
3) देशभरातील बाजारपेठांचा अभ्यास, काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट 

कुंड्यांतील लागवड का फायदेशीर?

1) कुंड्यांतील लागवड थेट मातीत नसल्याने अतिरिक्त पाणी व रोगांचा प्रसार कमी 
2) उत्पादन बेड पद्धतीपेक्षा सुमारे 20 टक्के अधिक मिळते. 
3) हवा खेळती राहून पिकाला फायदा होतो. 
4) फुलांची प्रत सुधारते 
5) एखाद्या रोपास किडी-रोगाचा जास्त प्रार्दुभाव झाल्यास तेवढीच कुंडी बाजूला काढता येते. 
6) बेड पद्धतीपेक्षा पॉट कल्चर पद्धतीत लागवड लवकर करता येते. 
7) बेड पद्धतीपेक्षा या पद्धतीत जास्त रोपे बसतात, त्यामुळे उत्पादनही जास्त मिळते. 

अर्थशास्त्र

पवार यांनी उभारलेल्या दहा गुंठ्यांवरील ग्रीनहाऊस उभारणीसाठी सात लाख 34 हजार रु. खर्च आला. रोपे, रॅक, कुंड्या, पाण्याची टाकी, ठिबक सेट, एचटीपी फवारणी संच, जमीन सुधारणा, कोकोपीट, मजुरी तसेच अन्य सर्व खर्च मिळून 17 लाख दोन हजार रुपये खर्च आला. 
जानेवारी 2013 मध्ये फुलांचे उत्पादन सुरू झाले. एक दिवसाआड तीन हजार फुले, तर महिनाभरात सुमारे 40 हजार फुले मिळतात. प्रति फूल कमाल दर 12 ते 15 रुपये मिळतो (लग्नसमारंभासारख्या काळात), तर सर्वांत कमी दीड रुपया दर मिळतो. सध्या दोन रुपये 65 पैसे प्रति फुलास दर मिळतो आहे. 
पाच गुंठ्यांतील बेड पद्धतीत एक आड दिवस पद्धतीने दररोज 1200 फुलांचे उत्पादन मिळते. महिन्याला सुमारे 18 हजार फुले मिळतात. प्रति फूल सरासरी दर दोन रुपये 50 पैसेपर्यंत मिळतो. प्रति फूल सुमारे 85 पैसे उत्पादन खर्च होतो.

मार्केटचा अभ्यास

पवार यांनी हैदराबाद, विजयवाडा, दिल्ली, विशाखापट्टणम, लखनौ, लुधियाना या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या, फुलांचा वाहतूक खर्च, दर यांची माहिती घेतली. वर्षातून पितृपंधरवडा व मार्च महिन्यात फुलांचे दर घसरतात, अशा वेळी अन्य वेळी ज्या व्यापाऱ्यांना फुले विकली जातात, त्यांच्याकडून दर बांधून घेतले. हैदराबादसाठी प्रति बॉक्‍स 80, विजयवाडासाठी प्रति बॉक्‍सला 125 रुपये वाहतूक दर द्यावा लागतो. उत्तरेकडे हाच दर 250 रुपये आहे. प्रत्येक वेळी देशातील विविध व्यापाऱ्यांकडून दर माहीत करून घेऊन फुले पाठविली जातात. उत्तरेकडे प्रति फूल तीन रुपये, तर दक्षिणेकडे हा दर त्याहून कमी मिळतो.

या गोष्टींबाबत कायम जागरूकता हवी

पवार म्हणतात - 
  • किडी-रोगांवर कायम लक्ष ठेवावे लागते.
  • ग्रीनहाऊसमध्ये माती-पाणी परीक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. ईसी, पीएच (सामू) या घटकांवर नियंत्रण ठेवावे लागते. प्रत्येक आठ दिवसांनी पाणी व मातीच्या सामूची तपासणी केली जाते.
  • मार्केटचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो.

कुटुंबाचे सहकार्य

पवार सध्या गावचे सरपंच आहेत. नोकरी करून शेती करीत असताना कुटुंबाची मदत अत्यंत महत्त्वाची ठरते, त्यादृष्टीने पत्नी सौ. हेमा व आई यादेखील शेताचे व्यवस्थापन सांभाळतात, असे श्री. पवार यांनी सांगितले. शेतीमुळेच मुलांना चांगले शिक्षण देणे शक्‍य झाले. सध्या मुलगी आयटी क्षेत्रात व मुलगा कृषी क्षेत्रात शिक्षण घेत आहे. नव्या ग्रीन हाऊससाठी काढलेले कर्ज तीन ते चार वर्षांत मुक्त करणार असल्याचेही ते सांगतात. 

राजेंद्र पवार - 98609114959860911495

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate