অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी !

प्रक्रिया उद्योगामुळे मराठवाड्यातील हळदीला मिळाली झळाळी !

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर शेतीतही नंदनवन फुलते… हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील छोटसं गाव असलेलं वांगी येथील तरूण शेतकरी सुशील शेळके यांनी हळदीवरील प्रक्रिया उद्योगातून प्रत्यक्षात आणून दाखविले आहे. त्यांची ही प्रेरक यशकथा…

शासनाच्या सेंद्रिय शेती योजनेसह कृषी विभागाचे तसेच कृषी विद्यापीठांचे मार्गदर्शनाखाली शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग तसेच प्रगती ही उल्लेखनीय आहे. त्यांनी उभारलेला एस फोर फुड्स नावाचा प्रक्रिया उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

सुशील शेळके यांनी बायोटेकमध्ये पदवी तर कृषी व्यापार व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते औरंगाबाद येथील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. परंतु प्रयोगशील शेती करण्याची आवड असल्याने त्यांनी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून हळद प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल सुरू केली. हळद हे एक मसाल्याच्या पिकांतील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलीत आहे. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर नांदेड, परभणी जिल्ह्यात होते. काही वर्षांपासून महाराष्ट्रात हळद लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.

2014 ला फुलंब्री तालुक्यातील औरंगाबाद-जळगाव महामार्गालगत बिल्डा मठपाटी येथील गट नं. 262 मध्ये अलाहाबाद राष्ट्रीयकृत बँकेच्या अर्थसाहाय्यातून हळद व आलं प्रक्रिया उद्योग सुरू केला. बाजारात व्यापाऱ्यांकडून कच्च्या हळदीला मिळणारा कवडीमोल भाव त्यातून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी हळद, आलं खरेदी केंद्र सुरू केले. 2016-17 या वर्षी जिल्हाभरातील जवळपास 100 शेतकऱ्यांनी 80 टन हळद प्रक्रिया उद्योगासाठी थेट विक्री करून नफा मिळविला. 35 शेतकऱ्यांनी हळदीवर प्रकिया करून कुरकुमीन औषध कंपन्यांना विक्री केलं.

कच्च्या हळदीला मिळणाऱ्या नाममात्र भावामुळे कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील हजारो शेतकरी पड्या दराने हळदीची विक्री दलालामार्फत व्यापाऱ्यांना करतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना हवा तसा हमी भाव मिळत नाही. परंतु शेळके यांनी सुरू केलेल्या प्रक्रिया उद्योगामुळे गेल्यावर्षी 900 ते 1 हजार रूपये प्रती क्विंटल दराने हळद विक्री केली. शेतकऱ्यांसाठी हा प्रक्रिया उद्योग आता हक्काचे विक्री केंद्र बनलंय. गेल्यावर्षी दुष्काळ तसेच दलाल, व्यापारी यांच्या कचाट्यात सापडलेल्या शेकडो शेतकऱ्यांची 850 क्विंटल हळद खरेदी करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी व्यापारी, दलालाच्या मार्फत हळदीची विक्री न करता प्रक्रिया उद्योगासाठी हळद देऊन योग्य मोबदला मिळवावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

स्थानिक तरूणांना मिळाला रोजगार : बिल्डा, विटेकरवाडी, गणोरी परिसरातील जवळपास 10 तरूणांना या प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. या तरूणांच्या हाताला गावातच काम मिळाल्याने त्यांची शहरात रोजगार शोधण्यासाठीची पायपीट थांबली आहे.

सेंद्रिय शेतीला प्राधान्य : रासायनिक खतांचा होणारा वापर व फवारणीसह होणारा इतर खर्च टाळण्यासाठी सुशील शेळके यांनी आपल्या शेतीत सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सुशील ॲग्रो फार्मच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सुमारे 20 एकर शेतात डाळिंब, आंबा, सीताफळ, चिंच, आवळा, चिकू आदी फळबागांची लागवड केली आहे.

कुरकुमीनच्या प्रमाणात वाढ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत विकसित केलेल्या तंत्राच्या सहाय्याने प्रक्रिया केल्यामुळे हळदीतील कुरकुमीनची टक्केवारी ही 4.80 टक्क्यापर्यंत वाढलेली आढळून आली आहे. वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढतात. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे 2 ते 6 टक्के इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधी तसेच सौंदर्य प्रसाधने तयार करतात. हळदीचा दर्जा तिच्यातील कुरकुमीनवर अवलंबून असतो. पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या हळदीमध्ये सर्वसाधारणपणे 2 टक्के कुरकुमीन आढळते. कच्ची हळद ही वाफेच्या सहाय्याने उकळून शेतातच वाळविल्या जात असल्याने वातावरणाचा हळदीवर परिणाम होतो. त्यामुळे तिच्या शुद्धतेवर परिणाम होऊन तिचा दर्जा कमी होतो. तथापि प्रक्रिया करून यंत्राच्या सहाय्याने तयार होणाऱ्या हळदीचे वर्गीकरण व प्रतवारी केल्यानंतर ती यंत्राद्वारे स्वच्छ केली जाते. त्यानंतर हळदीचे तुकडे करून रियाक्टरमध्ये बाह्यवाफेद्वारे उकळल्या जात असल्याने नैसर्गिक गुणधर्म कायम राहतात. या प्रक्रियेत हळद तेलही काढण्यात येतं. हळद ड्रायरच्या सहाय्याने वाळवुन पावडर केल्या जाते. त्यामुळे हळदीचा दर्जा हा उत्तम राहतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला बाजारभाव मिळतो.

-रमेश भोसले

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate