অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलिंगडाची शेती केली यशस्वी

कलिंगडाची शेती केली यशस्वी

कोकणामध्ये तीनही हंगामांत व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत. फळांची प्रतवारी करून बाजारपेठेचे योग्य नियोजन त्यांनी केले आहे. 
व्यवसायानिमित्त इचलकरंजी येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सौंदळ (ता. राजापूर) गावात जाकीर मुल्ला यांचे वडील चांद मुल्ला हे स्थायिक झाले. त्यांनी साठच्या दशकात पहिल्यांदा ऊस लागवड केली; तसेच भुईमूग व विविध पिके घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती संस्कृती येथे रुजविण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना ऊसवाले मुल्ला म्हणूनच ओळखले जाई. जाकीर यांनीही काही वर्षे मुंबईत नोकरी केल्यानंतर 20 वर्षांपूर्वी आपली शेती सांभाळायचे ठरवले. मुल्ला कुटुंबीयांकडे सात एकर 12 गुंठे क्षेत्र असून, ऊस आणि भाजीपाला लागवड केली जाते. या व्यतिरिक्त सौंदळ गावातील सार्वजनिक मालकीची दहा एकर जमीनही गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याने घेऊन तेथे ते कलिंगड लागवड करतात. 

उन्हाळ्यातील कलिंगड लागवडीचे तंत्र

मुल्ला कुटुंबीयांनी कलिंगड लागवडीसाठी प्रति एकर दोन हजार रुपये याप्रमाणे पाच एकर शेती भाडेपट्ट्याने घेतली आहे. या निवडलेल्या जमिनीच्या चारही बाजूंनी नदी आणि ओढ्याचे पाणी वाहते. पावसाळ्यात कोणतेही पीक घेण्यात अडचणी येतात. तसेच, पावसाळ्यानंतरही बराच काळ जमिनीत ओलसरपणा राहतो, त्यामुळे पिकांना बुरशीजन्य रोगांची भीती असते. म्हणूनच जाकीर मुल्ला येथे फेब्रुवारीत लागवडीला सुरवात करतात. 
 • उन्हाळ्यात 60 ते 70 दिवसांत फळे हमखास होतात. एका महिन्यात वेली फुलांवर येतात आणि पुढील तीस ते चाळीस दिवसांत फळे तयार होतात. उन्हाळ्यात कलिंगड लवकर तयार होते, असा जाकीर यांचा अनुभव आहे.
 • दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कलिंगड लागवडीस सुरवात केली.
 • एका आठवड्याच्या अंतराने तीन टप्प्यांत कलिंगडाची साडेसोळा हजार आळी लावली.
 • प्रत्येक सरीत सात फूट, तर दोन आळींत तीन फुटांचे अंतर ठेवले.

अन्नद्रव्य आणि सिंचन व्यवस्थापन

दरवर्षी कलिंगड लागवडीच्या वेळी गोठ्यातील शेणाचा वापर करतात. मात्र, या वर्षी त्यांनी शेणापासून गांडूळ खत बनविले आहे. कलिंगड लागवडीच्या वेळी प्रत्येक आळ्यात शंभर ग्रॅम गांडूळ खत टाकले. त्यानंतर 50 ग्रॅम युरिया दिला. त्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनी युरियाचा दुसरा 20 ग्रॅमचा डोस दिला. जमिनीच्या मगदुरानुसार दर चार ते सहा दिवसांनी पाणी दिले जाते. जवळच्याच बारेवाडी धरणातून सोडले जाणारे पाणी पंपाद्वारे उचलतात. 

कीड- रोग नियंत्रण

 • किडीमध्ये तुडतुडे आणि फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, त्यासाठी पाच फेरोमोन सापळे लावले होते.
 • वेली फुलांवर आल्यावर कीड व रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांची व वाढीसाठी संवर्धकांची फवारणी केली जाते. सकाळी येणाऱ्या मधमाश्‍यांवर परिणाम होऊ नये म्हणून कोणतीही फवारणी जाकीर संध्याकाळी करतात.
 • सर्वसाधारणपणे मळभ आल्यावर बुरशीजन्य रोगाला पोषक वातावरण निर्माण होते. अशा वेळी कलिंगडाच्या वेलींची काळजी घ्यावी लागते. रोगांचा प्रादुर्भाव कमी असतानाच योग्य त्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करण्यावर भर दिला जातो.

प्रतवारीमुळे बाजारात मिळतो दर चांगला

 • कलिंगडाला एप्रिल- मे महिन्यात दर चांगला मिळतो, त्याचमुळे आधीपासून जाकीर मुल्ला फेब्रुवारीनंतर कलिंगड लागवडीलाच पहिले प्राधान्य देतात.
 • कलिंगडाची प्रतवारी करून माल वाशी, रांझा, राजापूर येथील घाऊक बाजारांत पाठवतात. लहान फळांना घाऊक बाजारात चांगला दर मिळत नसल्याने अशी लहान फळे स्थानिक बाजारात स्वतः नगाप्रमाणे पाच ते 20 रुपये प्रति नग याप्रमाणे विकतात. स्थानिक बाजारातही सुट्टीमुळे परिसरातील गावांत आलेल्या चाकरमान्यांमुळे चांगला दर मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
 • या वर्षी घाऊक बाजारात एप्रिलमध्ये पहिल्यांदा पाठवलेल्या फळांना चांगला दर (दहा रुपये प्रति किलो) मिळाला असला तरी नंतर मात्र पाच रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. अशा रीतीने गेली अनेक वर्षे जाकीर कलिंगडांची विक्री करतात.

वन्य प्राण्यांवरील तोडगा

 • सौंदळ येथे डुकरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास आहे, त्यांना रोखण्यासाठी शेताच्या चारही बाजूंनी पिंजर (कुंकू) लावलेले केस टाकतात. केसांवरील ही पिंजर रात्रीच्या चांदण्यात चमकते, त्यामुळे डुक्कर येथे फिरकत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. हे केस सलूनमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.
 • या निर्जन शेतावरच झोपडी बांधून जाकीर मुल्ला रात्रीही तिथेच राहतात, त्यामुळे फळांचे व शेतीचे संरक्षण होते.

दुग्ध व्यवसायाची शेतीला जोड

मुल्ला यांच्या घरी एकूण 11 जनावरे आहेत, त्यांत तीन जर्सी गाई आणि एक पंढरपुरी म्हैस असून, उर्वरित जर्सीच्या कालवडी आहेत. सध्या एकापासून जाकीर यांना 16 ते 17 लिटर दूध मिळते. दुधाला डेअरीतून 19 रुपये दर मिळतो. याच पैशांतून घराला लागणारा दैनंदिन खर्च भागवला जातो. गेल्या वर्षीपासून गुरांच्या शेणापासून गांडूळ खत बनवीत आहेत. 

कुटुंबातील प्रत्येकजण राबतो शेतीसाठी

 • जाकीर मुल्ला यांच्या घरातील प्रत्येक जण शेतीच्या कामात गुंतलेला असतो. दुग्ध व्यवसायात पत्नी आणि दोन मुलींची साथ मोलाची ठरते. त्यांचा सातवीत असलेला मुलगाही त्यांच्या कलिंगड व्यवस्थापनात खांद्याला खांदा लावून काम करतो. दै. "ऍग्रोवन' मुल्ला कुटुंबीयांचा मार्गदर्शक आहे. गेल्या अनेक वर्षांचे ऍग्रोवनचे अंक त्यांनी संग्रहित ठेवले आहेत.

साडेचार एकर कलिंगड लागवडीचा जमा-खर्च

पाच एकर जमिनीचे हंगामापुरते भाडे - दहा हजार रु. 
बियाणे - बारा हजार रु. 
विविध फवारणी - सात हजार रु. 
मजुरी - सहा हजार रु. 
खत - एकोणीस हजार रु. 
कुंपणाची देखभाल - दहा हजार रु. 
अन्य खर्च - सहा हजार रु. 
एकूण खर्च - 70 हजार रुपये 
उत्पादन - 17 टन 
- 17 टनांपैकी मोठ्या आकाराच्या 12 टन कलिंगडांची विक्री सरासरी पाच रुपये प्रति किलोप्रमाणे झाली. त्यातून साठ हजार रुपये उत्पन्न मिळाले. या वर्षी पाणी कमी पडल्याने छोट्या आकाराच्या फळांचे प्रमाण अधिक राहिले. या फळांचे उत्पादन साधारणतः पाच टन मिळाले. ही फळे स्थानिक पासल, रांझा आणि राजापूरच्या बाजारामध्ये स्वतः प्रति नगाप्रमाणे विक्री केली. आकारानुसार पाच रुपये ते 20 रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यापासून 35 हजार रुपये मिळाले. 

जाकीर मुल्ला यांच्याकडून शिकण्यासारखे

 • बाजारपेठेचा विचार करून लागवडीचे नियोजन
 • निसर्गाच्या लहरीपणानंतरही शेतीत सातत्य
 • शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड
 • आव्हान स्वीकारण्याची तयारी
 • शेतीला वैयक्तिक नव्हे, कौटुंबिक जीवनशैलीचा दर्जा.

मुल्ला कुटुंबीयांसमोरील समस्या व त्यांनी केलेली उपाययोजना

 • छोट्या गावामधील शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी किंवा प्रसंगी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे पहिल्या टप्प्यातच वाहतुकीवर मोठा खर्च होतो. अनेक वेळा निविष्ठा आणण्यासाठी मुल्ला यांना 75 कि.मी. लांब असलेल्या कोल्हापूरवर अवलंबून राहावे लागते.
 • कोकणामध्ये तीनही हंगामांत व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे गटशेती आणि अन्य प्रकारच्या मदतीसाठी अडचणी निर्माण होतात, तरीही गावातील समविचारी लोकांबरोबर सहकार्य करत, मिळवत संघटितपणे पुढे जाण्याचा मार्ग जाकीर मुल्ला यांनी पत्करला आहे.
 • शेतीसाठी पहिल्या टप्प्यात भांडवलाची गरज मोठी असते, त्यासाठी यंदा कलिंगड लागवडीसाठी सौंदळ गावातीलच शेतकरी दीपक चव्हाण यांच्याशी भागीदारी केली आहे. केवळ भांडवलच नव्हे तर सहकार्याचे पाठबळही त्यांच्याकडून मिळत असल्याचे जाकीर यांनी सांगितले.

जाकीर चांद मुल्ला 
मोबाईल नं. - 8275624610

माहिती संदर्भ : अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate