অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जपले शेतीत आर्थिक स्थैर्य

रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवून पपईचे केले नियोजन

पाणी व मजुरी या दोन मुख्य समस्यांशी झुंजत शेतकरी शेती प्रगतीपथावर नेताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील खानापूर येथील दिनकर शेळके हे प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी आहेत. मका, कापूस, सोयाबीन पिकांबरोबर ऊस, कांदा ही पिके ते घेतात. रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी पपईची लागवडही केली. व्यापाऱ्यांसोबत दर बांधून घेतला. सतत प्रयत्नवादी राहिल्यानेच शेतीतूनच आर्थिक स्थैर्य जपणे त्यांना शक्‍य झाले आहे.
यंदाच्या खरिपात पावसाने पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भात जोर दाखवला, तरीही मराठवाड्यातील अनेक भागांत आजही पावसाला सुरवात झालेली नाही.

जालना जिल्हा तर गेल्या अलीकडील वर्षांपासून सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसतो आहे, तरीही शेतकरी शेतीत प्रयोगशीलता दाखवण्याचे धाडस करून त्यात यशस्वी होताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील खानापूर (ता. जाफराबाद) येथे दिनकर त्रिंबक शेळके यांची गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेती आहे. या गावात काही भाग बागायती तर काही जिरायती आहे. कापूस हे इथले मुख्य पीक आहे. सन 1980 पासून शेळके शेती करतात. पूर्वी या कुटुंबाची एकत्रित पद्धतीची शेती होती. मात्र भावा-भावात पुढे शेतीची विभागणी झाली. सुमारे 13 एकर शेतीची जबाबदारी दिनकर आता सांभाळतात. त्यांच्या जमिनीचा पोत मध्यम स्वरूपाचा असून, निचरा चांगल्या प्रकारे होतो. सोयाबीन, कापूस, मका या पारंपरिक पिकांसोबतच काही प्रमाणात ऊस ते घेतात.

पुन्हा एकदा पपई

सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी शेळके यांनी पपईची लागवड केली होती. मात्र दुष्काळी अवस्थेमुळे त्यांना हे पीक जगवणे शक्‍य झाले नव्हते. मात्र अलीकडील काळांत त्यांनी पाण्याची सोय करून घेतली. रमजान सणाला विविध फळांची मागणी वाढते. हे लक्षात घेऊन त्यांनी मागील वर्षी पपई लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी 20 गुंठे क्षेत्राची निवड केली. वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची त्यांची आवड आहे.

पाण्याची केली उपलब्धता

शेळके यांनी सिंचनासाठी तीन विहिरींची व्यवस्था केली आहे. त्यांची खोली सुमारे 50 ते 60 फूट आहे. पाणी अत्यंत कमी म्हणून 1325 फूट अंतरावरून 668 पाइप टाकून खडकपूर्णा मध्यम प्रकल्पाच्या जवळून पाइपलाइन केली. त्याचे पाणी शेतासाठी आणले.

पपई चांगली साधली

पपईच्या शेतीबाबत ऍग्रोवन दैनिकातून शेळके यांनी मार्गदर्शन घेतले आहे. मागील वर्षी सप्टेंबर- ऑक्‍टोबरच्या दरम्यान तैवान 786 वाणाची पपई 6 x 7 फूट अंतरावर लावली. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एका रोपवाटिकेतून रोपे विकत घेतली. लागवड करताना दोन ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत आणि रासायनिक खतामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश, 20ः20ः13 व सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येकी 50 किलो वापरले. पुढील 45 दिवसांनंतर पुन्हा 20ः20ः13 हे 100 किलो आणि 85 ते 90 व्या दिवशी 15ः15ः15 हे 100 किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली. झाडाची वाढ जोमदार झाली. काही फळांचे वजन दोन किलोच्या पुढे आहे. झाडाची उंची चार ते सहा फुटांपर्यंत आहे.

विक्रीसाठी केला करार

शेतकऱ्याला पिकविता येते; पण विकणे अवघड जाते असे म्हटले जाते. मात्र शेळके यांनी शेतात पीक उभे असतानाच एका व्यापाऱ्याशी विक्रीचा करार केला आहे. त्यानुसार जून ते डिसेंबर या काळात व्यापारी ही पपई दहा रुपये प्रति किलो या दराने विकत घेणार आहेत. सध्या रमजानचा सण असल्याने शेळके यांची पपई बाजारात येऊ लागली आहे. आतापर्यंत 15 क्विंटल मालाची विक्रीही झाली आहे. डिसेंबरपर्यंत अजून काही टन माल दहा रुपये दरानेच विकला जाईल. व्यापाऱ्याकडून शेळके यांनी अनामत रक्कम म्हणून 25 हजार रुपये आपल्याजवळ ठेवले आहेत. या करारामुळे पपईच्या दराबाबत शेळके निश्‍चिंत झाले आहेत.

व्यापारी जाफराबादचे व आपल्या विश्‍वासातील असल्याचा त्यांचा दावा आहे.

विशेष म्हणजे पपईच्या तोडणीची जबाबदारी व्यापाऱ्यावरच आहे. वाहतूकही व्यापारीच करणार आहेत.
केवळ जागेवरच वजन करून पपईचे पैसे घ्यायचे असे ठरले आहे, त्यामुळे तोडणी, पॅकिंग, वाहतूक यावरील खर्च वाचवणे शेळके यांना शक्‍य झाले आहे. पिकाच्या अखेरच्या कालावधीपर्यंत प्रति झाड 75 किलोपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांनी ठेवली आहे.

जमिनीची सुपीकता महत्त्वाची

शेतीतून चांगले उत्पादन काढण्यासाठी शेतीचा पोत चांगला राहणे गरजेचे असल्याचे शेळके सांगतात. त्यासाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. घरी तीनच जनावरे असल्यामुळे शेणखत अथवा कंपोस्ट खत बाहेरूनही विकत घेतले जाते. या शिवाय वेगवेगळ्या सेंद्रिय खतांचा वापरही केला जातो. रासायनिक खतांसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्येही वापरण्याकडे कल असतो.

शेळके यांचा सर्वांत मोठा मुलगा दत्तात्रय पूर्णवेळ शेतीचे काम पाहतो. दुसरा मुलगा संदीप याचे कृषी निविष्ठा विक्री केंद्र आहे, तर लहान मुलगा गजानन याचे औषध विक्रीचे (मेडिकल) दुकान टेंभुर्णीला आहे. आपल्या मुलांचे शिक्षण व व्यवसायासाठी भांडवल शेतीतील उत्पन्नावरच उभे केले आहे.

शेतीच्या व्यवस्थापनाकडे शोभाताईंचे लक्ष

शेतीकडे घरातील प्रत्येक जण लक्ष देतोच. मात्र दिनकरराव शेळके यांच्या पत्नी सौ. शोभा यांचे शेतीकडे विशेष लक्ष असते. शेतीचे व्यवस्थापन, मजुरांवर लक्ष ठेवणे या बाबी त्या कुशलतेने हाताळतात. काही वेळेस दिनकररावांना कृषी विक्री केंद्रात थांबावे लागते.

प्रयोगशील वृत्तीतून विविध पिकांची शेती

1) शेळके यांनी ऊस लागवड केली आहे. दीड एकर क्षेत्रात त्यांनी बीजोत्पादनासाठी कांद्याचे आंतरपीक घेतले होते. त्याचे त्यांना दोन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. अजून त्याची विक्री केलेली नाही. कांदा बियाण्याची सध्या टंचाई निर्माण झाल्याने चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा आहे. उसाच्या उत्पादनाचे लक्षांक एकरी 100 टनांचे ठेवले आहे.
2) पूर्वी टोमॅटो, वांगे, कपाशी, कारले आदी पिकांचे बीजोत्पादन घेण्याचाही शेळके यांना अनुभव आहे. मात्र मजूर समस्येमुळे त्यांनी बीजोत्पादनाचा प्रयोग थांबवला आहे.
3) खरीप व रब्बी हंगामात मका घेतला जातो. त्याचे एकरी 30 ते 35 क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे.
दीड एकरात बीटी कपाशीचे 29 क्विंटलपर्यंत तर सोयाबीनचे दीड एकरात 18 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले आहे. शेतकऱ्यासमोर अनंत अडचणी असल्या तरी त्यांनी बाजाराकडे लक्ष देऊन शेती केली तर ती परवडू शकते, असे शेळके यांचे मत आहे.


संपर्क -
दिनकर शेळके- 9130521888
गजानन शेळके- 9764344934
(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate