অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा

प्रयोगशील शेतकऱ्याची शेती बनली प्रयोगशाळा

सेंद्रीय खताचा वापर

खरीप हंगामात भातशेती व रब्बी हंगामात कडधान्य व भाजीपाला हे समीकरण इथल्या शेतकऱ्यांचे कायम असते. हे समीकरण बदलण्याचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील मुसारणे गावातील परशुराम कृष्णा पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने केला आहे. कांदा, गहू, कोबी, फ्लॉवर, केळी आदी पिके घेऊन आपल्या शेती व्यवसायात ते नवी क्रांती घडवू पहात आहेत. आगामी काळात झिरो बजेट नैसर्गिक शेती करून पिकांचे उत्पादन सेंद्रीय खताचा वापर करण्याचा मानस त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. शेतकरीवर्गाने सेंद्रीय शेतीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आवाहन त्यांच्याकडून केले जातेय. त्यांची विविध पिकांची शेती ही प्रयोगशाळा बनली आहे.

वाडा तालुक्यातील मुसारणे गावात राहणारे परशुराम कृष्णा पाटील हे यांचे मुळगांव चिंचघर, पण शेत जमीन जवळील गावाशेजारी असलेल्या मुसारणे गाव हद्दीत असल्याने ते त्यागावी स्थायिक झाले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ विभागात ते मेकॅनिक म्हणून काम करीत असताना आपल्या साडे पाच एकर वडीलोपार्जित शेत जमीन त्यांनी निरनिराळे पिके घेऊन इथल्या शेत जमिनीत काय पिकू शकते? याचे प्रात्याक्षिक त्यांनी प्रयोगात्मक शेतीत करून दाखविले आहे. अमुक पीक आपल्या इकडच्या शेतीत होत नाही अशी शेतकरीवर्गाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न शेती माध्यमातून ते करीत आहे.

विविध पिकांची लागवड

आपल्या साडेपाच एकरातील शेतीत विविध पिकांची लागवड करून पिके घेतली आहेत. परशुराम पाटील यांनी सन २००९ साली वरकस जमिनीत बोरवेल या जलस्त्रोताने ठिबक सिंचनाद्वारे कोल्हापुर जी- ९ या जातीच्या केळ्यांच्या ८०० झाडांची लागवड करून ३ वर्ष उत्पादन काढले. यात त्यांना २ लाख रूपये फायदा झाला. सन २०१२ ला टोमॅटोचे उत्पादन घेतले. पुढे कोबी, फ्लॉवरचे उत्पादन काढले असे विविध पिकांचे प्रयोग करीत असताना त्यांनी गत वर्षी घेतलेले कांद्याच्या पिकात १८ क्विंटल उत्पादनात साडे चार लाख रूपये नफा कमविला होता.

डिसेंबर २०१५ ला त्यांनी सिन्नरहुन पुणा फुरसुंगी या जातीच्या २० हजार रूपयांच्या लाल कांद्याची २ एकर शेतजमिनीत कोरडी जमीन नांगरणी करून लागवड करून पाणी दिले. त्याचप्रमाणे अर्धा एकरात सफेद कांदा लागवड केली. यात त्यांनी एकूण दिड लाखाचा खर्च करून लाल कांद्यांचे त्यांनी १७ टन उत्पादन काढले आहे. तर सफेद कांद्याचे ४ टन उत्पादन घेतले आहे. याच कांदा पिकाच्या सरीत त्यांनी १ क्विंटल धने पीक हे आंतर पिकातून घेतले आहे. घेतलेल्या कांदा पिकाची साठवणूक करण्यासाठी त्यांनी २५ हजार रूपये खर्च करून कांदा चाळ तयार केली आहे. हवामानात कांदा पीक टिकाऊ रहावा, म्हणून त्यांनी कांदा चाळीच्या छतावर पाण्याचा मारा करण्यासाठी स्प्रिंकल उभारले आहेत. याच वेळी पाव एकरात गहू हे हलवे अंकुर या १० किलो ग्रॅम बियाणांची लागवड करून २ क्विंटल उत्पन्न घेतले आहे. तुरडाळीचे ३ किलो ग्रॅम बियाणे लागवड करून १५० किलो ग्रॅमचे उत्पादन काढले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

शेती पुस्तके, कृषी विषयक माहितीपर मार्गदर्शन देणाऱ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून परशुराम पाटील यांनी आपल्या शेतीला जणू विविध पिकांच्या प्रयोगासाठी प्रयोगशाळा बनविली आहे. अमरावती येथे त्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती च्‍या सुभाष पालेकरांकडे देशी गायींच्या मलमूत्रापासून सेंद्रीय खताचा वापर करणे या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन घेतले आहे. पुढे सेंद्रीय खताचा वापर करून पपई, आले, हळद ही पिके घेण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लेखक - संतोष कोंडूबाबाजी पाटील
वाडा/पालघर, ठाणे
७५०७३७७७९५

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate