অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची

भोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील नरहरी निवृत्ती कुंभार यांनी उपलब्ध पाच एकर शेतीचे योग्य नियोजन करून ऊस आणि हरभरा पिकाचे चांगले उत्पादन मिळविले आहे. प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पीक व्यवस्थापन खर्चात बचत करून, पीक फेरपालट आणि सुधारित तंत्राने पीक उत्पादन वाढविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. 
प्रत्येकाजवळ ध्येय, धोरण आणि ध्यास असावा लागतो. तरच शेती फायद्याची होते,असाच काहीसा अनुभव आहे भोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील नरहरी निवृत्ती कुंभार यांचा. कुंभार यांची पाच एकर शेती आहे. या शेतीमध्ये ऊस, हरभरा या पिकांची लागवड असते. उपलब्ध जमीन, बाजारपेठ, पाण्याचे नियोजन आणि सुधारित तंत्राचा अवलंब करीत 65 वर्षीय कुंभार यांनी शेती किफायतशीर केली आहे. शेतीच्या नियोजनाबाबत कुंभार म्हणाले, की मी सहकारी संस्थेत 15 वर्षे नोकरी केली. नोकरीच्या बरोबरीने शेती करीत होतो. पुढे कुटुंबात शेतीची विभागणी झाल्याने माझ्या वाट्याला पाच एकर शेती आली. पूर्वी शेती जिरायती होती. परंतु 1980 मध्ये उजनी धरणामुळे पाण्याची सोय झाली. सध्या शेतात एक विहीर आणि दोन कूपनलिका आहेत. शाश्‍वत पाण्याची सोय झाल्याने ऊस लागवडीचे नियोजन केले.

जमिनीची सुपीकता जपत, पाण्याचा योग्य वापर करत ऊस उत्पादनात एकरी 30 टनांवरून 100 टनांचा टप्पा आता मी गाठला आहे. शेतीच्या व्यवस्थापनात पत्नी लक्ष्मीबाई यांचीही चांगली साथ मिळते. शेतीच्या व्यवस्थापनातून एक मुलगा आणि दोन मुलींचे चांगले शिक्षण झाले. मुलगा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतो. तर मुली लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. सध्या दोन एकर क्षेत्रावर हरभरा तर अडीच एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. जनावरे नसल्याने शेणखताऐवजी धैंचा, ताग ही हिरवळीची पिके दरवर्षी फेरपालटीसाठी घेतो. त्यामुळे जमिनीत पुरेसे सेंद्रिय घटक मिसळले जातात. जमिनीची सुपीकता टिकून राहिली आहे. दरवर्षी माती परीक्षण करूनच रासायनिक खताची मात्रा दिली जाते.

काटेकोर नियोजनातून ऊस शेती केली फायदेशीर...

ऊस लागवडीबाबत माहिती देताना कुंभार म्हणाले, की मी 1980 पासून ऊस शेती करीत आहे. दरवर्षी अडीच एकर ऊसशेती असते. दर्जेदार बेणे, बेणेप्रक्रिया, सुधारित पद्धतीने लागवड, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, पाचटाचे आच्छादन, हिरवळीच्या पिकांचा वापर असेल, तर उसाचे अपेक्षित उत्पादन मिळते. दरवर्षी मी को-86032 जातीची लागवड करतो. लागवडीच्या नियोजनानुसार 20 गुंठे, एक एकर असे ऊस लागवडीचे क्षेत्र असते. टप्प्याटप्प्याने ऊस उत्पादन वाढत आहे. गेल्या वर्षी मला 23 गुंठे क्षेत्रातून 63 टन ऊस उत्पादन मिळाले. ऊस शेतीसाठी मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ पी. व्ही. घोडके आणि श्री. एस. बी. माने-पाटील यांचे मार्गदर्शन घेत असतो.

1) पीक फेरपालटीच्या नियोजनानुसार खरिपात ताग, धैंचा या हिरवळीचे पीक घेऊन 45 व्या दिवशी जमिनीत गाडतो. त्यानंतर रब्बीमध्ये हरभरा लागवड करतो. त्यानंतर क्षेत्र तसेच ठेवून जुलैमध्ये हलकी मशागत करून ऊस लागवडीचे नियोजन केले. २) 23 गुंठे क्षेत्रावर को-86032 जातीची लागवड करताना तीन फुटाची सरी सोडली. जोड ओळ पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. म्हणजेच दोन सरी लागवड, त्यानंतर एक सरी मोकळी सोडली. 
3) लागवडीपूर्वी माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार पाच किलो झिंक सल्फेट, पाच किलो मॅंगेनिज सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट आणि दीड किलो बोरॅक्‍स अशी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा जमिनीत मिसळून दिली. तसेच 50 किलो युरिया, 75 किलो 10ः26ः26 मिसळून दिले. 
4) लागवडीसाठी दहा महिन्यांचे दोन डोळ्यांचे बेणे निवडले. बेणे घरचेच वापरले. लागवडीपूर्वी 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलेथिऑनच्या द्रावणात बेणे बुडविले. त्यानंतर ऍसेटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाच्या द्रावणात बेणे बुडविले. त्यानंतर कोरडी लागवड केली. लागवडीनंतर हलके पाणी दिले. 
5) लागवडीनंतर सहा आठवड्यांनी 50 किलो युरियाची मात्रा दिली. त्यानंतर 12 आठवड्यांनी पुन्हा 50 किलो युरियाची मात्रा दिली. ऊस 20 आठवड्यांचा झाल्यावर मोठी बांधणी केली. त्या वेळी 50 किलो युरिया, 
75 किलो 10-26-26 ही खतमात्रा दिली. गरजेनुसार आंतरमशागत करून तणनियंत्रण केले. 
6) पिकाला गरजेनुसार दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या. पट्ट्यात पाचटाचे आच्छादन केले, त्यामुळे पाण्याच्या पाळ्या कमी लागल्या. वसंतदादा शुगर इन्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लागवडीनंतर साठ दिवसांनी पहिली फवारणी मल्टिमॅक्रो न्युट्रियंट दोन लिटर, मल्टिमायक्रो न्युट्रियंट दोन लिटर प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. 90 दिवसांनी दुसरी फवारणी मल्टिमॅक्रो न्युट्रियंट तीन लिटर, मल्टिमायक्रो न्युट्रियंट तीन लिटर प्रति 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. त्याचा पीकवाढीला फायदा झाला. 
7) माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, हिरवळीच्या खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, तणनियंत्रण आणि काटेकोर पाणी नियोजन यामुळे उसाची चांगली वाढ झाली. साधारणपणे 23 गुंठ्यांतून 63 टन उत्पादन मिळाले. या पिकाच्या व्यवस्थापनासाठी मशागत, खत व्यवस्थापन, बेणे, आंतरमशागत, स्वतःची मजुरी धरून 23 गुंठ्यांसाठी सरासरी 25 हजार खर्च आला. गेल्या वर्षी साखर कारखान्याने 2475 प्रति टन असा दर मिळाला होता. त्यामुळे खर्च वजा जाता चांगला नफा ऊस शेतीतून मिळाला. 
8) या पिकाचा खोडवा ठेवला होता. या खोडव्यात पाचटाचे आच्छादन केले. शिफारशीनुसार खतमात्रा दिल्या. 
खोडव्याच्या व्यवस्थापनासाठी दहा हजार रुपये खर्च आला होता. खोडव्याचे 23 गुंठ्यांत 35 टन मिळाले. 
9) यंदा प्रयोग म्हणून ऊस लागवड करताना 20 गुंठे क्षेत्रावर पाच फूट पट्टा, एक एकर पाच गुंठे क्षेत्रावर सात फूट पट्टा आणि 20 गुंठे क्षेत्रावर नऊ फूट पट्टा पद्धतीमध्ये अंतर ठेवले आहे. 
10) यंदाच्या वर्षी अडीच एकर ऊस लागवडीला ठिबक सिंचन केले आहे. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिली जातात.

हरभऱ्याचे दर्जेदार उत्पादन

बाजारपेठेत हरभऱ्याला चांगला दर असल्याने दरवर्षी कुंभार दोन एकर हरभऱ्याची लागवड करतात. याबाबत माहिती देताना कुंभार म्हणाले, की साधारपणपणे 25 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबरच्या दरम्यान दोन एकर क्षेत्रावर उपलब्ध ओलीवर हरभऱ्याची लागवड करतो. 
1) लागवडीसाठी विजय आणि दिग्विजय या जातींची निवड करतो. 
2) लागवडीपूर्वी जमिनीची हलकी मशागत करतो. पेरणीच्यावेळी एकरी 50 किलो 18ः46ः0 आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो जमिनीत मिसळून देतो. तिफणीने हरभऱ्याची पेरणी केली जाते. विजय हरभऱ्याचे एकरी 25 किलो, तर दिग्विजय हरभऱ्याचे 30 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करतो. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया केली जाते. बीजप्रक्रियेमुळे रोपांची चांगली उगवण होते. 
3) जमीन काळी असल्याने उपलब्ध ओलीवरच हरभरा पीक घेतले जाते. पीकवाढीच्या काळात घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसतो. या किडीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करतो. 
4) जानेवारीमध्ये पिकाची काढणी येते. साधारणपणे एकरी दिग्विजय जातीचे 13 क्विंटल उत्पादन मिळते, तर विजय जातीचे 12 क्विंटल उत्पादन मिळते. 
5) हरभरा लागवडीचा एकरी खर्च सहा हजार इतका येतो. खर्च वजा जाता हरभरा पिकातून एकरी किमान 20 हजारांचा नफा मिळतो. 

नरहरी कुंभार : 9975815062.

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate