অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झेंडू शेतीकडे यशस्वी प्रवास

सातारा जिल्ह्यातील तारळे खोऱ्यातून शेतकऱ्यांना प्रवासी वाहतुकीद्वारे मजूर उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय करीत राजेंद्र जाधव यांना स्वतःच्या शेतीसाठी प्रेरणा मिळाली. अन्य शेतकऱ्यांचे प्रयोग समजून घेत त्यांनी ही शेती चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे.
काशीळ (जि. सातारा) येथील राजेंद्र बजरंग जाधव स्वतःची जीप घेऊन काशीळ-पाली या मार्गावर लोकांना ने-आण करण्याचा व्यवसाय करायचे. काशीळ परिसरात मजुरांची कमतरता होती. डोंगरी भागात काम नसल्यामुळे महिला बेरोजगार आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी चोरजवाडी येथील 20 ते 25 महिला मजुरांसाठी प्रवासी सेवा सुरू केली. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांची सोय झाली. मजूर ने-आण करताना गाडीत होत असलेली चर्चा, विविध शेतकऱ्यांच्या शेतातील प्रयोग, तंत्रज्ञान, हंगाम, पीक, उत्पादन याबाबतची माहिती त्याच्या कानावर सतत पडू लागली. त्यानंतर आपणही शेती करावी अशी प्रेरणा त्यांना मिळाली.

शेतीचा श्रीगणेशा

जाधव यांची स्वतःची चार एकर जमीन आहे. सन 2008 मध्ये त्यांनी 12 गुंठे क्षेत्रात झेंडूची लागवड केली. पिकाची अवस्था चांगली होती. मात्र अवकाळी पावसाने झेंडू बागेस फटका बसल्याने तोटा झाला. अशातही खचून न जाता त्यांनी उसात आंतरपीक म्हणून 25 गुंठे क्षेत्रात झेंडू लावला. हे पीक यशस्वी करण्यासाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून खर्च वजा जाता 50 हजारांचे उत्पन्न मिळाले. या प्रयोगानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय बंद करून पूर्णवेळ शेतीत लक्ष घातले. मात्र मजूर ने-आण करण्याचा दिनक्रम ठेवला. हंगाम व दराचे नियोजन करून वर्षभर "रोटेशन' पद्धतीने झेंडूची लागवड केली. घरची जमीन कमी पडू लागली. शेत जमीन खरेदी करणे शक्‍य नव्हते. त्यावर उपाय काढत टप्प्याटप्प्याने साडेतीन एकर शेतजमीन अर्ध्याच्या वाट्याने व चार एकर जमीन वार्षिक खंडाने करण्यास घेतली. सध्या नऊ एकर ऊस व एक एकर सोयाबीन पेरणीसाठी तयार ठेवले आहे. 

झेंडूची लागवड

जानेवारी 2013 मध्ये झेंडूची सुधारित पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन केले. शेताची उभी- आडवी नांगरट करून साडेचार फूट अंतरावर सरी सोडून घेतली. आवश्‍यकतेनुसार खते रिंग पद्धतीने दिली. साडेचार फुटांची सरी असल्याने पॉवर टिलरच्या साहाय्याने भर लावली. झाडेही डेरेबाज झाली. मार्चमध्ये पहिला तोडा केला. त्या वेळी सर्वांत कमी म्हणजे प्रति किलो 16 रुपये दर मिळाला. सर्वाधिक प्रति किलोस 80 रुपये दर त्यांना गुढीपाडव्यास मिळाला. आजपर्यंत -----सुमारे 12 तोड्यांतून साडेआठ टन उत्पादन मिळाले आहे. अजूनही पीक जोमात असून 700 ते 800 किलो उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. 

तंत्रज्ञान

-झेंडूच्या लागवडीत दोन्ही सरींतील अंतर चार फूट व दोन रोपांतील अंतर अडीच फूट आहे. 
या पद्धतीने लागवड केल्याने फवारणी तसेच फुले तोडणी सोपे जाते. 
-साडेतीन फूट सरीच्या तुलनेत साडेचार फुटाच्या सरीत रोपे कमी लागतात. त्यामुळे भांडवलाची बचत होते. 
-अशा अंतरामुळे हवा खेळती राहते. रोपांना वाढीसाठी मुबलक जागा मिळते. 
-पॉवर टिलरच्या साहाय्याने मशागत सुलभ होते. 

शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखे

  • हंगामाचा अभ्यास करून झेंडूची लागवड केली जाते.
  • वर्षभर उत्पादन घेतले जाते.
  • उत्पादनाची विक्री करताना स्वतः बाजारात जाऊन देखरेख ठेवली जाते.
  • जमीन कमी असल्यामुळे वाट्याने, तसेच खंडाने शेती करून उत्पन्न वाढवले जाते.
  • गरजूंना रोजगार व शेतकऱ्यांना प्रवासी वाहतूक व्यवसायाद्वारे मजूर उपलब्ध करून दिले जातात.
  • ऊस उत्पादनाकडेही चांगले लक्ष. एकरी सरासरी 60 टनांपर्यंत उत्पादन.
  • दसरा, दीपावली, पाडवा तसेच लग्नसराई यांचा विचार करून झेंडूची लागवड कमी-अधिक क्षेत्रात लागवड केली जाते.

पाणी व्यवस्थापन

जानेवारीत लागवड केल्यापासून दोन महिन्यांपर्यंत दर आठ दिवसांनी पाणी दिले. मार्च महिन्यात फुले सुरू झाल्यापासून, फुलाचा तोडा झाल्यापासून रात्रीच्यावेळी पाणी दिले. जमीन थंड झाल्यावर पाणी दिल्याने पिकास पोषक ठरते. 
फुले सुरू झाल्यावर लाल कोळी, नाग अळी, करपा आदी किडी-रोगांचा प्रार्दुभाव होण्यास सुरवात होते. कीडनाशकांच्या वेळेत फवारण्या घेतल्यास कीड नियंत्रणात येते. माझी फुले वर्षभर सुरू असतात.
मात्र पावसाळा सुरू झाल्यावर फुलात पाणी साठते. यासाठी फुले हॉलमध्ये फॅनच्या साहाय्याने सुकवावी लागतात. तसेच क्रेट भरताना टप्प्या-टप्प्यावर कागद टाकले जातात. जेणेकरून पाणी निघावे. पाणी राहिल्यास फुले कुजण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. पत्नी, आई, वडील व भाऊ यांची झेंडू शेतीत मोठी मदत होत असल्याचे जाधव सांगतात.

अर्थशास्त्र

दीड एकर क्षेत्रात जाधव यांना सुमारे आठ ते साडेआठ टन उत्पादन मिळाले आहे. किमान दर किलोला 16 रुपये तर सर्वाधिक 80 रुपये मिळाला आहे. सरासरी 30 रुपये दराने झेंडूपासून सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नांगरट, भर लावणे, रोपे, मजुरी (लागवड, तोडणी, भांगलण), रासायनिक खते, कीडनाशके असा सर्व मिळून सुमारे एक लाख आठशे रुपयांपर्यंत खर्च झाला. 

बाजारपेठेचा अभ्यास

जाधव मार्केटला प्रत्येकवेळी मालासोबत जातात. मार्केट सुरू झाल्यावर सर्वत्र फिरून मालाचा दराबाबतचा अंदाज घेतात. त्यानंतर एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल न देता दोन ते तीन व्यापाऱ्यांकडे विभागून दिला जातो. त्याद्वारे चांगले दर मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जाधव म्हणतात, की शेतकरी कष्ट करून उत्पादन घेतात. मात्र विक्रीसाठीही त्यांनी अजून कष्ट घेतले तर त्यांचाच फायदा होईल. प्रत्येक वेळी मार्केटमध्ये जाण्याने दरातील फरक व त्यांचा अभ्यास होतो. माझा त्यातूनच दहा हजारांहून अधिक फायदा काही वेळा झाला आहे. पाडवा, दसरा, दिवाळी यासारख्या सणांच्या वेळी बाजारपेठांचा अंदाज घेऊन फुलाचे तोडे घेतले जातात. खूपच दर घसरल्यास व्यापाऱ्याकडून तोडणी व वाहतूक निघेल एवढा तरी दर घेतलाच जातो.

समस्या व उपाय

झेंडूची शेती करायची असेल तर मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज असते. मात्र मजुरांची ने-आण करण्याची व्यवस्था माझ्याकडे असल्याने वर्षभर झेंडू सारखे पीक घेणे शक्‍य झाले. वेळेत कामे व मार्केटचा अंदाज घेऊन फुलांच्या तोड्याचे नियोजन करता आले. पुढील काळात प्रत्येक क्षेत्रात ठिबक करणार आहे. 

राजेंद्र जाधव, 9822087299

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate