অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन

फलोत्पादन अभियानातून खडकावर जरबेराचे नंदनवन

महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. असे असतानाही मराठवाड्यातील नांदेड शहरालगत अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी गंगाराम किशनराव कल्याणकर यांनी अथक परिश्रम व नियोजनाने पाणी वापर करुन जरबेरा फुलांचे भरघोस उत्पन्न घेत दुष्काळावर मात केली आहे.

ग्रीन हाऊस उभारणी

महादेव पिंपळगाव नांदेड शहरापासून जवळच आहे. श्री. कल्याणकर यांची परिस्थिती अगदी जेमतेम. माळावर वडिलोपार्जीत खडकाळ जमीन केवळ चार एकर.. शिक्षणात फारसा रस नसल्याने वडिलांनी लहानपणीच चार म्हशी घेऊन दिल्या. तेव्हापासून दुग्ध व्यवसाय सुरु केला. दुग्ध व्यवसायातून कसेबसे घर चालायचे. कालांतराने कुटुंब मोठे होत गेले. एकत्रीत कुटुंब असल्याने जबाबदाऱ्या वाढल्या. दुग्ध व्यवसायावर घर चालणे कठीण झाले. वडिलोपार्जीत जमिनीवर केवळ पारंपरिक पिकांमध्ये ज्वारी, कापूस, सोयाबीन घेतल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. शेतीत काहीतरी विशेष करण्याची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कोणताच मार्ग सापडत नव्हता. कल्याणकर सांगतात, शासनाच्या योजनांची माहिती ऐकली आणि लगेच शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया नवा मोंढा येथील शाखाधिकाऱ्यांना भेटलो. परिस्थितीची सर्व माहिती सांगितली. त्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेंतर्गत 50 टक्के सबसीडीवर ग्रीन हाऊस उभारणीसाठी कर्ज देण्याचे मान्य केले. येथूनच नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

या खडकाळ जमिनीवर 20 गुंठेवर ग्रीन हाऊस उभारुन त्यामध्ये खडक, लालमातीचा उपयोग करुन दीड बाय दोनचे वाफे तयार करण्यात आले. या वाफ्यांमध्ये जरबेरा फुलांची 19 हजार रोपे लावली. शेतातील बोअरला पाणी असल्याने पाण्याचे योग्य नियोजन केले. दहा हजार लिटरच्या सिंटेक्स टाकीचा वापर केला. रोपट्यांना खत, पाणी, औषध फवारण्यासाठी एसटीपी सेट बसविण्यात आला. ग्रीन हाऊस उभारणीसाठी व रोपटे व्यवस्थापनासाठी पुणे येथील के. एफ. बायोप्लँट कंपनीचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले. 19 हजार रोपट्यांपासून दररोज 2 हजार फुलांची तोडणी होत आहे.

जरबेरा फुलशेती

ही फुले नांदेड, हैद्राबाद, औरंगाबाद, मुंबई या बाजारपेठेत पाठविली जातात. या फुलांची काढणी, पॅकींग आणि ग्रीन हाऊस देखभाल (व्यवस्थापन) यासाठी दहा मजूर आहेत. फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने दर महिन्याला तीन लाखाचे उत्पन्न मिळते. दोन महिन्यात खर्च वजा जाता सहा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे, असे श्री. कल्याणकर यांनी सांगितले. सध्या फुलांचे उत्पादन चांगले असून बाजारभाव चांगला राहिल्यास वर्षभरात 70 ते 75 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचे काही हप्त्याची परतफेड झाली आहे. आणखी एक नवीन ग्रीन हाऊस प्रस्तावित असून त्यामध्ये मिरची लागवड करणार आहे. शेतात एका कोपऱ्यातून ग्रीन हाऊस करीता खडक व लाल मातीचे खोदकाम केल्यामुळे मोठा खड्डा तयार झाला असून त्याचा उपयोग शेततळ्यासारखा करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे यामध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे जलस्तर पाणी पातळी वाढली आहे.

जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले श्री. कल्याणकर यांना जरबेरा फुलशेतीची माहिती व प्रशिक्षण देण्याकरीता पुणे, मुंबई, नागपूर येथे बोलावले जाते. पारंपरिक शेतीला बाजूला सारुन नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन केवळ 20 गुंठे शेतात वर्षाकाठी 70 ते 75 लाखाचे उत्पन्न घेऊन, खडकावर नंदनवन फुलवणारे श्री.कल्याणकर अशी ओळख निर्माण झाली आहे. नोकरी करण्यापेक्षा ज्यांना शेती आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, कृषी विद्यापीठातून नवनवीन पिकांची, शेती औजारांची माहिती घ्यावी. तरुणांनी शेतीकडे वळावे. कृषी विभागाच्या सहाय्याने शेती विकास केल्यास निश्चितच बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महाराष्ट्राचा शेतकरी सधन होईल. त्यामुळे महाराष्ट्राचा नक्कीच कायापालट होण्यास वेळ लागणार नाही अशी अपेक्षाही श्री. कल्याणकर व्यक्त करतात.

लेखक - आर. पी. सोनकांबळे,
9422174142

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 3/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate