अकोला शहरापासून तीस किलोमीटरवर टाकळी पोटे हे जेमतेम 500 लोकवस्तीचे गाव आहे. शेती व शेतमजुरी हा गावातील कुटुंबीयांचा मुख्य व्यवसाय. गावातील विठ्ठल पोटे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत फुलशेतीसारख्या व्यावसायिक शेतीतून आर्थिक समृद्धतेकडे वाटचाल केली आहे.
त्यांची वडिलोपार्जीत एकत्रित कुटुंबाची वीस एकर शेती. कुटुंबात तीन भावंडांसह एकूण बारा सदस्यांचा समावेश आहे. घरातील सर्व सदस्य शेतीत राबतात, त्यामुळेच या शेतीत प्रयोगशीलता जपणे शक्य होते असे पोटे सांगतात.
पोटे यांच्याकडे वीस एकर क्षेत्रावर कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी यासारखी पिके घेतली जात होती. वडील श्रीकृष्ण यांच्यासह घरातील भावंडे शेतीत राबत; परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कौटुंबिक गरजा पूर्ण होत नव्हत्या; त्यामुळे विठ्ठल यांनी तब्बल 18 वर्षं टॅंकरचालक म्हणून काम केले. दहा हजार रुपये महिन्याकाठी त्यातून मिळत होते. दरम्यान, वडील श्रीकृष्ण यांचे वृद्धापकाळाने तर भाऊ प्रभाकर यांचे आजाराने निधन झाले. या कारणामुळे विठ्ठल यांनी घरच्या शेतीतच राबण्याचा निर्णय घेतला.
सन 2012 मध्ये शेतीत राबण्यास सुरवात केल्यानंतर विठ्ठल यांनी कुक्कुटपालन व्यवसाय उभारला. 40 बाय 25 फूट आकाराचे शेड उभारले. त्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च झाला. त्यासाठी पैशाची सोय बॅंककर्जाच्या माध्यमातून केली. एक हजार पक्ष्यांचे संगोपन सुरवातीला केले. मात्र काही कारणांमुळे या व्यवसायात त्यांना अपेक्षित यश साधता आले नाही, त्यामुळे त्यातून त्यांनी माघार घेतली.
शेतीपूरक व्यवसायात अपेक्षित यश साधता आले नसले तरी विठ्ठल यांनी शेतीत माघार घेतली नाही. निराश न होता त्यांनी प्रयोगशीलतेत सातत्य ठेवले. त्यामध्ये फुलशेतीची त्यांनी निवड केली. सन 2012 मध्ये एक एकर क्षेत्रावर गॅलार्डिया फुलांची लागवड केली. फुलशेती सुरू करण्यापूर्वी अकोला जिल्ह्यातील फूल उत्पादकपट्टा असलेल्या पातूर भागाला भेट दिली. तेथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील नियोजन सुरू केले. रोपांची खरेदी त्यांनी 3500 रुपये प्रति वाफा याप्रमाणे केली. सुमारे चार वाफ्यांत उत्पादनाचे नियोजन केले. एकूण व्यवस्थापनातून सुरू झालेल्या उत्पादनाची विक्री अकोला शहरात सुरू केली. सुरवातीच्या काढणीवेळी 25 रुपये प्रति किलो दर मिळाला, त्यामुळे या पीक पद्धतीतून अपेक्षित उत्पन्नाचा पल्ला गाठणे शक्य होऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांना आला. याच जाणिवेतून फूल लागवड क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. दोन एकरांवर याच फुलांची लागवड केली. उत्पादकता खर्चात बचतीच्या पर्यायांतर्गत रोपांची खरेदी करण्याऐवजी बियाणे आणत घरीच रोपवाटिका तयार केली.
ऑगस्ट 2013 मध्ये गॅलार्डियासोबतच निशिगंध, मोगरा, लिली या फुलांची लागवड केली. मोगरा आणि निशिगंधाचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही. लिली लागवडीखालील एक एकर क्षेत्र असून, त्यातून 100 जुळी (एका जुळीत 55 फुले) फुलांचे उत्पादन दररोज होते. प्रति जुळीला सरासरी सहा रुपयांचा दर मिळतो. यासाठी व्यापाऱ्यांशी त्यांनी वार्षिक करार केला आहे. दरात तेजी असो किंवा दर कमी झाले तरी त्यांना सहा रुपये प्रति जुळीचा दर मिळेल. एक एकरावर गॅलार्डिया लागवड क्षेत्र आहे. या फुलांचे दररोज एक क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. दोन हजार रुपये प्रति क्विंटल (20 रुपये प्रति किलो) प्रमाणे या फुलांच्या विक्रीचा वार्षिक करार व्यापाऱ्यांसोबत केला आहे.
गॅलार्डियासाठी बियाणे पाच हजार रुपये, खते दहा हजार रुपये, कीड-रोग निवारणासाठी उपायांवर दहा हजार रुपये, फुलतोडणीसाठी तीन महिला व एक पुरुष मजूर व त्यासाठी प्रति दिन 450 रु., वाहतूक खर्च 400 रु., याप्रमाणे खर्च होतो. मोगरा फुलांची अर्धा एकर क्षेत्रात सुमारे 300 रोपे आहेत. सहा बाय सहा फूट अंतरावर त्यांची लागवड आहे. निशिगंधाचे सहा हजार कंद मुदखेड (जि. नांदेड) येथून प्रति कंद 80 पैसे याप्रमाणे खरेदी करण्यात आले आहेत. अर्धा एकरावर ही फुले फुलत आहेत.
विठ्ठल यांनी फुलशेतीसोबत भाजीपाला पिकांची कास धरली आहे. वांगी, गवार, भेंडी, फ्लॉवर यासारख्या पिकांचे उत्पादन ते घेतात. वांगी दोन एकरांवर तर उर्वरित भाजीपाला पिकांची प्रत्येकी अर्धा एकरांवर लागवड होते. वांग्याची विक्री 12 रुपये प्रति किलोप्रमाणे केली जाते.
भाजीपाल्यासारख्या शेतमालाची विक्री दररोज करावी लागते. त्यासोबतच उत्पादित भाजीपालादेखील शहरात पोचविणे क्रमप्राप्त ठरते. फुले व भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी इतरांवर अवलंबून न राहता विठ्ठल यांनी स्वतःच वाहन खरेदी केले. त्याद्वारा दररोज अकोला, मूर्तीजापूर, अमरावती या बाजारपेठेत आपला भाजीपाला व फुले विक्रीसाठी नेला जातो. पारंपरिक पिकांच्या तुलनेत नगदी व थोड्या वेगळ्या प्रवाहाने जाणाऱ्या फुलांसारख्या पिकांचा पर्याय निवडून त्यात यश मिळवणे विठ्ठल यांना शक्य झाले आहे.
संपर्क - विठ्ठल पोटे - 8552862858
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील माटोडा गा...
हरभरा, तूर बाजार समितीत न विकता त्यावर प्रक्रिया क...
शेतीवर पूर्णपणे विसंबावे अशी आजची स्थिती नाही. कार...