অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला बागायतदार

  • पेठ तालुक्‍यातील गावांची पाणीटंचाईवर मात !
  • 8 बंधाऱ्यांतून पाणी अडविले
  • तीन गावांतील 10 विहिरीतील जलसाठा वाढला

"पावसाळ्यात चार महिने धो धो पाऊस आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण' अशी स्थिती वर्षानुवर्षे असलेल्या पेठ तालुक्‍यातील (जि. नाशिक) लव्हाळी, रानविहीर आणि सादरपाडा या गावांचा कायापालट झाला आहे. संस्था व ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आठ बंधारे उभारण्यात आले. त्यातून गावांतील विहिरी भरल्या. उन्हाळ्यातही बागायती शेती फुलू लागली. भात उत्पादक भाजीपाला उत्पादक झाला. नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम उत्तरेस महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेलगत पेठ हा आदिवासी तालुका वसला आहे. डोंगराळ दुर्गम परिसर, समतल जमिनींचा अभाव, पावसाळ्यात संततधार पाऊस.

अशा परिस्थितीत केवळ भाताचे पीक घेणेच शक्‍य होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम या भागातील अर्थव्यवस्थेवर कायमच झाला आहे. शिक्षण, स्वयंरोजगार, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांना येथील आदिवासी शेतकरी नेहमीच पारखा झाला आहे. गावांत मूलभूत सुविधा नाहीत. उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे विकासाच्या संधी नाहीत.

अभ्यासानंतर ठरवली कामाची दिशा

नाशिक येथील वनवासी कल्याण आश्रम संस्थेने ही परिस्थिती बदलण्याचे ठरवले. स्थापत्य अभियंता व संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद कुलकर्णी यांनी आपल्या दहा अभियंता मित्रांसोबत चर्चा केली. पेठ भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव ठेवला..सर्वांनीच काम करण्याची तयारी दाखवली.

वनवासी कल्याण आश्रमाचे आरोग्यरक्षणाचे प्रयोग पेठ तालुक्‍यातील काही गावांत मागील सात वर्षांपासून सुरूच होते. नव्या प्रयोगांसाठी तीच गावे निवडण्याचे ठरविले. तुलनेने अधिक दुर्गम व अविकसित अशी लव्हाळी, रानविहीर व सादरपाडा ही गावे निवडण्यात आली. पेठपासून नऊ किलोमीटरवरील ही गावे जमीन क्षेत्राच्या 700 ते 800 फूट खोल दरीमध्ये आहेत.

एवढे अनर्थ पाणीटंचाईने केले

खोल दऱ्यांच्या या परिसरात डोंगररांगांमुळे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो, पावसाचे पाणी दूरवर वाहून जाते. डिसेंबरपासूनच या आदिवासी प्रदेशात पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात. सिंचनासाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत भात शेतीनंतर येथील शेतकरी कुटुंब आपला बाडबिस्तरा बांधून रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात.

या भागात पाणी थांबले तर येथील गावकऱ्यांचे स्थलांतर थांबेल, असा निष्कर्ष समोर आल्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते असलेल्या नाशिकमधील तीस अभियंत्यांच्या गटाने लव्हाळी, रानविहीर, सादरपाडा या गावांत कामास सुरवात केली.

संबंध दृढ झाले

गटाचे समन्वयक विवेक पेंडसे म्हणाले, की शहरातील सुमारे 35 लोक आपल्याशी संवाद साधताहेत, हे सुरवातीला गांवकऱ्यांसाठी नवीन होते. पहिल्या काही बैठकांत हाती फारसे काही लागले नाही. मात्र आम्ही चिकाटी सोडली नाही. 12 नोव्हेंबर 2009 ला सादरपाडा गावाजवळून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यावर दगडांचे बांध टाकून पाणी अडविण्यास सुरवात केली.

25 अभियंते, 20 महाविद्यालयीन तरुण, असे काम सुरू झाले असताना परिसरातील ग्रामस्थही स्वयंस्फूर्तीने टिकाव, फावडे घेऊन या कामात सहभागी झाले. याच महिन्याभरात सादरपाडा, लव्हाळी आणि रानविहीर येथे प्रत्येकी असे तीन बंधारे बांधण्यात आले. ग्रामस्थांचा प्रतिसादही वाढत गेला. सादरपाडा येथे अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यानुसार (डिझाइन) व ग्रामस्थांचा पुढाकार यातून हनुमानाचे सुबक मंदिरही उभारण्यात आले. यातून गावकरी आणि संस्थेतील संबंध दृढ होत गेले.

आठ बंधारे पूर्ण

सन 2009 मध्ये सादरपाडा येथे दोन बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी सिमेंटच्या 150 गोण्या अभियंत्यांच्या गटाने उपलब्ध केल्या. परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन जुने पक्के बांधही बांधले होते. त्यात पाणी साठत नव्हते. त्या कामांची दुरुस्ती करण्यात आली. वन खात्याचे अधिकारी मुकुंद जोशी, श्री. गौड यांनीही या कामी भरपूर सहकार्य केले. सन 2010 मध्ये दर वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला तरी दिवाळीनंतर या चारही बंधाऱ्यांत प्रथमच 100 ते 125 फुटांपर्यंत पाणी साठले होते. डिसेंबरमध्ये पूर्ण आटणाऱ्या विहिरींत फेब्रुवारी संपला तरी पाणी टिकून राहिले होते. यामुळे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा हुरूप वाढला.
गावांतील महिलांना उन्हाळ्यात विहिरींतून पाणी काढणे हे मुश्‍कील काम होते. गटातील ज्येष्ठ तंत्रज्ञ अण्णासाहेब शिरोळे यांनी पाणी काढणे सुलभ होण्यासाठी रहाट तयार केले. सन 2011 ते 2013 या काळात जागानिश्‍चिती करून आणखी पाच बंधारे बांधण्यात आले. आता मेअखेरपर्यंत पाणी साठून राहत असल्याने उन्हाळ्यातील माणसांच्या पिण्याचा, जनावरांच्या पिण्याचा प्रश्‍न सुटला आहे. दर वर्षी डिसेंबरमध्येच कोरड्या पडणाऱ्या या गावांच्या शिवारातील 10 विहिरी उन्हाळ्यातही पाणी धरून ठेवू लागल्या आहेत. परिसरातील छोट्या बंधाऱ्यांतूनही साठलेल्या पाण्याचा सिंचनासाठी वापर वाढला आहे. केवळ भात घेणारा लव्हाळी, सादरपाडा, रानविहीर या गावांतील शेतकरी उन्हाळी भाजीपाला घेऊ लागला आहे. आपापले व्यवसाय सांभाळून नाशिक शहरातील 30 अभियंत्यांनी पेठ तालुक्‍यातील गावांच्या विकासासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांना ग्रामस्थांचाही तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.

या विकासकामांना मिळाली चालना

शिवारातील 10 विहिरींत पाणीसाठा वाढला
30 हजार उपयुक्त वृक्षांचे रोपण आणि जतन
चतुःसूत्री लागवड पद्धतीतून भात उत्पादनात 30 टक्के वाढ
महिलांचे दोन बचत गट सक्रिय
मधमाशीपालन प्रशिक्षणातून 14 युवकांना स्वयंरोजगार
चार युवतींना शिवणकाम प्रशिक्षण
आयुर्वेद सेवा संघाच्या मदतीने नियमित आरोग्यसेवा


संपर्क - विवेक पेंडसे - 9823196801
समन्वयक, "इंजिनिअर्स ग्रुप', वनवासी कल्याण आश्रम, नाशिक

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate