অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकात्मिक शेतीतून प्रगती

जालना जिल्ह्यातील खालापुरी (ता. घनसावंगी) येथील प्रदीप लक्ष्मणराव मरकड व त्यांचे बंधू प्रकाश यांनी एकात्मिक पद्धतीचे शेती व्यवस्थापन करून आपल्या शेतीला चांगला आकार दिला आहे. ऊस, मोसंबी, सोयाबीन, हरभरा या पिकांना दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. पाण्याचे नियोजन करून अवर्षणात शेती वाचविली आहे.
कायम अवर्षणाचा सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यात शेतीत आता बदल घडून येताना दिसत आहेत. शेतकरी आधुनिक पद्धतीचा वापर करीत आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी दुष्काळामुळे ऊस, कापूस, सोयाबीन, मूग, हरभरा, फळपिकांपासून समाधानकारक उत्पादन घेता न आल्याने बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. खालापूरी (ता. घनसावंगी) येथील प्रदीप लक्ष्मणराव मरकड व त्यांचे बंधू प्रकाश यांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसला. गेल्या वर्षी पाण्याची कमतरता भासू लागली. मात्र पाण्याचे व पिकांचे काटेकोर नियोजन केल्याने नुकसानीची तीव्रता कमी करणे शक्‍य झाले.

प्रयोगशीलतेवर भर

मरकड बंधूंची वडिलोपार्जित सुमारे 33 एकर जमीन आहे. प्रदीप यांचे शिक्षण बीए, बीएडपर्यंत तर प्रकाश यांचे शिक्षण एम. ए. पर्यंत झाले आहे. नोकरीच्या मागे न लागता ते शेतीकडेच वळाले. शेतीत सुधारणा करताना सुरवातीला जमिनीच्या सुपिकतेला प्राधान्य दिले. सन 2006 पासून उसाच्या पाचटाचे आच्छादन ते जमिनीत करतात. पाचटाबरोबर दर वर्षी ठिकठिकाणच्या जमिनीत सोयाबीन, मूग या द्विदलवर्गीय पिकांची लागवडही ते करतात. या पिकांच्या काढणीनंतर त्याचे अवशेषही जमिनीत आच्छादित केले जातात, त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली आहे. पर्यायाने पीक उत्पादनात वीस ते तीस टक्‍क्‍यापर्यंत वाढ करणे शक्‍य झाले आहे.

अवर्षणातही हरभऱ्याचे चांगले उत्पादन

गेल्या वर्षी मरकड यांनी पाच एकरांत सोयाबीनची पेरणी केली; परंतु दुष्काळी परिस्थिती असल्याने हे पीक पाण्याअभावी जळून जाऊ लागले. अखेर त्यातील एकच क्षेत्र लागवडीखाली आणले. त्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. त्यातून एकरी आठ क्विंटल उत्पादनापर्यंत ते पोचले. पुढे पाण्याची उपलब्धता पाहून रब्बी हंगामात याच एकरभर क्षेत्रात त्यांनी विजय जातीच्या हरभऱ्याची लावण केली. त्यासाठीही ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. लावण, त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी, त्यानंतर फुलोऱ्यापूर्वी व घाटे अवस्था अशा चार पीक अवस्थांमध्ये पाण्याचे नियोजन केले. एकूण व्यवस्थापनातून एकरी नऊ क्विंटल उत्पादन मिळाले.
त्याला प्रति क्विंटल 2800 रुपये दर मिळाला. त्यातून 25 हजार 200 रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुष्काळी परिस्थितीत मिळालेले हे उत्पादन व उत्पन्न दिलासादायक होते. यंदाही पाच एकरांत हरभरा असून सुमारे अडीच एकरात चांगले उत्पादन मिळण्याची मरकड यांना आशा आहे.

शेतीकडे दुर्लक्ष नाही

मरकड बंधूंचे वडील लक्ष्मणराव शेती सांभाळत गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपदेखील सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. मात्र शेतीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले नाही. रोज सकाळचा वेळ ते शेतीसाठी देतात. त्यांचे बंधू प्रकाश पूर्ण वेळ शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात.

पीक लागवडीचे नियोजन

मरकड बंधूंनी एकूण 33 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे नियोजन केले आहे. सुमारे वीस एकरांत कायम ऊस, पाच एकर मोसंबी पीक असते. सुमारे पाच एकरांवर सोयाबीन व त्यानंतर हरभरा पीक असे नियोजन असते.

पाणी व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे 18 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. त्याद्वारे विद्राव्य खते पिकांना दिली जातात. शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजनच प्रभावी केले तर अडचणी येणार नाहीत असे ते म्हणतात.

सेंद्रिय खतांवर पोसली मोसंबीची बाग

गेल्या आठ वर्षांपासून मोसंबीची बाग चांगल्या प्रकारे जोपासली असून सेंद्रिय खताच्या वापरावर अधिक भर दिला आहे. मोसंबी पिकातून पाच एकरांत सुमारे तीस टन उत्पादन घेतले आहे. गुणवत्ता उत्तम राखल्याने व्यापाऱ्यांकडून अन्य मोसंबींच्या तुलनेत अधिक दर मिळतो. प्रति टन 18 हजार रुपये दर त्यांना अलीकडील काळात मिळाला आहे.

दुग्ध व्यवसाय

शेतीला जोडधंदा म्हणून मरकड कुटुंबाने गेल्या दोन वर्षांपासून दुग्ध व्यवसायास सुरवात केली आहे. पाच म्हशींपैकी तीन म्हशी दूध देतात. यातील एक म्हैस दोन वेळेस मिळून चोवीस लिटर दूध देते. एकूण 40 ते 44 लिटर दूध उपलब्ध होते. सहा बैल, बारा गायी, पाच म्हशी व वासरू अशी मिळून एकूण पस्तीसपर्यंत जनावरे आहेत, त्यामुळे शेतीसाठी दर वर्षी पन्नास टॅक्‍टर-ट्रॉलीपर्यंत शेणखत उपलब्ध होते. याशिवाय सुमारे तीन एकर क्षेत्रावर चारा पिकांचे नियोजन केले आहे. त्यात लसूणघासही आहे. हरभरा, सोयाबीनचा भुसाही दिला जातो. चाऱ्यासाठी छोटे गोदामही केले आहे. याशिवाय अवर्षणात जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून दोन हौदही उभारले आहेत. दुग्ध व्यवसायापासून प्रति महिना सुमारे 36 हजार रुपये उत्पन्न मिळते. वर्षभरातील सुमारे आठ महिने याप्रमाणे उत्पन्न घेतले जाते. रोजचे दूध संकलित होऊन ते हॉटेल व्यावसायिकांना प्रति लिटर 40 रुपये या दराने दिले जाते. या व्यवसायातून शेतीला चांगले पूरक उत्पन्न जोडल्याचे मरकड म्हणतात.

ऊस शेती उल्लेखनीय व त्यात पारितोषिकही

- सन 2005 - 2006 मध्ये समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस पीक स्पर्धेत सहभाग घेतला. दीड एकरांत 120 मे. टन उत्पादन घेतले. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेतर्फे उत्तर-पूर्व विभागातून प्रथम क्रमांक देऊन मरकड यांन गौरविण्यात आले. त्यांचे दर वर्षीचे सरासरी ऊस उत्पादन एकरी 55 ते 60 टन असते. 
कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याकडून प्रति टन दोन हजार रुपये दर दिला जातो. ऊस पिकातही फर्टीगेशन केले जाते. 
चार फुटांच्या सरीवर को 86032 वाणाची लागवड केली जाते. 


प्रदीप मरकड- 9604320100 
मु. खालापुरी पो. बोडखा, ता. घनसावंगी, जि. जालना.

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate