অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मला उमगलेली सेंद्रिय शेती

वसुधा सरदार गेली अनेक वर्षे सेंद्रिय शेती करत आहेत. मुख्य म्हणजे त्यापलीकडे जाऊन खेडी-शहरं, उत्पादक-ग्राहक हे दुवे सांधण्याचा प्रयत्न त्या ‘सेंद्रिय सेतू’ या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून करत आहेत. सेंद्रीय अन्नाचं महत्त्व वाचकांना पटवून देत सेंद्रिय शेतीला त्यांनी सुरुवात कशी केली, का केली, त्यातले त्यांचे अनुभव काय आहेत आणि अनुभवांनी त्यांना काय शिकवलं याची विस्तृत मांडणी त्यांनी या लेखात केली आहे.

No civilization has ever lived beyond the healh of its soil. We are on the threshhold of vast human annihilation. The effort to revitalize the human immune system must begin with a massive effort to return vitality and fertility to our soils. Each of us must become dedicated to protecting what natural balance and health is left in us and our planet.
We begin to make ourselves heard in small ways, from placing demands on the grocer for safe, nutritious food to speaking out for natural values and the future of our planet. A clean environment is the foundation of life on this planet.
- EMPTY HARVEST’ : Dr Bernard Jensen, Mark Anderson

मुंबईतल्या गोरेगावात आमची शेती होती. शाळेत शिकत असतानाच आईआबांनी शेतात काम करायची सवय लावली होती. काकडीच्या आळयांत पाणी घाला, तोंडलीची जून पाने तोडा, भात लावणी आणि कापणी अशी आमची मुलांची लिंबूटिंबू कामं चालायची. पण त्यातून शेतीशी आणि शरीरश्र्रमाशी गट्टी झाली.

१९६० नंतरचा म्हणजे हरित क्रांती भारतात सुरू होण्याचा तो काळ होता. अधिक उत्पादन देणारी संकरित बियाणी, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वापरातून अन्नधान्य उत्पादन वाढण्याची व्यवस्था होत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातल्या सर्व जनतेला खायला पुरेसे अन्न आपण पिकवू शकत नव्हतो. अन्नधान्य आयात करावं लागत होतं; आंतरराष्ट्रीय राजकारणात लाचार बनवणार्‍या या लाजिरवाण्या स्थितीतून बाहेर काढणारं वरदानच वाटत होतं हे नवं तंत्र! अगदी छोटया शेतकर्‍यापर्यंत ते कसं पोचेल, रासायनिक खतंऔषधांचा वापर नियमितपणे कसा होईल, हे पाहण्याच्या कामात आम्ही विद्यार्थी त्यावेळी उत्साहाने सहभागी होतो.
दरम्यान लग्न होऊन पुण्यात रहायला आले, तरी दौंड तालुक्यातल्या पारगावची माहेरची शेती, आदर्श गाव योजनेमार्ङ्गत नांदेड जिल्हयातील शेती आणि पाणलोट क्षेत्र विकासाची कामं, इ. प्रकारे शेतीशी संबंध कायम होता. तरी हा सगळा संपर्क बांधावरूनच होता. २००२ मध्ये आबा गेले. त्यानंतर मी पारगावच्या शेतीत जास्त लक्ष घालायला सुरवात केली. तेव्हा ती काळी, कसदार, सुपीक समजली जाणारी जमीन मला वेगळंच काहीतरी सांगतेय असं जाणवलं.

पूर्वीएवढी किंबहुना जास्तच रासायनिक खतं घालूनसुद्धा उत्पादन घटत चाललं होतं. मशागत करायला ट्रॅक्टरला पूर्वीपेक्षा जास्त ताण पडत होता. एखाद्या वक्त्याला श्र्रोत्यांचा काही प्रतिसादच नसावा तशी माती अगदी ढिम्म होती. काही शेतकरी मित्रांबरोबर चर्चा व्हायच्या. कोणी सांगायचं, ‘आमच्याकडे पण असंच चाललंय. जी संत्र्याची बाग चाळायला पूर्वी दोन गडी पुरायचे, तिथे पाच गडी लावूनही काम उरकत नाही. जमीन कडक येत चाललीय’. कोणी सांगायचं, ’हल्ली शेतात ङ्गवारण्या करण्यातच माझा सगळा वेळ जातो. एवढं करून कीड हटत नाहीच.’ कोणी सांगायचं, ‘सेंद्रिय शेती करा’. म्हणजे काय करा? आणि त्याने काय होणार आहे?
अशातच, श्र्री. सुभाष पाळेकर नावाचे शेतीतज्ञ सेंद्रिय शेतीबद्दल व्याख्यान देतात, असं कळलं. मंगळवेढयाला त्यांचा कार्यक्रम होता. आम्ही काही शेतकरी गेलो. त्यांचं विवेचन ऐकताना रासायनिक शेतीपद्धतीमुळेच हे परिणाम दिसत आहेत, मुळातच काहीतरी बिघडतंय, हे लक्षात आलं. आमच्या शेतीतल्या बर्‍याचशा प्रश्‍नांची उत्तरं दिसायला लागली.

समजलं त्याप्रमाणे परत येउन सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाला सुरवात केली. गहू, कांदा, भाजीपाला, प्रत्येक पिकाचा एकेक सेंद्रिय प्लॉट केला. त्यात रासायनिक खतांचा वापर बंद किंवा नगण्य केला. उस,केळी सोडून कमी वयाच्या प्रत्येक पिकाचा सेंद्रिय प्लॉट रासायनिकपेक्षा सरस आला. जमिनीचा पोत लक्षात येण्याइतका सुधारला. शेतीच्या निरीक्षणांनी खूप काही शिकवलं. उमेद वाढली आणि सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रही वाढत गेलं. ‘सेंद्रिय शेती’ हा विषय आता माझ्यासाठी माझ्या शेतीपुरता मर्यादित राहिला नाही. आणखी वाचलं, ऐकलं, पाहिलं. यातून जे समजलं ते मांडण्याचा हा प्रयत्न.

सेंद्रिय शेतीने दिलेले धडे

सेंद्रिय शेती करताना आणि अनुषंगाने अभ्यास करताना समजत गेलं, जगभर रासायनिक शेतीचा हाच अनुभव आहे. जमिनीची धूप होत आहे. किडींची प्रतिकारक्षमता वाढत आहे. अमेरिकेत गेल्या ४५ वर्षांत कीटकनाशकांचा वापर १० पटींनी वाढूनही किडींमुळे होणारं नुकसान दुप्पट झालं आहे’. कीटकनाशकांतली घातक रसायनं अन्नात उतरत आहेत. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असूनही समाजातले आजार वाढतच आहेत. ‘जीवनशैलीचे’ म्हटले जाणारे आजार हे ‘जेवणशैलीचे’ही परिणाम आहेत. कमतरताजन्य आणि र्‍हासजन्य आजारांचं (deficiency diseases and degenerative diseases) वाढतं प्रमाण पाहिलं तर आपलं अन्न हाच आजारांचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. मुळात मानवाचं स्वास्थ्य हे वनस्पती, पशुपक्षी आणि ‘जिवंत जमीन’, या सर्वांच्या आरोग्याशी अतूटपणे निगडीत आहे, हे लक्षात आलं. आमच्या शेतातली माती प्रतिसाद देत नव्हती, कारण सततच्या रसायनांच्या वापरामुळे ती अशक्त, रोगट, मृतवत होत चालली होती. पोटातल्या असंख्य जीवाणू, बुरशी, गांडुळं, यांच्यामुळे असलेला तिचा जिवंतपणा, सुपीकपणा लोप पावत चालला होता. हयांच्यामुळे ती सजीव आणि सुङ्गला होते, हेच नव्याने समजलं.

मनुष्यमात्राच्या जन्माच्याही कितीतरी काळ आधी पृथ्वीतलावर वनस्पतीसृष्टी निर्माण झाली. विविधतेने बहरली. विविध जीव उत्क्रांत झाले. काही नष्ट झाले. नवे निर्माण झाले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतामार्ङ्गत चालवल्या जाणार्‍या या अविरत जीवनचक्राची परिपूर्ण, स्वयंचलित, गोळीबंद, अशी एक यंत्रणा निर्माण झाली. माणूस हाही या निसर्गचक्राचा एक भाग. पण आपल्या बुद्धिकौशल्यानेे त्याने बाहय परिस्थितीत हस्तक्षेप केला, त्यातून त्याची प्रगती होत गेली. त्याने अनेक वस्तूंची निर्मिती केली. औजारं व यंत्रं विकसित केली. स्वत:ला अनुकूल हस्तक्षेप करण्यापासून, निसर्गावर मात करण्यापर्यंत त्याची महत्त्वाकांक्षा वाढली.

या झपाटयात माणूस निसर्गापासून ङ्गक्त दूरच नव्हे, तर निसर्गनियमांच्या विरुद्ध गेला. शेतीपुरतं बोलायचं तर, शेती म्हणजे निसर्गांची मानवी आवृत्ती. ङ्गक्त निसर्गात उगवलेलं खाण्याऐवजी त्याने काही गोष्टी स्वत: पिकवायला सुरवात केली, निसर्गात ‘पिकं’ नसतात, तशी ‘तणं’ही नसतात. या अर्थाने ‘शेती करणं’ हीच निसर्गापासून काहीशी ङ्गारकत आहे. इथपर्यंतही ठीक आहे. पण आज संख्यात्मक उत्पादन वाढवणारी संकरित बियाणी, त्यासाठी कृत्रिम रासायनिक खतं, अंतर्प्रवाही विषारी कीटकनाशकं, तणनाशकं, कृत्रिम संप्रेरकं, अवजड यंत्रसामुग्री, आता जनुकपरिवर्तित बियाणी, या सर्वांची मिळून जी ‘रासायनिक शेतीपद्धती’ म्हणून ओळखली जाते, तिचा अर्थ समजून घ्यायला हवा.

निसर्गचक्रात सर्व सजीवांचं अन्न तयार करण्याची जबाबदारी वनस्पतींवर सोपवलेली होती व आहेे. वनस्पती, त्यांनी तयार केलेलं अन्न किंवा ते अन्न खाणारे सजीव, हाच कोणाचाही मुख्य आहार आहे. डोळयांना दिसू न शकणार्‍या सूक्ष्म जीवजंतूंपासून ते लहानमोठे कीटक, गांडुळं, प्राणी, पशु, पक्षी, असे अन्नाचे सर्व लाभार्थी, ते अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते! पंचमहाभूतांच्या जोडीला, या तमाम जीवसृष्टीच्या योगदानातून वनस्पतींच्या पोषण आणि संरक्षणाच्या यंत्रणांची गुंङ्गण निसर्गात विकसित होत गेली. विशेष म्हणजे, हजारो लाखो वर्षं ती निरंतर चालत राहिली. मधमाशा, ङ्गुलपाखरंं, पक्षी परागीभवन आणि कीडनियंत्रणाद्वारे उत्पादनवाढीला मदत करत असतात. वनस्पती आणि त्यांच्या मुळांजवळचे जीवजीवाणू यांचं साहचर्य आणि मैत्र तर अद्भुत आहे. वनस्पतींना आवश्यक अन्नद्रव्यं आवश्यक तेव्हा, आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचं काम हे निसर्गदूत शतकानुशतकंं इमानेइतबारे करत आले आहेत. परस्परावलंबन, परस्परपोषण आणि संतुलन हे निसर्गरचनेतले पायाभूत नियम या व्यवस्थेत बिनबोभाटपणे पाळले जात होते. निसर्ग हा निर्हेतुक असतो, असं म्हणतात. तरी वारा, वादळ, पाऊस, ऋतुबदल, अशा निसर्गाच्या प्रत्येक घटितामागे हा पसारा चालवण्याचं प्रयोजन आणि अव्वल दर्जाचं व्यवस्थापनकौशल्य अनुभवाला येतं. कोणाच्याही आज्ञेविना, नियंत्रणाविना वनस्पतींसह अगणित सजीवांचं वंशसातत्य टिकवण्याचेच नव्हे, ते सुधारत जाण्याचे आटोकाट प्रयत्न कोणत्याही गाजावाजाविना चालू रहाण्याचं एक स्वयंचलित यंत्र जणू कार्यरत आहे. या यच्चयावत् सजीवांचा योगक्षेम वाहण्याची आश्‍वासक हमी या व्यवस्थेतच अंतर्भूत होती. सर्व जीवमात्रांचा संख्यात्मक समतोल सांभाळण्याचीही व्यवस्था त्यात होती. त्यासाठी आवश्यक त्या पोषक व संरक्षक द्रव्यांच्या पुनर्भरणाची सोय होती.

या सर्वांना बाजूला सारून, किंबहुना जिवंत प्रक्रियांचा बळी देउन तो सगळा मक्ता माणसाने आता स्वत:कडे घेतला आहे. यात पुनर्भरण नाही, बाजारातून विकत आणून शेतीत टाकण्याचा खटाटोप आहे. नैसर्गिक, जैव यंत्रणांचं जतन नाही, उलट कृत्रिम घातक रसायनांच्या सतत कराव्या लागणार्‍या वापरामुळे त्यांचा नाश आहे. निसर्गचक्राचा आदर नाही, त्याच्यावर विजय मिळवण्याचा अट्टाहास आहे. सर्व जीवमात्रांचा नाही, ङ्गक्त स्वत:चा विचार आहे. या ‘स्वत:’ मध्येही संपूर्ण मानवजात नाहीच. हे कुठपर्यंत चालू शकेल?

१८४० च्या सुमाराला जस्टस लायबिग या जर्मन शास्त्रज्ञाने वनस्पतींचं रासायनिक विश्‍लेषण करून त्यातील नत्र,स्फुरद,पालाश हे मुख्य आणि काही सूक्ष्मद्रव्यं घटक शोधून काढले. हे घटक बाहेरून पुरवले, तर पिकांची जोमाने वाढ होईल, हा सिद्धांत मांडला. तो प्रत्यक्षाच्या कसोटीला उतरला आणि शेतीत ‘रासायनिक युग’ सुरू झालं. ‘युग’ म्हटलं गेलं खरं, पण उण्यापुर्‍या दोनशे वर्षांच्या आतच ते धोक्यात आलेलं दिसतं. कृत्रिम रसायनांमुळे अन्नद्रव्यांचं संतुलन ढासळू लागलं. जमिनीचं आरोग्य बिघडू लागलं. उत्पादनावर परिणाम झाला.

नेमक्या याच गोष्टी आमच्या शेतीत घडत होत्या. परिणाम स्पष्ट होते. रासायनिक निविष्टा बंद करून नैसर्गिक प्रक्रियांना वाव दिल्यानंतर सर्वात पहिला बदल दिसला तो मातीच्या पोतात. आणि ‘कोंभाची लवलव | सांगे मातीचे मार्दव’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पिकांतही तो उतरला. पिकांप्रमाणेच बांधावरच्या आणि परिसरातल्या झाडांतही आम्ही जैवविविधता जोपासली आहे. त्यात खूप वेगवेगळे पक्षी वस्तीला आले आहेत. कावळे मधुमक्याच्या कणसांना टोच्या मारतात तेव्हा त्यांचा राग येतो; पण शेणखतातून येणार्‍या, अत्यंत नुकसानकारक अशा हुमणीच्या अळया कावळयांनी वेचून ङ्गस्त केलेल्या पाहिल्या तेव्हा, पीक ङ्गक्त मीच पिकवलेलं नाही, म्हणून त्याच्यावर ङ्गक्त माझाच अधिकार नाही, याची निसर्ग आठवण करून देतोय, असं वाटलं.

एकदा दोन दिवस बाहेरगावी जाऊन आले तेव्हा ल्यूसर्न घासावर माव्याचा जोरदार हल्ला झाला होता. सर्व सहकार्‍यांच्या मते काहीतरी जालीम उपाय (म्हणजे रासायनिक ङ्गवारणी), तोही ताबडतोब करणं आवश्यक होतं. परिस्थिती पहायला शेतात गेले. तर पाचसहाशे पाखरं मावा किडीवर तुटून पडलेली दिसत होती. मी मनाच्या समाधानासाठी हळद आणि हिंग मिसळून ताकाची एक ङ्गवारणी करून घेतली. पण निसर्गाने आपलं काम केलं होतं. आठ दिवसात पीक स्वच्छ झालं होतं. वनस्पतींच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी शतकानुशतकांच्या वाटचालीतून निर्माण झालेल्या निसर्गाच्या यंत्रणा समजून घेउन त्या आपल्या शेतीत उभ्या करणं ही आम्ही सेंद्रिय शेतीची व्याख्या समजतो.

निसर्गाने योजलेले हे उपाय आपल्या शेतातही चालू करण्याऐवजी कृत्रिम विषारी रसायनांनी आपण कीडनियंत्रण करू पाहतो, तेव्हा दोन अनर्थमालिका सुरू होतात : नैसर्गिक प्रकियांत ढवळाढवळ आणि शेतकर्‍याचं शोषक बाजारव्यवस्थेवरचं वाढतं अवलंबन. उपद्रवी किडींबरोबर ‘मित्रकिडी’ही मारल्या जातात. एका अशिक्षित शेतकर्‍याने मला सांगितलं, ‘हे कौरवपांडवागत असतंय बगा. किडी शंबर, त्यांना खाणारे पाच.’ आपल्या विषारी ङ्गवारणीत हे पाच हमखास मरतात. शंभरांपैकी काही हमखास बचावतात. औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवून ते नव्या जोमाने हल्ला करतात, तेव्हा त्यांना खायला आपण कोणालाच शिल्लक ठेवलेलं नसतं. मग आणखी जहाल औषधं! ती आणखी महाग. पण इलाजच नाही. एका महागडया दुष्टचक्रात शेतकरी अडकतो. जमिनीच्या उपजाउपणाचा बळी देउन. हवा, पाणी, पर्यावरण आणि या सर्वांबरोबर आपलंच अन्न प्रदूषित करून.

आरोग्य नव्हे, अस्तित्वच धोक्यात

शेतीतून पिकलेल्या अन्नाचा अंगभूत दर्जा म्हणजे सकसता. कस म्हणजे त्यातील विविध पोषक द्रव्यं. यातून शरीराचं भरणपोषण होतं. ‘अन्नमयो प्राण:’ असं ऋषिमुनींनी म्हणून ठेवलंच आहे. रासायनिक शेतीपद्धतीमुळे पिकांतील पोषक अन्नद्रव्यांचा र्‍हास होतो. उत्क्रान्तीचा सिद्धांत मांडणार्‍या डार्विनने गांडुळांवर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला आहे. गांडुळांच्या विष्ठेत विविध सूक्ष्म अन्नद्रव्यं विपुल प्रमाणात असतात. उदाहरणार्थ क्रोमियमसारखी अतिसूक्ष्म प्रमाणात लागणारी, शरीरातील साखरेच्या व्यवस्थापनाला अत्यावश्यक द्रव्यं खोल जमिनीतून पिकांच्या कार्यशील मुळ्यांपर्यंत आणून सोडण्याचं काम गांडुळं शांतपणे करत आली आहेत. रासायनिक खतंऔषधांनी गांडुळांसारख्या असंख्य जिवांचं शिरकाण केल्यावर मधुमेह, हृदयरोग आणि सर्वच कमतरताजन्य आजारांचं प्रमाण शतपटीने वाढलं असल्यास नवल ते काय?

हे निकस अन्न कीटकनाशकांच्या ङ्गवारण्यांमुळे विषमय होतं, ही अधोगतीची पुढची पायरी. अन्नसाखळीच्या प्रत्येक वरच्या कडीत विषांचं प्रमाण भूमितीश्र्रेणीने वाढत धोक्याची पातळी ओलांडतं, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. या रसायनांचा मुख्य आघात प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि प्रजननक्षमता यांच्यावर होतो. एकीकडे एडस्विरोधात जगभर युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत; दुसरीकडे आपण रोजच्या अन्नातून आपली प्रतिकारशक्ती क्षीण करून घेत आहोत, हा किती विदारक विरोधाभास आहे! विषारी अंशांच्या जोडीला संजीवकविध्वंसक (एन्डोक्राईन डिस्रप्टिव) रसायनांमुळे लिंगबदल, जन्मजात विकृती, व्यंगं, कॅन्सर, असे भयानक दुष्परिणाम होत आहेत. पण रोजच्या अन्नातील धोक्यांची जाणीव सुशिक्षित वर्गातही म्हणावी तेवढी झालेली नाही, हे दुर्दैव.

सेंद्रिय शेती : परदेशी फॅड?

रासायनिक शेती आपल्याकडे १९६० च्या सुमाराला आली. पण लायबिगच्या शोधानंतर पाश्‍चात्य देशात ती १८५० च्या सुमारालाच सुरू झाली होती. रासायनिक शेतीच्या जोडीला वाढतं औद्योगीकरण, वाहतुकीच्या सोयीसाठी महामार्गांचं जाळं, त्याच्या वाटेत आडव्या येणार्‍या समृुद्ध वनसंपदेची कत्तल, पृथ्वीच्या पोटातील खनिजांचा, कोळशाचा अमर्याद उपसा.. निसर्गचक्राची मोडतोड करणार्‍या अशा अनेक पायर्‍या माणूस बिनदिक्कत ओलांडत आहे. प्राणवायूकर्बद्विप्राणिलवायू (Co2) चक्र, पर्जन्यमान, तापमान, ऋतुचक्र, या सर्वांवर त्याचे परिणाम झालेले आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हा खेळ विनाशाच्या वाटेकडे नेणारा आहे. विसाव्या शतकाच्या आरंभापासून पाश्‍चात्य देशात तज्ञांनी याबद्दलचे इशारे द्यायला सुरवात केल्याचं दिसतं. पण महाभारतातल्या व्यासांच्या किंवा बुडणार्‍या टायटॅनिकच्या कप्तानाच्या हाकार्‍यांप्रमाणे याही इशार्‍यांकडे लक्ष द्यायची कोणाला गरज वाटत नव्हती.

‘किडींचा कर्दनकाळ’ आणि महायुद्धात सैनिकांना मलेरियापासून वाचवणार्‍या डीडीटीच्या शोधाबद्दल त्याच्या जनकाला नोबेल पारितोषिक मिळालं. १९६२ मध्ये, म्हणजे पंचवीसतीस वर्षांतच डीडीटीने माजवलेल्या हाहा:काराचं चित्र राचेल कार्सनने तिच्या ‘सायलेन्ट स्प्रिंग’ या गाजलेल्या पुस्तकात मांडलं. लवकर विघटन न होणार्‍या या हट्टी प्रदूषकाचं (persistent polutant) घातक अस्तित्व, जिथे त्याची कधीही ङ्गवारणी झालेली नाही अशा, ऍमेझॉन खोर्‍यातल्या घनदाट अरण्यातल्या पक्ष्यांच्या अंडयांपासून ते ध्रुवप्रदेशातल्या अस्वलांपर्यंत सर्वदूर पोचलं आहे, हे तिने सप्रमाण दाखवून दिलं. त्यानंतर अमेरिकेत डीडीटीच्या वापरावर बंदी आली. (उत्पादन चालूच आहे आणि तिसर्‍या देशात त्याची निर्यात अव्याहत चालू आहे, हा भाग अलाहिदा.) आज अशी असंख्य प्रदूषकं दैनंदिन वापरात आहेत.

विषारी रसायनांच्या प्रभावामुळे प्रजननक्षमता क्षीण होऊन सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी गरूड, नामशेष होणार्‍या प्रजातींच्या यादीत आला तेव्हा तिथे खळबळ उडाली. पण निर्वंश होणार्‍या अतिसूक्ष्म जीवाचंही निसर्गात कळीचं स्थान असतं, मानवाच्या अस्तित्वासाठीही तो जीव तितकाच महत्त्वाचा असतो, हे आपण विसरलो. स्वत: निर्माण केलेल्या या विनाशचक्रात खेचली जाऊन मानवजातही नामशेष होण्याच्या वाटेवर लागली आहे, याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. पुरुषांमधील वंध्यत्व वाढत चालल्याची संशोधनं रोज प्रसिद्ध होत आहेत. लहानपणच्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव कुठल्यातरी दूरवरच्या पिंजर्‍यातल्या पोपटात अडकलेला असायचा. तसा मानवजातीचा जीवही या प्रत्येकामध्ये अडकलेला आहे. ते संपले तर आपणही ङ्गार काळ तग धरू शकणार नाही, याचा बोध आपण कधी घेणार? ‘जगातल्या शेवटच्या मधमाशीनंतर आपण ङ्गार तर चारएक वर्षं जगू’ हे अल्बर्ट आइन्स्टाईनचे उद्विग्न उद्गार हेच अधोरेखित करतात. आजघडीला ‘नष्ट होण्याच्या वाटेवर असलेल्या प्रजातीं’च्या यादीत मधमाशांचा समावेश झालेलाच आहे.

संप्रेरकं (hormones) प्रयोगशाळेत तयार करता येतात, हा शोध लागला, तेव्हा वंध्यत्वावर मात करण्याचा मार्ग खुला झाला. या संशोधनाचा प्रयोग करून असंख्य विनापत्य कुटुंबांच्या जीवनात आनंद आला. नंतरच्या पंचवीसेक वर्षांतच, १८ ते २५ वयाच्या मुलामुलींत जननेन्द्रियाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे आढळले. संशोधनातून या दोन्हींचा संबंध प्रस्थापित झाला.

नैसर्गिक जैव प्रक्रियांमधील अवाजवी हस्तक्षेप आपल्यावर उलटल्याचे असे अनुभव वारंवार येताहेत. बाकी कोणत्याही क्षेत्रापेक्षा शेती क्षेत्रातली ढवळाढवळ सर्व सजीवांच्याच मुळावर उठण्याचा धोका जास्त आहे. तरी शेतीत, पाळीव प्राण्यांत कृत्रिम संप्रेरकांचा वापर सढळपणे चालू आहे. जनुकपरिवर्तन ही संकरीकरणाची पुढची पायरी गाठताना आपण तोच उतावीळ उत्साह दाखवत आहोत. जमिनीची आणि पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्याऐवजी निसर्गात न होणारे संकर घडवून, त्यासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपण धन्यता मानत आहोत.

नफ्यासाठी काय पण..

या सर्व खटाटोपाला ‘जगाच्या वाढत्या लोकसंख्येला पोटभर खाऊ घालण्याच्या’ उदात्त उद्दिष्टाची झिलई चढवण्यात येत असली, तरी त्यामागील मुख्य उद्देश अधिकाधिक नङ्गा कमावणं हाच आहे. महायुद्धात रासायनिक अस्त्रांसाठी उभारलेला उद्योग डोलारा नंतर बहुतांशी रासायनिक खतऔषध निर्मितीकडे वळवला गेला. गरीब, उपाशी तिसर्‍या जगात त्यांची सवय लावली.

रासायनिक खतंऔषधांविना शेती चांगली पिकूच शकणार नाही, अशीच आज शेतकर्‍याची मानसिकता तयार झाली आहे.
‘शुद्ध बीजापोटी’ रसाळ गोमटया ङ्गळाची महती संत सांगून गेले. उत्तम वाणांचं बी पिढयान्पिढया जतन करण्याची आपली परंपरा. या बीजावर आणि एकूणच जगाच्या अन्नपुरवठयावर निरंकुश सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. पुढची पिढी उगवणारच नाही, अशी ‘निरंकुर’ (terminator) बियाणी विकसित करण्यात आली आहेत. पेटंट कायद्याने असे एकाधिकार निर्माण केले जात आहेत, की शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातले बियाणे राखून लावले, तरी तो गुन्हा ठरावा. शेतकर्‍याला प्रत्येक हंगामाला बियाण्यासाठी कंपनीच्या दारातच जायला लागावं. जातीव्यवस्था आणि पुरुषप्रधानता टिकवून ठेवण्यासाठी स्त्रीबीजावरच ताबा ठेवण्याचा अट्टाहास असतो ना!

अशी विषमतेवर आणि शोषणावर आधारलेली व्यवस्था सुरळीत चालवायची असेल तर दुहेरी मूल्यव्यवस्था अपरिहार्य ठरते. जगाचा अन्नव्यापार आपल्या मुठीत ठेवण्याची आकांक्षा बाळगणार्‍या अमेरिकेसारख्या देशांचं ‘खायचं अन्न आणि दुसर्‍यांना विकायचं अन्न’ वेगळं असतं. आज पुढारलेल्या देशांसाठी सकस,विषमुक्त अन्न ही महत्त्वाची गोष्ट आहे; तर तिसर्‍या जगातील देशांसाठी निर्यात महत्त्वाची ठरली आहे. १९६०पर्यंत ङ्गक्त सेंद्रियच शेती असलेल्या आपल्या देशात, सेंद्रिय शेतीच्या दुसर्‍या पर्वाची सुरुवात कृषि नव्हे, तर वाणिज्य मंत्रालयाकडून झाली आणि आज भारतातील ४० पेक्षा जास्त सेंद्रिय उत्पादन निर्यातीसाठीच घेतलं जातं, या दोनच गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत. अलीकडेच, निर्यातीसाठी निगुतीने पिकवलेल्या द्राक्षांचे कंटेनर्स त्यात क्लोरोमेेट क्लोराईड हा एक घटक विहित प्रमाणापेक्षा जास्त होता म्हणून युरोपच्या उंबरठयात तिष्ठत राहून शेवटी परत आले. आपले लोक काही का खाईनात. ज्या गरीब, कष्टकरी वर्गासाठी अन्नसुरक्षा महत्त्वाची आहे, त्यांना सुरक्षित आणि कसदार अन्न तितकंच महत्त्वाचं आहे ना !

मनुष्यबळ विकासाचं पहिलं साधन आणि सर्वदूर पसरलेल्या प्रदूषणापासून बचाव करण्याचं आपलं प्राथमिक सुरक्षाकवच काय असेल तर ते आपलं अन्न. हे अन्नच आज आपल्याला ङ्गितूर झालं आहे. पुतनामावशीची कथा पुराणांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अमृतासमान मातेचं दूध आज बहुविध विषांचं कॉकटेल झालं आहे. शरीराचं पोषण आणि संरक्षण ही मूलभूत कार्यं पार पाडायला आजचं निकस व विषमय रासायनिक अन्न पूर्णपणे असमर्थ झालं आहे. वैयक्तिक आयुष्यात एका दुर्दैवी क्षणी अन्नाचं हे प्राणघातक, विषारी स्वरूप माझ्यापुढे अचानक उभं ठाकलं. आणि मी हडबडून गेले. सेंद्रिय शेती त्याआधीही सुरूच होती. पण नुसती सेंद्रिय शेती करणं एवढंच पुरेसं नाही; विषमुक्त सेंद्रिय उत्पादनं ग्राहकापर्यंत सातत्याने पोचवणं आणि त्यांनी ती जाणीवपूर्वक स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं आहे, हे प्रकर्षाने जाणवलं. यानंतर २००८ मध्ये ‘सेंद्रिय सेतू’ या शेतकरी गटाची स्थापना झाली.

सेंद्रिय सेतू

खेडी..शहरं, उत्पादक..ग्राहक आणि अन्न.. आरोग्य यातला सेंद्रिय सेतू. हे तुटलेले दुवे सांधण्याचा प्रयत्न आम्ही ’सेंद्रिय सेतू’ मार्ङ्गत करत आहोत. सभासद शेतकर्‍यांनी भाजीपिकं आपसात वाटून घेऊन, सेंद्रिय पद्धतीने पिकवून त्याची शहरी ग्राहकांना थेट विक्री करणं, हे थोडक्यात सेतूच्या कामाचं स्वरूप आहे. थान्यं, डाळी, गूळ इ. इतरही सेंद्रिय पदार्थ आमच्याकडे विक्रीला असतात. पण भाजीपिकं म्हणजे कीडरोगांची गॅरंटी. पिकवायला अवघड. त्याला मनुष्यबळाची जास्त गरज. शिवाय नाशवंत. इतक्या जोखमीच्या खेळात आम्ही का उतरलो? कारण सेंद्रिय सेतू मधली अन्न.. आरोग्य ही कडी आमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांच्या तुलनेत भाजीपाल्यापासून मिळणार्‍या जीवनसत्त्वांचं प्रमाण खूप जास्त आहे. शरीराला जीवनसत्त्वांची गरज असते ती अतिशय थोडया प्रमाणात. पण चयापचय, इतर अन्नघटकांचं योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात वहन, इ. साठी त्यांचं अस्तित्त्व अत्यंत महत्त्वाचं. दुचाकी पेट्रोलवर चालते, ऑईलवर नाही.पण ऑईलशिवाय मात्र ती सुरळीत चालू शकत नाही, तसंच. त्यामुळे आरोग्यासाठी भाजीपाला अतिशय महत्त्वाचा ठरतो. दुसरीकडे, रासायनिक शेतीपद्धतीचे जास्तीत जास्त तोटे भाजीपाला पिकांत असतात. ग्राहकांना माल निरोगी ‘दिसावा’, म्हणून रासायनिक शेतकरी शेवटच्या दिवसापर्यंत ङ्गवारण्या सुरू ठेवतात. परिणामी भरगच्च, तजेलदार, कीडमुक्त पण विषयुक्त भाज्या आपल्या हातात येतात. मानवी आरोग्यावर होणारे याचे परिणाम निव्वळ भयानक आहेत. म्हणून हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे.

उपवासाच्या दिवशी पोटात भूक आहे, समोर कांद्याची भजी आली आहेत, कोणाच्या लक्षात यायला चान्स नाही, तरीही आपण स्वत:लाच साक्षी ठेवून, भज्याला हात लावत नाही. तसंच ‘सेंद्रिय सेतू’साठी राखून ठेवलेली जमीन भाविकाच्या श्र्रद्धेने सेंद्रियच करायची, असा गटाचा संकल्प आहे. त्याचे उत्कृष्ट परिणाम दिसत आहेत. वांगी, भेंडीसारख्या हमखास कीडरोगाला बळी पडणार्‍या भाज्याही निरोगी नि चंागलं उत्पादन देत आहेत. १० गुंठे जमिनीपासून सुरवात केलेल्या सभासदांनी आता दोनतीन एकर सेंद्रियसाठीच राखून ठेवले आहेत. यासाठी शेतकर्‍यांचं निरंतर प्रशिक्षण चालू असतं. गावरान गाईच्या शेणमूत्रापासून जीवामृत, मिश्र्रपिकं, सापळापिकं, आच्छादन, पाण्याचा कमीत कमी वापर, वनभिंती, कीडभक्षी पक्ष्यांना बसायला शेतात जागा निर्माण करणं, कामगंध सापळे, अशा अनेक पद्धतींतून आपण नैसर्गिक यंत्रणाचं अनुकरण करू शकतो. सेंद्रिय सेतू गटाच्या सभासद शेतकर्‍यांकडे या विविध पद्धती कमीअधिक प्रमाणात राबवलेल्या दिसतील. जगाची भूक, अनारोग्य आणि शेतीच्या समस्या या सर्वांना उत्तर देण्याची सेंद्रिय शेतीपद्धतीची ताकद ही शेती करताना निर्विवादपणे अनुभवाला येते.

अर्थात, या वाटचालीत अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागत आहे. विजेचा लपंडाव, मजुरांची टंचाई, हवामानातील तीव्र बदल, रस्त्यावरचे पोलीस, ते मुलांच्या विकासासाठी अतोनात कष्ट घेणार्‍या सधन पालकांची भाज्यांवरील खर्चाबद्दल खळखळ, अशा अनेक आव्हानांना तोंड देत मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालण्याची कसरत करावी लागते. पण ‘डॉक्टरांकडच्या खेपा कमी झाल्या’, ‘लिव्हर कॅन्सरच्या सहा वर्षं वयाच्या पेशंटला गेल्या चार वर्षांत केमोथेरपीची गरज लागली नाही,’ असे ग्राहकांचे अभिप्राय ऐकले, की आपण योग्य मार्गावर आहोत, याची खात्री पटते.

‘सेंद्रिय सेतू’ ही शेतकरी आणि ग्राहक यांची संयुक्त चळवळ आहे, असं आम्ही समजतो. शहरी ग्राहकांनी आमच्या शेतांना भेट द्यावी, आमचे हे प्रयत्न समजून घ्यावे आणि सेंद्रिय आहाराचा आग्रह धरावा,अशी आमची अपेक्षा आहे. आपल्या कुटुंबाचं आरोग्य या अगदी वैयक्तिक स्वार्थापासून ते शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवून पर्यावरण रक्षणाला सक्रिय हातभार, इथपर्यंत, सुपरिणामांची एक मालिका आपण निर्माण करू शकतो. काही ग्राहक अत्यंत जाणीवपूर्वक आमचा शेतमाल घेतात, कमी असेल ते गोड मानून घेतात, गर्दीच्या वेळी विक्रीत सहकार्यही करतात, हा आनंददायक अनुभव आहे.

पण आरोग्य आणि त्यासाठी आरोग्यदायक अन्न, हा प्रत्येकच नागरिकाचा अधिकार आहे. आज अभिजनांपुरतंच मर्यादित असलेलं विषमुक्त अन्न प्रत्येकाला उपलब्ध झालं पाहिजे. यासाठी आपल्या शेतीधोरणाचा रोखच बदलावा लागेल. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय बर्‍याचदा नाइलाजाने, जनमताच्या रेटयानेच घेतले जातात, असा अनुभव आहे. स्वत: सेंद्रिय अन्न आवर्जून खाण्याबरोबरच, असा रेटा निर्माण करण्यासाठी, अगदी प्रत्येकाशी नातं असणार्‍या या चळवळीत सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना सेंद्रिय शेतकर्‍याचं मनापासून आवाहन !
-----
वसुधा सरदार
पारगाव (सालोमालो),
ता. दौंड, जि. पुणे ४१२२०३
चलभाष : ९० ११ ०३ ४९ ५०,
ajitvasudha@yahoo.com
www.sendriyasetu.org.

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate