অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मल्चिंग प्रयोग फळबागेत

मल्चिंग प्रयोग फळबागेत
औरंगाबाद- बीड परिसरात मोसंबी व डाळिंब उत्पादकांनी यंदाच्या भीषण दुष्काळात सेंद्रिय व प्लॅस्टिक मल्चिंगद्वारे आपली पिके जगवण्याचा प्रयत्न केला, त्यातून हिरवाई टिकवली व आर्थिक आधाराची आशाही पल्लवीत झाली.
बीड महामार्गावरील सांजखेडा हे पिंप्री राजा मंडळातील गाव. मोसंबीचे आगार समजल्या जाणाऱ्या भागातील हे गाव आहे. मोसंबीची बाग म्हणजे पाणी भरपूर आहे असे म्हटले जाते. सुकना मध्यम प्रकल्पाचा कॅनॉलही जवळून वाहतो, त्यामुळे हे पीक भरभराटीस आले; मात्र या वर्षी दुष्काळाच्या झळा या गावातील मोसंबी उत्पादकांनाही बसल्या. विहिरीचे पाणी आटले. कॅनॉल तर वर्षाच्या सुरवातीपासूनच कोरडा होता. खरीप व रब्बी पाण्याअभावी वाया गेला. मोठ्या कष्टाने जगविलेल्या बागा नष्ट होताना पाहणे दुःखकारक होते. अशा वेळी कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी आणि पैठण तालुक्‍यातील देवगावचे जय जवान जय किसान शेतकरी मंडळ पुढे आले आणि बागा जगविण्याच्या प्रयत्नाला सुरवात झाली. 

शेतकऱ्यांकडून दोन- तीन वर्षांपासून शेततळ्यांतील पाण्याचा वापर फळबागांसाठी व्हायचा; मात्र या वर्षी पाऊसच इतका कमी झाला, की विहिरींचा तळ उघडा पडला, त्यामुळे शेततळ्यांत भरण्यासाठी पाणीच राहिले नाही. मिळेल तेथून पाणी विकत आणण्याचा व त्यातून पिके जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागले. मात्र, पाणी कुठपर्यंत विकत घ्यायचे व ते पुढे विकत मिळेलच याची शाश्‍वती नव्हती.


आच्छादनाचा पर्याय निवडला


कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फळबागांना मल्चिंग (आच्छादन) करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मल्चिंगचे महत्त्व समजावून देण्यात आले. यात दोन प्रकारचे म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे व प्लॅस्टिकचे (पॉलिमल्चिंग) आच्छादन शेतकऱ्यांनी वापरले.


सेंद्रिय आच्छादन


शेतातीलच गवत, काडी कचरा, बाजरीच्या बनग्या व अन्य प्रकारचा पालापाचोळा शेतकऱ्यांनी सेंद्रिय आच्छादन म्हणून वापरला. दुपारच्या वेळेस झाडाची सावली जमिनीवर जिथपर्यंत पडते तेथपर्यंतचा भाग आच्छादनाने झाकला. त्याखाली वाळवीसारख्या किडींचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून थोडे फोरेट टाकले. ठिबकवरच आच्छादन होते, त्यामुळे तेथे पडणारे पाणी हे जमीन व त्यालगतचे आच्छादन सतत ओले ठेवू लागले. जमीन थंडगार राहू लागली. झाडाच्या सर्व मुळ्यांना पुरेशी ओल मिळू लागली. पाऊस कमी असल्याने पाहिजे तेवढे गवत वा काडी कचरा उपलब्ध झाला नसला तरी शक्‍य तेवढे सेंद्रिय पदार्थ शेतकऱ्यांनी वापरले.


प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय


ज्यांच्याकडे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नव्हते अशांनी प्लॅस्टिक आच्छादनाचा पर्याय स्वीकारला. औरंगाबाद, जालना, नाशिक जिल्ह्यातून प्लॅस्टिक आणले. चार फूट रुंदी व 1300 फूट लांबी असलेले प्लॅस्टिकचे प्रत्येक बंडल होते. मोसंबीच्या जुन्या झाडांना आच्छादन करताना किमान दहा फूट रुंद व दहा फूट लांब असे चौकोनी प्लॅस्टिक आच्छादणे गरजेचे होते. मात्र, ठिबक असल्याने झाडाच्या दोन्ही बाजूस आच्छादन केले तरी त्याचा उपयोग होणार होता, त्यामुळे चार फुटांचा पट्टा दोन्ही बाजूस अंथरला. ठिबकची नळी आच्छादनाखाली येईल अशी काळजी घेतली.


मल्चिंगचे असे केले नियोजन


ठिबक सिंचन करताना झाडाच्या चार कोपऱ्यांत पाणी पडते. प्लॅस्टिक आच्छादन करण्यापूर्वी जेथे पाणी पडते, तेथे सहा बाय सहा इंच आकाराचा खड्डा घेऊन त्यात एक घमेले शेणखत भरले. ठिबकच्या मायक्रोट्यूबमधून पाणी पडेल अशा प्रकारे नळ्या अंथरूण घेतल्या. त्यावर चार बाय दहा फूट आकाराचा प्लॅस्टिक पेपर एका बाजूने अंथरला. प्लॅस्टिक उडून जाऊ नये म्हणून त्याच्या कडा चोहोबाजूने मातीने दाबून टाकल्या. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूनेही प्लॅस्टिक अंथरूण घेतले. शेणखत टाकल्यामुळे पाणी जास्त काळ धरून ठेवले जाते. ज्यांची मोसंबीची झाडे लहान आहेत, त्यांनी चार बाय दहा फूट आकाराचे प्लॅस्टिक संपूर्ण झाडाभोवती अंथरूण घेतले. 

प्लॅस्टिक पेपरची एक बाजू चंदेरी रंगाची (सिल्व्हर), तर एक बाजू काळी आहे. चंदेरी बाजू वरच्या दिशेने राहील अशा प्रकारे पेपर अंथरला. ही बाजू वरच्या दिशेने असल्याने सूर्यकिरणे परावर्तित होण्यास मदत होऊन प्लॅस्टिक कमी प्रमाणात तापते, त्यामुळे पाण्याची वाफ कमी प्रमाणात होते, त्यामुळे पाण्याची बचत होते. 

काहींनी आच्छादन करण्यापूर्वी एका विशिष्ट पॉलिमरचा वापर केला, त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची शक्ती चांगल्या प्रकारे आहे. पॉलिमरसाठी आलेला खर्च पाणी विकत आणण्यापेक्षा काही पट कमी होता.


झाडाची कळी खुलली


आच्छादनाचा परिणाम दृष्टिपथास येऊ लागला. झाडाच्या मुळ्यांभोवती सतत ओलावा टिकून राहू लागला. आठ दिवसांनी द्यावयाची पाण्याची पाळी पंधरा दिवसांनी देणे शक्‍य झाले. झाडाभोवतालची जमीन सतत वाफसा स्थितीत राहिल्यामुळे पांढऱ्या मुळींची वाढ झाली. आच्छादनाखाली सतत ओलावा राहिल्याने गांडुळांची संख्या वाढली. झाडाच्या पोषणास योग्य वातावरण निर्माण झाल्याने झाडाची कांती टवटवीत झाली.


पिकाचे सुयोग्य नियोजन


झाडावर बहर असला तर पाण्याची गरज जास्त असते. अशा वेळी तेवढे पाणी देणे शक्‍य नसल्याने फळे मर्यादित ठेवण्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण ठेवले. जास्तीच्या फांद्याही काढून झाडाची पाण्याची गरज कमी केली. झाडे जगवणे हेच महत्त्वाचे होते. मोसंबीला दर दिवशी सरासरी 80 ते 140 लिटर पाण्याची गरज असते; मात्र ठिबक सिंचनाद्वारे जास्तीत जास्त एक तासभर पाणी देता येऊ शकत असल्याने प्रति झाड आठ ते नऊ लिटर पाणी देण्यात आले.


डाळिंबासाठी प्लॅस्टिक पट्टा


डाळिंबाची झाडे मोसंबीच्या तुलनेत जवळ- जवळ असतात, फांद्या एकमेकांना भिडल्या जातात, त्यामुळे ज्या ठिकाणी डाळिंबाचे झाड येईल, तेवढ्या भागापुरते प्लॅस्टिक गोल कापून संपूर्ण गादीवाफाच प्लॅस्टिकने झाकून टाकला. डाळिंबाला प्रति झाड 20 ते 50 लिटर पाणी प्रति दिवस लागते. आच्छादनामुळे तीन दिवसांनंतर देण्यात येणारी पाण्याची पाळी आठ दिवसांनंतर देणे शक्‍य झाले. 

मोसंबी व डाळिंबाच्या झाडांना प्लॅस्टिक आच्छादन करण्यासाठी प्रति हेक्‍टरी 30 ते 35 हजार रुपये, तर अंथरण्यासाठी 4000 रु. खर्च आला. 
बळिराम काळे, भांबर्डा, 
मो. 9975817603 

तीन वर्षांची डाळिंबाची झाडे असून, एक वेळ उत्पादन घेतले आहे. 50 गुंठे क्षेत्रातून या वर्षी आठ टन उत्पादन मिळाले. प्लॅस्टिक मल्चिंगसाठी 20 हजार रु. खर्च आला. डाळिंबासाठी एक तास व शेवग्यासाठी अर्धा तास ठिबक चालविले. प्लॅस्टिक आच्छादनामुळे दर तीन दिवसांनी देत असलेले पाणी पाच दिवसांनंतर दिले तरी जमिनीत ओल पुरेशी राहिली. 
एकनाथ गवळी, सांजखेडा, मो. 9422309841 

मोसंबीची आठ वर्षांची झाडे असून, त्यासाठी पाणी विकत आणून द्यावे लागले. मोसंबीच्या दोन्ही बाजूला 19 x 4 फूट आकाराचे प्लॅस्टिक आच्छादन केले. त्यापूर्वी शेणखत टाकले. त्यामुळे मोसंबीखाली सतत ओलावा टिकून राहिला. पांढऱ्या मुळींची वाढ झाली. गांडुळांची संख्या वाढली. झाडे हिरवीगार झाली. 
गणेश ठोंबरे, सांजखेडा, मो. 9421400696 

मोसंबीची काही झाडे आठ वर्षांची, तर काही दोन वर्षांची आहेत. टॅंकरने पाणी विकत आणून झाडे जगविताना एका टॅंकरसाठी 1500 रु. खर्च येतो. एका वेळेस चार टॅंकर मागवावे लागतात. दुष्काळी परिस्थितीत हा खर्च परवडणारा नाही. विहिरीत कमी पाणी असून ते किती दिवस टिकेल याची शाश्‍वती नाही. अशा वेळेस प्लॅस्टिक आच्छादनाने थोडीशी आशा जागविली. 
रामराव तवार, सांजखेडा, मो. 9422808369 

अकरा वर्षांच्या मोसंबीच्या व एक वर्षाच्या डाळिंबाच्या बागेत प्लॅस्टिक मल्चिंग केले. त्यापूर्वी चार टॅंकर पाणी विकत आणून टाकावे लागायचे. नंतर दोनच टॅंकर पाणी प्रत्येक आठवड्याला विकत घ्यावे लागेल अशी वेळ आली. पाण्याची बचत झाल्याचे आढळले. 

दीपक जोशी, समन्वयक, जय जवान जय किसान शेतकरी मंडळ, देवगाव, तालुका पैठण 
75889331913
पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाने विविध प्रकारच्या आच्छादनांचा वापर मोसंबीसाठी करण्यास सुरवात केली. आतापर्यंत परिसरातील 25000 झाडांना आच्छादन केले. 

(लेखक औरंगाबाद कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक आहेत.)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate