অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महोत्सवांची पर्यायी बाजारपेठ

महोत्सवांची पर्यायी बाजारपेठ

साताऱ्यात सलग दुसऱ्या वर्षी भरवलेल्या तांदूळ महोत्सवाला अपेक्षेप्रमाणे जोरदार प्रतिसाद मिळाला. 2700 क्विंटल तांदळाची विक्री होऊन सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली. ग्राहकांपर्यंत तांदळाचे विविध स्थानिक वाण पोचले. पाठोपाठ कोल्हापुरातही असाच महोत्सव सुरू झाला आहे. पुण्यात ग्राहक पेठ तसेच काही व्यापारी तांदूळ महोत्सव घेत असतात. शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून दिला, तर मधली दलालांची साखळी दूर होऊन दोघांचाही फायदा होतो. दर्जेदार चविष्ट तांदूळ व तोही किफायतशीर भावात मिळतो आहे म्हटल्यावर अशा महोत्सवांत ग्राहकांची गर्दी न उसळली तरच नवल. हा थेट संपर्क सातत्याने सुरू राहिला तर उभयतांचा फायदा होणार आहे. अनेकांना लहानपणी खाल्लेला चविष्ट तांदूळ परत पाहायला आणि खायलाही मिळतो आहे याचाच मोठा आनंद झाला. काळीकुसळी, इंद्रायणी, मांजरवेल, पार्वती, कौसल्या, हंसा, दोडका, फुले राधा, कृष्णसाळ, मल्ली, सोनम, कोलम, कोळंबा, फुले समुद्री, घनसाळ, आंबेमोहोर, तामसाळ, चिमणसाळ असे असंख्य वाण उपलब्ध झाल्याने महोत्सवाला भेट देणारे नागरिक व विशेषतः गृहिणी हरखून गेल्या. सेंद्रिय तांदळाबरोबरच बाजारातून गायब झालेला हातसडीचा तांदूळही आकर्षण ठरला हे विशेष. हल्ली बाजारात अनेक प्रकारचा महागडा तांदूळ उपलब्ध आहे. किंमत भरमसाट असली तरी एकाही तांदळाला चव नाही, ही सार्वत्रिक तक्रार असते. त्या पार्श्‍वभूमीवर हा महोत्सव म्हणजे पर्वणीच ठरला. जुन्या वाणांची चव नागरिकांच्या जिभेवर रेंगाळणार असल्याने यापुढे या वाणांची मागणी वाढणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्या देशी वाणांचे उत्पादन घेण्यास चालना मिळणार आहे.
उपक्रमशील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साताऱ्यातील महोत्सवाच्या यशाचे श्रेय द्यावे लागेल. तांदळाच्या निवडीपासून ते प्रमाणीकरणापर्यंत अनेक प्रकारची काळजी घेऊन त्यांनी ज्या प्रकारे या महोत्सवाची आखणी केली, ती प्रशंसेस पात्र आहे. त्यांच्यासारखे धडपडणारे अधिकारी सर्वत्र असते, तर राज्यातील कृषी क्रांतीला निश्‍चितच एक नवा आयाम मिळाला असता. या महोत्सवापासून प्रेरणा घेऊन अन्यत्रही, किमान जिल्हा पातळीवर असे महोत्सव नक्कीच घेता येतील, शिवाय ते वर्षातून एकदा घेण्याऐवजी शहरी लोकांची गरज लक्षात घेऊन महिन्यातून घेता आले, तर त्याचाही मोठा उपयोग होईल आणि ते फक्त तांदळापुरते मर्यादित न ठेवता सर्वच धान्यपिके तसेच फळांसाठी घेता येतील. असे झाले, तर लोक महिन्याचा बाजार महोत्सवातूनच भरतील. त्यासाठी यंत्रणा उभी करणे हे सोपे काम नाही, त्यात अनंत अडचणी आहेत, त्या निवारण्यास कृषी खाते पुरे पडणार नाही. पणन खात्याने त्याची जबाबदारी उचलली पाहिजे. शेतकऱ्याचा आणि ग्राहकाचाही फायदा असणाऱ्या अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवणे, हेच विद्यमान शोषणकेंद्रित बाजार व्यवस्थेला उत्तर आहे, असे म्हणता येईल.

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate