অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न

माद्याळच्या शिवारात डोळा पद्धतीने आता एकरी सव्वाशे टन उसाचे उत्पन्न

डोळा पद्धतीने उसाची लागण करुन जैविक तसेच सेंद्रीय खतांच्या मात्रेद्वारे एकरी 125 मेट्रीक टन उसाचे उत्पन्न घेण्याची किमया कागल तालुक्यातील माद्याळ येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय मेतके यांनी करुन लाभदायी उसशेतीचा नवा मार्ग अन्य शेतकऱ्यासमोर ठेवला आहे.

शाश्वत ऊस उत्पन्न तंत्रज्ञान

गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात डोळा पद्धतीने उसाची रोपे लावून लागण केली. मात्र यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या शाश्वत ऊस उत्पन्न तंत्रज्ञान अभियानाचा अवलंब केला. या सुधारित ऊस लागवडीच्या पद्धतीनुसार एक डोळा पद्धतीने उसाची लागण करुन त्यांना सेंद्रीय खतांची 80 टक्के मात्रा दिली, तसेच या उसाला ठिबक संचाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात खऱ्या अर्थाने त्यांनी पुढाकार घेतला. नव्या पद्धतीच्या ऊस लागण पद्धतीनुसार त्यांनी सरीतील अंतर किमान 5 फुटांचे ठेवून शेतात को 86032 ह्या ऊस जातीच्या रोपांची डोळा पद्धतीने लागण केली. जमिनीचा आणि पाण्याचा सामू योग्य राहण्यासाठी वेळच्यावेळी जैविक खतांच्या मात्रा आणि शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीडनाशकांची फवारणी यासह अन्य शास्त्रीय उपाय योजनांमुळे कमी काळात भरघोस पीक घेण्याची विक्रमी वाटचाल सुरु केली.

डोळा पद्धतीने उसाची लागण केल्याने परंपरागत ऊस कांडी तयार करणे ती लावणे या पद्धतीत शेतकऱ्यांना होणारा आर्थिक आणि शरिरीक त्रास कमी होऊन कमी खर्चात, कमीत कमी मजुरीत आणि वाहतूक, भरणी व उतरणीच्या खर्चाला फाटा देऊन डोळा पद्धतीने शेतातच ऊस बेण्याची निर्मिती करण्याची नवी कला या पद्धतीने शेतकऱ्यांना लाभली आहे. या पद्धतीमुळे ऊस बेणे रोपवाटिकेत तयार होत असल्याने 30 ते 35 दिवस शेतीची मशागत करता येते शिवाय रोपवाटिकेत ऊस बेणे तयार होत असल्याने योग्य सूर्यप्रकाश, आवश्यक पाणी, सेंद्रीय खते मिळाल्याने रोपांची एकसारखी वाढही होते.

यासर्व प्रक्रियेमुळे उसबेण्याची एकाच छताखाली एकसारखी वाढ झाल्याने शेतात ही रोपे लावल्यानंतर मुळांची अन्नघटक घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे एकसमान वाढ होऊन वजनही वाढून समान वयाचा व समान रिकव्हरीचा उस शेतकऱ्यांना मिळतो. याच पद्धतीचा श्री.मेतके यांनी अवलंब केल्यामुळे त्यांच्या शेतात आजमितीस एका उसाला किमान 25 ते 30 पेरं तयार झाली असून या पेरातील अंतरही 7 ते 9 इंचाचे आहे. तसेच एका उसाला जवळपास 25 च्या आसपास फुटवे येतात, यातील उसाचे सरासरी वजन हे साडे तीन ते चार किलो इतके आले आहे.
डोळा पद्धतीने उसाची रोपे तयार करण्याच्या पद्धतीमध्ये एकरी 6 हजार रोपे तयार होतात, कृषी विभागामार्फत अशा रोपवाटिकांसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानही दिले जाते.

अशा पद्धतीच्या ऊस लागवडीमध्ये किमान 5 फुटाची सरी सोडणे गरजेचे आहे, तसेच एकरी 5 ट्रॉली शेणखताची फवारणीही तितकीच महत्वाची आहे. ट्रे पद्धतीच्या ऊस रोपांच्या निर्मितीमुळे रोपांची मर टाळता येते, उसाची पूर्वमशागत करतांना तागाची पीक घेऊन त्यांची उत्तम वाढ झाल्यानंतर ते रोटावेअरने जमिनी गाडल्याने जैविक तसेच सेंद्रीय जीवाणूद्वारे खतांची मात्रा मिळून उसाला मोठ्या प्रमाणावर फुटवे फुटण्यास मदत होते. याबरोबरच ऊस पट्यात वरणा, भाजीपाला पिके आंतर पीक म्हणून घेतल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्याबरोबरच जमिनीचा पोतही सुधारण्यास मदत होते. पिकामध्ये वापसा राहण्यासाठी ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी दिल्यास उसाची उत्तम वाढ होण्यास मदत होते. ठिबक सिंचन संचासाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध होते.

आज अनेक कारणांनी ऊस शेती अडचणीत येत आहे, अशा परिस्थितीत ऊस शेती लाभदायी करण्यासाठी कृषी विभागाने शाश्वत ऊस उत्पन्न तंत्रज्ञान विकसित केले असून याद्वारे घटत चाललेली उत्पादकता वाढविण्याबरोबरच वाढत चालेलेला उत्पादन खर्च कमी करण्याचे गणित या नव्या पद्धतीने शेतकऱ्यासमोर मांडले आहे. यापद्धतीमध्ये प्रामुख्याने रोपाद्वारे ऊस लागवडीवर भर दिला आहे. यासाठी सर्वसाधारण पणे काही मूलभूत तंत्रांचा या पद्धतीत वापर करणे गरजेचे आहे. यामध्ये जमिनीत हिरवळीच्या खतांचा सर्वार्थाने वापर करणे, पट्टा पद्धतीचा उस लागणीसाठी वापरही तितकाच महत्वाचा आहे. आंतरपीक घेणे, बेणे मळ्याचा वापर करुन प्रमाणित बियाणे तयार करणे, माती व पाणी परीक्षण, सेंद्रीय तसेच जैविक खतांच्या वापरावर भर देणे या बाबींचा समावेश गरजेचा आहे.

डोळा पद्धतीच्या ऊस लागवड पद्धतीमध्ये रोपवाटिकेत बड चीप (एक डोळा) पद्धतीने पॉली ट्रेमध्ये रोपे तयार करणे, 25 ते 35 दिवस वयांच्या रोपांची पुनर्लागवड. 30 ते 45 दिवस पर्यंत पुन: लागण करणे शक्य. मुख्य शेतात 5x6 ते 9x2 फुट या रुंद अंतरावर/ पट्टा पद्धतीने/ जोड ओळ पुनर्लागवड. पाण्याची पर्यायाने विजेची बचत होते. दोन भांगलणीचा खर्चाची बचत होते. पिकाच्या वाढीच्या संपूर्ण अवस्थेत मुळाभोवती वाफसा राहील अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन. सेंद्रिय पद्धतीच्या खत, एकात्मिक पीक संरक्षण (कीड रोग, तणे नियंत्रण) तसेच आंतरमशागतीय पद्धतीला उत्तेजन. नैसर्गिक साधनसामग्रीचा पुरेपूर व किफायतशीर वापर होण्याच्या दृष्टीने आंतरपीक घेणे. या सिद्धांतांचा जेव्हा सुसंगत वापर होईल, तेव्हा निविष्ठांच्या वापरातही बचत होऊन उत्पादन वाढ आणि जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत होईल.

शाश्वत ऊस उत्पादकता तंत्रज्ञान पद्धतीमध्ये बेण्यावरील खर्च पारंपरिक ऊस उत्पादन पद्धतीपेक्षा निश्चितच कमी असल्याचे सांगून दत्तात्रय मेतके म्हणाले की, या नव्या पद्धतीमुळे आपल्याच शेतात अधिकाधिक रोपांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. रोपवाटिकामधून रोपे तयार करण्याच्या पद्धतीमुळे आठवड्याभरात अधिकाधिक उगवण मिळते. यामुळे बेणे वापरात बचत होऊन एकेरी निरोगी रोपांची संख्या जास्त ठेवता येते. पॉलीट्रेमध्ये रोपे तयार केल्याने पुनर्लागवडीसाठी लहान रोपांची वाहतूक सुलभ होते. रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ होतात. भरणी केल्यामुळे पिकांच्या मुळांना आधार मिळतो. पीक लोळत नाही. आच्छादनाचा वापर केल्याने तणांवर जैविक पद्धतीने नियंत्रण ठेवता येते.

जमिनीतील आर्द्रता टिकवता येते. रासायनिक व सेंद्रीय खतांचा संतुलित वापर केल्याने केवळ पिकालाच नव्हे तर जमिनीलाही फायदा होतो. गाळप योग्य उसांची संख्या जास्त मिळते. प्रत्येक उसाचे वजन व प्रतवारी वाढते. सेंद्रीय खतांच्या योग्य वापराने अन्नद्रव्ये घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होते. हवा व सूर्यप्रकाश यांची अधिकाधिक उपलब्धता होत असल्याने रोपे पुन: लागवडीपर्यंत एक ते दीड महिना उसाचे शेत मशागतीसाठी किंवा कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते. आंतरपिकांतून अतिरिक्त उत्पादन्नात वाढ होते. लागवड खर्च आणि मजूरसंख्येत 20 ते 30 टक्के तर पाणी वापरात 40 ते 70 टक्के बचत होते.

पाणी व रासायनिक खतांचा अमर्याद वापर, एकाच जमिनीमध्ये वारंवार घेण्यात येणारे ऊसपीक, जास्तीत जास्त खेाडवा घेण्याकडे असलेला कल यासारख्या प्रमुख कारणामुळे उसाची हेक्टरी उत्पादकता कमी होत चालली आहे. उसाखालील जमिनी खराब होत आहेत. आता मात्र पट्टा पद्धतीचा अवलंब, सूक्ष्म सिंचनाचा अवलंब, द्विदलवर्णीय फेरपालट, माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ. बाबींसह ऊस संवर्धन तंत्रज्ञानाने विकसित केलेली उत्कृष्ट जातीची रोपे उस बेणे मळा, रोपाद्वारे ऊस लागवड करुन उसाची उत्पादकता वाढविणे शक्य असल्याचे मतही माद्याळचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय मेतके यांनी व्यक्त केले.

लेखक - एस.आर.माने, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.

स्त्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate