অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माळरानावर गुलछडीचा सुगंध

दुष्काळातही ठिबक सिंचनाद्वारे आदर्श पाणी व पीक व्यवस्थापन केल्याने सोनवडी सुपे (जि. पुणे) येथील कुंडलिक नानासाहेब मोरे यांनी निशिगंध (गुलछडी) पिकातून चांगले उत्पादन मिळवले आहे. घरचे सदस्यच शेतात राबल्याने मजूर समस्या कमी होण्यास मदत झाली आहे.
सोनवडी सुपे (ता. बारामती, जि. पुणे) येथील कुंडलिक मोरे यांच्याकडे वडिलोपार्जित सोळा एकर शेती आहे. त्यापैकी पाच एकर क्षेत्र पठारी व माळरान असल्याने ती पडीक होती. सन 2007 ला त्यांनी त्या जमिनीची मशागत करून घेतली. तिथे सिंचनासाठी विहीर खोदली. विहिरीला पाणीही चांगले लागले. त्यांची प्रकाश व मिनिनाथ ही दोन मुले आपापला व्यवसाय सांभाळून शेतीकडेही लक्ष देतात. मुलांच्या मदतीने मोरे यांनी रेशीम शेती सुरू केली. त्याचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने केल्याने त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळत आहे. तसेच या क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रावर लिंबाची बाग लावली आहे. इतर क्षेत्रामध्ये कोरडवाहू पद्धतीने पावसावर आधारित ज्वारी, बाजरी, गहू आदी हंगामी पिके ते घेतात. विहिरीचे पाणी उन्हाळ्यात कमी पडत असल्याने त्यांनी शेतात 350 फूट बोअर घेतले. बोअर व विहिरीच्या पाण्यावर पिकांचे नियोजन केले. 

गुलछडी हे मोरे यांचे सध्या महत्त्वाचे पीक झाले आहे. या शेतीविषयी

  • गेल्या दहा वर्षांपासून मोरे गुलछडीची शेती करत आहेत.
  • पाच गुंठ्यांपासून क्षेत्र वाढवत 2011 मध्ये 30 गुंठे क्षेत्रावर लागवड केली.
  • एकदा लागवड केल्यानंतर हे पीक सुमारे तीन वर्षे उत्पादन देते.
  • दर तीन वर्षांनंतर जमिनीची फेरपालट करावी लागते.
  • जमीन बदलताना वाढलेले वा उपलब्ध झालेले बियाणे इतर शेतकऱ्यांना विकले जाते. त्याला प्रति पोते पाचशे रुपये मिळतात. एका पोत्यामध्ये साधारणतः एक हजार ते बाराशे कंद बसतात. एकूणच गुलछडीतून बारामाही फुलांचे उत्पादन मिळत असल्याने या पिकाची प्रेरणा अन्य शेतकऱ्यांना मिळाली आहे.

घरातील सर्वजण शेतीत राबतात

गुलछडीची काढणी दररोज पहाटे साडेपाच ते साडेसात या कालावधीमध्ये केली जाते. सरासरी रोज 15 ते 20 किलो फुले निघतात. आता पावसाच्या वातावरणामुळे फुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या सुमारे 35 किलो फुले निघत आहेत. साधारण शेतातील मालाच्या प्रमाणानुसार फुलांच्या काढणीसाठी तीन ते सहा लोक लागतात. मोरे यांच्या दोन्ही मुलांची कुटुंबे एकत्रित असल्यामुळे हे काम घरातील माणसांच्या साह्याने केले जाते. 

लागवडीत सुधारणा...

  • गुलछडी गेल्या दहा वर्षांपासून करत असल्याने त्यातील प्रत्येक अडचणीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
  • या आधी गादीवाफ्यावर तीन ते चार ओळी लावल्या जात असत. त्यात आता बदल केला आहे. गुलछडी कंदाची एक ओळ सरीवर लावली जात असून, दोन सरींतील अंतर दोन फूट ठेवले जाते. दोन कंदांतील अंतर हे 10 इंच ते एक फूट ठेवले जाते. कमी वेळ चालवूनही ठिबकचे पाणी योग्य प्रमाणात प्रत्येक रोपांपर्यंत पोचते. त्यामुळे अधिक पाण्यामुळे होणाऱ्या मर समस्येचे प्रमाण कमी होते. तोडणीचे कामही सुलभ होते.
  • शेणखत व सेंद्रिय खतांचे प्रमाण अधिक ठेवल्याने रोपांचे आरोग्य चांगले राहते. आता त्यांची उंची चार फुटांपर्यंत झाली आहे. फुले तोडणीचे काम न वाकता अगदी सहजपणे करता येते.
  • फुले काढणीसाठी गळ्यामध्ये अडकविण्याच्या पिशव्या तयार करून घेतल्या आहेत. त्यामुळे दोन्ही हात रिकामे राहतात. दोन्ही हातांनी फुले तोडणी केली जात असल्याने फुलांचा गोंडा मोडत नाही. नुकसान टळते.

खत व्यवस्थापन...

मोरे यांच्याकडे जर्सी गाई व खिलारी बैल आहेत. दुभत्या जनावरांपासून दुधाबरोबर शेणखत मिळते. शेणखत शेतीला दिले जाते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे. 
दर सहा महिन्याला गुलछडीला 10:26:26 व युरिया खत दिले जाते. त्यासाठी प्रति वर्ष चार हजार 600 रुपयांपर्यंत खर्च होतो. गरजेनुसार कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी घेतली जाते.

गुलछडी पुण्याच्या बाजारात...

परिसरात अनेक शेतकऱ्यांनी पाण्याच्या नियोजनानुसार गुलछडी शेती केली आहे. सर्वांची फुले पुणे येथील फुलबाजारात पाठविण्यासाठी टेंपोची व्यवस्था आहे. दररोज सकाळी साडेसात वाजता फुलांचा टेंपो पुण्याला जातो. फुलांचे पैसे दर आठवड्याला मिळतात. त्यामुळे अनेकांचे आठवडा बाजाराचे नियोजन फुलांच्या पैशावर होते. मात्र यंदा दुष्काळातील पाणीटंचाईमुळे अनेकांची गुलछडी जळून गेली आहे. 

फुलांचा हंगाम...

प्रत्येक महिन्यातील सण, गणपती उत्सव, दसरा-दिवाळी, तसेच खास करून लग्नसराईमध्ये गुलछडी फुलांना मोठी मागणी असते. वर्षात उन्हाळ्यात व दिवाळीत लग्नसराईचा हंगाम असतो. अशावेळी गुलछडीला प्रति किलो दीडशे ते अडीचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. अन्य कालावधीत 15 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत मालाची आवक आणि मागणीनुसार दर मिळतो. वर्षाला तो सरासरी 25 रुपये राहतो. 

गुलछडी पिकाचा ताळेबंद

  • सन 2011 मध्ये मोरे यांनी 30 गुंठ्यांवर लागवड केली. त्यापासून पहिल्या वर्षी 2.5 टन फुलांचे उत्पादन मिळाले. त्याला प्रति किलो 20 रुपये सरासरी दर मिळाला. त्यापासून पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळाले.
  • 2012 मध्ये जानेवारी ते ऑक्‍टोबर या काळात सुमारे 3.5 टन उत्पादन मिळाले. सरासरी 25 रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यापासून 87 हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळाले.
  • सन 2012 च्या ऑक्‍टोबर ते यंदाच्या मेपर्यंतच्या काळात तीन टन उत्पादन मिळाले. 27 रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यापासून सुमारे 81 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
  • बियाणे (कंद) हे घरचेच वापरल्याने त्यावरील खर्च वाचला. बाजारभावाप्रमाणे त्याचा खर्च 1500 रुपये होतो.
  • सेंद्रिय खतही घरचे आहे.
  • रासायनिक खते 30 गुंठ्यांसाठी प्रति वर्ष सुमारे पाच हजार रुपयांची लागतात. कीड व रोगांसाठी फवारणीचा खर्च पाच हजार रुपये होतो.
  • काढणीसाठी मनुष्यबळ अधिक लागते. मात्र घरातील माणसे या कामामध्ये मदत करतात.

शेतातील खर्च ...

2007 मध्ये शेतीमध्ये विहीर पाडणे, बोअर घेणे, शेतीपंप, जलवाहिन्या, ठिबक, जमिनीचे सपाटीकरण यांची कामे केली आहेत. त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च झाले. शेतीची मशागत घरच्या बैलांच्या साह्याने स्वतः करत असल्याने मशागतीचा खर्च वाचतो. आजपर्यंत त्यांना तुती-रेशीम शेतीतून सुमारे चार लाख रुपये मिळाले आहेत. गुलछडीतील उत्पन्ना व्यतिरिक्त अन्य हंगामी पिकांतून दोन लाख रुपये मिळाले आहेत.

"ऍग्रोवन'चे मार्गदर्शन...

मोरे यांचा मुलगा मिनिनाथ यांचे बारामतीत कपडे शिलाईचे (टेलरिंग) दुकान आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून "ऍगोवन'चे वाचक आहेत. यात प्रसिद्ध झालेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथा, तज्ज्ञांचे लेख वाचून त्याची कात्रणे ते संग्रही ठेवतात. प्रसंगी प्रसिद्ध झालेल्या संपर्क क्रमांकावरून माहिती घेतात. घरातील लोकांना सायंकाळी एकत्रित जेवण करतेवेळी ही माहिती "शेअर' करतात. त्याप्रमाणे घरातील मंडळींना नियोजन करणे सोपे होते. 

(मिनिनाथ कुंडलिक मोरे, मो. 9860627518)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate