অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माळरानावर फुलली शेवंती

नगर जिल्ह्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी दुष्काळी परिस्थिती ओळखून रोपनिर्मिती करून शेवंतीची पुनर्लागवड केली. योग्य व्यवस्थापनातून शेवंती चांगली बहरली. उत्तम दर्जा राखल्याने दरही चांगला मिळाला. दुष्काळात हे पीक चांगला दिलासा देणारे ठरले.
माळरानावर फुलली शेवंतीनगर जिल्ह्यातील दुष्काळी पारनेर तालुक्‍यात फुलशेतीचे कायम उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या दोन-चार वर्षांपासूून या भागाला पाणीटंचाईची किंवा अवर्षणाची झळ बसू लागली आहे. त्यामुळे कमी पाण्यात नियोजन करत फुलशेतीतून प्रगती साधण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत.

पारंपरिक पद्धतीने फुलशेती न करता सुधारित तंत्रज्ञानाचा आधार घेत व ठिबक सिंचनाची जोड ते देऊ लागले आहेत. तालुक्‍यातील हंगा गाव परिसरात फुलांची लागवड साधारण मार्च-एप्रिल महिन्यात केली जाते. या काळात लागवड केलेली फुले मार्केटमध्ये दसऱ्याच्या सुमारास विक्रीस येतात. त्या वेळी दरही चांगले मिळतात. यंदाच्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील नितीन साठे यांना एप्रिल-मेचा हंगाम साधता आला नाही. पाणी नव्हते, मात्र शेवंतीची लागवड मात्र करायची होती. त्यासाठी त्यांनी एप्रिल-मेचा कालावधी रोपे तयार करण्यासाठी वापरण्याचे ठरवले. माळरानावरील हलक्‍या प्रतीच्या 28 गुंठे जमिनीवर शेवंतीची लागवड करण्याचे नियोजन केले. साठे यांचे गावात खतविक्रीचे दुकान आहे. ते सांभाळताना शेतीकडे मात्र ते दुर्लक्ष करीत नाहीत.

लागवडीचे असे केले नियोजन

साठे यांनी पावसाळ्याच्या सुरवातीला जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या गावरान राजा या नावाने लोकप्रिय शेवंती वाणाची लागवड केली. त्याआधी नांगरट, मशागत करून घेतली. दोन फूट रुंदीचे व अर्धा फूट उंचीचे गादीवाफे तयार केले. लागवडीपूर्वी शेवंतीची रोपे तयार करण्यासाठी पॉली ट्रेचा वापर केला. रोग-किडींचा प्रादुर्भाव नसलेल्या चांगल्या प्रतीच्या शेवंतीच्या पाच इंच लांबीच्या काशा (सकर्स) वापरून कार्बेन्डॅझिम बुरशीनाशकाच्या द्रावणात त्यांची प्रक्रिया केली. त्यानंतर ट्रेमधील कप्प्यात गांडूळ खत, माती, निंबोळी अर्क, बोनमील एकत्र करून त्यात लावण्यात आल्या. रोपांची उगवण झाल्यानंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये  यासाठी डायमिथोएट कीटकनाशकाचा वापर केला. सुमारे दीड महिन्यात पुनर्लागवडीला आलेल्या रोपांची साडेतीन बाय सव्वा फूट अंतरावर लागवड केली. लागवडीआधीच ठिंबक सिंचनाच्या नळ्या अंथरल्याने योग्य जागी रोपांची लागवड करता आली. अठ्ठावीस गुंठे क्षेत्रात सुमारे सात हजार झाडे लावली. झाडांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी निवडलेले अंतर लक्षात घेऊनच लागवड केल्याने झाडांची वाढ झाल्यावर दाटी झाली नाही.

खत व पाण्याचे नियोजन

खतांचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे समजून लागवडीच्या वेळी 10-26-26, निंबोळी पेंड यांचा वापर केला. सुमारे एक महिन्यानंतर 19-19-19 खत व ह्युमिक ऍसिड यांचा वापर केला. झाडांना कळ्या लागताना 0-52-34 हे खत ठिबक सिंचनाद्वारा दिले. त्यामुळे कळ्यांची वाढ समतोल व वेळेत होण्याला मदत झाली. लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने दोनदा खुरपणी केली. चार दिवसांच्या अंतराने चार तास पाणी पाळ्या दिल्या. कळ्या लागल्यावर दोन दिवसांचे अंतर ठेवून पाणी दिले. ठिबकचा वापर केल्याने दर वेळेच्या तुलनेत पन्नास टक्केही पाणी लागले नसल्याचा साठे यांचा अनुभव आहे.

रोग-कीड व्यवस्थापन

पिकाच्या वाढीच्या सुरवातीपासूनच रोग-किडींचे नियंत्रण- व्यवस्थापन करण्यावर भर दिला. शेवंतीवरील मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग केले. त्यानंतरही अन्य दोन बुरशीनाशकांच्या ठराविक अंतराने फवारण्या केल्या. किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्‍लोरपायरीफॉस कीटकनाशकाचे झाडांच्या मुळाशी ड्रेंचिंग केले. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएटची फवारणी केली.

तोडणी ते विक्री

लागवडीनंतर साधारण पाच महिन्यांनी दसऱ्याच्या काळात फुलांची पहिली तोडणी केली. दसरा ते दिवाळी या काळातील साधारण पंधरा दिवसांत साधारण दीड टन फुलांची तोडणी झाली. तोडणी जिकिरीची असल्याने दिवसाकाठी प्रति मजूर साधारण 30 ते 35 किलो फुले तोडतात. तोडणी झालेल्या फुलांचे 23 किलोप्रमाणे करंड्या पॅकिंग करून घेतले. फुले ताजी व मोकळी राहावीत यासाठी कागदाचा वापर केला. फुलांचा आकार एकसमान व दर्जा चांगला असल्याने नगरसह मुंबई (दादर) बाजारपेठेत मागणी अधिक राहिली.

पिकाचा ताळेबंद थोडक्‍यात असा राहिला

दिवाळीपर्यत साठे यांचा शेवंती प्लॉट संपला. एकूण कालावधीत 28 गुंठे क्षेत्रात सुमारे दोन टन व 200 किलोंपर्यंत फुलांची विक्री केली. किमान दर 80 रुपये तर कमाल दर 125 रुपये मिळाला. सरासरी 100 रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एक लाख दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला

खर्च थोडक्‍यात असा (रुपयांमध्ये)

  • शेत तयार करणे (नांगरट व पाळी) - 2000
  • रोपे तयार करणे व लागवड - 21,000
  • खते - 4000
  • फवारणी - 3000
  • तोडणी व पॅकिंग मजुरी - 14,000
  • वाहन भाडे, हमाली - 7000
  • विक्री कमिशन (पंधरा टक्के) - 34,000
  • पाणी व्यवस्थापन - 5000

शेवंती मार्केटबाबत साठे म्हणतात...

मार्केटचा अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन केल्यास फायदा होऊ शकतो. यंदा दुष्काळामुळे उन्हाळ्यात लागवड शक्‍य नव्हती. त्यामुळे लागवड लेट म्हणजे पावसाळ्यात केली. मात्र रोपे उपलब्ध पाण्यावर आधीच करून घेतली. 
यंदा दसऱ्यात पावसामुळे अनेकांची फुले भिजून नुकसान झाले. दर घसरले. माझी लागवड लेट असल्याने दसऱ्याच्या वेळी नुकसानीची जोखीम टळली. पुढे पाडव्यावेळी फुले सुरू झाली, दरही चांगला मिळाला. 
शेवंतीला पाणी कमी लागते. ठराविक वाढीनंतर दर आठ दिवसांनी अर्धा तास मोटर सुरू ठेवून ठिबकने पाणी दिले तरी चालते. घेतलेले वाण देशी असून, त्याची टिकवणक्षमता चांगली आहे.
यंदा रोपनिर्मितीमुळे खर्च जास्त आला असला तरी दर वर्षी तो तुलनेने कमी असतो. सणासुदीला शेवंतीला दरही चांगले मिळतात. या पिकासोबत ऍस्टरही 25 गुंठ्यांत होते. त्यालाही किलोला 60 ते 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. ही दोन्ही फुलपिके किफायतशीर आहेत, असा अनुभव आहे. 
"ऍग्रोवन'मधील तांत्रिक लेख, यशकथा कायम मार्गदर्शक ठरतात, असेही साठे म्हणाले.

साठे यांच्या फुलशेती नियोजनातील काही बाबी

  • उन्हाळ्यात थेट शेतात लागवड करण्याएवजी रोपे तयार करून पावसाळ्याच्या सुरवातीला लागवड केली तर रोपांची मर होत नाही. उत्पादन चांगल्या प्रमाणात येते.
  • ठिबक सिंचनाद्वारा पाणी दिल्याने कमी पाण्यात उत्पादन तर घेता येतेच; पण खते थेट मुळांना पोचून झाडांची, कळ्यांची वाढ सम प्रमाणात व लवकर होण्याला मदत होते.
  • फुलशेतीसाठी गादीवाफा पद्धतीचा वापर केला तर रोपांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही अपेक्षित वाढ होते.

 

संपर्क : नितीन साठे - 9404071660

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate