অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजगिऱ्याचे 19 क्विंटल उत्पादन

जालना जिल्ह्यातील नेर येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद लालचंद बजाज आपल्या संयुक्त कुटुंबाच्या सुमारे सव्वादोनशे एकरांतील शेतीचे व्यवस्थापन पाहतात. त्यांनी मागील वर्षी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राजगिरा हे मुख्य व स्वतंत्र पीक म्हणून घेण्याचा प्रयोग केला. त्यांना तीन एकरांत 19 क्विंटल उत्पादन मिळाले. राजगिऱ्याचे महत्त्व, त्याचे दर व पिकाचा देखभाल खर्च यांचा विचार करता हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते, हे या प्रयोगातून दिसले आहे.

काही पिकांत बदलत्या वातावरणात उत्पादन देण्याची क्षमता असते. त्यातील एकच पीक म्हणजे राजगिरा.   राजगिरा पिकात औषधी गुणधर्म आहेत. उपवासाच्या काळात राजगिऱ्यावर आधारित चिक्की, लाडू आदी पदार्थांना मागणी असते. बाजारपेठेत वाढणारी मागणी आणि चांगले मिळणारे दर यामुळे प्रमुख पीक बनण्याची या पिकाची क्षमता आहे.
नेर, ता. जि. जालना येथील प्रगतिशील शेतकरी शिवप्रसाद लालचंद बजाज यांनी मागील वर्षी मुख्य पीक म्हणून "राजगिरा' पीक घेण्याचा प्रयोग केला. वास्तविक हे पीक सर्वत्र मिश्र पीक अथवा आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात घेतले जाते. मात्र बजाज यांनी बाजारपेठेचा अभ्यास करता स्वतंत्र क्षेत्रात हे पीक घेण्याचे नियोजन केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ऍग्रोवनमध्ये राजगिरा पिकाविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरू शकते असे त्यात म्हटले होते. त्यामुळेच हा प्रयोग करण्याचे त्यांच्या मनात आले. या विद्यापीठातर्फे राजगिरा पिकाची "फुले कार्तिकी' हा वाण 2005 मध्ये प्रसारित करण्यात आला आहे. त्याची उत्पादनक्षमता 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्‍टर आहे. बजाज यांनी विद्यापीठाच्या "जेनेटिक्‍स व प्लांट ब्रिडिंग' या विभागातून त्याचे बियाणे उपलब्ध करून घेतले. किलोला 55 रुपये या दराने ते त्यांनी खरेदी केले.

असा राबवला राजगिऱ्याचा प्रयोग

मागील रब्बी हंगामात सुमारे तीन एकरांवर पेरणी केली. तीन एकरांसाठी सुमारे दोन किलो बियाणे वापरले.
लागवडी व्यवस्थापनातील मुख्य बाबी अशा होत्या-

  • पेरणीची वेळ - 20 ऑक्‍टोबर
  • जमिनीचा प्रकार - मध्यम जमीन
  • खते - 12-32-16 - 2 बॅग, सर्व खत पेरणीच्या वेळेस देण्यात आले.
  • पेरणी झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करण्यात आली. त्यामुळे झाडांची योग्य संख्या राखून दोन रोपांतील अंतर योग्य राखले गेले. रोपांची वाढ व्यवस्थित झाली. त्याचा फायदा पुढे चांगले उत्पादन मिळण्यात झाला.
  • विरळणीनंतर पाण्याची पाळी देऊन त्याबरोबर युरियाची एक बॅग पिकास देण्यात आली.
  • पेरणी केल्यानंतर स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले. एकूण पाच पाणी सुमारे पंधरा दिवसांच्या अंतराने ठराविक वेळेनंतर देण्यात आले.

काढणीचे नियोजन

राजगिरा पीक सुमारे तीन महिन्यांत तयार होते. 20 जानेवारीच्या सुमारास पीक काढणीस तयार झाले. या वेळी पक्व झालेल्या तुऱ्यांची सोंगणी करण्यात आली. दोन दिवस या तुऱ्यांना कडक ऊन देण्यात आले. यानंतर छोट्या ट्रॅक्‍टरद्वारा (पॉवर टिलर) तुऱ्यांची मळणी करण्यात आली. आलेले उत्पादनाची उफणणी करून धान्य तयार करण्यात आले.

राजगिरा पिकाचा ताळेबंद

मिळालेले उत्पादन - तीन एकरांत 19 क्विंटल (एकरी 6.3 क्विंटल)

आलेला उत्पादन खर्च (रुपये) (तीन एकर क्षेत्रातील)

बियाणे - 110 (रु. 55 प्रति किलो)
पेरणी - 1500
खते - 2550
विरळणी - 1000
खुरपणी - 1000
खोडणी व खळे - 33, 500
इतर मजुरी - 3000
एकूण खर्च - 42,660 रुपये (एकरी 14,220 रु.)
सध्या राजगिऱ्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहे. मागील वर्षी तो दहा हजार रुपयांपर्यंत होता, असे बजाज यांनी सांगितले. त्यामुळे अजून चांगल्या दराची प्रतीक्षा असल्याने राजगिऱ्याची विक्री केलेली नाही.
30 किलो गोण्यांमध्ये त्याचे पॅकिंग करून ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात त्याला अजून चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा आहे. अर्थशास्त्रच तपासायचे तर मिळालेले एकरी उत्पादन सहा क्विंटल व दर सहा हजार रुपये धरला, तर 36 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. त्यातून खर्च वजा जाता एकरी 21 हजार 780 रुपये नफा हाती राहू शकतो. हाच नफा तीन एकरांत 65,340 रुपये याप्रमाणे मिळेल. उत्पादन वाढल्यास व दरही वाढल्यास नफ्याचे प्रमाण अजून वाढू शकते. बजाज यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक (वनस्पतिशास्त्र विभाग) डॉ. नंदकुमार कुटे यांचे मार्गदर्शन या प्रयोगाला लाभले. पुढील वर्षी राजगिऱ्याखालील क्षेत्र अजून वाढवण्याचा, तसेच राजगिऱ्याचे विविध पदार्थ बनवण्याचा मानस आहे. यासाठी त्यांचा नातू हेमंत यांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

अन्य पिकांतही प्रयोगशीलता

शिवप्रसाद यांचे मोठे बंधू रामेश्‍वर बजाज कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी आहेत. त्यांच्यासह रामरतन व प्रदीपकुमार या भावांचादेखील त्यांना पाठबळ असते. बजाज बंधूंचे मिळून एकूण सुमारे 225 एकर क्षेत्र आहे. त्यात मोसंबी, डाळिंब, केशर आंबा ही फळपिके आहेत. सुमारे शंभर एकर क्षेत्र फळपिकांखाली आहे. हळद, गहू, कापूस, सोयाबीन आदी नेहमीची पिके त्यांच्याकडे असतातच. संपूर्ण शेतीचे व्यवस्थापन शिवप्रसाद यांच्याकडेच आहे. त्यांच्याकडे ठिबक क्षेत्र दीडशे एकरांवर आहे. कांदा बीजोत्पादन 10 एकरांवर केले जाते. दर वर्षी एकरी अडीच क्विंटल ते तीन-चार क्विंटलच्या दरम्यान ते त्याचे उत्पादन घेतात. यंदा मात्र हवामानामुळे उत्पादन घटणार असल्याचे ते म्हणाले. क्विंटलला पन्नास हजार रुपयांपर्यंतही दर बियाण्याला मिळाला असल्याचे शिवप्रसाद म्हणाले. यंदा पाच एकरांवर हळद आहे. एक बहुपीक पेरणी यंत्र आहे. दोन मोठे व दोन छोटे ट्रॅक्‍टर आहेत. सुमारे 25 मजूर कायम कामाला असतात. अलीकडील वर्षांत 10 एकरांवर मिरचीचा प्रयोगही त्यांनी केला. अलीकडील काळात मात्र पावसाचे घटलेले प्रमाण, मजूरबळ यांचा परिणाम होऊन त्यांनी हे क्षेत्र कमी केले आहे.

राजगिरा पिकाविषयी

राजगिऱ्याचे पीक हे कमी कालावधीत, कमी पाण्यावर येणारे आहे. तसेच ते कमी देखरेखीचे आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन घेण्याची संधी त्यातून आहे. या पिकात अधिक प्रथिने (15 ते 19 टक्के) आहेत. त्यात लायसिन (6.2 ग्रॅम प्रति 16 ग्रॅम नायट्रोजन) हे अत्यावश्‍यक अमिनो ऍसिडही भरपूर प्रमाणात आहे, तसेच बीटा कॅरोटिन व लोह यांचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे राजगिऱ्याचा आहारात वापर केल्यास अ जीवनसत्त्वाची कमतरता भरून येण्यास मदत होते. राजगिऱ्यात फॉलिक ऍसिडचे प्रमाणही जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. राजगिऱ्यातील असे पौष्टिक गुणधर्म पाहता त्याची मागणी वाढण्यास संधी आहे.

संपर्क - शिवप्रसाद बजाज - 8237177999
नेर, ता. जि. जालना
डॉ. नंदकुमार कुटे - 75888513398
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate