অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोगरा फुलला

मोगरा फुलला

फळबागायतीच्या ज्ञानाचा अनुभव

आदिवासी भागात शेती करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आदिवासी परिसरात प्रयत्नातील मोगरा फुलविल्याचे काम ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील ओंदे जवळ वाकुडपाडा या इथल्या कैलास मेहता यांनी केली आहे. दोनदा शेती प्रयोग आर्थिक व इतर कारणांमुळे फसला. शेती उद्योगाची पुन्हा आस बाळगून सेंद्रीय शेती आत्मसात करत फळबागायतीच्या ज्ञानाचा अनुभवही इथल्या शेतकरीवर्गाला वाटत आहेत. त्यांच्या या बागायती शेतीस महान्यूज माध्यमातून प्रत्यक्ष भेट देण्यात आली यावर त्यांनी आपल्या जडघडणीचा आलेख अधोरेखीत केला.

खरंतर, मुंबईत जन्मलेले कैलास शामदास मेहता हे एल्फिस्टन कॉलेजात त्यांनी सोशल सायन्स व लॉ केले. कॉलेज करत असताना ते मार्केटिंग एक्झिक्युटीव्हचे काम करीत असत. टेक्स्टाईल्स मशिन पासून ते प्रिंटेड पॅकेजची काम करत होते. यात त्यांना प्रवास भत्त्यासह दोन हजार पाचशे रूपये मिळत. ही नोकरी त्यांनी सात वर्ष केली. अंगी असलेले मार्केटिंगमधील ज्ञान शेतीव्यवसायात कामी येईल, काही तरी शेतीत करावं म्हणून त्यांच्या दोन मित्रांसह त्यांनी माले इथे 25 एकर जमीन घेतली. त्यात त्यांनी शेळीपालन सुरू केले. राजस्थान व सौराष्ट्र येथून जमनापारी व बाबरी क्रॉस या जातीच्या शेळींचे पालन सुरू केले. त्या जोडीला त्यांनी फळ बागायत व कुक्कुटपालन सुरू केले. मात्र हा व्यवसाय आर्थिक घडी विस्कटल्याने मोडीत निघाला. तरीही ते डगमगले नाहीत.

मोगऱ्‍याचे आंतरपिक

बऱ्‍याच कालखंडानंतर त्यांनी शेतीत काही करावं, आपला अनुभव इतरांना वाटावा या हेतूने ते पुन्हा उमेदीने शेती व्यवसायाकडे वळले. सेंद्रिय शेतीत अधिक प्रमाण ठेवून ते ओंदे येथे अकरा एकरात काजू -1200 झाडे, साग-500 झाडे, सोबतीला कुक्कुटपालन व्यवसाय, बांबूची लागवड केली. असे असतानाही ड्रायझोन हटविण्यासाठी त्यांनी पाण्यासाठी वर्षभर बैलगाडीने बागायतीला पाणी पुरवठा केला. त्यातही त्यांची आर्थिकघडी विस्कटली. त्यांना अपयश आले. पुढे त्यांनी वाकुडपाडा येथे आठ एकरमध्ये बंगलोरी (कोईम्बतुर) मोगरा-3000 रोपांची लागवड, शिसव, फणस, काजू-150, आंबे-750, पपई-500, कागडा-पारस आदी विविध प्रकारची मिश्र प्रमाणात बागायत केली. पपई पिकातून 35 टन माल निघतो. यातून त्यांनी तीन लाख रूपये नफा मिळवला. इथल्या बंगलोरी मोगऱ्‍याचे उत्पादन हे वर्षातून 8 महिने मिळते. या मोगऱ्‍याचे ते आंतरपिक घेतात. बहुतांशी शेती ड्रायझोनमध्ये असल्यामुळे दिड किलोमीटर अंतरावरून एका ओढ्यातून पाईप लाईनद्वारे पाणी आणले आहे. ठिबक सिंचनासाठी ट्रिपर न बसवता मायक्रो ट्युबचा वापर केला आहे. आंबा, काजू, पपई, चिकू, फणस ते मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आज या परिसरात मोगरा फुलविण्याचे योगदान माझ्याकडून झाल्याचे ते सांगतात. या ठिकाणी 40 वर्षे राहून ते इथल्या सर्व समाजात मिसळले आहेत. या मोगऱ्‍याचा माल ते पालघर, दादर, नाशिक या ठिकाणी देत असतात. सरासरीने प्रतीकिलो किमान 132 ते 150 रुपये भाव बाजारात मिळतोय.

नवतरूणांनी शेती केली पाहिजे. उजाड शेतीत लागवड करणे गरजेचे आहे. शेतीत अर्थाजनाबरोबर शेतीतलं बौद्धिक ज्ञान शेतकऱ्‍याला मिळतेय, ते गरजू शेतकरीवर्गाला गरजेचे आहे. असेही मत यावेळी ते व्यक्त करतात. मिश्र शेतीमुळे एखादं पिक बदलत्या हवामानात हाती आलं नाही तर इतर पिकाने त्याची तूट भरून निघत असते असं मत त्यांचा बीएस्सी झालेला मुलगा शिवम हा व्यक्त करतो.

आज मेहतांची साठी उलटली तरी त्यांची शेतीतली जिद्द संपलेली नाही. आज त्यांच्या शेतीला आधार त्यांचा मुलगा बनलाय. शेतीत बरच काही करता येतं ते करण्यासाठी उरी जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा असावी लागते ते कैलास मेहतांच्या व्यक्तीरेखेतून प्रतीत होतेय.

- संतोष पाटील,
वाडा, ठाणे
7507355595

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate