অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोसंबी पिक - शेतीत स्थैर्य

मोसंबी पिक - शेतीत स्थैर्य

जालना जिल्ह्यातील मोती पवार यांची मोसंबी शेती

जालना- बीड रस्त्यावरील अंबड तालुक्‍यातील वडीगोद्री गावातील मोती लक्ष्मण पवार यांची मोसंबीची बाग म्हणजे उत्तम नियोजनाचे चांगले उदाहरण आहे. काही काळ राजकारणात रमलेले पवार आता मोसंबी बागेत रमू लागले आहेत. योग्य व्यवस्थापनातून मोसंबीचे एकरी 11 ते 12 टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. दुष्काळातही पाण्याचे नियोजन करून आपली बाग हरतऱ्हेने वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.

अंबड तालुक्‍यातील वडीगोद्री गावात मोती पवार राहतात. समर्थ सहकारी साखर कारखाना जवळ असल्याने व जमीनही काळी, भारी असल्याने उसाचे क्षेत्र या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग मोसंबीचा "बेल्ट' म्हणूनही ओळखला जातो. मात्र, अलीकडील व त्यातही मागील वर्षीच्या दुष्काळात परिसरातील सुमारे 80 टक्‍के बागा सुकून गेल्या आहेत. पवार देखील पूर्वी उसाची शेती करीत होते. जालना जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांचा संपर्क माजी जिल्हा परिषद सदस्य व मोसंबी उत्पादक प्रल्हाद अण्णा काकडे यांच्याशी आला, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मोसंबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तीन भावांत 50 एकर शेती आणि तीही गावाला लागूनच आहे. विहिरीला बऱ्यापैकी पाणी असल्याने मोसंबीची बाग चांगली येऊ शकेल असे पवार यांना वाटले. अंबडच्या कृषी विभागाशी संपर्क साधून मोसंबीबाबतच्या योजना व लागवडीची माहिती घेतली. 

मोसंबी लागवडीची तयारी 

जमीन काळी व निचऱ्याची आहे, अशा जमिनीत कोणतेही फळझाड जोमाने वाढते. मग मोसंबीचे उत्पादनही चांगले येणारच, असा ठाम विश्‍वास ठेवून 18 x 18 फूट अंतरावर 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे खोदले. प्रत्येक खड्ड्यात कंपोस्ट खत, माती व एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत टाकले. रंगपूर लाइम खुंटावर बांधलेली मोसंबीची कलमे आणून लावली. कलमे लावत असतानाच त्यांची मुळे कीडनाशकाच्या द्रावणात बुडविली. दोन महिन्यांच्या अंतराने रासायनिक खतांची मात्रा दिली. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिली, त्यामुळे पिकाची वाढ जोमाने झाली. 

मोसंबीची काळजी घेणे आवश्‍यक

एकदा मोसंबी लावली व वर्षातून एकदा खते दिली, की पाणी देणे एवढेच काम बाकी राहते, असा काही मोसंबी उत्पादकांचा समज असतो; मात्र त्या वेळी उत्पादनही जेमतेमच निघत असते, ही बाब पवार यांनी चांगली समजून घेतली. ते मोसंबीसाठी विशेष लक्ष देऊ लागले. शेणखत वा सेंद्रिय खताची कमतरता काही प्रमाणात निंबोळी खतातून भरून काढली. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी तसेच जमिनीतूनही दिली. रासायनिक खताच्या मात्रा दर वर्षी टप्प्याटप्प्याने वाढविल्या. कीड व रोगनाशकांच्या फवारण्याही सुरवातीपासून केल्या. 

मोसंबीची छाटणी महत्त्वाची

मोसंबीची छाटणी सुरवातीपासून अशी केली, की शेतात कोणत्याही ठिकाणी बसले तरी संपूर्ण बागेवर लक्ष ठेवता आले पाहिजे, त्यामुळे जमिनीपासून दोन ते 2.5 फूट उंचीपर्यंत खोड ठेवून तेथूनच झाडांना आकार मिळाला आहे. झाडाच्या फांद्या व्यवस्थित छाटून झाडाला नीट आकार दिला. झाडावर एकही वाळलेली फांदी नाही व एकही वॉटरशूट नाही. झाडाचा देखणा आकार व निरोगी वाढ यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. आताही वेळोवेळी छाटणी करून झाडाच्या अनावश्‍यक फांद्या काढून टाकल्या जातात, त्यामुळे झाड मोकळे राहतेच, शिवाय सर्वत्र हवा खेळती राहण्यास मदत होते. झाडाची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडाचे खोड व फांद्या मजबूत बनल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लागूनही झाडांना कोणता आधार देण्याची गरज भासली नाही. परिणामी, आधारासाठीचे बांबू व मजुरांच्या खर्चात बचत झाली, शिवाय झाडेही मजबूत बनली. 

खतांचे नियोजन

मोसंबीची झाडे सध्या नऊ वर्षांची असून या वेळी चौथे पीक धरले आहे. वर्षातून दोन वेळा खते दिली जातात. एकदा बहर उतरून गेल्यानंतर व दुसऱ्यांदा जून- जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर प्रत्येक वेळी निंबोळी खत एक ते दीड किलो प्रति झाड दिले जाते. पाच किलो गांडूळ खत दिले. त्याशिवाय युरिया 300 ग्रॅम, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांसोबतच बोरॉनसारखी सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली. पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने प्रत्येकी 200 ग्रॅम युरिया तीन ते चार वेळेस दिला जातो. 

पाणी व्यवस्थापन

बागेला लागून एक व दुसरी दीड किलोमीटर अंतरावर अशा दोन विहिरी आहेत. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असून त्यांचे पाणी दोन्ही शेतांत पाइपलाइनद्वारे आणले. दुष्काळात प्रसंगी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागले. मोसंबीच्या दोन्ही बाजूस ठिबकने पाणी देण्याची सोय केली आहे. झाडाचा घेर पाहता प्रत्येक झाडाला दोन्ही बाजूने तीन- तीन ड्रीपर लावण्यात आले, जेणे करून झाडाचा "रूट झोन' (मूळविस्तार कक्ष) पूर्णपणे भिजवला जाईल. चार ड्रीपरने झाडाच्या सर्व मुळांपर्यंत पाणी पोचत नाही आणि बहुतेक ठिकाणी तर दोनच ड्रीपरवर सिंचन केले जाते. बहर धरण्यासाठी पहिल्यांदा दोन तास, चार दिवसांनंतर दररोज चार तास, आठ दिवसांनंतर दररोज सहा तास नियमितपणे ठिबक चालविले जाते. 
बहर धरण्यासाठी झाडांना ताण दिला जातो. झाडांच्या खोडांना बोर्डोपेस्ट नियमितपणे लावली जाते. त्याआधी खोडाची तपासणी करून खोडकीड नसल्याची तपासणी केली जाते. सुदैवाने आजपर्यंत खोडकीड आढळली नाही. 

सापळ्यांचा उपयोग

फळे लागल्यानंतर साधारणतः सप्टेंबर- ऑक्‍टोबरदरम्यान फळांतील रसशोषक पतंग किडींचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. आधी रात्रीच्या वेळी टेंभे लावून ते मारले जायचे. आता कृषी विभागाकडून प्रकाश सापळे मिळाले आहेत. याशिवाय झाडांना घरीच बनविलेले सापळे लावले आहेत. साधारणतः 50 झाडांमागे एक सापळा हे प्रमाण ठेवले, त्यात सर्वच प्रकारच्या किडी ट्रॅप होतात. सार्वजनिक कार्यक्रमात सर्रास वापरले जाणारे प्लॅस्टिकचे "यूज ऍण्ड थ्रो' (वापरून फेकावयाचे) प्रकारचे ग्लास सापळ्यांसाठी वापरले आहेत. त्यात अर्धा ग्लास पाणी व थोडे कीडनाशक टाकले जाते. याशिवाय मोसंबी व लिंबाचा रसही त्यात टाकला जातो. लिंबाच्या व मोसंबीच्या रसाचा सुगंध किडीला आकर्षित करतो, ते त्याकडे झेप घेऊन कीडनाशक द्रावणात येऊन पडतात. झाडांच्या फांद्यांना असे ग्लास सापळे अडकविले आहेत. अशा सापळ्यांसाठी अत्यंत कमी खर्च आला, फायदा मात्र भरपूर झाला. प्रकाश सापळे व घरी बनविलेल्या ग्लास सापळ्यांमुळे किडींचा प्रादुर्भाव जाणवला नाही. शेती व्यवस्थापनात कृषी सहायक कृष्णा गट्टूवार, मंडल कृषी अधिकारी माणिक जाधव व तालुका कृषी अधिकारी दिंडे यांचे सहकार्य पवार यांना महत्त्वाचे ठरले आहे. 

उत्पादन व उत्पन्न

मोसंबीची सुमारे आठ एकर क्षेत्रात एक हजारापर्यंत झाडे आहेत. 1000 झाडांपासून दोन वर्षांपूर्वी 95 टन म्हणजे एकरी सुमारे साडेअकरा टन उत्पादन मिळाले. मागील वर्षी हेच उत्पादन एकूण झाडांपासून शंभर टनांच्या आसपास मिळाले. दरवर्षी आंबे बहराचे नियोजन असून, मागील वर्षी प्रति टन 24 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामागील वर्षी मात्र हाच दर साडेदहा हजार रुपयांपर्यंत मिळाला होता. व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन मालाची खरेदी केली आहे. 

(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) 

संपर्क - मोती पवार - 9765906162

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate