অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती

मोसंबी लागवडीतून साधली आर्थिक प्रगती

शेती पारंपरिक पद्धतीने न करता नियोजनात्मक पद्धतीने करत त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती निश्चितच फायदेशीर ठरते. चाळीसगाव तालुक्यातील हातले येथील प्रयोगशील शेतकरी विनोद परदेशी यांनी मोसंबी लागवडीतून तब्बल 25 लाख रुपयांचा नफा कमवत इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात हातले गाव आहे. या गावाच्या विनोद परदेशी यांनी पाच वर्षापूर्वी माती परीक्षण, उपलब्ध पाणीसाठा व उपलब्ध साधनांचा आढावा घेत आपल्या शेतात मोसंबी लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. फक्त पाच एकरात दर्जेदार मोसंबी उत्पादनातून लागवड ते विक्रीपर्यंतचा खर्च वजा करता 25 लाखांचा फायदा मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. मोसंबीची लागवड 2010 मध्ये त्यांनी लागवड केली. उत्पादन सुरु होण्यास पाच वर्षाचा कालावधी लागणार होता. त्या कालावधीपर्यत आतंरपीक म्हणून पहिल्या वर्षी आतंरपीक म्हणून केळीची लागवड केली. केळी काढल्यानंतर आंतरपीक म्हणून कमी पाण्यावर येणारी छोटी पिके जशी कोबी, फ्लॉवर, टरबूजचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली त्यावर मात करण्यासाठी मल्चिंग पेपर (प्लास्टीक आच्छादन) चे बेड तयार केले. त्यावर टरबूज लागवड केली. त्यामुळे टरबूजाचे पण चांगले उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर मोसंबी बागही फुलली.

हातले गावात पाण्याची टंचाई ठरलेली. परदेशी यांच्याकडील 20 एकर शेतीला 3 विहिरीचं पाणी देखील कमी पडत असे. त्यामुळे 20 एकरापैकी जवळपास पाच एकर शेती कोरडवाहू पद्धतीने करण्याशिवाय पर्याय नव्हता. या पाच एकर शेतात मोसंबीची लागवड त्यांनी केली. मोसंबी बरोबरच आतंरपिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी इनलाईन ड्रिपरचा प्रभावी वापर केल्यामुळे कमी पाण्यात जास्तीचे उत्पन्न घेण्यात ते यशस्वी झाले. मोसंबीमधल्या जागेत मल्चिंग करुन टरबुजची लागवड केली. त्यातून गेल्या उन्हाळ्यात त्यांनी तब्बल पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळविले होते, अशी माहिती परदेशी यांनी दिली. दुष्काळ परिस्थितीत मोसंबीची बाग टिकविणे फार कठीण होते, पाणी टंचाईमुळे वेळप्रसंगी खासगी पाणी टॅंकरद्वारे देखील पाणी द्यावे लागले. जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे उन्हाळ्यात झपाट्याने कमी होते, त्यामुळे त्यांना जमिनीतील ओलावा राखण्यासाठी मल्चिंग तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरले. त्याचप्रमाणे झाडावरील पानांमधून देखील पाण्याचे उत्सर्जन होत असते ते रोखण्यासाठी झाडांची हलकीशी छाटणी करुन पानांची, फळांची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे झाडे सशक्त करुन त्यांनी पाण्याची बचतही केली.

मोसंबी पिकास एका वर्षात साधारणत: 23 ते 24 ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. हिवाळ्यात 7 ते 8 दिवासांच्या अंतराने तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने तसेच पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओलित करावे लागते. फळपिकांना प्रांरभिक तीन वर्षाच्या काळात सिंचनाची गरज असते. मध्यम जमिनीत मोसंबीची लागवड चांगल्या प्रकारे होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मोसंबीच्या झाडांची छाटणी सुरुवातीपासून त्यांनी अशी केली की, शेतात कोणत्याही ठिकाणी बसले तरी संपूर्ण बागेवर लक्ष ठेवता येते. त्यासाठी जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंची पर्यत खोड ठेवून तेथूनच झाडांना आकार त्यांनी दिला आहे. झाडावर वाळलेली एकही फांदी दिसून येत नाही व एकही वॉटरशुट नाही. झाडांच्या निरोगी वाढीमुळे उत्पादनात वाढ होत आहे. वेळोवेळी छाटणी करुन झाडाच्या अनावश्यक फांद्या काढून टाकल्यामुळे झाड मोकळे तर राहतेच, शिवाय सर्वत्र हवा खेळती राहण्यास मदत होते. झाडाची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडाचे खोड व फांद्या मजबुत बनल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लागूनही झाडांना कोणताही आधार देण्याची गरज भासली नाही. परिणामी आधारासाठीचा खर्चही वाचला शिवाय झाडेही आणखी मजबूत झाली. साहजिकच झाडांवरील फळांची संख्याही वाढली, त्यामुळे उत्पादनही वाढले.

आपल्या यशाचे गमक उलगडतांना प्रगतशील शेतकरी विनोद परदेशी यांनी स्व अनुभवनातून दिलेली माहिती इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.

लेखक  - निलेश किसन परदेशी
चाळीसगाव जि.जळगाव

स्त्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate