অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी

राजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी

मराठवाड्याची ओळख कमी पर्जन्यमान असलेला व डोंगराळ भाग म्हणून प्रचलित आहे. त्यातच शेती कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, अपुरा पाऊस व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय.

निपाणी म्हणजेच पूर्वी पाणी नसलेले गाव. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात निपाणी गावात राहणारे राजशेखर मुरलीधरराव पाटील यांचा जन्म 1 मे 1971 रोजी झाला. सध्या ते मुरुड ता.जि. लातूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडील वडिलोपार्जित 54 एकर शेती होती. त्यांनी 1993 मध्ये कृषि पदवी प्राप्त केली. त्यानंतर पाणी नसलेले गावांचा कायमचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि पाणीदार गाव करण्यासाठी लोकसहभागातून दहा किलोमीटरचा नाला खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन रांजणी शुगरचे प्रशासकीय संचालक बी.बी.ठोंबरे यांनी 40 लाखांचे सहकार्य केले. या गावात एकूण एक कोटींची कामे झाली. त्यामुळे शासनाने इंधनासाठी दहा लाख रुपयांची मदत केली. या भागात 40 कि.मी. नाला खोलीकरणाची कामे लोकसहभागातून करण्यात आली. या कामास आमदार राणा जगजितसिंह यांच्याकडून दहा लाख रुपयांचा निधी मिळाला. तसेच शासन व तसेच इतर लोकप्रतिनिधींनीही निधी दिला. त्यामुळे पाणी नसलेली शिवार पाणीदार करण्यात यश मिळाले. पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांच्या प्रतिष्ठानमध्ये शेती व पाणलोट विकासासंबंधी घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा झाला.

बांबुच्या शेती संदर्भात राजशेखर पाटील म्हणाले की, बांबुशेतीची संकल्पना मनात धरुन सुरुवातीस इंटरनेटच्या माध्यमातून जपान येथील कायटो येथे जाऊन निसर्ग शेतीची (जंगल शेती) पाहणी केली. शास्त्रज्ञ तथा कृषी/ऋषी शेतीचे जनक गुरु फुकोआका यांच्या प्रेरणेतून आपल्या गावात निसर्ग शेती करण्याचे ठरवले. पडीक जमिनीत, कमी कष्टात आणि दीर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या बांबुची लागवड, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करत असताना आपल्या शेतीला बांबूची वन भिंत तयार केली. हे करत असताना फळलागवडीत आंबा, चिकू, आवळा, नारळ, जांभूळ, चिंच याचबरोबर वृक्ष कडूलिंबाची लागवड करुन ठिंबक सिंचनाने जमिनीतील ओलावा निर्माण केला. बांबूची रोपे शेतीच्या कडेला लावून शेताला बांबूचे कुंपनच तयार केले.

सुरुवातीस दीड ते दोन फुटावर रोपे लावली. एक लाख रोपे 54 एकर मध्ये लावली असून सर्व रोपांना ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. एका रोपांपासून 100 ते 200 काठ्या 30 ते 40 फुट लांबीच्या मिळतात. एका काठीचे 50 रुपये उत्पन्न मिळते. हे उत्पन्न तीन ते चार वर्षापासून मिळण्यास सुरुवात होते. ते उत्पन्न 60 वर्षापर्यंत घेता येते. एकरी 1000 ते 3000 पर्यंत घन लागवड करुन त्यापासून 20 ते 30 लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. ते आज मी घेत आहे.

माझ्याकडे एक लाख 40 हजार रोपे घनलागवड जंगल आहे. शेतीमध्ये चालणारे कोणतेही अवजार नाही. बांबूच्या शेतीला इतर पिकांप्रमाणे मजूर लागत नाहीत. बांबूमध्ये मानवेल, कष्टांग, रुपाई, मेसकाठी, मानगा आदी 140 जातींची रोपे आहेत. विशेष म्हणजे बांम्बोसा बल्कोवा वाणाच्या बांबुला बाजूला फांद्या आणि काटे येत नाहीत.

खेळणी, बांधकामापासून ते ऊर्जानिर्मितीसाठी बांबुचा वापर वाढलाय. बांबुशी संबंधित इंडस्ट्रीज आहे. पेपरमिल, प्लायवूड, उदबत्ती कारखाने, फर्निचर, इथेनॉल, कोळसा, नोटा आदी मोठा उद्योग बांबूवर अवलंबून आहेत. सर्वसाधारण शेतकरी बांबूंच्या शेतीकडे वळल्यास त्याच्याकडे पाहून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. परंतु याच्यावर मात करत बांबू शेती केली. बऱ्याच प्रमाणात आपल्याला बांबुची आयात करावी लागते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बांबुशेतीकडे वळले पाहिजे. बांबुला सध्या प्रचंड मागणी आहे. व त्यापासून चांगले उत्पन्नही मिळत आहे.

बांबूवर फवारणी करावी लागत नाही. खत लागत नाही. कीड लागत नाही. गवती प्रकार असल्यामुळे जनावरे या रोपांना खात नाहीत. रोपे वाळत नाहीत. पाणी नाही मिळाले तर पाणगळ होते नि पाणी मिळाल्यास पुन्हा पाने फुटतात. शक्यतो रोपे मरत नाहीत. त्यामुळेच तर शेतकऱ्यांना हे वरदान असून त्यास हिरवे सोने असे म्हणतात. ही शेती केल्यास लोक हसतात ; परंतु बांबू शेती करणारा शेतकरी 100 टक्के श्रीमंत होतो, हे या शेतीचे वैशिष्ट्ये आहे, असे श्री.पाटील सांगतात.

श्री.पाटील यांनी अमृतसर, वाराणसी, दिल्ली, विजापूर, नागपूर व महाराष्ट्रातील अन्य शहरात जाऊन माझ्या बांबूच्या शेतीबद्दल लोकप्रबोधन केले आहे.

माझ्या कामाची दखल घेऊन आजपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते कृषिरत्न पुरस्कार-, माजी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार-, कृषि गौरव पर्यटन पुरस्कार - ॲग्रोवन तर्फे, तर जनजागृती पुरस्कार, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते, पायरोनिअर ऑफ बीएससी ॲग्री पुरस्कार - महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या हस्ते तर नवी दिल्लीचा प्रसार भारतीचा किसान वाणी पुरस्कार महानिर्देशक ग्रेस कुंझर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आता देशातही बांबुला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबुची वाहतूक आणि त्यापासूनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल. महाराष्ट्राचा निर्णय देशपातळीवर स्वीकारल्या गेल्याचा आनंद असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत आयोजित बांबू बोर्ड बैठकीत दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

बांबुला वृक्षाच्या श्रेणीतून वगळून गवत बनविण्याची तरतूद असलेले महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा झाला. याचबरोबर केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय बांबू मिशनचे काम हाती घेतले असून त्यासाठी भरीव तरतूदही केली आहे. मी माझ्या संपर्कात येणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बांबू शेतीकडे वळवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9860209283 या संपर्क साधल्यास त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्याही सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

बांबुच्या शेतीकडे का वळावे ?

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी बांबू लागवड खऱ्या अर्थाने शाश्वत शेतीचा मार्ग आहे. आजच्या घडीला कृषी आधारित उपक्रम म्हणून बांबूकडे पाहिले जाते. बदलत्या शेतीच्या पद्धतीत आणि स्पर्धेच्या युगात बांबू लागवड आदर्श ठरू शकते. अतिशय कमी भांडवलात शेतकरी उत्तम शेती करुन आपले भविष्य सुखकर करु शकतील. यासाठी शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळल्यास शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असेल.

बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचिक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्त्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व चार ते पाच वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते. मानवेल जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. बाबूपासून कागद, चट्या, दांड्या, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचर आदी उत्पादने तयार होतात. या उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत 'पाच ५ मीटर अंतरावर ६ox६ox६० सें.मी. आकाराचे खडे खोदावेत. बांबू रोप लावताना व वाहतुकीमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास रोपे मरण्याचे प्रमाण फारच अल्प असते.

बियाण्याची पेरणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. या तऱ्हेने तयार केलेली रोपे जून-जुलै महिन्यात लागवडीसाठी वापरता येतात. पॉलिथिन पिशवीत लावून बांबूच्या रोपांची निर्मिती बियाणे पॉलिथिन पिशवित सुद्धा लावून करता येते. कंदाद्वारे केलेल्या बांबूच्या लागवडीमध्ये झाडे जगण्याचे प्रमाण चांगले असते व वाहतुकीचा खर्च कमी येतो. लागवडीसाठी कंदाची निवड करताना कंदावर दोन ते तीन डोळे असणे आवश्यक असते. बांबूची काढणी ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात करावी. एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांत बांबुची काढणी करू नये, कारण त्या काळात बांबूची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते.

कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षापासून उत्पादनास सुरुवात होते. जर रोपापासून केली असेल तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळते. बांबू शेतीच्या नियोजन व व्यवस्थापनातून आंतरपिके घेता येतात. बांबू लागवड सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये उत्तम पर्याय आहे. ही लागवड दीर्घकाळ उत्पन्न देणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून बांबूंचे संरक्षण करता येईल.

-अशोक रामलिंग माळगे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 5/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate