অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानमसले नव्हे कांद्याचे मसले !

रानमसले नव्हे कांद्याचे मसले !

कांद्याच्या गटशेतीने गावाला दिली वेगळी ओळख

वाढता उत्पादन खर्च, महागडी खते, कीडनाशके, मजुरांचा तुटवडा आणि बाजारपेठेतील चढ-उतार याचा विचार करता शेती आता एकट्या-दुकट्याची राहिलेली नाही, ती सामूहिक पद्धतीने कसणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन रानमसले (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी कांदा पिकाच्या गटशेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे.


सोलापूरपासून 31 किलोमीटरवर असलेले रानमसले हे गाव कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही गावातील सुमारे 90 टक्के शेतकरी खरीप कांदा उत्पादन घेतात. ज्याच्याकडे पुरेसे पाणी आहे, वेळच्या वेळी खते- कीडनाशके वापरण्याची आर्थिक क्षमता आहे, त्याच शेतकऱ्याला कांद्याचा आर्थिक लाभ मिळायचा; पण सामान्य शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टी पैशाजवळ येऊन थांबायच्या. रानमसले गावातील शेतकऱ्यांची अडचण माजी खासदार सुभाष देशमुख यांच्या लक्षात आली. शेतकऱ्यांचे कष्ट आणि धडपड लक्षात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल शेतकरी मंडळाची गावात स्थापना झाली. गावातील प्रयोगशील शेतकरी घनश्‍याम गरड हे गटाचे अध्यक्ष झाले. या मंडळामार्फत शेतकरी एकत्र आले. शेतीमध्ये नवे काही तरी करण्याची आस प्रत्येकाच्या मनात होती; पण पैशाअभावी पुढे जाता येत नव्हते, त्यामुळे लोकमंगल पतसंस्थेकडून शेतकरी मंडळातील सदस्यांना खास कांद्याच्या गटशेतीसाठी एकरी 45 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक प्रश्‍न सुटला. शेतकऱ्यांनी कर्जफेडीची ग्वाही दिली.

गटशेतीने केली कांदा लागवड

कांदा पिकाच्या गटशेतीबाबत माहिती देताना गरड म्हणाले, की आमच्या प्रत्येक शेतकऱ्याची दर वर्षी सरासरी तीन ते चार एकर कांदा लागवड असते. गटशेतीच्या माध्यमातून सुधारित तंत्राने लागवड करण्याचे ठरविले. त्यासाठी पहिल्यांदा वडाळ्याच्या लोकमंगल कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून तांत्रिक माहिती घेतली. याचबरोबरीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राजगुरुनगरच्या राष्ट्रीय कांदा व लसूण संचालनालयाला आम्ही भेट दिली. तेथील तज्ज्ञ डॉ. आशुतोष मुरकुटे, डॉ. स्वामी यांनी सुधारित लागवड पद्धत आणि पारंपरिक लागवड पद्धतीमधील फरक सांगितला. सुधारित तंत्रज्ञानाचा फायदा लक्षात घेऊन मंडळातील घनश्‍याम गरड, सुधाकर सिरसट, सत्यवान गरड, सुनील सिरसट, संजय वाघमारे, सुनील पाटील, सुखदेव क्षीरसागर, दत्तात्रय वाघमारे, भरत पवार यांनी प्रत्येकी एक एकर या पद्धतीने गादीवाफा आणि ठिबक सिंचनावर कांदा लागवडीचे नियोजन केले.

अशी केली कांद्याची लागवड

कांदा लागवडीबाबत घनश्‍याम गरड यांनी दिलेली माहिती... 
1) लागवडीसाठी कांद्याची सुधारित जात निवडली. एकरी तीन किलो बियाणे लागले. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात बियाण्यास शिफारशीत बीजप्रक्रिया करून गादीवाफा रोपवाटिकेत पेरणी केली. 15 ऑगस्टच्या दरम्यान रोप पुनर्लागवडीस आले. 
2) लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या माती-पाणी परीक्षण केंद्रात प्रत्येक शेतकऱ्याने माती-पाणी परीक्षण करून घेतले. त्यानुसार खतमात्राचे नियोजन झाले. 
3) लागवडीसाठी जमिनीची योग्य मशागत करून उसासाठी सरी सोडायच्या यंत्राने गादीवाफे केले. कांदा लागवडीसाठी तीन फूट रुंद, 15 सेंमी उंच आणि शेतीच्या क्षेत्रानुसार लांब असे गादीवाफे तयार झाले. ठिबक सिंचन करायचे असल्याने दोन गादीवाफ्याच्या मध्यापासूनचे अंतर चार फूट ठेवले, त्यामुळे दर चार फुटांवर लॅटरल आली. गादीवाफ्यावर लागवड करताना दोन ओळीत 12.5 सेंमी आणि दोन रोपात 10 सेंमी अंतर ठेवले. या पद्धतीने लागवड केल्याने रोपांची संख्या वाढली. 4) गादीवाफा करताना मातीमध्ये एकरी 24-24-0 100 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, युरिया 50 किलो मिसळून दिले. माती परीक्षणानुसार या खतमात्रा दिल्या. 
5) शेतात तण होणार नाही याची काळजी घेतली. पाऊस असल्याने दररोज एक तास ठिबक सिंचनाने पाणी दिले. लागवडीनंतर तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार ठिबक सिंचनातून 0-52-34 आणि 19-19-19 ही खते दिली. सप्टेंबरनंतर पिकाची गरज लक्षात घेऊन दररोज दोन तास ठिबक सिंचनाने पाणी दिले. साधारणपणे 90 व्या दिवसानंतर पाणी बंद केले. 
6) पिकावर करपा आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकाच्या दर पंधरा दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घेतल्या. 
7) साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांदा काढणी केली. पहिल्यांदा कांदा पातीसह उपटून चार दिवस शेतात वाळवत ठेवला. त्यानंतर पाती कापून दोन दिवस शेतातच कांदा वाळविला. त्यानंतर कांद्याची तीन प्रकारे प्रतवारी केली. 
8) सुधारित पद्धतीमुळे एकरी 120 क्विंटल कांदा उत्पादन मिळाले. पारंपरिक पद्धतीने एकरी 60 क्विंटल कांदा उत्पादन मिळायचे. 
9) यंदा सोलापूर मार्केटमध्ये प्रति क्विंटल सरासरी 2000 रुपये दर मिळाला. मशागत, ठिबक, बियाणे, खते, कीडनाशके, काढणी, मजुरी असा प्रति एकरी 58 हजार रुपये खर्च आला. हा खर्च वजा जाता 1 लाख 82 हजारांचा निव्वळ नफा झाला.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या शेतकऱ्यांना श्रीराम मंडळाच्या सचिव अनिता ढोबळे यांच्यासह लोकमंगलच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश करंडे, प्रा. मंदार पवार, प्रा. धनंजय शिंदे, प्रा. सचिन फुगे, सलमान शेख यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन लागवडीसह पीक व्यवस्थापनाची माहिती दिली.

सुधारित तंत्राने वाढले उत्पादन...

सामूहिक पद्धतीने कांद्याची गटशेती केल्याने आम्हाला फायदा झाला. सर्वांचे सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नामुळे आमचा वेळ आणि पैसाही वाचला. गटशेतीचे महत्त्व आमच्या शेतकऱ्यांना कळले. 
  • घनशाम गरड
  • जमीन खडकाळ-माळरान अशीच होती; पण कांदा लागवडीचा निर्णय घेतला. गादीवाफा पद्धतीने लागवड केली. दर वर्षी एकरी 50 क्विंटल उत्पादन मिळत होते. यंदा तेच दुपटीने वाढले. शिवाय कांद्याचा आकार, वजन चांगले आहे.
  • सुनील सिरसट - 9850697652
  • ठिबक आणि गादीवाफा पद्धत फायदेशीर ठरली. साधारणपणे 10 टन उत्पादन मिळाले. खते आणि कीडनाशकांचा खर्चही कमी झाला.
  • सुनील पाटील - 9545330096
  • दर वर्षी पारंपरिक पद्धतीने आम्ही कांदा लागवड करायचो; पण यंदाच्या वर्षी गादीवाफा पद्धतीने कांदा लागवड केली. प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेतली. लोकमंगल शेतकरी मंडळाच्या माध्यमातून आम्हाला अर्थसाह्य मिळाले. त्याचाही चांगला आधार मिळाला.
  • सुधाकर सिरसट, रानमसले, ता. उत्तर सोलापूर - मोबाईल : 9763870547
  • संपर्क - मोबाईल - 9763607713
  • घनशाम गरड - (अध्यक्ष, लोकमंगल शेतकरी मंडळ, रानमसले)

माहिती संदर्भ : अग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate