অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाद्वारे वाढले हरभऱ्याचे उत्पादन

कृषि पद्धत व गरजेच्या निविष्ठा पुरवून उत्पादन वाढीस हातभार

दिवसेंदिवस घटत चाललेले कडधान्ये व तेलबियांचे क्षेत्र व उत्पादन तसेच दरवर्षी होणारी या पिकांची आयात यामुळे या दोन्ही वर्गातील पिकांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. या सर्वांचा विचार करून भारत सरकारने कडधान्ये व तेलबियांचे उत्पादन व क्षेत्र वाढीसाठी राष्ट्रीय अत्रसुरक्षा अभियानामार्फत प्रत्येक राज्य व तेथील महत्वाचे पिकांचा विचार करून शेतक-यांना आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचा एक चांगला उपक्रम राबविला आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून कृषि पद्धत व गरजेच्या निविष्ठा पुरवून शेतक-यांच्या उत्पादन वाढीस हातभार लावला व त्याचे चांगले परिणाम दिसून आले कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (ATARI), हैद्राबाद यांचे मार्फत रब्बी समूह आद्यरेषा डाळवर्गीय पीक प्रात्यक्षिके ही कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव यांनी राबविली.

तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करण्यात आले व मालेगाव तालुक्यातील वडेल व अजंग या दोन गावांचा समावेश या प्रकल्पांतर्गत करण्यात आला. गावातील ग्रामपंचायतीमध्ये सर्व पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित असताना दोन्ही गावातील मिळून ५० लाभार्थी शेतकरी निवडण्यात आले. वडेल गावातून ३८ व अजंग येथील १२ शेतकरी प्रकल्पांतर्गत निवडण्यात आले. सर्व शेतकरी हे बागायती शेती करणारे निवडण्यात आले. जेणेकरून या प्रकल्पात उत्पादित माल पुढील वर्षी बियाणे म्हणून इतर शेतक-यांना उपयोगी पडेल. सुरवातीला निवडण्यात आलेल्या शेतक-यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे कृषिविद्या शाखेचे शास्त्रज्ञ श्री. रूपेश खेडकर यांनी हरभरा पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान जसे माती परीक्षण, सुधारित जाती, पेरणी तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि बीजप्रक्रियेची पद्धत प्रात्यक्षिकांव्दारे करून दाखविण्यात आली.

'शेती दिन' व 'हरभरा पीक प्रात्यक्षिके पाहणी कार्यक्रम'

सर्व लाभार्थी शेतक-यांच्या ज्या क्षेत्रावर हरभरा पेरणीचे नियोजन होते त्या क्षेत्राच्या माती नमुन्याचे परीक्षण करण्यात आले व माती परीक्षण अहवालानुसार खतांचे नियोजन करण्याची शिफारस करण्यात आली. प्रकल्पांतर्गत निवडण्यात आलेल्या लाभार्थी शेतक-यांना गरजेच्या निविष्ठा ज्यामध्ये हरभ-याच्या सुधारित दिग्विजय या वाणाचे १५ किलो व कीटकनाशक क्लोरोपायरीफोसचे वितरण करण्यात आले, पेरणीच्या वेळी व पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व शेतक-यांना येणा-या समस्येचे निराकरण करण्यात आले. प्रकल्प कालावधीमध्ये शेतक-यांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर पिकाच्या विविध अवस्थेतील नोंदी घेण्यात आल्या. जिपीएस प्रणालीतील अक्षांश व रेखांशाच्या नोंदी, पेरणीची वेळ, वापरलेली रासायनिक खत मात्रा, आढळून आलेल्या तणाच्या विविध प्रजाती, घाटे संख्या, उत्पादन प्रती हेक्टर इत्यादी महत्वाच्या नोंदी घेण्यात आल्या. कृषि विज्ञान केंद्राने राबविलेल्या या प्रकल्पामार्फत सुधारित तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने लाभार्थी शेतक-यांच्या हरभरा प्रात्यक्षिक क्षेत्रावर 'शेती दिन' व 'हरभरा पीक प्रात्यक्षिके पाहणी कार्यक्रम' आयोजित करण्यात आला.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेला हा कार्यक्रम श्री. सोमनाथ अहिरे व श्री. गोरख शेलार यांच्या शेतात घेण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद लाभला तसेच कार्यक्रमात तज्ज्ञांनी हरभरा पीक संरक्षण संदर्भात शेतक-यांना मार्गदर्शन केले. पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत घेतलेल्या नोंदी व तुलनात्मक अभ्यासावरून असे आढळून आले की, सुधारित बियाणे (दिग्विजय) व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेले उत्पादन (२१.१६ क्रॅि./ हेक्टर) हे घरगुती बियाण्यांच्या वापर करून मिळालेल्या उत्पादनाच्या (१६.२५ क्रॅि./हेक्टर) तुलनेत ३०.२१ टक्क्याने जास्त मिळाले. खर्च व नफा यांचे घरगुती व दिग्विजय वाणाचे गुणोत्तर अनुक्रमे १.७८ व २.५६ इतके मिळाले . निव्वळ नफ्याच्या विचार केला असता घरगुती बियाणे वापरून २८३९२ रुपये /हेक्टर व दिग्विजय वानापासून ५१५४५ रुपये / हेक्टर इतका नफा मिळाला. प्रात्यक्षिकांच्या नोंदी व प्रयोगाचे निष्कर्ष पुढील तक्त्यांमध्ये दिले आहेत.

अ.क्र. घटकसरासरी
घरगुती / गावठी बियाणे दिग्वजय वाणाचे बियाणे व  सुधारित लागवड पद्धत
माती परीक्षण कमतरता - नत्र , स्फुरद कमतरता - नत्र , स्फुरद
आढळलेल्या तणांच्या जाती चिल,गाजरगवत,लव्हाळा चिल,गाजरगवत , लव्हाळा
रासायनिक खात मात्रा उपलब्धतेनुसार २५:५०:३० (नत्र , स्फुरद,पालाश)
उत्पादन (क्वी./हे.) १६.२५ २१.१६
निव्वळ नफा (रुपये /हे.) २८३९२ ५१५४५
खर्च:नफा गुणोत्तर १.७८ २.५६
उत्पादनात झालेली  वाढ (टक्के) - ०.२१

या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे  उत्पादन वाढलेले असून शेतकऱ्यांमध्ये  समाधानाची भावना निर्माण झालेली आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रगतशील शेतकरी व उपसरपंच श्री. नरेंद्र सोनवणे , श्री सोमनाथ अहिरे .श्री. प्रेमचंद शेलार ,श्री सुरेश सोनावणे , श्री दिगंबर सोनवणे व गावकरी यांचा हातभार लाभला.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate