অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोपवाटिका ते ट्री मॉल, अन् आता कृषी पर्यटन केंद्रही!

शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतून जनतेत वृक्षप्रेमाची गोडी निर्माण झाली. पूर्वी झाड विकत घेऊन लावण्याचा जमाना नव्हता. परंतु आता शासन वृक्ष लागवड मोहीम जोमानं राबवित आहे. त्यात जनतेचा सहभागही भरभरुन मिळतो आहे. म्हणून तर यंदा उद्दीष्टपूर्तीच्या एक दिवस अगोदरच शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. परंतु या मोहिमेत महत्त्वाची भूमिका असते, ती रोपवाटिकेची. अशाच एका औरंगाबादेतील रोपवाटिकेची भूषणावह अशी वाटचाल.

औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर असलेली पैठण रोडवरील पल्ल्वांकुर रोपवाटिका. अगदी संताजी पोलिस चौकीपासून अर्धा किलोमीटरवरील. सुहास वैद्य (वय, 58) यांची. केवळ 500 रुपयांवर सुरु केलेला त्यांचा रोपवाटिकाचा व्यवसाय आज कोट्यवधींचा झालाय. रोपवाटिकेचे रुपांतर आता ‘ट्री मॉल’ (झाडांचा मॉल) मध्ये झालेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने या व्यवसायामध्ये शास्त्रशुद्धपणे रसही घेतलाय. सुहास वैद्य यांची सुकृत, संकेत दोन्ही मुलं कृषी पदवीधर, पत्नी सुनीता, वास्तूविषारद सून अभिधा त्यांना या कामात मदत करतात. निसर्गाच्या सान्निध्यात रमलेलं कुटुंब इतरांनाही प्रेरणा देणारंच आहे. इतरांनीही रमावं यासाठी ‘पल्लवांकुर’ रोपवाटिका, आताचा ‘आंगन’ मॉल आणि पुढच्या महिन्यापासून सुरु होणारं कृषी पर्यटन केंद्र, वनप्रेमींसाठी भूरळ घालणारंच ठरणार आहे.

स्वप्नं अपुरं राहिलं असतं…

जिद्द, चिकाटी, संयमाने रोपवाटिका व्यवसायाला सन्मानाचं स्थान मिळवून देण्यासाठीचा केलेला सुहास वैद्य यांचा आटापिटा. म्हणावा तितका सोप्पा नाहीय. त्यांचं शिक्षण अभियांत्रिकीचं. पण बालपणापासून आवड रोपवाटिकेची. म्हणून तर अभियांत्रिकीची शेवटच्या वर्षाची परीक्षाच त्यांनी दिली नाही. याबाबत ते म्हणतात, ‘त्या काळात अभियांत्रिकीची बॅचच्या बॅचच वीज मंडळात शासकीय नोकरीला लागत. सध्या माझे काही मित्र अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आहेत. तसाच मीही असलो असतो. पण माझं रोपवाटिका व्यवसायाला सन्मान मिळवून द्यायचं स्वप्नं अपुरं राहिलं असतं. ते आता पूर्ण झालंय.’

रमणीय परिसर

वडील लक्ष्मणराव. स्वातंत्र्यसैनिक, हिंदी प्रचार सभेत त्यांची नोकरी. मूळ आम्ही नाशिकचे. पण नोकरीनिमित्त वडिलांना औरंगाबादेत यावं लागलं. मग इथेच स्थायिक झालो. खऱ्या अर्थाने वृक्षप्रेमाचं रोपटं रोवल्या गेलं ते 1977 मध्ये. ‘पल्ल्वांकुर’च्या माध्यमातून. आमच्या आंगनातच नर्सरीची सुरुवात झाली. त्यावेळी कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. म्हणून तर आज या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झालंय. झाडांचा मॉल झालाय. त्यालाच आता कृषी पर्यटनाची जोडही मिळाल्याने वनप्रेमींना बारा बल्लुतेदार, लोकग्राम, वनभोजनाचा आनंद खऱ्या अर्थाने इथे मिळेल, अशी संकल्पनाही प्रत्यक्षात साकारली आहे. त्यात आम्ही यशस्वी झालोत. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत रमण्याचा हा परिसर असणार आहे. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. त्यातच पर्यटकांना आता कृषी पर्यटनाचे दालनही यामाध्यमातून खुले झाले आहे.

सर्व काही एकाच छताखाली

डोळ्यात स्वप्नं होतं, पण ते सत्यात उतरविण्यासाठी धडपडीशिवाय पर्याय नव्हता. सायकलवर रोपं विकली. सुरुवातीला एकरभरात रोपवाटिका सुरु झाली. आता त्याचे रुपांतर सहा एकरावरील रोपवाटिका, ट्री मॉलच्या स्वरुपात पाहावयास मिळतेय. आंगनात लागणाऱ्या सर्व बागकाम वस्तूंची विक्री याठिकाणी होतेय. अगदी गवत कापणाच्या यंत्रापासून ते तुळशी वृंदावन, रंगीत कुंड्या, क्ले-फॅब्रिक, म्युरल्ससह; फळ, फुलझाडांची निगा राखण्यासाठी अद्यावत साधनांबरोबरच, वृक्षलागवड कार्यक्रमात आवश्यक असणारी वृक्ष लागवडीच्या कीटपासून छोट्या-मोठ्या वृक्षांच्या रोपांपर्यंत. 50 रुपयांपासून ते हजारोंपर्यंतचे बागकाम साहित्य, फळ, फुलझाडे, वाचन साहित्यही याठिकाणी उपलब्ध आहे.

गुणवत्तेचा ध्यास

सहा एकरच्या रोपवाटिकेत तीन हजार प्रकारचे रोपं आहेत. जवळपास 5 लाख झाडांचा हा ‘ट्री मॉल’ आहे. तसा हा व्यवसाय जिकरीचाच. दररोज नवी दिशा, उमेद घेऊन व्यवसाय करावा लागतो. निसर्गावरच बरंचसं अवलंबून असतं. तरीही बदलत्या जगाबरोबर आधुनिकतेची कास आम्ही धरली. म्हणून रोप दर्जेदार असावं. गुणवत्तेत तडजोड नसावी, हाच आमचा आग्रह. त्याचबरोबर त्यासाठी त्याची निगा, हवामान, व्यवस्थापन याची योग्य काळजी आम्ही सर्वचजन घेतोत.

यशासाठी शासनाचे अनुदान महत्त्वाचे

शासनाच्या योजनांचा फायदाही आम्हाला रोपवाटिका व्यवसायासाठी झाला. त्यात विशेषत्वाने सांगायचे झाल्यास सहा एकरच्या परिसरात 10 आणि 05 गुंठ्यांवर दोन पॉलिहाऊस उभारलेत. तर 06 शेडनेटही आहेत. यासाठी कृषी विभागाकडून शासकीय अनुदान मिळाले. यशाची पुढची पायरी गाठण्यासाठी ते महत्त्वाचं होतं. आज रोपांच्या गुवत्तेमुळं दररोज एक हजार विविध जातींच्या रोपांची विक्री होते, यातूनच ग्राहकांचा पसंती मिळाल्याची पावतीही मिळते. 80 च्या दशकात मराठवाडा विकास महामंडळाकडूनही 2 हजार 200 रुपयांचे अनुदान मिळाल्याचं सुहास वैद्य सांगातात.

अन् कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली

विविध प्रकारची रोपं, झाडं यांची माहिती पुढच्या पिढीला व्हावी. पूर्वीची महत्त्वाची साधनं त्यांना कळावी. बारा बल्लुतेदार पद्धत कळावी. वनभोजनाचा आस्वाद त्यांना चाखता यावा. प्रात्यक्षिकातून ज्ञान मिळावे. निसर्गरम्य वातावरणात. प्रदूषणापासून दूर, अशा ठिकाणी कुटुंबाला वेळ घालवता यावा. निसर्ग संवर्धन चळवळ वृद्धींगत व्हावी, अशा दूरदृष्टीकोनातून ‘ट्री मॉल’ कार्य करतोय. नुसतेच कार्य करत नाही. तर त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीचं भानही वैद्य यांनी जपलंय. सुकृत आणि अभिधा यांच्या विवाहाप्रित्यर्थ असलेला आनंद सोहळाही हटकेच पार पाडला. लग्नानंतरच्या रिसेप्शन ऐवजी वनभोजनाचा आस्वाद त्यांच्या आप्तस्वकीयांसह, मित्र-मंडळींनी याठिकाणी घेतला. निसर्गाच्या सान्निध्यात पारंपरिक पद्धतीच्या कलाकृतींचा आनंद त्यांनी लुटला. बऱ्याच वर्षांपासून औरंगाबादेत असूनही एकमेकांना न भेटणाऱ्यांची भेट या सोहळ्यात झाली. दिवसभर त्यांनी ठिकठिकाणी हजेरी लावली. त्यांना आनंद, समाधान मिळाले. अगदी त्याचप्रकारे इथे येणाऱ्या पर्यटकांना समाधान मिळावे, असाच आमचा मानस आहे. म्हणूनच तर कृषी पर्यटनाची संकल्पना आम्ही सत्यात, प्रत्यक्षात उतरवत आहोत. औरंगाबादला येणाऱ्या प्रत्येकासाठी ती मेजवानीच असेल. त्याचबरोबर बच्चे कंपनीसाठी याठिकाणी पारंपरिक खेळांची साधनंही उपलब्ध करुन दिली आहेत. त्यात लगोरी, भोवरे, झोके, चंपूल, सागरगोटे आदी प्रकारच्या खेळांची देखील व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे सेल्फी पॉइंटही आजच्या काळाची गरज म्हणून विकसीत केले आहेत.

पाण्याचे व्यवस्थापन

मराठवाडा तसा दुष्काळानं होरपलेला. पण दुष्काळावर मात करावयाची असेल तर पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे. त्यातल्या त्यात रोपवाटिकेचा व्यवसायदेखील पाण्यावरच अवलंबून. म्हणून पाण्याचे योग्य नियोजन हा देखील यशातील महत्त्वाचा घटक. सुहास वैद्य यांनी परिसरात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण केले. या पाण्याचा वापर रोपांसाठी होतो. नियमित न चुकता वेळेवर रोपांना पाणी दिलं जातं. पण ते पाणी देखील फिल्टर केले जाते. त्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा त्यांनी उभारली. म्हणून शुद्ध पाणी रोपांना, झाडांना मिळतं. त्यामुळं ते टवटवीत राहतात. ग्राहकाच्या पसंतीला ते उतरतात.

पुढच्या पिढीला जागृत करण्याचे कार्य

औरंगाबादच्या निसर्ग संवर्धनात मोलाचा वाटा उचलणारे, शहरातील अधिकांश बगिचे सुशोभित करणारे, सिडकोच्या 32 सार्वजनिक बगिचांचा विकास करणारे, औरंगाबादेतील औद्योगिक कंपन्यांचा परिसर नेटाने हिरवागार करणारे, सामाजिक बांधिलकी जपत रोपवाटिका व्यवसायाला सन्मानाचं स्थान मिळवून देणारे सुहास वैद्य आहेत.

रोपवाटिकेला दरवर्षी 30 ते 35 शाळांची भेट होते. विद्यार्थ्यांना विविध रोपांची माहिती, ओळख, रोपनिर्मिती प्रक्रिया, तंत्रज्ञान समजण्यास मदत होते. पर्यावरण जागृतीपर माहितीपटही मॉलमध्ये दाखविला जातो. चिमुकली आल्याने मॉलचा परिसर लगबगून जातो. त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो, असे सुनीता वैद्य म्हणतात. पुढील पिढीने निसर्ग संवर्धनाबाबत अधिक जागृत व्हावं. पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे, असेही त्या म्हणतात. माझं क्षेत्र कृषी नसतानाही, सुहास वैद्य यांच्यामुळे मीही आता या व्यवसायात रमल्याचे त्या सांगतात. एकूणच सर्व कुटुंबाने या मॉलला झोकून देऊन व्यवसायात हव्या असणाऱ्या चिकाटी, ध्येयाचं उत्तम उदाहरण घालून दिल्याचे यातून दिसते.

नव उद्योजकांना यशाचा मंत्र

व्यवसाय मग तो काणताही असो. तो तुम्हाला मोठं करत असतो. पण व्यवसायाला मोठं करणं तुमच्या हातात असतं. ग्राहक आहेत. पण त्यांना हवं असलेलं दर्जेदार उत्पादन देण्याचा तुमचा ध्यास असावा. पण त्या करीताही तुमच्यात सर्वाधिक महत्त्वाचं आहे, ते परिश्रमाबरोबरच संयम असाही नवउद्योजकांना यशस्वी उद्योजक, वृक्षप्रेमी सुहास वैद्य यशाचा मंत्र देतात.

अशाप्रकारच्या निसर्ग संवर्धनाची चळवळ वृद्धींगत करणाऱ्या, वृक्ष लागवड मोहिमेत हातभार लावणाऱ्या, झाडांचा मॉल, कृषी पर्यटन केंद्राला एकदातरी भेट देणे उत्तमच.

लेखक : श्याम टरके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate