অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी !

लोकसहभागातून 16 दिवसात 5 हजार वनराई बंधाऱ्याची कामे पूर्ण लय भारी !

‘बहुतांच्या कामास यावे बहुतांच्या सुखी सुखावे’ या म्हणीप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने अवघ्या काही दिवसात लोकसहभाग व श्रमदानातून जिल्ह्यात हजार वनराई बंधारे पूर्णपणे बांधून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात इतिहास घडविला आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी.एस. देवकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या कामाचे गुपित मनमोकळेपणाने पुढील प्रमाणे मांडले...

मागील तीन ते चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती व पाणी टंचाईमुळे हाहाकार उडाला होता. परंतु या वर्षीच्या पावसाळा हंगामात परतीच्या दमदार पावसामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जिल्ह्यातील सर्व तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून पाणी वाया जात होते. वाया जाणारे पाणी ऐनवेळी अडविण्याचा एकच उत्तम उपाय म्हणजे वनराई बंधारे होय.

जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी.एस. देवकर म्हणाले, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या अध्यक्षतेखाली वनराई बंधारे बांधून पूर्ण करण्यासाठी नियोजनाची बैठक होऊन लघुपाटबंधारे विभागाने मॉडेल म्हणून प्रत्येक तालुक्यात कमीत कमी 10 बंधारे बांधावे व इतर विभागांना तांत्रिक मार्गदर्शन करावे असे ठरले. त्याप्रमाणे जून 2016 मध्ये सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता यांची पहिली बैठक होऊन त्यासाठी लागणारे सिमेंट व खताची रिकामी पोती तसेच नियोजित वनराई बंधारे जागेची निश्चिती व इतर आवश्यक साहित्य जमा करण्याचे नियोजन करण्यात आले. 2 ऑक्टोबर 2016 रोजी या वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ होणार होता परंतू 1 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे प्रत्येक नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे तो कार्यक्रम पूढे ढकलून 16 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, कर्मचारी यांच्या उपस्थितीत घाटंग्री ता. उस्मानाबाद येथे लोक सहभाग व श्रमदानातून बंधाऱ्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्याच दिवशी वनराई बंधारे कामाचा शुभारंभ करुन एकाच दिवशी दि. 16 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार सहासष्ठ वनराई बंधाऱ्यांची कामे लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली. दि. 17 ऑक्टोबर 2016 ते 31 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्ह्यात दोन हजार अठ्ठावन्न वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. म्हणजेच दि. 16 ऑक्टोबर 2016 ते 31 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्ह्यात अवघ्या 16 दिवसात 5 हजार एकशे चोवीस वनराई बंधारे पूर्ण करुन 300 द.ल.घ. फूट म्हणजे 900 कोटी लिटर पाणीसाठा निर्माण करण्यात आला. या पाणी साठ्यामुळे जिल्ह्यात जवळ जवळ 300 हेक्टर जमिन क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होऊन त्या त्या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा कांही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. शासकीय दराने या वनराई बंधाऱ्यांची अंदाजे किंमत रु. 1 कोटी होते. जिल्ह्यात 1 कोटी रुपये किंमतीचे काम जिल्हा परिषदेमार्फत लोकसहभाग व श्रमदानातून शासनाचा एक रुपयाही न घेता पूर्ण करण्यात आले.

या वनराई बंधाऱ्यांच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमधील सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, सर्व कर्मचारी, प्राथमिक/माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक/शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, अंगणवाडी सेविका, बालगोपाळ, त्या-त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, शेतकरी या सर्वांनी श्रमदान केल्यामुळेच एवढे मोठे प्रचंड काम होऊ शकले. हा एक जागतिक विक्रम म्हणावा लागेल. याची नोंद फक्त जिल्हा बुक मध्येच नाही तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशी जिल्हा परिषदेची आग्रहाची विनंती आहे.

या अगोदर सन 2014 मध्ये 2 ऑक्टोबर 2014 रोजी 1213 व 3 ऑक्टोबर 2016 ते 10 ऑक्टोबर 2014 पर्यंत 1442 असे एकूण 2 हजार 655 वनराई बंधारे श्रमदानातून बांधले होते. यांची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. अशा प्रकारे या जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड याच जिल्हा परिषदेने मोडून यावर्षी फक्त 16 दिवसात 5 हजार 124 वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हाच उपक्रम प्रत्येक वर्षी सुरु राहिला तर हा जिल्हा टँकर मुक्त पाणी टंचाईमुक्त होऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे व बळीराजाचे जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही. या सर्व वनराई बंधाऱ्यांच्या कामाला जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने लोकसहभागातून श्रमदानाला उपमा द्यावयाची असेल तर एकच शब्द आहे तो... लयभारी...!

लेखक  - आश्रुबा नामदेव सोनवणे
जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद

स्त्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate