অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसहभागातून मेडसिंगा पॅटर्न

लोकसहभागातून मेडसिंगा पॅटर्न

गावतलावातील गाळ उपशासह शेतशिवारात बांधबंदिस्ती, बंधाऱ्यांची दुरुस्ती
27 विहिरी, 32 बोअरच्या पाणीपातळीत वाढ

लोकसहभागाने परिपूर्ण जलसंधारणाचा "मेडसिंगा पॅटर्न' उस्मानाबाद जिल्ह्यात नावारूपास आला आहे. त्याचीच परिणिती म्हणून मेडसिंगा गावातील 27 विहिरी, 32 बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. परिसरातील एक हजार हेक्‍टरवरील पिकांसाठी पाण्याचा शाश्‍वत स्रोत तयार झाला.


उस्मानाबाद तालुक्‍यातील मेडसिंगा हे 2700 लोकवस्तीचे गाव. पाऊस हाच काय तो पाण्याचा एकमेव स्रोत. सुमारे 1200 हेक्‍टरपर्यंत गावचे शेतीक्षेत्र. ऊस, सोयाबीन, हरभरा, तूर, ज्वारी पिकांसह आंबा, अंजिराच्या बागाही गावात आहेत; पण सर्वाधिक क्षेत्र उसाचे. रुईभर प्रादेशिक नळ पाणी योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळायचे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कधी पाण्याचा, कधी विजेचा तर कधी तांत्रिक अडचणींचा अडथळा पुरेसे पाणी मिळण्यामध्ये येऊ लागला. शेतीच्या पाण्याची स्थिती त्याहून बिकट झाली. सगळ्या संकटांवर मार्ग सापडला जलसंधारण कामांतून. काही सकारात्मक घडवायचे असा निश्‍चय गावकऱ्यांनी केला. त्याला कृषी सहायक ए. एल. जाधव यांनी साथ देत जलसंधारणाच्या विविध योजनांची माहिती दिली. सरपंच रघुराम आगळे व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने कामांना सुरवात झाली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला

रुईभर योजनेच्या पाण्यावर अवलंबून न राहता गावात ग्रामपंचायतीने दोन बोअर घेतल्या. त्यावर विविध भागांत प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेच्या चार टाक्‍या बांधल्या. त्याला नळाची सोय करून पाणीपुरवठा सुरू केला. दोन बोअर गाव तलाव कार्यक्षेत्रात आहेत. गाळामुळे अत्यंत कमी पाणी तलावात साठायचे. एकात्मिक पाणलोट योजनेतून गाळ उपसा काम सुरू झाले. गावकरी श्रमदानासाठी पुढे आले. बघता-बघता जवळपास 10 हजार 500 घनमीटर गाळाचा उपसा झाला. त्याचे परिणाम समोर आले. पावसामुळे पाणी साठले. पूर्वी दीड मीटरपर्यंत असलेली पाणीपातळी तीन मीटरपर्यंत वाढली. ग्रामपंचायतीने पाण्यासाठी घेतलेल्या बोअरलाही पाणी टिकून आहे. आज जुलै महिना उजाडला. मात्र पाण्याची टंचाई नाही, कोणता टॅंकर नाही, हातपंपही पुरेशा दाबाने सुरू आहेत.

वाढला शेतीसाठीच्या पाण्याचा स्रोत

गावच्या बाजूने जुना ओढा आहे. त्यात पूर्वी जवळपास 16 सिमेंट बंधारे बांधले आहेत. मात्र ते नादुरुस्त होते. त्यांची दुरुस्ती केली. गाळ काढण्यात आला. त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी संधारण अभियानातून निधी उपलब्ध झाला. बंधाऱ्याचे बांधकाम आणि ओढ्याच्या खोलीकरणामुळे सुमारे 64 टीसीएम पाणी साठवण क्षमता तयार झाली, त्यामुळे भागातील शेतीसाठीच्या पाण्याचा स्रोत वाढला. गावच्या चोहोबाजूंनी हे बंधारे असल्याने गाव परिसरातील सुमारे एक हजार हेक्‍टर शेतीक्षेत्राला त्याचा लाभ होत आहे.

शेतकऱ्यांनी केली बांधबंदिस्ती

गावतलाव आणि सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या थोड्या पावसानेही यंदाच्या जुलैपर्यंत त्याचा परिणाम जाणवला आहे. आज विहिरींची पाणीपातळी टिकून आहे. पाणी अडवण्याचे महत्त्व कळल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतशिवारात बांधबंदिस्ती केली आहे. समपातळीतील चर खोदून आवश्‍यक ठिकाणी पाणी अडवले आहे. अधिकाधिक पाणी साठेल, मुरेल अशी व्यवस्था केली आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे पाणी त्याच्याच शेतात अडते. गावातील सुमारे 950 हेक्‍टर क्षेत्रावर बांधबंदिस्तीची कामे झाली आहेत.

तलावासह बंधाऱ्यात पुनर्भरणाची प्रक्रिया

गावच्या तलावासह बंधाऱ्यात "रिचार्ज शाफ्ट' घेण्यात आले. ज्या तलावामध्ये स्वतंत्र जागी 13 बाय 7 बाय 2 मीटरचा खड्डा घेतला, त्याच्या आतमध्ये पुन्हा दोन बाय दोन फुटाचा खड्डा घेण्यात आला. ज्यामध्ये 70 फूट अंतरापर्यंत बोअर घेण्यात आले. त्यात 14 फूट अंतरावर प्रत्येक इंचावर छिद्र असणारा पाइप सोडण्यात आला. त्याला काथ्या गुंडाळून तो खड्ड्यात सोडण्यात आला. पाइपच्या बाजूने नदीतील दगडगोटे टाकण्यात आले, जेणेकरुन पाण्याच्या पुनर्भरणाची प्रक्रिया होऊन, पाणी टिकून राहील, असा उद्देश ठेवला. गावतलावात एक आणि सिमेंट बंधाऱ्यात चार अशा पाच ठिकाणी हा प्रयोग केला.

पाणीपातळीत वाढ

जलसंधारणाच्या विविध प्रयोगांमुळे आज गाव परिसरातील सुमारे 27 विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. उन्हाळ्यात कायम दीड-दोन मीटरपर्यंत असणारी पाणीपातळी यंदा जुलैत अद्याप पाऊस नसतानाही पाच मीटरपर्यंत टिकून आहे. 32 बोअरच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी दोन तास चालणारे वीजपंप आज चार तासांपर्यंत चालतात.

पाणीक्षमता वाढली

गावतलाव, सिमेंट बंधारे, बांधबंदिस्ती आणि जलसंधारणाच्या प्रयोगांमुळे तलावात 10.5 टीएमसी, बंधाऱ्यांत 64 टीएमसी, बांधबंदिस्ती व अन्य कामांतून 428.85 टीएमसी अशी एकूण 503.35 टीएमसी पाणीपातळी वाढली. ग्रामस्थांच्या धडपडीला तत्कालीन जिल्हाधिकारी के. एन. नागरगोजे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी संजय जाधव, मंडल कृषी अधिकारी जी. व्ही. सस्ते, कृषीपर्यवेक्षक आर. बी. पाटील, कृषी सहायक ए. एल. जाधव आदींनी साथ दिली. एकात्मिक पाणलोट विकासासह महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान आदी योजनांतून सुमारे 80 लाख 76 हजार रुपयांचा निधी खर्ची पडला.

मेडसिंगा पॅटर्नमधील ठळक कामे-

 1. शेतकऱ्यांकडून शेतशिवारात बांधबंदिस्ती
 2. जमिनीच्या उतारानुसार समतल चरी
 3. अधिकाधिक पाणी शेतात साठेल-मुरेल यासाठी विविध प्रयोग
 4. गावतलावातील गाळ काढणे, सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती

  सामाजिक उपक्रमांत अग्रेसर

  मेडसिंगा गावाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे बक्षीस पटकावले आहे. स्वच्छतेबाबतही कायम आग्रही राहताना परिसरात सुमारे सहा हजार विविध वृक्षांची लागवड केली आहे. गावातील तरुण तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी वाचनालय सुरू केले आहे. त्यात "ऍग्रोवन'सह अन्य दैनिके, पुस्तके व साहित्य उपलब्ध आहे. अद्ययावत व्यायामशाळा आहे.

  कृषी विभाग व लोकसहभागामुळे आम्ही जलसंधारणाची कामे करू शकलो. आज गावात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

  रघुराम आगळे, सरपंच, मेडसिंगा
  माझ्या पंधरा एकर शेतात ऊस, सोयाबीन आहे. यंदा विहिरीची पाणीपातळी वाढली आहे. दर वर्षी तास-दीड तास चालणारा वीजपंप आज चार तास चालतो.
  विनोद लांडगे, शेतकरी, मेडसिंगा
  माझ्या 14 एकर शेतीत तीन एकर ऊस आहे. दोन बोअर आहेत. त्यांची पाणीपातळी वाढली आहे.
  बळीराम रोहिले, शेतकरी, मेडसिंगा, ता. जि. उस्मानाबाद
  संपर्क -
  रघुराम आगळे - 9881519635
  (सरपंच)
  ए. एल. जाधव - 9420158888
  (कृषी सहायक)

  स्त्रोत: अग्रोवन  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate