অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घडली किवळमध्ये जलक्रांती

किवळ (ता. कराड, जि. सातारा) गावाने लोकसहभागातून विविध विभागांच्या योजना राबवत जलसंधारणाचे विविध उपाय राबवले. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरग्रस्त असलेले किवळ गाव टॅंकरमुक्त झाले. शेती बारमाही झाली. खोल समतल चरी, शेतांची बांधबंदिस्ती, साखळी पद्धतीने माती व सिमेंट नालाबांध, साठवण तलावांच्या माध्यमातून गावालगतच्या डोंगरउतारावरील क्षेत्रात जलस्रोत बळकटीकरण झाले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद फुलला आहे.
कराड शहरापासून उत्तरेस सुमारे 19 किलोमीटरवर तिन्ही बाजूंनी डोंगररांगांलगत किवळ हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. पावसाळ्यात जे पाणी पडेल व अडेल तोच काय तो गावाला पाण्याचा स्रोत. गावाची तालूक्‍याच्या कृषी व महसूल विभागाकडे दुष्काळी गाव म्हणून नोंद होती. सिंचनाची मोठी सोय नाही. गावाचे एकूण क्षेत्र एक हजार 704 हेक्‍टर आहे. खरिपात ज्वारी, सोयाबीन, तर रब्बीत ज्वारी, गहू व काही क्षेत्रावर हरभरा ही पीक पद्धत आहे. गावात विहिरीद्वारा लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. गेल्या तीन वर्षांत सलग दोन वर्षे गावाला टॅंकरने पाणी मिळत होते. पाण्याअभावी उसाचे क्षेत्र घटले होते.

लोकसहभागाचे चळवळीत रूपांतर

सततच्या टंचाईस्थितीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याचा गावकऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतला. तानाजीराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदाऱ्या पेलण्याचे ठरवले. लोकसहभाग वाढविण्यासाठी सुरवातीला ग्रामदैवत संत श्री नावजीनाथ व कुलदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरासाठीचा 50 लाख रुपये निधी लोकवर्गणीतून उभारण्यात आला. यातून लोकसहभागाचे चळवळीत रूपांतर झाले. गावातील लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांसाठी जिल्ह्यातील जलसंधारणाचे काम झालेल्या निढळ व लोधवडे येथे सहलींचे आयोजन केले.

व्यापक प्रमाणात बांधबंधारे

जलसंधारणाच्या कामात प्रारंभी गावच्या डोंगरउताराला पडीक क्षेत्रात जवळपास 212 हेक्‍टर क्षेत्रावर खोल समतल चरींचा उपाय घेण्यात आला. त्यानंतर वहिती क्षेत्रावर जवळपास 625 हेक्‍टर क्षेत्राची बांधबंदिस्ती (कंपार्टमेंट बंडिंग) करण्यात आली. यातून चळवळीने व्यापक रूप धारण केले. गावकऱ्यांनी कृषी व जलसंधारण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे या कामी लागणाऱ्या निधीची मागणी करण्यात आली. परिणामी, 45 मातीनाला बांध व 20 सिमेंट नालाबांधांची साखळी पद्धतीने उभारणी करता आली. त्याचबरोबर महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत जुन्या 13 मातीनाला बांधांतील गाळ काढून सुमारे शंभर एकर पडीक क्षेत्र वहितीखाली आणता आले. कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा फुले जलभूमी अभियान व साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे उभारण्याचा कार्यक्रम, तसेच जलसंधारण विभागाची एकत्रित सांगड या उपक्रमात घालण्यात आली.
अशा प्रकारे कायम दुष्काळी किवळ गावालगत जलसंधारण बळकटीकरणासाठी घेतलेल्या उपायांमुळे 254 टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा कृषी व लघुसिंचन विभागामार्फत करणे शक्‍य झाले. भूजल पातळीत तीन मीटरनी वाढ झाली. यामुळे 20 नवीन व 50 जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात 350 मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याने विहिरींची पाणीपातळी वाढली. त्यामुळे यंदा हे गाव टॅंकरमुक्त झाले. शेतीत आठमाहीऐवजी बारमाही पीक पद्धत रूढ झाली. ग्रामस्थांच्या धडपडीला जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शरद दोरगे, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले, तत्कालीन उंब्रज मंडल कृषी अधिकारी आर. एस. शेळके व सहकाऱ्यांनी साथ दिली.

रिचार्ज शाफ्ट तंत्रज्ञानाचा घेतला आधार

यंदाच्या उन्हाळ्यात गावाला पाणीटंचाई जाणवू नये. याकरिता भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने मातीनाला बांधांजवळ विहिरीमध्ये दोन व नालाबांधांमध्ये चार रिचार्ज शाफ्ट घेतले. याचा परिणाम असा झाला, की यंदाच्या उन्हाळ्यात परिसरातील गावांत कितीही पाणीटंचाई असली तरी किवळला मुबलक पाणी मिळेल, असा दृढ विश्‍वास झाला. त्या पद्धतीने पाणीटंचाईचा धोका उद्‌भवला नाही.

जलसंधारण कामांतील ठळक नोंदी

  • पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करण्यासाठी कृषी विभागातर्फे शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी जनजागृती
  • सातार जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांचे "पाणी वाचवा, गाव वाचवा" या विषयावर गावकऱ्यांसाठी मार्गदर्शन
  • जळगाव येथील जैन उद्योग समूह, सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी, आष्टा, कासेगाव व सातारा जिल्ह्यातील शिरढोण व धावडशी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अभ्यास सहली.
  • सुमारे 500 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब
  • पाण्याच्या उपलब्धीमुळे ऊस, केळी पिकाखालील क्षेत्र वाढले. 50 एकरांवर नव्याने डाळिंब लागवड
  • जलसाक्षरतेची गोडी रेंगाळत ठेवण्यासाठी गावात ठिकठिकाणी पाण्याचे महत्त्व सांगणारे फलक उभारले.
  • किवळची जलक्रांती पाहण्यासाठी आतापर्यंत राज्यभरातील 100 सहलींच्या माध्यमातून सुमारे पाच हजार शेतकरी, तसेच मंत्री व संबंधित विभांगातील वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन झालेल्या कामांबाबत कौतुक केले.

लोकसहभागातून उभारलेला जलसंधारणामधील किवळ पॅटर्न राज्याला दिशादर्शक आहे. जानेवारी 2013 मध्ये जलसंधारणाचे काम पाहण्यासाठी लोधवडे गावाला आम्ही ग्रामस्थांनी भेट दिली. आता आमच्याच गावाला राज्यभरातून लोक येत आहेत, हेच आमच्या कामाचे सार्थक आहे.
सुनील साळुंखे - 9403347710
उपसरपंच, किवळ

पूर्वी दर वर्षी जानेवारीपर्यंत विहिरींतील पाणी शेतीसाठी मिळायचे. गेली दोन-तीन वर्षे समाधानकारक पाऊसही झालेला नाही, परंतु पाणी अडवण्याची कामे प्रभावीपणे झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात विहिरी काठोकाठ भरल्या होत्या. याआधारे मी ऊस व डाळिंब पिकाचे नियोजन केले. आंबा, सोयाबीन, मका पिकासाठी उपलब्ध पाण्याचा संरक्षितपणे वापर करत आहे.


कृष्णात यशवंत साळुंखे - 9850763140 शेतकरी

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate