অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वकिलाने दिला शेतीला न्याय !

ममुराबाद (जि. जळगाव) येथील ऍड. अरुणकुमार मुंदडा यांनी शेतीमधील अडचणींवर मात करीत विकासाच्या दिशेने पावले टाकली आहेत. वकिली व्यवसाय सांभाळत योग्य पीकनियोजन आणि उत्पादनखर्च कमी करून जिरायती शेतीतूनही किफायतशीर उत्पन्न घेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.

जळगाव शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वसलेल्या ममुराबाद गावात पूर्वीच्या काळी पन्नास ते शंभर एकर शेती बाळगणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मुंदडा कुटुंब त्यांपैकीच एक. या कुटुंबातील धोंडूराम मुंदडा यांच्याकडे तब्बल 54 एकर शेती. विहिरीसह अन्य कोणतीही सिंचन सुविधा नसताना निव्वळ पावसाच्या ओलीवर खरिपासह रब्बी, असे दोनही हंगाम ते आरामात घ्यायचे. दुर्दैवाने आजारी पडल्याने शेतीची सर्व जबाबदारी त्यांनी एकुलता मुलगा अरुणकुमार यांच्या खांद्यावर टाकली. बीए., एल.एल.बी.चे शिक्षण घेऊन नुकतेच कुठे वकिली व्यवसायात रमलेल्या ऍड. मुंदडा यांना शेतीच्या व्यवस्थापनाबाबत फार काही माहीत नव्हते. काका लक्ष्मीनारायण मुंदडा यांच्यासोबत सुटीच्या दिवशी मारलेला फेरफटका, एवढाच काय तो शेतीशी संबंध. अशा परिस्थितीत दोन-चार एकर नव्हे, तर सुमारे 54 एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळणे वकील साहेबांसाठी तारेवरची कसरतच होती. अर्थात, काकांनी पाठीवर हात ठेवून हिंमत दिली. वेळप्रसंगी पीकपेरणीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत सर्वतोपरी मार्गदर्शन केले. काकांच्या तालमीत ऍड. मुंदडा यांना अस्सल शेतकरी बनण्यास फार उशीर लागला नाही.

अडचणींनी दाखविला मार्ग....


साधारणतः 1984 च्या काळात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असताना ऍड. मुंदडा आपल्या शेतीत खरीप हंगामामध्ये कपाशी, उडीद, मूग, तीळ आणि रब्बी हंगामामध्ये दादर ज्वारीसारखी पिके मोठ्या प्रमाणात घ्यायचे. वकिली सांभाळून शेतीकडे लक्ष देताना होणारी रोजची ओढाताण नंतर त्यांच्या अंगवळणीच पडली. न्यायालय रविवारी बंद असताना घरी आरामात दिवस घालविण्याऐवजी त्या दिवशी मजुरांच्या बरोबर थांबून दिवसभर शेतीकामे उरकण्यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. हंगामाच्या दिवसात रोज सकाळी लवकर उठून ममुराबाद गावी जाऊन सालदारासह शेतमजुरांना शेताकडे रवाना करण्याची, सगळी कामे उरकून पुन्हा दहा वाजेपर्यंत न्यायालयात पोचण्याची धावपळ त्यांना करावी लागायची.
मजूरटंचाईशी दोन हात करताना स्थानिक शेतकऱ्यांची दमछाक होते, त्यातून ऍड. मुंदडा यांनाही सूट मिळाली नाही. सायंकाळी होकार देणारे शेतमजूर दुसऱ्या सकाळी कामावर येतील की नाही त्याची शाश्‍वती न राहिल्याने, शेतीची कामे खोळंबण्याचे प्रकार वाढले. त्यावर उपाय म्हणून मग त्यांनी ट्रॅक्‍टर घेतला. त्यामुळे मळणीसह धान्याची वाहतूक व उन्हाळी नांगरटीचे कामसुद्धा सोपे झाले. काही कारणास्तव त्यांनी यंदा ट्रॅक्‍टर विकला असला, तरी शेती मशागतीसाठी दोन बैलजोड्या बाळगल्या आहेत. एक सालदार व रोजंदारी मजूरसुद्धा ठेवला आहे. दर वर्षी 20 एकरांवर कापूस, उडीद 15 एकर, तीळ सात एकर आणि राहिलेली जमीन खरिपात पडीक ठेवून रब्बीमध्ये ज्वारी लागवड, असे पीक लागवडीचे त्यांचे नियोजन असायचे. कापसाचे एकरी चार क्विंटल, रब्बी ज्वारीचे चार क्विंटल, उडीद, मुगाचे अडीच क्विंटल अशी त्यांची पीक उत्पादनाची सरासरी असते.

उडीद- दादर ज्वारीचा पॅटर्न....


जिरायती शेतीत विविध पिके घेतल्यानंतर मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर ऍड. मुंदडा यांनी सलग कपाशी लागवडीचा प्रयोगदेखील अनेक वेळा केला. एकरी चार क्विंटल प्रतिएकरी कापसाचे उत्पादनही घेतले. मात्र, अनियमित पाऊस व कापूसवेचणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याच्या स्थितीत त्यांनी शेवटी पीक पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. त्यातून खरिपात उडीद- मुगासारखी कमी कालावधीची पिके घेऊन, रब्बी हंगामात दादर ज्वारीचे पीक घेण्यावर भर दिला. परिणामी, कमी कालावधीत व कमी खर्चात दोन हंगामांपासून चांगले शेती उत्पन्न मिळू लागले. विशेषतः दादर ज्वारीचे पीक त्यांच्यासाठी सर्वाधिक किफायतशीर सिद्ध झाले. नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामातही त्यांनी 37 एकरांवरील शेतीत दादर ज्वारीचे पीक घेतले. त्यातून त्यांना प्रतिएकरी चार क्विंटलच्या हिशेबाने सुमारे 200 क्विंटल ज्वारी आणि सुमारे 3,500 पेंड्या कोरडा कडबा मिळाला. ज्वारी 1200 ते 1700 रुपये प्रतिक्विंटल या दराने विकली जाते. तसेच 3500 रुपये शेकडा या दराने कडबाविक्री होते. धान्यासह चाऱ्याच्या विक्रीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. घरच्या जनावरांपासून त्यांना वर्षभरात 25 गाड्या शेणखत मिळते. हे सर्व शेणखत न विकता स्वतःच्या शेतीमध्ये ते वापरतात. पिकांना माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांची संतुलित मात्रा दिली जाते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहते, त्याचबरोबरीने जमिनीची सुपीकता टिकून राहिली. शेतात विहीर नाही, पूर्ण पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. त्यामुळे जल-मृद्‌ संधारणावर त्यांचा भर असतो.

मुले- मुली वकिली व्यवसायात....


वकिली व्यवसाय सांभाळून शेतीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणाऱ्या आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन ऍड. मुंदडा यांचा मुलगा सागर हासुद्धा एल.एल.बी.चे शिक्षण घेऊन वकील बनला आहे. याशिवाय त्यांच्या दोन मुलींनी वकिली व्यवसाय निवडला आहे. मुलगा सागर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अधूनमधून शेतीकडे फेरफटका मारत असतो. त्यालासुद्धा शेतीची आवड निर्माण झाली आहे.

उन्हाळी सुटी शेतातच....


दर वर्षी मे महिन्यात जिल्हा न्यायालयास सुटी असते. त्या काळात वकील मंडळींची सुट्टीवर जाण्याची लगबग असते; मात्र, ऍड. मुंदडा संपूर्ण उन्हाळी सुटी आपल्या शेतीत घालवितात. सुटीचा फायदा घेऊन नांगरटीसह पेरणीपूर्व मशागत, बांधबंदिस्तीची काम करून घेतात. त्यांच्याप्रमाणे शेतीत रस असलेल्या वकील मित्रांशी आपले अनुभव सांगतात. पुढील हंगामाचे नियोजन करीत बियाण्यासह अन्य कृषी निविष्ठांची व्यवस्था आधीच लावतात. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत ते अगदी निवांत राहतात. यंदाच्या उन्हाळी सुटीतही ते शेतीकामांमध्ये व्यस्त आहेत. "निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानंतर, अंगातून घामाच्या धारा निघाल्यानंतर प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहते; डॉक्‍टरकडे जाण्याची कधी गरज भासत नाही, असे ते सांगतात.

शेतीचा पैसा शेतीच.....


ऍड. मुंदडा यांनी शेतीसाठी वर्षभर लागणाऱ्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी बॅंकांसह गावातील सोसायटीकडून आजतागायत कधी कर्ज काढलेले नाही. शेती उत्पन्नातून खर्च वजा जाता शिल्लक राहिलेला पैसा ते हंगामापूर्वीच बॅंकेत जमा करून ठेवतात. वेळोवेळी गरजेनुसार पैसे काढतात. ऐन वेळी पैसे नाहीत म्हणून कामे रखडत नाहीत किंवा कोणापुढे हात पसरण्याची पाळी येत नाही. साधारणतः दीड लाख रुपयांची तरतूद दर वर्षी ते करतात.

नवीन तंत्राचा सातत्याने अभ्यास

1) प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांची पीक नियोजनाबाबत चर्चा. दररोज ऍग्रोवनचे वाचन.
2) कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून नवीन जातींची माहिती, त्यानुसार पीकनियोजनावर भर.
3) परिसरातील कृषी प्रदर्शनांना भेटी, त्यातून नवीन तंत्राचा अभ्यास
4) सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर, एकात्मिक पद्धतीने रासायनिक खतांची मात्रा.
5) जमा-खर्चाचा हिशेब ठेवला जातो, त्यातून पुढील वर्षाचे नियोजन.

संपर्क : ऍड. अरुणकुमार मुंदडा ः ९४२२२७८९७१

------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate