অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनउपजातून गडचिरोलीत आर्थिक समृद्धी

वनउपज गडचिरोली जिल्ह्याच्या अर्थकारणाची नाड ठरली आहे. भुमिहीनांपासून ते जमीनदारांपर्यंत सर्वांच्या उपजीविकेची सोय या माध्यमातून होते. या भागात केवळ धानासारखी एकच पीकपद्धती असल्याने उर्वरित काळात वनउपज हाच आर्थिक स्त्रोत ठरतो. जून महिन्यात अवघा 15 ते 20 दिवसाचा हंगाम असलेल्या जांभूळाच्या विक्रीतून देखील लक्षावधी रुपयांची उलाढाल येथे होते.

गडचिरोलीतील जांभूळ क्षेत्र

राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे. तेंदूपत्ता, मोहफुले त्यासोबतच जांभूळ संकलन हे या भागात टप्याटप्याने होते. जुनच्या पहिल्या आठवड्यात जांभळाचा हंगाम सुरु होतो. 100 ला 25 या प्रमाणात जांभळाची झाडे जंगलात पहावयास मिळतात, अशी माहिती साले नंबर एक (ता. कोरची) येथील रहिवासी झाडूराम इलामे यांनी दिली.

आदिवासींचा अनुभव

झाडूराम सलामे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यातील 3 एकरावर धान (भात) लागवड तर उर्वरित क्षेत्र पडीक आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला घरच्यापूरता घेण्यावर भर राहतो. 3 एकरातून 200 पोत्याची (40 किलो प्रत्येकी एक पोते) उत्पादकता मिळते. खरीप हंगामात 40 रुपये किलो प्रमाणे मोहाफुलाची विक्री होते. पहाटेच ती फुले पडतात. त्यामुळे सकाळी चार वाजता उठून जंगलात जावे लागते. त्यामुळे साऱ्यांचीच लगबग पहाटेच जंगलात जाण्याची राहते. मार्च महिन्यात मोहाफुलचा हंगाम राहतो. मे महिन्यात तेंदूपत्त्याचा 15 दिवसाचा हंगाम राहतो. खरीप हंगामात एकदाच धानाचा हंगाम या भागात घेतला जात असल्याने वनउपजाच्या विक्रीतूनच वर्षाची आर्थिक सायकल फिरते. वनउपजाचा हंगाम नसलेल्या काळात रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे लागते. गत काही वर्षात पाऊसमान कमी झाल्याने उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला आहे. हंगामात 90 ते 100 क्रेट जांभूळ एक कुटूंब गोळा करते. जांभळापासून हंगामात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या परिणामी शेतकऱ्यांनी आता बांधावर देखील जांभळाच्या लागवडीवर भर दिला आहे.

जांभळाचा असा आहे हंगाम

जून महिन्यात जांभळाचा हंगाम असतो. फांद्याकडील भागात असलेले जांभूळ तोडण्यासाठी त्रिपाल (साड्यांचा वापर करुन तयार केलेली जाळी) चा वापर होतो. त्रिपालमध्ये वरच्या बाजूस असलेली जांभळे विळा बांधलेल्या बांबूच्या सहाय्याने तोडत ती त्रिपाल मध्ये जमा केली जातात. जमिनीवर जांभळे पडून ती खराब होऊ नयेत याकरीता ही खबरदारी घेतली जाते. मालाच्या तोडणीनंतर त्याच ठिकाणी ग्रेडींग करण्यावर भर राहतो. कुटूंबातील सगळ्या सदस्यांची उपस्थिती येथे राहते. त्यामुळे ग्रेडींगचे काम सोपे होते. याच फळांच्या विक्रीतून कुटूंबाच्या गरजा भागणार असल्याने हे करावेच लागते. घरातील मुलांचे शिक्षण, किराणा व इतर साहित्य खरेदीकरीता पैशाची सोय यातूनच होते. विशेष म्हणजे जांभळाची झाडे जंगलातच असल्याने त्यावरील व्यवस्थापनावर कोणत्याच प्रकारचा खर्चही आदिवासी शेतकऱ्यांना करावा लागत नाही.

जांभळाची बाजारपेठ

गडचिरोलीतील जांभळाला राजाश्रय मिळावा या उद्देशाने केव्हीके सोनापूर (गडचिरोली) च्या वतीने जांभूळ महोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून होते. शेतकरी व भुमिहीनांना जांभळाची विक्री नागपूरातील व्यापाऱ्यांनाच करावी लागते. एका गाडीत 150 ते 200 क्रेट राहतात. कोरची तालुक्‍यातून हंगामात 20 गाड्या जातात. एकाच दिवशी अधिक माल बाजारपेठेत पोचल्यास 200 रुपये क्रेटचा दर राहतो. मालाची आवक कमी राहिली तर एक हजार ते पंधराशे रुपये प्रती क्रेटचाही दर मिळतो, असा अनुभव असल्याचे झाडूराम इलामे सांगतात. आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने जांभूळाला मागणी अधिक राहते. जांभूळ हंगामाच्या सुरवातीला अधिक दराचा अनुभव घेतल्याचे झाडूराम यांनी सांगितले. जांभळाच्या 15 ते 20 दिवसाच्या हंगामात एक भुमिहीन कुटूंब 15 ते 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविते. 1 ते 2 गाव मिळून एका वाहनातून क्रेटवर नाव लिहून तो माल नागपूरच्या मार्केटमध्ये पाठविला जातो. वाहनासोबत गावातील एक ते दोन व्यक्‍ती राहतात. विकल्यानंतर पट्टीवरील नोंदीनुसार संबंधितांना पैसे दिले जातात. क्रेटनुसार वाहतूकीचा खर्च वसुल केला जातो. कुटूंबातील अनेक सदस्य शेतीत राबतात. त्यामुळे पैसे कमी मिळाले तर प्रत्येकाच्या वाट्याला केवळ 35 ते 40 रुपयेच येतात. परिणामी जास्त दराने तो विकल्या जावा, अशी अपेक्षा असते. झाडूराम सोबतच साले नंबर 1 मधील रामदास इंद्रु कुमरे, संकर सुपरेल गोट्टा, चमरू दिनकू होडी, इंजमसाय सन्नु काटेंगे यांच्याद्वारे देखील हंगामात जांभूळ तोडणीचे काम होते.

केव्हीकेने दिले प्रक्रीया उद्योगाचे बळ

केव्हीके सोनापूर येथील गृहविज्ञान शाखेच्या योगीता सानप यांनी जांभळाचे मुल्यवर्धन करण्याकरीता पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून या फळाला दोन पैसे अधिक मिळतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. जांभूळ ज्युस व पल्प त्यांच्याद्वारे तयार होतो. 2 किलो जांभळापासून एक लिटर ज्युस तयार होतो. जांभळाच्या मुल्यवर्धीत उत्पादनांसाठी केव्हीके सोनापूरच्या वतीने 3 पेटंट ही दाखल करण्यात आल्याची माहिती योगीता सानप यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाने देखील जांभळाचे मुल्यवर्धीत उत्पादनाच्या विक्रीसाठी अनेकदा अशाप्रकारच्या महोत्सवाचे आयोजनावर भर दिला आहे.

आवकनुसार असतो दर

नागपूरच्या महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी महम्मद गौस यांनी दिलेल्या माहितीनुसार मालाची आवक दरावर परिणाम करणारा घटक ठरतो. नागपूरात हातठेल्यावर फिरून जांभळाची किरकोळ विक्री करणाऱ्यांची संख्या जवळपास दोन हजारावर आहे. किरकोळ विक्रीचा दर साधारणतः 55 ते 60 रुपये किलो राहतो. बाजारात हंगामात दररोज सरासरी 25 ते 30 हजार क्रेटची आवक होते. त्यामध्ये गडचिरोलीसह छत्तीसगड व आंधप्रदेश मधून येणाऱ्या मालाचा देखील समावेश राहतो. छत्तीसगडमधून येणाऱ्या मालावर रासायनिक प्रक्रीया केली जात असल्याने तेथील जांभळाचा आकार हा तुलनेत अधिक राहतो. त्यामुळे या मालाला अधिक मागणी राहते. 20 किलोच्या क्रेटची खरेदी सरासरी 500 ते 800 रुपयांना होते.

-------
झाडूराम इलामे
9404919751
रा. साले नंबर 1, ता. कोरची, जि. गडचिरोली.
-------
योगीता सानप
9421512358
केव्हीके सोनापूर (गडचिरोली)
-------

लेखक - : चैताली बाळू नानोटे,
निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.
मो. 7773987427

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate