অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डेरे यांची शाश्‍वत शेती

डेरे यांची शाश्‍वत शेती

प्रस्तावना

सुमारे तीस वर्षांच्या प्रयोगांतून रमाकांत डेरे यांची वनशेती चांगलीच बहरली आहे. विविध झाडे, वनस्पतींची संपदा अथक प्रयत्न, अभ्यासातून जोपासत शाश्‍वत शेतीचे उदाहरणच शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. वनशेतीच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि सोबत आयुष्यभरासाठी उत्पन्नाची सोयही होते. याचा अनुभव नगर जिल्ह्यातील चितळवेढे (ता. अकोले) येथील रमाकांत डेरे घेत आहेत. आपल्या सुमारे 13 एकर संयुक्त कुटुंबाच्या शेतीत त्यांनी वनराईचे लेणे कोरले आहे. वनशेतीचा सांभाळ करीत, जोडीला हंगामी पिके घेत त्यांनी अल्पखर्चात नियमित उत्पन्न देणारी वैशिष्ट्यपूर्ण शाश्‍वत शेती साकारली आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले-राजूर रस्त्यावर निळवंडे धरणाच्या पायथ्याशीच चितळवेढे शिवारात रमाकांत दादा डेरे यांची 13 एकरांवर संयुक्त कुटुंबाची शेती वसली आहे. त्यांचे वय 67 असले तरी शेतात वनराई फुलविताना आजही ते घेत असलेले कष्ट तरुणांना लाजविणारे आहेत.
"मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्‍वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजविल्या चैतन्याच्या बागा', या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेप्रमाणे डेरे दादा नैसर्गिक शेतीत एकरूप झाले आहेत. आपले नियम निसर्गावर लादण्यापेक्षा निसर्गाचे नियम आपणच समजून घेतले पाहिजेत. शाश्‍वत शेतीचा हा मुख्य आधार आहे, असे त्यांचे तत्त्वज्ञान सांगते.

जमिनीतूनच जमिनीला द्यायचे


""या शेताला बाहेरून काही द्यायची गरज नाही. रोग, किडींचा प्रादुर्भाव किंवा वादळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळण्यासाठी शेताच्या बांधावर, पडीक जमिनीत दीर्घायू मोठ्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. या झाडांचा पाला जमिनीवर पडून त्याचे उत्कृष्ट सेंद्रिय खत बनते. त्याचा उपयोग जमिनीत लाभदायक जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी होतो. यामुळेच जमिनीचा पोत सुधारून उत्पादकता वाढते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जैविक पुनर्वापर (बायोमास रिसायकलिंग) प्रक्रिया होते. डेरे आपल्या शाश्‍वत शेतीचे रहस्य या पद्धतीने उलगडत जातात.

सुरवातीपासूनच वनशेतीचा ध्यास


डेरे यांनी सुरवातीपासून वनशेतीचाच ध्यास घेतला. सन 1990 मध्ये केनिया, युगांडा, टांझानिया या देशांना भेटी देण्याचा योग त्यांना आला. या देशांत सामान्य माणसांनीही पर्यावरण वाचविण्यास प्राधान्य दिले असल्याने तेथे जंगले, प्राणी, निसर्ग यांचे उत्तम जतन झाल्याचे त्यांना जाणवले. यातून प्रेरित होऊन गावी परत आल्यानंतर आपल्या जमिनीत काय होऊ शकते याचा त्यांनी अभ्यास केला. पहिल्या टप्प्यात शेताच्या बांधावर विविध उपयोगी वनस्पतींची लागवड करण्याचे ठरविले. यासाठी वनस्पतींची उपयोगिता आणि पर्यावरण पूरकता हे निकष समोर ठेवले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. बायफ संस्थेतील कार्यक्रम अधिकारी जितीन साठे यांचे प्रत्येक टप्प्यावर आपुलकीने मार्गदर्शन मिळाल्याचे डेरे आवर्जून नमूद करतात. आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, पेरू, सुपारी, जांभूळ, चिंच, संत्रा, लिंबू, फणस, बदाम, अंजीर, पपई, शेवगा, उंबर या फळझाडांची लागवड केली. झाडांच्या वाढीच्या सवयी, जागा, पाणी यांचा अभ्यास उपयुक्त ठरला. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर सुरवातीपासूनच अत्यंत कमी केला. आज अत्यंत अल्प किंवा गरजेपुरता युरियासारख्या खतांचा वापर होतो.

पीक विविधता जपली


डेरे यांच्या शेताला तीनही बाजूंनी वनखात्याच्या जंगलाने वेढले आहे. या भागात पाऊस चांगला पडतो. भंडारदरा धरण जवळ आहे. वनराईला अनुकूल परिस्थिती आहे. हंगामी पिकांमध्ये भुईमूग, मका, गहू, हरभरा, वालपापडी, तूर, मूग आदी पिके आदींचा समावेश असतो. 
डेरे म्हणाले, शेतीत तीस वर्षांहून अधिक काळातील अनुभवात एक शिकलो आहे की, एकाच वर्गातल्या वनस्पतींची बांधावर लागवड करू नये. त्यामुळे त्यांची मूळ पिकाशी स्पर्धा होऊन वसवा (सायवड) होण्यासारख्या अडचणी निर्माण होतात. त्याचा विपरीत परिणाम पीक उत्पादकतेवर होतो. बांधावरील मोकळ्या जागेत त्यांनी साग, सुरू, बांबू, रिठा, सुबाभूळ, अशोका, हिरडा, बेहडा, उंबर तसेच चाऱ्यासाठी सुबाभूळ, सिल्व्हर ओक, कमरक, खैर, बेल, लिंब या झाडांची खड्डे खोदून लागवड केली आहे. आता ही झाडे मोठी झाली आहेत. त्यांच्या छाटणीतून जळाऊ लाकूड फाटा, चारा यांची वर्षभर उपलब्धता होते. 

डेरे यांची वनशेती संपदा- दृष्टिक्षेपात


फळझाडे -झाडांची संख्या----वाण 
आंबा-------200-----हापूस, केशर, नीलम, पायरी, रत्ना, तोतापुरी, लंगडा 
नारळ-----105----बाणावली, वेस्ट कोस्ट स्टॉल 
चिकू-----20-----क्रिकेट बॉल, कालीपत्ती 
सीताफळ---250----स्थानिक वाण, बाळानगर 
पेरू---50-----सरदार 
सुपारी----25----श्रीवर्धन 
फणस---5----कापा (स्थानिक वाण) 
आवळा---20----चकैय्या, नरेंद्र-7 
चिंच---15----गावरान वाण 
उंबर---5----गावरान वाण 
लिंबू---10----गावरान वाण 
इडलिंबू---1---गावरान वाण 
अंजीर---2----दिनकर 
पपई---10----तैवान, गावरान बक्षी वाण 
काजू----15----वेंगुर्ला-4, स्थानिक वाण 
रामफळ---5----बियांपासून बनविलेली रोपे 
जांभूळ---5----रोपवाटिकेतून मिळविली 
बदाम---5----गावरान स्थानिक वाण 
शेवगा---15---मोरिंगा कोईम्बतूर 
बेल---4-------स्थानिक वाण 
--------------------- 
औषधी व जंगली वनस्पती 
बांबू----50-----भरीव व पोकळ दोन्ही प्रकार 
रिठा-----15-----स्थानिक वाण 
सिल्व्हर ओक---30----सरळ वाढणारा वाण 
सुबाभूळ ---150---गावरान वाण 
अशोका---30----सुधारित व सरळ वाढणारे 
कमरक----1----स्थानिक वाण 
कॅक्‍टस---200----मृदसंधारणासाठी उतारावर लागवड 
साग----1000----स्थानिक वाण 
निलगिरी---20----स्थानिक वाण 
सुरू----250--- स्थानिक वाण 
खैर-------60----स्थानिक वाण 
देशी गवत ----60-----पडीक जमिनीवर चाऱ्यासाठी 
जास्वंद---50----विविध रंगी, औषधी गुणधर्माचे 
एरवंड---1 बेट----औषधी उपयोगासाठी 
केवडा---1 बेट---शोभेसाठी 
अडुळसा---20-----औषधी उपयोगासाठीचे 
------------------------------ 
सर्व मिळून सुमारे 2445 झाडांची यशस्वी लागवड आहे. झाडांच्या संख्येत बदल होत राहतो. 
-------------------------- 
शेतीची वैशिष्ट्ये- 
* सागाची सुमारे एक हजार झाडे असून, दरवर्षी विक्रीतून सुमारे 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 
*"झाडे म्हणजे म्हातारपणासाठी पेन्शन' हे डेरे आवर्जून सांगतात. आंबा, पेरू, अन्य फळझाडांमधून वार्षिक उत्पन्न 25 हजार रुपयांपर्यंत मिळते. 
* स्वत:च्या शेतातील झाडांपासून लाकडाचा उपयोग घरासाठी केला. त्यामुळे लाकूड खरेदीचा खर्च वाचला. 
*औषधी वनस्पतींच्या रूपाने घरासाठी वैद्य मिळाला. 
*विविध झाडांमुळे शेतपरिसरातील जल व मृदसंधारणाचे काम साधले. 
*जैवसाखळी, जैवविविधतेची निर्मिती व संरक्षण नैसर्गिक होते. 
*वनराईमुळे स्वच्छ हवा, उन्हाळ्यातही थंड तापमान राहण्यास मदत होते. 
* झाडांच्या गर्दीमुळे शेताला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. कमी पाण्यात पिकांचे नियोजन होते. 
-डोंगरावरून वाहून येणारा गाळ शेताला आपोआप मिळतो. 
* वनशेतीच्या माध्यमातून नियमित आणि शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत तयार झाला.

पाणी नियोजन


डेरे यांचे शेत डोंगर उताराला असल्याने पाणी जोरदारपणे शेतात शिरून पिकाचे मोठे नुकसान सुरवातीच्या टप्प्यात अनेकदा झाले. सन 1995 मध्ये डोंगर उतारावर मोठा आडवा चर खोदून हे पाणी अडविले. शेताच्या कडेने खोदलेल्या पाच लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्याकडे ते वळविले. शेततळ्याजवळ पाण्याची टाकी बांधली असून त्याद्वारे उतारांवरील झाडे, पिकांना ठिबकद्वारे पाणी दिले जाते. उताराच्या दाबाने पाणी येत असल्याने विजेचा वापर टळला आहे. 

लेण्याची निर्मिती होण्यासारखे दुसरे समाधान नाही


वनशेतीची सुरवातीची काही वर्षे अनियमित उत्पन्न मिळायचे. झाडे मोठी होत जातील तसे उत्पन्न वाढत गेले. मागील वीस वर्षांपासून ते 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत स्थिरावले आहे. वनशेती म्हणजे केवळ निसर्गावर हवाला ठेवून होणारी शेती नव्हे, तर उत्तम नियोजन आणि झाडांशी मैत्री जमली तर ती आयुष्यभर शाश्‍वत उत्पन्न देऊ शकते व वनराईच्या लेण्याचीच निर्मिती यातून होती ही समाधानाची बाब असल्याचेच डेरे म्हणतात. 
नगरच्या जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी तसेच वनशेतीतील विशेष योगदानाबद्दल अकोले तालुक्‍यातील ट्रस्टतर्फे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला आहे. 

संपर्क : 
रमाकांत दादा डेरे- ७५८८२९६५५५

लेखक : ज्ञानेश्‍वर उगले

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate