অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केळीचा उत्पादनखर्च कमी

केळीचा उत्पादनखर्च कमी

कांदा रोपनिर्मिती व झेंडू आंतरपीक प्रयोग

जळगाव जिल्ह्यातील माचला (ता. चोपडा) येथील डॉ. रवींद्र निकम यांनी नव्या केळी बागेत गादी वाफ्यांवर कांदा रोपनिर्मिती व झेंडूचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग करून कमी कालावधीत, कमी श्रमात चांगली कमाई साधली. केळीचा उत्पादन खर्च कमी केला. झेंडूमुळे बागेतील सूत्रकृमींवर प्रतिबंधक उपाय साधले.

जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला चोपडा तालुक्‍याचा पट्टा केळी, कपाशी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. याच पट्ट्यातील माचला येथील डॉ. रवींद्र निकम दर वर्षी तीन टप्प्यांत सुमारे 25 एकरांवर केळी लागवड करीत असतात. पाणी, खत व्यवस्थापनासह शास्त्रशुद्ध लागवड तंत्रातून प्रति 25 ते 30 किलोची रास त्यांना मिळते.

उत्पादन खर्च कमी करण्यावर भर

वाढत्या महागाईमध्ये सर्वच शेतकऱ्यांकडील केळीचा उत्पादनखर्च वाढला आहे. मिळणारे दर व उत्पन यांचा मेळ साधून निव्वळ नफा हाती कमीच येतो. निकम यांनी त्यावर उत्तर शोधले आहे ते केळी बागेत आंतरपिके घेण्याच्या प्रयोगातून. अनुभवातून त्यांनी त्याबाबतचा स्वतःचा पीक "पॅटर्न'सुद्धा तयार केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी केळीत चवळी, कलिंगड लागवडीचा यशस्वी प्रयोग केला होता. कलिंगडातून प्रति एकरी एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळाले होते. केळीतील उत्पादनखर्च त्यातून वसूल झाल्याने ते पीक त्यांच्यासाठी बोनसच ठरले होते.

केळीत कांदा नर्सरी....

प्रयोगशील वृत्तीच्या निकम यंदाही स्वस्थ बसले नाहीत. त्यांची केळीची टप्प्याटप्प्याने लागवड असते. यंदा जुलै महिन्यात त्यांनी सहा एकरांवर मृगबाग केळीच्या लागवडीचे नियोजन केले. त्यातील सव्वा एकर क्षेत्रात कांदा रोपे तयार करण्याचे नियोजन केले. केळीची पाच बाय साडेपाच फूट अंतरावर लागवड होती. दोन दिवसांनी केळी रोपांच्या दोन ओळींमधील साडेतीन फूट रुंदीच्या तसेच 220 फूट लांबीच्या 50 गादी वाफ्यांचे (बेड) नियोजन केले. बेडवर ट्रायकोडर्मा प्रति एकरी 10 किलो मिसळून घेतले. त्यानंतर लोखंडी पंजाच्या साह्याने पाच इंचावर सरी पाडून कांदा बी पेरून घेतले. प्रति वाफ्यासाठी गुलाबी कांद्याचे 600 ग्रॅम बियाणे लागले. पेरणीनंतर मिनी स्पिंकलर सुरू करून हलके पाणी दिले. बेडमुळे अतिरिक्त पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला. उगवण शंभर टक्के झाली. उगवणीनंतर रोपांची मर दिसून आली नाही. रोपांची सुरवातीपासूनच जोमदार वाढ झाली. शिवाय रोपांची मुळे चांगली पसरली. लागवडीवेळी रोपे उपटताना मुळ्या तुटल्या नाहीत.

रोपनिर्मिती ठरली फायद्याची

चांगली निगा ठेवल्याने केळी बागेतील कांदा रोपे लागवडीसाठी कमी कालावधीत तयार झाली. परिसरातील पाच शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार रुपये प्रति वाफा या दराने रोपांची विक्री केली. त्यातून सुमारे पावणेदोन लाख रुपयांची कमाई झाली. स्वतःच्या शेतातील कांदा लागवडीसाठी त्यांना रोपे बाहेरून खरेदी करावी लागली असती. त्याचा सुमारे 75 हजार रुपयांचा खर्च कमी झाल्याचे ते म्हणाले. प्रति बेडवर अंदाजे 70 ते 75 हजार रोपे याप्रमाणे एकरी तीन बेड लागतील असे निकम यांचे म्हणणे आहे. रोपे तयार करण्यासाठी 30 किलो कांदा बियाणे लागले होते. बियाणे, खते, जैविक घटक, मजुरी असा एकूण 45 हजार रुपयांपर्यंत खर्च कांदा रोपनिर्मितीसाठी आला.

झेंडू फुलांमुळे नफ्याचा दरवळ...

सहा एकर नव्या बागेत अन्य ठिकाणी 12 जुलैच्या सुमारास कोलकता झेंडू लागवडीचा प्रयोग केला. नाशिक जिल्ह्यातील खासगी नर्सरीतून दोन रुपये वीस पैसे प्रतिरोप दराने सुमारे सात हजार रोपे आणली. दोन केळीतील प्रत्येकी साडेपाच फुटात झेंडू घेतला. केळी व झेंडू यांना एकावेळी पाणी व विद्राव्य खते देण्यासाठी इनलाइन ठिबकचा वापर केला. किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन वेळा कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. सुरवातीच्या कळ्या खुडून टाकल्या. त्यामुळे झेंडूची जोमदार वाढ झाली.

स्वतः केली फुलविक्री

लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी फुलांची पहिली तोडणी शक्‍य झाली. एक क्विंटल फुलांची चोपडा शहरातील मार्केटला 45 रुपये दराने विक्री झाली. दुसरी तोडणी दसऱ्याला केली. या वेळी तीन क्विंटल फुले मिळाली. शेतासमोरच फुलविक्रीचा स्टॉल लावला. किलोस कमाल 80 रुपयांपर्यंत दर मिळवणे त्यामुळे शक्‍य झाले. दोन वेळा झालेल्या तोडणीतील फुलविक्रीतून साधारणतः 30 ते 35 हजार 500 रुपयांची कमाई झाली. दिवाळीच्या तोंडावर आणखी तीन क्विंटल फुले मिळण्याची आशा आहे. रोपे खरेदी, तोडणी मजुरी व व्यवस्थापन खर्च वगळता झेंडूपासून सुमारे 40 हजार रुपये शिल्लक राहतील असा निकम यांना अंदाज आहे.

आंतरपीक पद्धती ठरते किफायतशीर

निकम यांना केळीचे एकरी किमान 30 टन (कमाल 40 टनांपर्यंत) उत्पादन मिळते. उत्पादन खर्च सुमारे 60 ते 70 हजार रुपये असतो. मात्र आंतरपिकांद्वारा त्यांनी तो कमी केला. केळी पीक बेडवर घेतल्याने हे शक्‍य झाले. कमी कालावधीची आंतरपिके घेतल्यास केळीसारख्या दीर्घ पिकासाठी पुढील पैसा उपलब्ध होतो असे निकम म्हणतात. निवडलेली आंतरपिके केळीच्या पोषणावर परिणाम करणार नाहीत, किडी-रोगांचा धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही ते सांगतात.

सूत्रकृमींवर नियंत्रण...

केळी बागेत आढळणारी सूत्रकृमी पिकाचे नुकसान करतेच, शिवाय त्याद्वारा पोखरलेल्या भागातून बुरशीसारखे सूक्ष्मजीव झाडात प्रवेश करतात. केळीची रोपे कोलमडून पडतात. त्या दृष्टीने झेंडूचे पीक घेऊन निकम यांनी सूत्रकृमींवर प्रतिबंधक उपाय साधलाच शिवाय आर्थिक कमाईसुद्धा साधली.
संपर्क - डॉ. रवींद्र निकम- 9422745953

संदर्भ: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate