अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवळा खुर्दचे रमेश मातकर यांनी 1992 मध्ये सेंद्रीय शेती करायला सुरुवात केली. पारंपरिक व रासायनिक पद्धतीने शेती करायची नाही हे मातकर यांनी ठरविले होते. सेंद्रीय पद्धतीने शेती करणे कसे फायद्याचे आहे हे मातकर यांच्या संत्रा बागेला भेट दिल्यावर समजते.
काळ्या मातीच्या जमिनीत संत्रा बाग येणार नाही, रासायनिक खते, औषधे वापरल्याशिवाय संत्रा येऊ शकत नाही असे त्यावेळचे जाणकार सांगत होते. मात्र रोजगार हमी योजनेचा फायदा घेत मातकर यांनी 2002 साली संत्रा बागेची लागवड केली. आज 16 एकर क्षेत्रात संत्र्याची 1600 झाडे आहेत. अमरावती जिल्ह्यात यावर्षी अती पावसामुळे मूळकूज, डिंक्या या रोगांमुळे अनेक ठिकाणी संत्रा बागांचे नुकसान झाले, फळगळती झाली. पण पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी नियोजन केल्यामुळे माझ्या बागेला कुठलाही धोका झाला नाही, असे मातकर सांगतात. यावर्षी आंबिया बहारात 16 एकराच्या संत्रा बागेत 18 लाखांचा संत्रा त्यांनी विकला. खर्च वजा जाता 15 लाखांचा फायदा झाल्याचे ते सांगतात.
ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबरच सेंद्रीय पद्धतीने तयार केलेले खत बागेला दिले जाते. झाडांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी लूप पद्धतीचा वापर केला जातो. बागेतील झाडांना नंबर देण्यात आलेत. त्यामुळे एखाद्या झाडाच्या वाढीमध्ये काही समस्या असल्यास त्यावर तात्काळ व कमी खर्चात उपाय शोधता येतात.
सेंद्रीय शेतीमध्ये शेणखताचे महत्त्व मोठे आहे. शेणखतासाठी मातकर यांच्या गोठ्यात देशी गायी आहेत. त्यांच्या शेणाचा व गोमूत्राचा खतासाठी उपयोग केला जातो. तसेच, खतासाठी जून महिन्यात बागेत धेंच्याची लागवड केली जाते. दीड महिन्याने ब्रश कटरच्या सहाय्याने त्याची कापणी करुन ते शेतातच कुजविले जाते.
श्री. मातकर हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अप्पर वर्धा कालवे विभाग क्रमांक 1 मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. जिल्ह्यात त्यांची ओळख इंजिनिअर म्हणून नाही, तर सेंद्रीय शेतीचा खंदा पुरस्कर्ता अशीच आहे. 19 एकर संत्रा, 10 एकर चिंच, 2 एकर आवळा, 12 एकर रंगपुरी लाईम (ईडलिंबू), अडीच एकर मोसंबी अशी संपूर्ण शेती मातकर सेंद्रीय पद्धतीने करतात. फळबागेत सोयाबीन, तूर, मूग, हरभरा इत्यादी आंतरपिके घेत असताना, त्यासाठी लागणारे बियाणे ते घरीच तयार करतात.
कृषी विभागाच्या अनेक योजनांचा श्री.मातकर यांनी योग्य पद्धतीने लाभ घेतला आहे. सेंद्रीय शेतीची चळवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती लोकचळवळ व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतशिवारात उपलब्ध असलेल्या झाडांचा, वनस्पतींचा वापर करुन ते खते व औषधे बनवितात. आपल्या शेतीत ते जीवामृत, दशपर्णी, निंबोळी अर्क, व्हर्मी वॉश, त्रिविभूती याचा वेळोवेळी वापर करत असतात. त्यांची शेती पाहिली की शाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीला पर्याय नाही, याची खात्री पटते.
लेखक : - सचिन ढवण, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 4/15/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...