অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न

शिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न

जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्ह्याने प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्ह्यात या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाला चांगले यश आले ते लोकांचा सहभाग आणि शासकीय यंत्रणेने एकजिनसीपणे केलेल्या कामकाजामुळे. या अभियानाच्या यशामुळेच सोलापूरला राज्यातील सर्वोच्च असा पुरस्कार मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या या यशोगाथेबाबत...

सोलापूर जिल्ह्याला खरीप व रब्बी हंगामाचे वरदान आहे. मात्र जिल्ह्याला रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. कोरडवाहू जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात अलिकडील दहा पंधरा वर्षामध्ये पावसाच्या अनियमिततेने शेतीचे आर्थिक गणित कोलमडले होते. पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. पाणी टंचाईवर उपाय म्हणुन जलयुक्त शिवार अभियानाची घोषणा केली.

सोलापुरात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली. लोकसहभागासह विविध यंत्रणामार्फत झालेल्या सांघिक प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार अभियानाचे सर्वात उत्कृष्ट काम सोलापूर जिल्ह्यात झाले. राज्याचा सर्वोच्च महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला व मळेगावला मिळाल्याने जलयुक्तचा सोलापूर पॅटर्न राज्यभरात चर्चेत आला आहे. 

नेटके नियोजन

जलयुक्त शिवार अभियानाच्या शासन निर्णयामधील सुचनानुसार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, पावसाचे प्रमाण, पिक पद्धती विचारात घेतली. माथा ते पायथा तत्त्वाप्रमाणे आणि त्रिसुत्री पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले. यामध्ये क्षेत्रिय उपचार, ओघळीवरील उपचार व शास्त्रीय दृष्टीने पाण्याचा वापर व पिक पद्धतीत बदलांचा समावेश करण्यात आला. जिल्हास्तरावर अभियानाचे महत्त्व व अंमलबजावणीसाठी निश्चित केलेली कार्यपद्धती अधिकारी कर्मचारीपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गावपातळीवर काम करणारे सरपंच, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांचीही कार्यशाळा घेतली. यातूनच सर्व समावेशक आराखडे तयार झाले.

अंमलबजावणी

शेतकऱ्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुढील सहा बाबींवर भर देण्याचे नियोजन केले.


  1. 100 टक्के क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडींग (बांध बंदिस्ती)
  2. लोकसहभागातुन 100 टक्के विहिरींचे पुनर्भरण
  3. लोकसभागातुन नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे
  4. सिमेंट नाला बांध बांधणे
  5. जुन्या जलस्त्रोतांमधील गाळ लोकसहभागातुन काढणे आणि दुरूस्ती शासकीय निधीतून करणे
  6. शास्त्रीयदृष्ट्या पाण्याचा वापर व पिक पद्धतीत बदल यांचा समावेश.


शिवारातले पाणी शिवारात अडविणे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश असल्याने कंपार्टमेंट बंडींग (शेताची बांधबंदिस्ती) केंद्रबिदू ठरविण्यात आला. बांध तयार करण्याकरीता शेतातील सुपिक माती वापरण्याच्या पारंपारीक पद्धतीला बगल देऊन बांधा शेजारी दीड मीटरचा चर घेऊन बांध तयार करण्याचा नवा पॅटर्न उदयास आला. यातून विक्रमी अशा 1,33,903 हेक्टर क्षेत्रावर बांधबंदीस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे मातीची धूप तर थांबलीच. त्याचबरोबर भूजल पातळीत वाढ होऊन जमिनीतील ओलाव्यामुळे पिकांचे उत्पादन देखील वाढले.

सर्व विभागामार्फत पूर्ण झालेल्या जलस्त्रोतांची माहिती अक्षांश रेखांशासह घेण्यात आली. प्राप्त माहितीद्वारे सर्व कामे नकाशावर घेऊन एकुण 6600 कामांचा जलआराखडा तयार करण्यात आला. यामुळे पाझर तलावांची, गाव तलावांची, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचा आकडा निश्चित झाला. ज्या जलस्त्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढला जाईल त्याची दुरुस्ती शासनामार्फत करण्याचे ठरल्याने विक्रमी अशा गाळाचा उपसा होऊन 346 पाझर तलावांची व 32 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली. विविध जलस्त्रोतांमधुन लोकसहभागातून 47 लाख घ.मी. गाळ काढून त्यापासुन 2800 हेक्टर जमिन सुपिक करण्यात आली.

भुजलपातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने 16,340 विहीर पुनर्भरणाची कामे पूर्ण करण्यात आली. जी गावे लोकसहभागातून नाला खोलीकरण, रुंदीकरण करतील त्या नाल्यावर प्रत्येक एक किलोमीटरवर सिमेंट नाला बांध शासकीय निधीतून बांधण्याचे ठरले. यामुळे अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले. नाल्यावर 562 सिमेंट बंधारे बांधण्यात आले. उपलब्ध झालेल्या पाण्याचा शास्त्रीय दृष्टीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनावर भर देण्याचे ठरले. यासाठी शासकीय अनुदानीत योजनेबरोबरच 10,000 कोटींच्या जिल्हा पतपुरवठा आराखड्यामध्ये 2000 कोटी गुंतवणूक कर्जासाठी राखीव ठेवले गेले. वरील सर्व कामांबरोबर सलग समतल चर 691 हेक्टर, खोल सलग समतल चर 912 हेक्टर. माती नाला बांध 693, शेततळी 561, केटी वेअर 11, रिचार्ज शाफ्ट 168, साठवण बंधारे 4, वनराई बंधारे इ. कामे पूर्ण करण्यात आली.

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगावने आदर्शवत काम केले. एकुण साडेआठ किलोमीटर ओढ्याचे लोकसहभागातुन खोलीकरण व रूंदीकरण पूर्ण केले. गावाच्या मधोमध असलेल्या गावतलावातील स्मशानभुमीचे सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन स्थलांतर केल. आठ एकरावरील तलावास पुनरुज्जीवीत केले. याशिवाय लोकसहभागातून 65 विहीरींचे पुर्नभरण, 4 शेततळे, 8 सिमेंट नाला बांध, 3 पाझर तलावांची दुरूस्ती 1226 हेक्टर कंपार्टमेंट बंडींग आदी कामे पूर्ण केली. 

जिल्ह्यातील यशस्वी कामासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, श्री.रणजितकुमार, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रफिक नाईकवाडी, बसवराज बिराजदार, रवींद्र माने, सर्व प्रांत अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी नियोजन केले. कामे चालू असताना विभागीय कृषि सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी वेळोवेळी कामास भेट देऊन मार्गदर्शन केले. वरील कामांच्या गुणवत्तेमुळे सोलापूर जिल्ह्याला 50 लाखाचा व मळेगावला 25 लाखाचा प्रथम क्रमांकाचा महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार शासनाने घोषित केला.

फलनिष्पती - सर्व कामांच्या माध्यमातून 1,91,672 टी.सी.एम. पाणी साठवण क्षमता निर्माण. प्रत्यक्षात 71,595 हे. क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. भूजल पातळीत 1.32 ने वाढ. मागील वर्षांच्या तुलनेत 1 मे, 2017 पर्यंत एकाही टँकरची आवश्यकता भासली नाही.

लेखक - रवींद्र माने
अतिरिक्त प्रकल्प संचालक,
आत्मा, सोलापूर

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate