অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शून्यातून एकात्मिक शेती

खासगी व्यवसाय सांभाळून ठाणे जिल्ह्यातील जामशेत येथील पोतदार बंधूंनी एकात्मिक फळ व मसाला शेती केवळ अभ्यास व वडिलांच्या मार्गदर्शनातून पुढे विकसित केली आहे. वर्षभर उत्पन्न सुरू राहील या पद्धतीने नियोजन करताना सेंद्रिय शेतीवर अधिक भर दिला आहे.
ठाणे जिल्ह्यात निसर्गसौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनाऱ्याने नटलेल्या उत्तर कोकणातील डहाणू तालुक्‍यात वसलेले छोटे गाव म्हणजे जामशेत. येथील पोतदार बंधूंच्या एकत्रित कुटुंबाची चिकू, आंबा, नारळ व अन्य विविध पिकांची शेती अभ्यासण्याजोगी आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करत वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे प्रयोग येथे झाले आहेत. पोतदार बंधूंचे वडील (कै.) अनंत पोतदार यांनी "इलेक्‍ट्रिकल कॉंट्रॅक्‍टर'चा व्यवसाय सांभाळत शेती खरेदी करीत तिचा विस्तार केला. यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे निधन (वय वर्षे 78) झाले. संजय, प्रशांत व स्नेहल या बंधूंनी वडिलांकडून मार्गदर्शन घेत ही शेती आणखी विकसित केली आहे. 
स्नेहल इलेक्‍ट्रिकल कॉंट्रॅक्‍टर असून, त्यांचे बंधू त्यांना व्यवसायात मदत करतात. मात्र शेतीकडे या बंधूंनी जराही दुर्लक्ष केलेले नाही. स्नेहल ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्थेचे (पालघर) सदस्य आहेत. मसाला लागवडीसाठी त्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत ते आवर्जून सहभागी होतात. आई श्रीमती सुमनबाई यांची मोलाची साथ या बंधूंना मिळाली आहे.

अभ्यासातून साधली प्रगती

पोतदार कुटुंब मूळ नाशिक जिल्ह्यातील नामपूर (ता. सटाणा) येथील आहे. मात्र नोकरी व व्यवसायानिमित्त डहाणू हीच त्यांची कर्मभूमी झाली. या कुटुंबाने शून्यातून शेतीचे विश्‍व उभारले आहे. जिद्दीने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना अनुभवी, प्रगतिशील शेतकऱ्यांकडील शेती अभ्यासली. 
पारंपरिक पिकांतून वर्षाकाठी जेमतेम लाख-दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे. घरचे पाच-सहा जण राबायचे. जोडधंदा असूनही पोटापाण्याची हातमिळवणी अवघड झाली होती. पण वडिलांचा मोठा आधार, त्यांची जिद्द, हिंमत या गुणांमुळे पोतदार कुटुंब स्वस्थ बसले नाही. त्यांनी शेतात विहीर खोदली, दोन बोअर घेतले, पाण्याची टाकी बांधली. सुरवातीला लिली फुले, मिरची, पपई यांची लागवड केली. त्यानंतर कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांचा विचार सुरू झाला.

चिकूची वाडी

सन 1996 मध्ये पोतदार बंधूंच्या वडिलांनी पडीक जमीन सपाट करून चिकूच्या कालीपत्ती जातीची 2200 कलमे आणून लावली. सुरवातीला असलेली 25 एकर चिकूची बाग आता 42 एकरपर्यंत विस्तारली आहे. झाडांची सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली जाते. गांडूळ खत, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क, जीवामृताचे युनिट आहे. चिकूच्या प्रति झाडापासून 250 ते 275 किलो, तर हेक्‍टरी सुमारे दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते.

फळांची विक्री 

वर्षभर फळे देणाऱ्या झाडाला ऑक्‍टोबर ते मेपर्यंत अधिक चिकू लागतात. पावसाळ्यात ती कमी येतात. फळे विक्रीसाठी डहाणूच्या चिकू मार्केटला (ऑक्‍शनला) आणली जातात. येथे शेतकऱ्यांचा फळफळावळ संघ असून, तेथेही विक्री होते. ऑक्‍शनमध्ये मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली, खानदेश येथील व्यापाऱ्यांमार्फत उघड बोली पद्धतीने विक्री केली जाते. आकारानुसार चिकूला सरासरी आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो. मोठ्या आकाराच्या चिकूला 25 ते 30 रुपये भाव मिळतो.
पोतदार बंधूंचा मार्केट स्टडी चांगला आहे. गेल्या दहा वर्षांत चिकूला किती भाव मिळाला, याचे पूर्ण टिपण त्यांनी ठेवले आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांच्या एक "नंबर'च्या चिकूला किलोला 40 रुपये सरासरी, तर कमाल भाव 80 रुपये मिळाला.

जनावरांचे आदर्श संगोपन

बाग दर्जेदार पिकवायची तर शेणखत मोठ्या प्रमाणात पाहिजे.

त्यासाठी आधुनिक पद्धतीने सुसज्ज गाई, म्हशींसाठी 40 बाय 40 फूट आकाराचा गोठा आहे. एकूण 28 जनावरे आहेत. त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होते. जनावरांपासून दररोज 30 लिटर दूध मिळते. दुधाची 30 रुपये प्रति लिटरप्रमाणे जागेवर व 40 रुपये लिटरप्रमाणे डहाणूत विक्री होते. वर्षभरात जनावरांपासून जवळपास 20 ते 25 ट्रक शेण मिळते. ते खड्ड्यांत टाकून चांगल्या प्रकारे कुजविले जाते. काही शेणाची स्लरी करून ती पिकांना दिली जाते. विरंगुळा म्हणून शेतात बदके, हंस पाळले आहेत.
नारळ - बाणवली जातीची सुमारे 325 झाडे आहेत. लहान-मोठे मिळून प्रति झाड 80 ते 100 नारळ मिळतात. डहाणूचे व्यापारी प्रति नग 5 ते 8 रुपये दराने शहाळी खरेदी करतात. धार्मिक व सणासुदीच्या निमित्ताने नारळाला 10 ते 12 रुपये (प्रति नग) दर मिळतो. 
आंबा - आंब्याची सुमारे 75 झाडे असून हापूस, केशर, रायवळ, राजापुरी, पायरी आदी जाती पाहण्यास मिळतात. राजापुरी आंब्याचा उपयोग लोणच्यासाठीही करतात. हेक्‍टरी उत्पादन साडेचार ते पाच टन मिळते. हापूसला 30 ते 35 रुपये, केशर 20 ते 25 रुपये, तर राजापुरीला 20 रुपये प्रति किलो दर मिळतो.

अन्य फळझाडांचेही उत्पन्न

पेरू (लखनौ), रामफळ, सीताफळ, पपई, बांधावर सागाची झाडे, केळी (वेलची व भाजीची केळी), अळूची पाने, कढीपत्ता, आवळा, सफेद जांबू, शेवगा, चिंच, पपनस, बिजोरा लिंबू, फणस आदी पिके आहेत. पॉंडमध्ये विविध जातींची कमळफुले लावली आहेत. दोन गुंठ्यांत छोटी नर्सरी असून, आंबा, चिकू, शोभिवंत, औषधी वनस्पती, सायकस आदींची रोपे आहेत.
मसाला पिके - छोट्या जागेत मसाला पिके आहेत. यात प्रामुख्याने तेजपान, जायफळ, लवंग, वेलदोडा, काळी मिरी (बुस्टर काळी मिरी) यांची थोड्या प्रमाणात लागवड. कोकणतेज जातीच्या दालचिनीची एकूण 150 कलमे. त्यांची लागवड बागेत ओहोळाच्या कडेने, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आहे. दालचिनीची साल, तसेच तमालपत्राला चांगली मागणी आहे. मसाला पिकांमधून वर्षाला सुमारे 30 हजार रुपयांची उलाढाल होते.

पोतदार बंधूंचे दूरदृष्टीचे नियोजन

  • संरक्षित पाण्याची सोय म्हणून शेततळे.
  • बोअर, ड्रिप इरिगेशन, विहीर खोल केली, पाणीसाठा वाढविला.
  • विहीर व बोअरचे पुनर्भरण केले.
  • दर वर्षाच्या बचतीतून वर्षाला दोन एकर याप्रमाणे 12.5 एकर बागायत जमीन विकत घेतली.
  • घरात कृषीविषयक विविध पुस्तके, मासिके, "ऍग्रोवन' दैनिक यांचे वेगळे दालन.
  • वेळोवेळी कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची तांत्रिक मदत.

बचतीचे महत्त्व

  • घरचे सर्व जण शेतीत कष्ट करतात.
  • पूरक व्यवसायातून आर्थिक पाठबळ.
  • सेंद्रिय स्लरी व शेणखतावर भर.

यांत्रिकीकरणावर भर 

  • चिकू मार्केटला नेण्यासाठी जीप.
  • एचटीपी पंपाद्वारा फवारणी.
  • सुमारे 29 एकरांवर ठिबक सिंचन.
  • द्रवरूप खतांवर भर.
  • -टॅंकमधून चिकूला पाइपलाइनद्वारा सेंद्रिय स्लरी दिली जाते.

सुधारणा

  • पॅकहाऊ,त्तिसेच 50 शेतकरी बसू शकतील अशी शेड.
  • दोन मोटारसायकली व कार.
  • मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण.
  • सर्व मुले हुशार. घरातील एका मुलीला दहावीत 91 टक्के गुण

स्नेहल पोतदार - 9422477445, 9209270265 
प्रा. उत्तम सहाणे-8087985890 
प्रा. उत्तम सहाणे
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे विषय विशेषज्ञ आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate