जलयुक्त शिवार अभियानाचे यश; पाणीदार शेंडेवाडीचे हिरवेगार शिवार.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून टँकरवर अवलंबून असलेल्या शेंडेवाडी गावची जलस्वयंपूर्ण गावाकडे वाटचाल सुरू आहे. गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असून त्यामुळे आता अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरिपावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके व डाळींब, सिताफळ या फळ पिकासह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले आहे.
संगमनेर तालुका मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले दोन हजारावर लोकसंख्येचे शेंडेवाडी गाव आहे. 1693 हेक्टर क्षेत्रापैकी 775 हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. गावातील कौटुंबिक अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेंडेवाडीत सरासरी 450 मिलीमीटरपर्यंतच पाऊस पडतो. पडलेल्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने पाणी वाहून जाते, त्यामुळे गावात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होते. गावात पाण्याचा कुठलाही स्त्रोत नसल्यामुळे शेंडेवाडी बारमाही जिरायती गाव म्हणून ओळखले जाते. बाजरी, मटकी, हुलगे ही खरिपाची पिके घेतली जात होती. सरपंच उर्मिलाताई काळे, उपसरपंच बाळासाहेब डोळझाके यांच्यासह ग्रामस्थांनी अत्यंत बारकाईने ही कामे पूर्ण केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी अशोक कुटे, कृषी सहायक लक्ष्मण भोकनळ, ग्रामसेवक प्रभाकर पोटफोडे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले.
सर्वांसाठी पाणी- टंचाई मुक्त महाराष्ट्र- अंतर्गत अभियानाची जानेवारी 2015 मध्ये थेट शिवारात कामाला सुरूवात झाली. प्रथम गावाचा भौगोलिक अभ्यास झाला. लोकसहभाग वाढू लागला. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामानंतर शेतीतील पीकपद्धती बदलू लागली. शेतकरी भाजीपाला शेती करू लागले. उजाड माळरानात कुसळे दिसणाऱ्या शिवारात पाणी दिसू लागल्यामुळे आज शेतकरी, ग्रामस्थ आणि महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. शेंडेवाडीत साकारलेल्या कामांमुळे सुमारे 150 एकर शेती नव्याने सिंचनाखाली येईल, असा अंदाजही पहिल्या टप्प्यात कृषी विभागाकडून बांधण्यात आला आहे. या क्षेत्रात हरभरा, गहू, कांदा, उन्हाळी भूईमुग, मका व चारा पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.
शेंडेवाडी गावात गेल्यावर्षी या दिवसात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यंदा मात्र गावातील विहिरींना पाणी टिकून आहे. गावात शेतकरी भाजीपाला पिके घेत आहेत. टोमॅटोचे क्षेत्र वाढू लागले आहे. शेतकऱ्यांना दोन पिके घेणे शक्य झाल्याचे सरपंच उर्मिला भागा काळे सांगतात.
लेखक - गणेश फुंदे,
प्रभारी माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/31/2023
वायगाव निपाणी ग्रामपंचायतने केले लोकसहभागातून तलाव...