অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक

सिंचनाने समृद्ध पारगाव सुद्रीक

पाणीदार पारगाव सुद्रीकची नवी ओळख

  • शेततळे, तलावांमुळे बागायती क्षेत्रात वाढ
  • गावात सुमारे 90-95 टक्के ठिंबक सिंचन
  • राज्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून पारगावची ओळख
  • प्लॅस्टिक मल्चिंगवर शेतकऱ्यांचा भर
  • गावात गटशेतीची संकल्पना येतेय पुढे
महाराष्ट्रातील डोंगरमाथ्यावर असलेल्या पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली. आता तलाव, शेततळी, सूक्ष्म सिंचन, पॉलिमल्चिंग आदी उपायांद्वारा हे गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. राज्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून पारगावची ओळख तयार झाली आहे.
नगर जिल्ह्यात असलेल्या पारगाव सुद्रीक गावाला अनेक वर्षांपासून पिण्यासाठी व शेतीसाठी तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. काही वर्षांपूर्वी गावात तलाव बांधण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय झालीच, परंतु त्याचा शेतीसाठीही फायदा झाला. मात्र पाण्याबाबत जागरुकता निर्माण झाल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर वापर व त्याचे योग्य नियोजन सुरू केले.
गेल्या चार-पाच वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने कॅनॉललाही बारमाही पाणी नव्हते. वर्षातील सात ते आठ महिने पाण्याची टंचाई भासत होती. त्यातच गावाजवळील तलावही उन्हाळ्यात कोरडा पडत असे. त्यावर पर्याय म्हणून येथील शेतकरी कॅनॉलला पाणी आल्यानंतर तो तलाव भरून घ्यायचे. मात्र त्यात गाळ साठत गेला होता. त्यातील पाणी पातळी कमी झाली होती. मात्र शेतकऱ्यांनी गाळउपसा मोहीम सुरू केली.

दर वर्षी काढला जातो गाळ

गावात ज्या शेतकऱ्यांकडे खडकाळ जमीन आहे असे शेतकरी दर वर्षी या तलावातील गाळ काढतात. साधारणपणे 15 ते 20 शेतकरी तो गाळ शेतात नेऊन टाकतात. त्यामुळे शेतीही सुपीक होण्यास मदत होत आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे तलावातील गाळ अनेक शेतकऱ्यांनी काढला. त्याचा लाभ यंदा पाणीसाठा वाढण्यामध्ये झाला. तलावात यंदा जुलैपर्यंत पाणी टिकून राहिले आहे.

बागायती क्षेत्रात झाली वाढ

पंचवीस वर्षांपूर्वी गावात 20-25 टक्के क्षेत्र बागायती होते. आता 95 टक्के क्षेत्र बागायती पिकांखाली आले असून, त्यात सुमारे 50 ते 60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गावात द्राक्षे, डाळिंब, लिंबू, ऊस, भाजीपाला अशी विविध पिके घेतली जातात. यंदा गावात द्राक्ष सुमारे तीनशे हेक्‍टर, डाळिंबाचे 800 हेक्‍टर, लिंबू 300 हेक्‍टर, ऊस 50 हेक्‍टर, भाजीपाला पिके 200-250 हेक्‍टर अशी विविध पिके उभी आहेत.

गावात सुमारे 100 शेततळी

गावात पावसाची सरासरी 600-650 मिलिमीटर आहे, परंतु पाच-सहा वर्षांपासून पाऊस कमी होत असल्यामुळे पाण्याची चांगलीच टंचाई भासत होती. त्यामुळे कमी पाण्यात पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत 100 शेततळी घेतली आहेत. त्याचा लाभ सुमारे हजार ते बाराशे हेक्‍टर क्षेत्राला झाला आहे. सर्वाधिक लाभ फळबागांना झाला असून, फळबागांच्या क्षेत्रातही चार-पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गावात बहुतांश क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली

पारगावातील शेतकऱ्यांचा तंत्रज्ञानाकडे कल वाढला असून, त्यानुसार शेतीमध्ये बदल केला जात आहे. शेतकरी कमी पाण्यात येणारी पिके घेऊ लागला आहे. त्यात प्रामुख्याने फळबागांवर अधिक भर आहे. गावात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गटशेतीची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. सुमारे 95 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केला आहे.

चार पाणीवाटप संस्था

गावात चार पाणीवाटप संस्था स्थापन केल्या आहेत. यामध्ये माउली पाणीवाटप संस्था, सुद्रिकेश्‍वर पाणीवाटप संस्था, किसन कन्हैया पाणीवाटप संस्था, वडळी पारगाव पाणीवाटप संस्था यांचा समावेश आहे. या संस्था जेव्हा कॅनॉलला पाणी येते तेव्हा शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन पाण्याच्या समप्रमाणात पुरवठा करतात. त्यासाठी ठराविक रक्कमही शेतकऱ्यांकडून घेतली जाते. त्यामुळे शेतकरीही पाण्याचा काटेकोर पद्धतीने वापर करतात.

सुमारे 50 हेक्‍टरवर प्लॅस्टिक मल्चिंग

सध्या शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून, शेततळे, ठिबक सिंचनाबरोबर आता प्लॅस्टिक मल्चिंगकडे वळू लागले आहे. गावात सुमारे 50-60 हेक्‍टरवर प्लॅस्टिक मल्चिंगवर भाजीपाल्यासारखी पिके घेतली आहेत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया कमी झाली आहे. आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक मल्चिंगकडे वळणार आहेत.

पारगावकर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

"पाणी कमी असल्यामुळे सात वर्षांपूर्वी शेततळे घेतले. तलावातील, कॅनॉलचे पाणी त्यात वापरून ठिबकद्वारा ते शेतीला दिले जाते. त्यामुळे सध्या मला 25 एकर क्षेत्र सिंचनाखाली आणता आले. लिंबू, ऊस, डाळिंब, द्राक्षे अशी पिके घेता आली.''
- रमेश लडकत
"मला पाण्याचे महत्त्व गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी कळले होते. म्हणून गावात पहिल्यांदा शेततळे घेतले. त्याचा उपयोग पिकांना पाणी देण्यासाठी चांगला झाल्यामुळे पुन्हा गेल्या वर्षी दुसरे शेततळे घेतले आहे. त्यामुळे मला यंदा विविध पिके उन्हाळ्यात जगवता आली.''
- बाळासाहेब खेतमाळीस
दोन-तीन वर्षांपूर्वी पाणीटंचाईत दर वर्षी उन्हाळ्यात पिके जळत होती. त्यामुळे गावाजवळ असलेल्या पारगाव तलावात मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे तलावात पाणीसाठ्यात 10-12 टक्के वाढ झाली. शेततळी झाल्याने उन्हाळ्यातही शेतकऱ्यांना द्राक्षे, डाळिंब, लिंबू ही पिके घेता आली.
- शारदा हिरवे - सरपंच, 9960317855
पाण्याच्या योग्य नियोजनासाठी गावातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत शेततळी घेतली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला असून, भाजीपाला, फळबागा त्यांना घेता आल्या.
- व्ही. बी. दारकुंडे - 9423468409
तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा
---------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate