অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल !

शेततळ्यांमुळे गोजेंची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल !

औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुंभेफळ हे गाव… या परिसरातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. पर्जन्यमान कमी झाल्यास जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच परिसरातील विहिरी, बोअरवेल, तलाव, तळ गाठतात. अशा दुष्काळी परिस्थितीतही शासनाच्या सामुहिक शेततळे तसेच मागेल त्याला शेततळे या महत्त्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून अनिल विष्णू गोजे या शेतकऱ्याने आपल्या शेतात फळबाग लागवडीतून लाखो रूपयांचे उत्पादन घेतले आहे.

विष्णू गोजे यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाले असून त्यांना कोरडवाहू 15 एकर शेती आहे. वडिलांबरोबर त्यांनी सुरूवातीला पारंपरिक पद्धतीने शेती केली. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, सोयाबीन यासारखी विविध पिके ते सुरूवातीला घेत होते. परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांच्या उत्पन्नावर होत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न देखील हातात पडत नव्हते. त्यामुळे दरवर्षी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असे. पेरणीचा खर्च देखील यातून निघत नव्हता. या पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन विष्णू गोजे यांनी आधुनिक शेती करण्याचे ठरविले परंतु कमी पाण्याअभावी ते शक्य होत नव्हते.

गोजे यांनी शासनाच्या कृषी विभागाकडून सामूहिक व मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती घेतली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याच्या जिज्ञासेपोटी 2013 ला आपल्या गट नं 220 मध्ये सामूहिक शेततळे योजनेतून 30 बाय 20 फुटांचे शेततळे तयार केले. यासाठी त्यांना शासनाकडून सुमारे तीन लाखांचे अनुदान मिळाले. त्यांनी शेततळ्यातील पाण्यावर डाळिंब, पेरू आदी फळबागांची लागवड करून त्यात लसून, कांदा, आलं यासारखी आंतरपिके घेऊन एका वर्षातच सुमारे 10 लाखांचे उत्पन्न घेतले. त्यासोबतच एका शेततळ्यात सुमारे सहा हजार मत्स्यबीज टाकून राहू, कटला या माशांच्या विक्रीतून सुमारे 50 हजारांचे अधिकचे उत्पादन देखील मिळविले. शेततळ्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाल्याने मागेल त्याला शेततळे योजनेतून त्यांनी 30 बाय 20 फुटाचे दुसरे शेततळे तयार केले आहे. हे दोन्ही शेततळे एक एकर शेतात तयार करण्यात आले असून यावर्षीच्या पावसाळ्यात दोन्ही शेततळे तुडूंब भरले होते. मुबलक पाणीसाठा झाल्याने गोजे यांनी रोपवाटिका देखील तयार केली आहे. या रोपवाटिकेत पेरू, सीताफळ, बांबू, डाळिंब, जांभूळ आदी फळझाडांची रोपे तयार करून जिल्हाभरात त्यांची विक्री केली जाते. यामाध्यमातून अधिकचे उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे महत्तव पटवून दिले आहे.

आधुनिक पद्धतीने शेती तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असल्याने श्री. गोजे हे आता गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीकडे वळले आहेत. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 4 महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या शेततळ्यात सुमारे 600 शिंपले टाकले आहेत. शिंपले संवर्धनातून जवळपास 1200 मोती तयार होतील. यासाठी त्यांना 75 हजारांचा खर्च आला असून सर्व खर्च वजा जाता सुमारे दोन लाखांचे उत्पन्न पुढील आठ महिन्यात निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मोत्यांच्या शेतीतून डिझाईन मोती, राऊंड मोती, राईस मोती, मेटल उत्तक मोती अशा विविध प्रकारच्या मोत्यांचे उत्पादन घेतले जाते. या कामात त्यांना नाशिक येथील कृषी सहायक पेरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी, कुंभेफळ, हातमाळी, वरझडी, जयपूर, दुधड, भाकरवाडी, हिवरा, कन्नड, लाखेगाव, शेंद्रा आदी गावातील जवळपास 75 शेतकऱ्यांनी मोत्यांची शेती सुरू केली आहे.

-रमेश भोसले

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate